विरगावचा भोवाडा


_Veergaoncha_Bohada_1.jpgआमच्या विरगावला भोवाड्याची परंपरा कायम आहे. दरवर्षी आखाजीच्या आसपास चैत्र-वैशाख महिन्यात भोवाडा व्हायचा. तरी दरवर्षीचे सातत्य पूर्वीसारखे आता उरलेले नाही. चैत्र-वैशाख म्हणजे उन्हाळा. शेतक-यांना कामे उन्हाळ्यात फारशी नसतात. खेड्यापाड्यांवर उन्हाळ्यातील लोकरंजन म्हणून भोवाड्याची लोकपरंपरा टिकून राहिली असावी. मात्र रंजनाला अनेक माध्यमे उपलब्ध झाल्याने लोकपरंपरेचा तो प्रकार अलिकडे क्षीण होऊ लागला.

भोवाडा सुरू होण्याच्या पंधरा दिवस आधीपासून गावक-यांमध्ये भोवाड्याचा उत्साह दिसून येत असे. चैत्र पुनवेला गावातून भोवाड्याची दांडी मिरवून, पेठ गल्लीतील भोवाड्याच्या नियोजित ठिकाणी पूजाअर्चा करून दांडी रोवली जात असे. सागाच्या लाकडाच्या दांडीच्या वरच्या टोकाला वाळलेल्या *रोयश्याचे गवत बांधून तयार केलेली दांडी वाजतगाजत-नाचवत तिची मिरवणूक गावभर काढली जात असे. त्यामुळे गावात भोवाडा होणार असल्याची वर्दी संपूर्ण गावाला मिळत असे. 

भोवाड्याच्या कार्यक्रमाला प्रत्यक्ष सुरुवात होण्याच्या दोन दिवस आधी गावात सोंगे आणली जात. विरगावजवळ खामखेडा नावाचे गाव आहे. तेथून सोंगे (मुखवटे) भाड्याने आणली जात. सोंगे त्यांची मोडतोड होणार नाही अशी काळजी घेत दोन बैलगाड्यांमध्ये आणून चावडीजवळील शाळेत ठेवली जात असत. सोंगे पाहण्यासाठी लहान मुलांसोबत गावातील थोराडही त्या खोलीभोवती गर्दी करायचे. सोंगे कागदाचा भिजलेला लगदा आणि त्याला चिकटपणा येण्यासाठी मेथीचे पीठ एकत्र कालवून तयार केली जात. काही सोंगांना मोठमोठ्या ताट्याही असत. त्या ताट्या टोकराच्या म्हणजे बांबूच्या कामट्यांपासून बनवलेल्या असत. रावण, विराट, आग्या वेताळ अशा सोंगांना मोठ्या आकाराच्या ताट्या असत. 

एकेका सोंगाचा लिलाव भोवाडा सुरू होण्याच्या दिवशी चावडीजवळ करण्यात येत असे. लिलाव फक्त एका रात्रीसाठी असे. भोवाडा संपल्यानंतर पहाटेला दुसर्‍या दिवशीच्या भोवाड्यासाठी सोंगांचा पुन्हा लिलाव करण्यात येई. सोंग नाचवण्याचा मान सर्वात जास्त बोली बोलणा-याला मिळे. त्या पैशांमधून भोवाड्याचा खर्च भागवला जात असे. सोंगांचे भाडे, टेंभ्यांचे रॉकेल, संबळ वाद्याचे पैसे, तमाशाचे पैसे, टेंभा धरण्यासाठी लावलेल्या माणसांचा पगार लिलावाच्या पैशांतून दिला जात असे.
सोंग घेणा-या माणसाला सोंग बांधण्याअगोदर रात्री सजवत. म्हणजे गणपतीच्या सोंगासाठी त्याला पितांबर नेसवतात.

एकादशीचे सोंग घेणा-या माणसाला लुगडे नेसवतात, दागिने घालतात, मेकअप करतात. भोवाड्यात सर्वप्रथम बेलबालसलाम नावाचे तीन शिपायांचे सोंग निघते. तोंडाला रंग दिल्याने त्यांच्या तोंडाला सोंग बांधण्याची गरज उरत नाही. ते शिपाई भोवाडा सुरू करण्यासाठीचे सूत्रधार असत. ते चावडीपासून पूर्वेकडे नाचत वडाच्या झाडापर्यंत येऊन परत फिरत आणि भोवाड्याच्या मध्यभागी येऊन ‘होऽऽ’ असे म्हणत. त्यांनी तसे म्हणताच संबळ वाद्य बंद होत असे. शिपाई म्हणत, ‘गणपतीची सवारी येऊ येऊ करत आहे होऽऽ’ आणि पुन्हा वाद्ये वाजू लागत. शिपाई नाचत चावडीकडे निघून जात. त्यानंतर मग धोंड्या, गणपती, सरस्वती, दत्तात्रेय, एकादशी, द्वादशी, त्रयोदशी, खंडेराव, मगरमासा, कच्छ, मच्छ, तंट्याभील, विराट, रावण, वराह, मारुती, बिभीषण, आग्यावेताळ, हुरनारायण (नरसिंह), दैत्य, नंदी, अस्वल, चुडेल, इंद्रजित, जांबुवंत, नरशू, विरभद्र, चुडेल-डगरीन, बाळंतीण बाईची खाट, चंद्र, सूर्य अशी सोंगे येत. ती सोंगे पेठ गल्लीत साधारणत: दोनशे मीटरपर्यंत नाचत पुढे जात आणि तशीच परत येत. प्रत्येक सोंग नाचण्यासाठी संबळावर वेगवेगळ्या चाली लावाव्या लागत. त्या चालींवर ती सोंगे नाचत. भोवाडा पेठ गल्लीत अर्थात गावाच्या मुख्य गल्लीत होतो. संपूर्ण गाव त्यांच्या लेकराबाळांसह गल्लीच्या दोन्ही बाजूंच्या ओट्यांवर जमिनीवर खाटा टाकून, गोणपाट अंथरून भोवाडा पाहण्यासाठी गर्दी करत. बाया-माणसे, म्हातारी-कोतारी, लहानसहान पोरे अशी ती गर्दी असे. संपूर्ण गाव तीन रात्री जागरण करून भोवाडा पाहत असे. भोवाडा पाहण्यासाठी आजुबाजूच्या दूरदूरच्या गावांची माणसेही येत असत. 

_Veergaoncha_Bohada_2_1.jpgप्रत्येक सोंगाच्या मागेपुढे टेंभे घेतलेली दोन दोन माणसे असत. परंतु आग्या वेताळसारख्या सोंगाला आठ टेंभे लावले जात. टेंभा म्हणजे मशाल. सोंगे टेंभ्याच्या उजेडातच पाहवी लागत. त्यासाठी बत्ती किवा कंदील लावण्याची पद्धत नव्हती. *चंद्रे या वनस्पतीच्या ओल्या फांद्यांच्या एका टोकाला कापडांच्या चिंध्या बांधून टोक रॉकेलमध्ये बुडवून पेटवतात. त्याला टेंभा म्हणतात. टेंभ्यांबरोबर एकजण रॉकेलचे डबे उघडे घेऊन चालत असतो. एकाद्या टेंभ्याचे रॉकेल संपत आले, की टेंभावाला जळता टेंभा रॉकेलच्या डब्यात बुडवून टेंभा पुन्हा चांगल्या पद्धतीने पेटवतो. भोवाडा टेंभ्याच्या प्रकाशात रात्रभर चालतो.  

एका सोंगानंतर दुसरे सोंग येते. दोन सोंगांमध्ये वेळ शांत जाऊ नये म्हणून त्या वेळेत तमाशावाले प्रेक्षकांचे मनोरंजन करत. गाणी, लावण्या, लोकगीते, पोवाडा, नाच, नकला असे प्रकार तमाशात असत. भोवाड्याच्या मध्यभागी भोवाड्याची दांडी रोवलेली असते, ‍तेथे एका बाजूला तमाशा थाटलेला असायचा. पडद्याचा उपयोग केला जात नाही. मोकळे अवकाश हाच तमाशाचा पडदा असतो. तमाशाजवळ दोन बत्त्या टांगलेल्या असत. सोंग येण्याचे संबळ वाजू लागले की तमाशा बंद होत असे आणि सोंग येऊन गेले, की तो पुन्हा सुरू होई.

आग्या वेताळाचे सोंग मध्यरात्रीच्या आसपास निघत असे. सोंगाचा आकार मोठा आणि अक्राळविक्राळ असे. त्याच्या उघड्या तोंडातील मोठ्या दातांतून लालभडक जीभ लोंबकाळताना दिसे. कंबरेला *कांबडींचे रिंगन तयार करून त्याला चोहो बाजूंनी टेंभे लावलेले असत. दोन मडकी दोन हातांत असतात. त्यातून जाळ निघत असे. सोंग घेणारी व्यक्ती गरजेपुरते अंग झाकून बाकी उघडीबंब असे. त्या उघड्या अंगावर लालभडक रंगाचे पट्टे ओढलेले असत. आग्या वेताळाचा तो भयानक अवतार सर्वांना घाबरवून सोडत असे. वेताळ म्हणजे भुतांचा राजा. वेताळाचे सोंग भोवाड्याच्या मध्यभागी आले, की त्याची पूजा करून त्याला नारळ फोडला जात असे.

आग्या वेताळाचे सोंग निघण्यापूर्वी वातावरण निर्मितीसाठी चुडेलींचा खेळही दाखवण्यात येत असे. चुडेल म्हणजे स्त्री लिंगी भूत. भीती वाटेल असा विद्रूप काळा चेहरा, मोकळे सोडलेले केस, वेडेवाकडे शरीर असे चुडेलीचे काल्पनिक रूप आहे. चुडेलीचे सोंग देवराव महाले नावाचे गृहस्थ अप्रतिम साकारायचे. त्यांनी घेतलेले सोंग बघून खरोखरची चुडेलही घाबरली असती! चुडेल केवळ रंगरंगोटी, अंगावरचे कपडे, हातात कडुनिंबाचा पाला आणि बीभत्स नाच यांच्या बळावर सर्वांना घाबरवून सोडत असे. चुडेलींची संख्या तीन-चारपर्यंत असूनही देवराव महालेची चुडेल भाव खाऊन जायची. चुडेली भोवाड्यात पेठेतील कोणत्याही बोळीतून एकदम प्रवेश करायच्या. म्हणूनच त्यांची दहशत भोवाड्यात सर्वाधिक असायची. चुडेली निघायच्या अगोदर भोवाड्याच्या मध्यभागात एक गवळी आणि गवळण लोणी काढायचे नाटक करत. तेव्हा ते गाणीही गात असत:

घुसळन घुसळन दे बाई, लोनी अजून का नाही
लोनी येईना ताकाला, माझा गवळी भूकेला

चुडेली लोणी खाण्यासाठी अचानक निघत. चुडेलींच्या नाचानंतर आग्या वेताळ निघत असे. चुडेलींच्या खेळाला आग्या वेताळची *सपातनी असे म्हणत. 

भोवाडा संध्याकाळची जेवणे आटोपल्यावर सुरू होत असे आणि तो सकाळी सूर्योदयाच्या वेळी बंद होई. रात्र संपूनही सोंगे मात्र संपत नाहीत, म्हणूनच ‘रात्र थोडी सोंगे फार’ अशी म्हण रूढ झाली आहे. म्हण ही लोकपरंपरेकडूनच भाषेला मिळालेली देणगी असते.

काही सोंगे उदाहरणार्थ, चंद्र, सूर्य, मारुती, बिभीषण, जांबुवंत, इंद्रजित, नरसिंह, देवी ही फक्त शेवटच्या रात्री निघत. चंद्र-सूर्य दिवस उगवण्याच्या वेळी निघत. नरसिंहाचे सोंग पूर्वेकडून निघत असे. त्या सोंगासाठी कागदांचा मोठा पडदा तयार केला जाई. तो पडदा दोन्ही बाजूंनी लोक धरून ठेवत आणि नरसिंहाचे सोंग तो पडदा फाडून बाहेर येई. नरसिंह अवतार लाकडी खांबातून बाहेर आला. त्या कथानकाला अनुसरत भोवाड्यात तो कागदाचा पडदा फाडून बाहेर येतो. नरसिंह जमिनीवर लोळण घेई. पुन्हा उठून हातात ढाल असलेल्या माणसावर धावून जाई. तो त्याच्या हातातील लोखंडी कड्या त्याच्या हातातील ढालीवर आपटून जमिनीवर लोळण घेई. त्याच्या मागेपुढे हातात ढाली घेतलेले दोन लोक असत.

देवीचे सोंग तिसर्‍या रात्रीनंतरच्या सकाळी निघत असे. ते दुपारपर्यंत सर्व गावभर मिरवले जाई. देवीचे सोंग फक्त भोवाड्यापुरते नाचत नाही. ते भोवाड्याच्या सुरुवातीपासून सकाळी निघाले, की मिरवणूक संपूर्ण गावातून झाल्याशिवाय त्याची सांगता होत नसे. देवीची आरती, पूजा घरोघरी केली जात असे. देवीचे सोंग एकदा बांधले, की मिरवणूक गावभर पूर्ण होईपर्यंत सोडता येत नाही. म्हणून सोंग घेणार्‍याचा थकवा घालवण्यासाठी सोंगाच्या तोंडातून गव्हाच्या काडीने त्याला दूध पाजले जात असे. त्याला मिरवणूक पूर्ण होईपर्यंत काही खाता येत नसे. देवीची पूजा करून तिची ओटी खणानारळाने घरोघरी भरली जात असे. देवीचे सोंग संपूर्ण गावातून मिरवून झाले, की जेथून भोवाडा सुरू होतो तेथे आणून पूजेनंतर सोडले जायचे. तोपर्यंत त्या दिवसाचा तिसरा प्रहर टळून गेलेला असायचा. 

देवांसोबत दैत्यांचेही दर्शन सोंगांमधून दाखवून गाव व परिसरातील लोकांचे मनोरंजन पूर्ण होत असे व आमच्या गावातील तीन दिवसांच्या पारंपरिक भोवाड्याची सांगता होत असे.

हा देवी भोवाडा. अहिराणी भागात भोवाडा दोन प्रकारचा असतो. देवी भोवाडा आणि रामायण भोवाडा. देवी भोवाडा तीन दिवसांचा असतो आणि तो गावाच्या मुख्य गल्लीत या टोकापासून त्या टोकापर्यंत सोंगांनी नाचून आणि हावभाव करत साजरा करायचा असतो. सोंगे घेतलेले लोक फक्त नाचतात, भाषणे करत नाहीत. रामायण भोवाडा पाच दिवसांचा असतो. तो विशिष्ट जागी व्यासपीठ तयार करून सादर केला जातो. त्यात पात्रे मुखवटे धारण करतातच, पण त्यांची नेमून दिलेली भाषणेही करतात. म्हणून रामायण भोवाडा हा नाटक प्रकाराकडे झुकलेला दिसतो. रामायण भोवाड्यातून रामायणाचे सार सांगितले जाते आणि शेवटच्या दिवशी रामाकडून रावणास मारले जाते.

टीप - लेखात स्टार मार्क केलेल्या शब्दांचा अर्थ खालीलप्रमाणे :
रोयसा - रोयसा ही गवतासारखी दिसणारी औषधी वनस्पती. वाळलेल्या रोयश्याचा चहा करतात. या वनस्पतीची शरीराला वाफ दिली तर अंगातले रक्त शरीरभर पसरते असा समज आहे.   
कांबडीचे रिंगन - बांबूच्या उभ्या आकारात फळ्या केल्या, की त्यांना कामटी म्हणतात. अहिराणीत कांबडी. या कांबडीपासून गोल रिंगण तयार करून आग्या वेताळचे सोंग घेणार्‍या माणसाच्या कंबरेला बांधतात आणि छोट्याश्या टेंभ्यांची आगही निर्माण करतात.  
सपातनी - सपातनीला मराठीत संपादणी म्हणता येईल, पण सपातनी या अहिराणी शब्दाचा अर्थ नक्कल करणे वा विडंबन करणे असा होईल. 
चंद्रे - चंद्रे ही अहिराणी पट्ट्यात दिसणारी वनस्पती आहे. या वनस्पतीच्या फांद्यांमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. म्हणून टेंभ्यासाठी ही वनस्पती वापरली तर ती लवकर जळत नाही. सहज हातात धरता येते.

- डॉ. सुधीर रा. देवरे, 9422270837, 7588618857
Email : sudhirdeore29@rediffmail.com
ब्लॉग : http://sudhirdeore29.blogspot.in/

लेखी अभिप्राय

Dr. Devre ! your attempt is very good. This is history and culture of Maharashtra. keep it up.

Dr. Sopan Shende05/11/2017

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.