नाशिकरोडची लोकनाट्य-मेळा संस्कृती


_Nasik_Loknatya_Mela_2.jpgनाशिकरोड हे नाशिकचे उपनगर. मध्य रेल्वेचे नाशिकला जाण्यासाठी रेल्वेस्टेशन. इंग्रजांच्या काळात ‘इंडिया सिक्युरिटी प्रेस’ आणि ‘करन्सी नोट प्रेस’ नाशिकमध्ये सुरू झाल्याने तेथील कामगारांमुळे वस्ती वाढली, बाजारपेठ फुलली. नाशिकरोड गाव वसत गेले. तेथील सामाजिक आणि सांस्कृतिक जडणघडण करणाऱ्या कार्यक्रमांमध्ये लोकनाट्य आणि मेळे यांचा वाटा महत्त्वाचा आहे. तमाशे देवळाली गावात ग्रामदैवत म्हसोबा महाराजांच्या यात्रोत्सवात होत. गायन-नृत्याची मेजवानी शिवजयंती, आंबेडकर जयंती अशा उत्सवांच्या काळात मिळे. गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव या काळात होणाऱ्या लोकनाट्य-मेळ्यांनी मनोरंजनातून प्रबोधनाचेही काम केले.

नवरंग, सारंग, बबनराव घोलपनिर्मित जयशंकर, गोसावीवाडीतील प्रेम खरे यांचे प्रेम, गीतांजली, स्वरसंगम अशा विविध संगीत मेळ्यांनी आबालवृद्धांचे १९८०च्या दरम्यान दिलखुलास मनोरंजन केले. मेळ्यांची, लोकनाट्यांची बहारदार मेजवानी एक दशकपर्यंत नाशिकरोडकरांनी अनुभवली. त्या कार्यक्रमांतील विनोदाची जातकुळी म्हसोबाच्या यात्रेतील तमाशांपेक्षा वेगळी असे. लोकनाट्य-मेळ्यांनी विनोदातून वैचारिक-प्रबोधनात्मक विचारांची मांडणी केली. मेळ्यांचे वैशिष्टय म्हणजे त्यांतील कलावंतांपासून सर्व तंत्रज्ञ मंडळी सर्वसाधारण कुटुंबांतून आलेली असत. त्यांची मानधनाची फार अपेक्षा नसे.
नाशिकरोडचे देवळाली गाव आणि परिसर हा मेळ्यांचा बालेकिल्ला. तेथील जणू प्रत्येक गल्लीत आणि वाड्यामधील घराघरात हरहुन्नरी कलावंत घडले. कलावंत स्थानिक असल्याने मेळ्यासाठी जुळवाजुळव करणे सोपे जात असे. परंतु केवळ दोन घडींचे मनोरंजन हा मेळ्यांचा वरकरणी हेतू भासे. मात्र त्यांचा रोख अंधश्रद्धा निर्मूलन, अनिष्ट रूढी-परंपरा व वाढती व्यसनाधीनता यांना विरोध, कुटुंब नियोजन, हुंडाबंदी अशा सामाजिक प्रबोधनात्मक विषयाकडे असे. त्यांनी प्रबोधनाची उज्ज्वल परंपरा जपली.

तुटपुंजे मानधन, तालमीसाठी एक-दोन महिन्यांची तयारी, पदरखर्चाने मेळा उभारणी, स्वतःचा नोकरी व्यवसाय सांभाळून मेळ्यांत सर्वस्व झोकून दिलेले, प्रेक्षकवर्गांनी कधी हुल्लडबाजी केली तर तिची तमा नसलेले, असे तन्मयतेने काम करणारे ते मेळ्यांतील कलावंत असत.

मला आठवते, १९८०नंतरचा दोनेक वर्षांचा काळ असावा. ‘नवरंग संगीत मेळ्या’ने गणेशोत्सव-नवरात्रात नावलौकिक मिळवला होता. देवळाली गावातील बाबू गेनू रोडपुढील वरची गल्ली या ठिकाणी मेळ्याचे आयोजन करण्यात आले होते. जगन्नाथ नागरे यांच्या विनोदी अदाकारीने ‘तुफान हास्याचा धबधबा’ अशी प्रसिद्धी पंचक्रोशीत मिळवली होती. आम्ही मुले नेहमीप्रमाणे सर्वात पुढे बसलो. राजू तागडसारखी मित्रमंडळी शेजारी होतीच. मेळ्यातील संवाद कानात भरून घेतलेले असल्याने लगेच तोंडपाठ व्हायचे. मेळा खूपच गाजला. प्रत्येक संवादाला, विशेषतः जगन्नाथ नागरे यांच्या प्रत्येक वाक्याला हमखास टाळ्या मिळायच्या. राजू आणि मी तसाच मेळा करण्याचे ठरवले. धनगर गल्ली, सुनावाडा, कुंभारगल्ली, जगतापवाडा, वालदेवी नदीचा परिसर या ठिकाणच्या कचराकुंड्या, उकिरडे पालथे घातले. मेळ्यासाठी आवश्यक वस्तू गोळा केल्या आणि इतरांच्या टाकाऊ-फेकलेल्या वस्तूंमधून आमचा (अल्पजीवी) टिकाऊ मेळा उभा राहिला!

_Nasik_Loknatya_Mela_1.jpgनावाजलेला मेळा गल्लोगल्ली झाला, की आम्हा मुलांचे मेळे दुसऱ्या दिवशी तेली गल्ली आणि धनगर गल्ली यांच्या कोपऱ्यावर केळ्यांच्या गाडीवर रंगायचे. राजू तागड हा जगन्नाथ नागरे यांची भूमिका करायचा. मी निवेदनाला असायचो - तेव्हापासून निवेदनाचा लागलेला लळा अजूनही सुटलेला नाही. मेळ्यांच्या स्मृती मनात रुंजी घालत आहेत.

मेळ्यानंतर लोकनाट्याची चळवळ ‘सप्तशृंग थिएटर्स’सारख्या संस्थांनी सुरू केली. लोकनाट्य नांदी, नमन, गण-गवळण आणि शेवटी वगनाट्य अशा क्रमाने तमाशाप्रमाणे रंगत जाई. लोकनाट्ये गावातील पारावर किंवा चौकाचौकात रंगमंच उभारून तेथे सादर होत. ‘यमाची रजा आणि हवालदारांची मजा’ या तुफान गाजलेल्या लोकनाट्याचा पहिला प्रयोग देवळाली गावातील शनी मंदिराजवळ झाला होता. महाराष्ट्राचे माजी मंत्री बबनराव घोलप आणि जगन्नाथ नागरे या जोडगोळीने रसिकांना पोट धरून हसायला लावले होते. त्या कलावंतांसह मधुकर गांगुर्डे, सुशीला हंडोरे, लता लहामगे, केशव साळवे, भारत भालेराव, रतन भालेराव, शाहीर दत्ता वाघ, बाळकृष्ण मंडलिक, शाहीर मदन केदारे, विठ्ठल श्रीवंत, पंढरीनाथ देवकर, शाहीर दत्ता शिंदे, भास्करराव थोरात, प्रेम खरे अशा कलावंतांनी आमचे बालपण समृद्ध केले.

त्या वेळच्या लोकनाट्यांना लोकाश्रय लाभला, पण राजाश्रय नव्हता. ते त्यांच्या कलेशी प्रामाणिक राहिले. उत्सवाचे स्वरूप बदलले. उत्सव, जत्रा ‘डिजे’वर तरुणाई थिरकू लागली. मेळे-लोकनाट्यांच्या प्रबोधन परंपरेने एकोणिसशेनव्वदच्या दशकानंतर दोन-चार वर्षांतच परिसराचा कायमस्वरूपी निरोप घेतला!

- रवींद्र मालुंजकर, 9850866485, 9423090526
 rmmalunjkar@gmail.com
 

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.