गुरुवर्य सोनोपंत (मामासाहेब) दांडेकर (Sonopant Dandekar)
गुरुवर्य शंकर वामन दांडेकर ऊर्फ सोनोपंत (मामासाहेब) दांडेकर यांचा जन्म २० एप्रिल १८९६ रोजी पालघर जिल्ह्यातील माहीम येथे झाला. त्यांचे बंधू बाबासाहेब दांडेकर हे विद्वान व त्यागी देशभक्त. सोनोपंतांना घरचे उत्तम वळण, तशीच बुद्धिमत्ता व सात्त्विकता अशी अनुकूल परिस्थिती लाभली. घराजवळ वै. वा. जोग महाराज राहत. सोनोपंतांना त्यांच्या मुखातून श्रीज्ञानेश्वरी, भजन, कीर्तन ऐकण्यास मिळे. घराजवळ जसे जोग महाराज तसे कॉलेजात त्यांचे प्रोफेसर तत्त्वज्ञ गुरुदेव रा.द.रानडे हे होते. पुढे, दांडेकर स्वत: तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक झाले.
मामासाहेबांच्या ठायी पौर्वात्य व पाश्चिमात्य तत्त्वज्ञानाचा गाढा व तुलनात्मक अभ्यास आणि अनुभव यांचा अपूर्व संगम झाला होता. त्यांनी वयाच्या पंचावन्नाव्या वर्षांपर्यंत कॉलेजात विद्यार्थ्यांना शिकवण्याचे काम केले. दिवसा ते काम; व ते संपल्यावर श्रीज्ञानेश्वरी संबंधीच्या कीर्तनाद्वारे समाजात नैतिक व धार्मिक शिक्षण देण्याचे त्यांचे कार्य सुरू होई. ते आयुष्यभर अखंड चालू होते. शाळा-कॉलेजातील विद्यार्थी असोत, अशिक्षित वारकरी असोत किंवा व्यसनी, वाममार्गाला लागलेला मनुष्य असो, त्यांनी समाजाची पातळी उंचावण्याचे महान कार्य सातत्याने केले. मामासाहेबांनी त्यांच्या उदाहरणाने ‘तत्त्वज्ञानी मनुष्याने समाजापासून अलिप्त न राहता समाजामध्ये मिसळून त्यांच्यापुढे उत्तम ध्येय ठेवणे हे किती आवश्यक आहे, तसेच पारमार्थिक मनुष्य व्यावहारिक जबाबदारीसुद्धा किती उत्कृष्ट रीतीने पार पाडतो हे दाखवले आहे’ असे गुरुदेव रानडे यांनी त्यांच्याबद्दल लिहून ठेवले आहे. मामासाहेब हे नैष्ठिक ब्रह्मचारी होते. त्यांनी लौकिक असा संसार केला नाही. ते अपरिग्रही जीवन जगले. ते निर्वाहापुरते ठेवून बाकीचा पैसा गरीब विद्यार्थी व वारकरी यांना वाटून टाकत. ते वडिलोपार्जित शेती व घरदार यांस कधीही शिवले नाहीत. त्यांनी ‘सार्थ श्रीज्ञानेश्वरी’ ग्रंथ छापून प्रसृत केला. मात्र त्यांनी त्यातील उत्पन्नातून स्वत:साठी कवडीचादेखील उपयोग केला नाही. ते स्वत: श्रीज्ञानेश्वरी जगले. त्यांनी त्यांचा देह पुणे येथे ९ जुलै १९६८ (आषाढ शुद्ध १३) रोजी ठेवला. त्यांची पुणे ते आळंदी अशी अंत्ययात्रा अभूतपूर्व निघाली होती. हजारो लोक अश्रुपूर्ण नेत्रांनी त्यात सामील झाले होते.
(ज्ञानेश्वरी स्वर्णिमा, १ ते १५ जुलै २०१७ वरून उद्धृत)
लेखी अभिप्राय
Nice article on sonopant dandekar
Mamasaheb yancha newase yethe dar varshi aamchya Ghari mukkam sasyacha.
राम कृष्ण हरी, खूपच छान .
Add new comment