शतकाच्या उंबरठ्यावरील निफाडचे श्री माणकेश्वर वाचनालय


_Mankeshwar_Vachanay_2_1.jpgसी.के. गाडगीळ, व्ही.बी. सोनवणी आणि श्री जी.आ. उगावकर या तीन जणांच्या कमिटीने 1919 साली लावलेले रोपटे म्हणजे निफाड येथील ‘श्री माणकेश्वर वाचनालय’. त्यांनी तो ज्ञानयज्ञ त्या काळी प्रज्वलित करून मोठे, दूरदर्शी व बहुमोल कार्य केले! त्या वाचनालयाच्या निमित्ताने निफाडसारख्या ग्रामीण भागात, तेथील आदिवासी, अस्पृश्य शेतकरी आणि मध्यमवर्गीय गावकर्‍यांसाठी ते सांस्कृतिक व सामाजिक परिवर्तनाचे केंद्र निर्माण झाले आहे.

‘श्री माणकेश्वर वाचनालया’ची स्थापना 1919 साली करण्यात आली. भाऊराव उगावकर व त्यांचे सहकारी यांचे वाचनालय सुरू करण्याचे विचार किती स्वच्छ व प्रामाणिक होते ते पहिल्या बैठकीच्या अहवालावरून दिसून येते. त्यावेळी उपलब्ध असलेली वर्तमानपत्रे म्हणजे ‘इंदुप्रकाश’, ‘लोकसंग्रह’, ‘राजकारण’, ‘महाराष्ट्र’, ‘हिंदू मिशनरी’ व ‘राष्ट्र हितैषी’. तसेच, उपलब्ध असलेली मासिके म्हणजे ‘मधुकर’, ‘उधान’, ‘हिंद एजन्सी’, ‘लोक - शिक्षक’ इत्यादी. ती वाचकांसाठी उपलब्ध करून देण्याचे ठरवले. वाचनालयाच्या खर्चाने आरंभी केवळ चार रुपये पाच आण्यांची पुस्तके विकत घेतली गेली. वाचनालयासाठी पुस्तके भेट म्हणून मिळवली गेली. वाचनालयासाठी लागणा-या खुर्च्या, टेबले, जाजम, तक्के इत्यादी वस्तूही लोकांकडून भेट म्हणूनच मिळवल्या गेल्या. पहिल्या वर्षी, वाचनालयाचे सभासद एक रुपया मासिक वर्गणी देणारे तीन, आठ आणे वर्गणी देणारे पाच, तर चार आणे वर्गणी देणारे चौतीस नोंदले गेले. वाचनालयास एक वर्ष झाल्यानंतरच्या बैठकीमध्ये महत्त्वाचा पण गंमतीशीर विषय चर्चेस आला. तो म्हणजे, ‘टाईम्स ऑफ इंडिया’ आणि ‘बॉम्बे क्रोनिकल’ ही दोन वर्तमानपत्रे विकत घ्यावीत की नाही? कारण या दोन वर्तमानपत्रांची किंमत वाचनालयासाठी खूपच जास्त होती, अठ्ठेचाळीस रुपये! पण ती वर्तमानपत्रे घेण्याचे ठरले. पहिल्या वर्षाचा वाचनालयाचा खर्च बाहत्तर रुपये तेरा आणे आणि सहा पै एवढा झाला.

श्री माणकेश्वर मंदिर गावाच्या मध्यभागी असून त्या ठिकाणी शिवलिंगासमवेत पाच फूट उंचीची श्री विष्णूची मूर्ती पण आहे. मंदिराचा वरचा मजला वाचनालयासाठी देण्यात आला. शंभर वर्षांपूर्वी ज्ञानदानामध्ये मंदिरांचा सक्रिय सहभाग होता. मंदिराच्या सहभागामुळेच वाचनालयाचे नाव ‘श्री माणकेश्वर वाचनालय’ असे झाले.

श्री कोंडाजी पाटील सुक्नेकर, रावसाहेब एकबोटे, भाऊसाहेब वैद्य यांनी वाचनालयास आर्थिक मदत केली. वाचनालयास प्रथम महिला सभासद 1938 साली मिळाल्या. वाचनालय 1946 ते 1948 या काळात बंद ठेवावे लागले. ते 1948 साली पुन्हा सुरू झाले. वाचनालयाचे पुनरुज्जीवन करण्याचे काम भाईसाहेब गडकरी, रूपचंद जी बिनाकिया व बा.य.परीट गुरुजी यांनी केले. नंतर ‘माणकेश्वर वाचनालया’ने मान्यवर विद्वानांची विविध विषयांवरील व्याख्याने नियमित आयोजित करणे आरंभले.

लक्ष्मणराव उगावकर व प्रभाकर सोनवणी यांनी, त्यांच्या वडिलांच्या मृत्यूनंतर  दुस-या पिढीमध्येही वाचनालयाच्या कामाची जबाबदारी स्वीकारली व परंपरा पुढे चालू ठेवली. वाचनालयाची प्रगतीही साधली. त्यांनी फिरते वाचनालय व सेवा केंद्रे सुरू केली. ‘राजाराम मोहन रॉय फाउंडेशन’कडून (कोलकाता) पुस्तके येऊ लागली. त्या काळात वाचनालयास स्वतःची इमारत नव्हती. प्रसिद्ध समाज सेवक श्री शान्तिलालजी सोनी यांनी  ‘शांतीनगर गृहनिर्माण सोसायटी’मध्ये अल्प किंमतीत जागा 1984 मध्ये उपलब्ध करून दिली. वाचनालयास तेथे 1986 मध्ये छोटीशी पण आकर्षक वास्तू मिळाली. त्या साली वाचनालयास ‘अ’ दर्जा मिळाला. पुस्तकांची संख्या वीस हजारांपेक्षा जास्त झाली होती. नवीन वास्तू मिळाली तरीही श्री माणकेश्वर मंदिराच्या दुसर्‍या मजल्यावरील वास्तूतही वाचनालय चालू आहेच.

_Mankeshwar_Vachanay_1_0.jpgवाचनालयाची सभासद संख्या सहाशेवीस आहे. बाल सभासदांची संख्या  वाढवण्याचे प्रयत्न चालू आहेत. एकंदर ग्रंथसंख्या अठ्ठावीस हजार आहे. संदर्भ विभागात दोन हजार एकशेबेचाळीस ग्रंथ आहेत. सांस्कृतिक विभागातर्फे दरवर्षी महात्मा फुले जयंती, आंबेडकर जयंती, गुणवंत विद्यार्थी सत्कार, स्वातंत्र्यदिन, शिक्षकदिन, महात्मा गांधी, लाल बहादूर शास्त्री, पंडित जवाहरलाल यांच्या जयंती, तसेच बहिःशाल शिक्षण मंडळ (पुणे विद्यापीठ) यांची डॉ. जयकर व्याख्यानमाला, ज्येष्ठ नागरिक व्याख्यानमाला, यशवंतराव  चव्हाण व्याख्यानमाला, रानडे पुण्यतिथी व जयंतीनिमित जिल्हा स्तरीय वक्तृत्व स्पर्धा आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. त्यातून समाजोपयोगी अनेक विषयांवर चर्चा  होते.

संस्थेला 1994 मध्ये पंच्याहत्तर वर्षें पूर्ण झाली तेव्हा अमृत महोत्सव वर्ष साजरे करण्यात आले.

संस्थेने न्यायमूर्ती रानडे यांच्या राष्ट्रीय स्मारकाचा प्रकल्प साकारण्याचा निश्चय करून वाटचाल सुरू ठेवली आहे. त्यांच्या जन्मस्थानाची सव्वातीनशे चौरस मीटरची जागा मूळ मालकाकडून खरेदी करून त्या ठिकाणी वाचनालयाची तीन मजली भव्य वास्तू व दर्शनी भागात न्यायमूर्ती रानडे यांचा पुतळा स्थापन करण्याचा संकल्प आहे. काम पूर्ण होत आले आहे. न्यायमूर्ती रानडे यांच्या जीवनातील प्रसंग चित्ररूपाने साकारले गेले आहेत. त्यांच्या समग्र लेखनाचे ज्यात त्यांची पत्रे, लेख, भाषणे इत्यादी सर्व विचारधन आहे त्याचे वेगळे दालन करून देण्यात येत आहे. ते संकलित करून वाचकांना उपलब्ध करून देण्यात येईल.

नवीन वास्तूत तळमजल्यावर न्या. रानडे स्मारक व वाचन कक्ष, पहिल्या मजल्यावर ग्रंथालय व अभ्यासिका आणि दुसर्‍या मजल्यावर सभागृह अशी योजना आहे.

- पुरुषोत्तम कर्‍हाडे

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.