सर्पमित्र दत्ता बोंबे


_Datta_Bombe_1.jpgकल्याणचे 'दत्ता बोंबे' यांची सर्पमित्र म्हणून ख्याती आहे. ते लहानपणापासून मासे पकडण्याचे शौकिन होते. ते यशस्वी गिर्यारोहकसुद्धा आहेत. त्यांनी स्वत: अनेक ठिकाणी गिर्यारोहण केले आहे आणि इतरांनादेखील गिर्यारोहणाचे धडे दिले आहेत. त्यांनी त्यांचे आयुष्य पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन यासाठी खर्च केले असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. त्यांनी पशुपक्ष्यांना राहण्यासाठी; तसेच पर्यावरणाचे संवर्धन व संरक्षण यांसाठी अनेक ठिकाणी रानटी झाडांची लागवड केली. ते तशीच प्रेरणा इतरांना देत असतात. त्यांचा हा अट्टाहास निसर्गातील अन्नसाखळी कायम राहवी म्हणून असतो. 
ते भारत सरकारच्या अंबरनाथ येथील ‘ऑर्डनन्स फॅक्टरी’मध्ये अग्निशामक विभागात नोकरी करतात. बोंबे यांना विषारी आणि बिनविषारी अशा सर्व प्रकारच्या सर्पांची इत्थंभूत माहिती आहे. ते सर्प पकडत असताना सापांप्रमाणे स्वतःचीही काळजी घेतात. त्यांच्याकडे आवश्यक असणारे चिमटे, काट्या, टॉर्च अशी साधने उपलब्ध आहेत.
त्यांनी कल्याण ते शिर्डी व शिर्डी ते कल्याण असा पाचशेआठ किलोमीटरचा प्रवास सायकलवरून केला आहे. ती सायकल मोहीम ‘कल्याण अग्निशामक दल’ आणि ‘ऑर्डनन्स फॅक्टरी फायर ब्रिगेड’ यांनी आयोजित केली होती. दत्ता बोंबे यांनी जानेवारी १९९६ मध्ये पर्यावरण विषय घेऊन कल्याण ते गोवा व गोवा ते कल्याण सायकल मोहिमेचे नेतृत्व केले होते. त्यांना पर्यावरण मंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला.
बोंबे हे कल्याणच्या ‘शिवगर्जना गिरिभ्रमण संस्थे’चे सदस्य आहेत. त्यांनी त्या संस्थेच्या माध्यमातून गडकिल्ल्यांवर स्वच्छता मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवला आहे. शिवाय, अतिउत्साही ट्रेकर्सचे डोंगर, दरीत पडून झालेल्या अपघातग्रस्तांचे प्रेत काढण्याचे धाडसी कार्य दत्ता बोंबे करत आले आहेत. ते शाळा-कॉलेजांच्या सुट्ट्यांत विद्यार्थ्यांमध्ये धाडसी वृत्ती सामावण्यासाठी विविध शिबिरे घेत असतात. त्यांना गिरिभ्रमण करत असताना सतत डोंगर-दऱ्यांच्या सहवासामुळे अनेक प्रकारच्या सर्पांची तोंडओळख व्हायची, म्हणजेच विविध प्रकारचे सर्प पाहण्यास मिळायचे. त्यामुळे त्यांचा सापांच्या जातीबाबत अभ्यास दांडगा होत गेला. त्यांनी सापांमध्ये सर्वात विषारी म्हणून ओळखला जाणारा 'किंग कोब्रा' पकडण्याचे स्वप्नही पूर्ण केले. बोंबे यांच्याकडे कल्याण, डोंबिवली; तसेच दूरवरून बहुतांश तरुण सर्प पकडण्याचे प्रशिक्षण घेण्यासाठी येत असतात. त्यांनी त्यांच्यामधून एक टीम तयार केली आहे. बोंबे यांना दिवस-रात्र कधीही फोन येत असतात, की 'आमच्या घरात साप घुसला आहे तुम्ही लवकर या'... ते निःस्वार्थपणे घटनास्थळी धाव घेतात. त्यांना शक्य न झाल्यास ते त्यांच्या सहकाऱ्यांना घटनास्थळी पाठवतात.
_Datta_Bombe_2_2.jpgकल्याणच्या अग्निशामक दलाने दत्ता बोंबे यांना सर्प ठेवण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली आहे. पकडलेले सर्प काही दिवस त्या ठिकाणी संग्रहीत करण्यात येतात. त्यांनंतर ते वनविभागाच्या जंगलक्षेत्रात सोडले जातात. बोंबे यांनी सापांच्या फोटोसहित, माहितीची पोस्टर्स तयार केली आहेत. त्यांची प्रदर्शने भरवली जातात. दत्ता बोंबे यांच्यासोबत त्यांची पत्नी आणि दोन्ही मुलेही साप पकडण्यात माहीर झाले आहेत.
बोंबे यांनी उत्तर काशी, उत्तरांचल; तसेच रक्षा मंत्रालयाच्या अधिपत्याखाली असलेल्या ‘नेहरू पर्वतारोहण संस्थे’अंतर्गत बेसिक पर्वतारोहण कोर्सेस पूर्ण केले आहेत. ते हिमालयातील परिसरातसुद्धा पर्वतारोहण करत असतात. त्यांना 'कल्याणरत्न' पुरस्कार, 'सच्चान स्मृती' महापौर पुरस्कार, रोटरी क्लबचे 'डायमंड्स व्होकेशनल अॅवार्ड' प्रदान करण्यात आले आहेत.
- राम सुरोशी 
9220489579
इमेल ramsuroshi214@gmail.com

लेखी अभिप्राय

खुप छान लेख.
एक मनस्वी गिर्यारोहक व सर्पमीञ दत्ता आम्हाला अभिमान आहे.लेखकाचे आभार

Prakashvishnuw…14/10/2017

खुप छान लेख.
एक मनस्वी गिर्यारोहक व सर्पमीञ दत्ता आम्हाला अभिमान आहे.लेखकाचे आभार

Prakashvishnuw…14/10/2017

लेख वाचून खूप छान वाटले, दत्ता सर व्हेरी nice

Dhanashri arun borse02/03/2018

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.