तबला वादक रुपक पवार

प्रतिनिधी 01/08/2017

_Rupak_Pawar_1.pngरूपक पवार ह्यांना ‘तबला रूपक’ ह्या नावाने कोणी हाक जरी मारली तरी चालेल असे तेच हसत हसत पण नम्रपणे सांगतात. इतके ते तबला या वाद्याशी एकरूप झालेले आहेत!

पवारांचे मूळ गाव मापरवाडी. ते मूळ घराणे वाई तालुक्यातील (जिल्हा सातारा). मात्र रूपक यांचा जन्म डोंबिवलीत झाला. ते तेथेच लहानाचे मोठे झाले व तेथूनच त्यांची तबला क्षेत्रातील सुरुवातही झाली. त्यांचे शिशू वर्ग ते दहावीपर्यंतचे शिक्षण डोंबिवली पूर्व येथील आदर्श विद्यामंदिर शाळेत झाले. त्यांनी डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्सपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांना ताबडतोब चांगला जॉब मिळाला, पण त्यांनी फक्त एक महिन्यात ‘जॉब’ सोडला.

तबलावादन हे त्यांना वारसा हक्काने मिळालेले संचित आहे. त्यांचे तबला गुरू त्यांचे वडील पंडित सदाशिव पवार. तबलावादनाची आवड वा छंद या व्यतिरिक्त कोणतीही व्यावसायिक संधी नसताना त्यांनी नोकरी सोडण्याचा निर्णय निव्वळ आत्मिक शक्तीच्या जोरावर घेतला. त्यानंतर त्यांचे संधी मिळेल तेव्हा आणि मिळेल तोपर्यंत फक्त तबलावादन हे सत्र सुरू झाले.

त्यांना नोकरी सोडल्याबरोबर काही दिवसांतच परदेशगमनाची (फ्रान्स) सुवर्णसंधी चालून आली. ते तेथूनच पुढे ऑस्ट्रिया, जर्मनी, स्वीत्झर्लंड असे प्रदेश तबलावादनाच्या माध्यमातून पादाक्रांत करत गेले. त्यानंतर त्यांना भारतभर तबलावादनाची संधी मिळत राहिलेली आहे.

रूपक पवार यांना नकळत्या वयापासून तबल्याशीच खेळण्याला मिळाले. त्यांचे चलन, बोलणे, खेळणे, विचार करणे, स्वप्न पाहणे, जितेजागतेपणीचा ध्यास आणि कास म्हणजे तबला, तबला, तबला... आणि तबला. त्या ध्यासामधूनच रूपक पवार यांना ‘त’चा चौकार प्राप्त झाला आहे - तेजस्वीता, तपस्वीता, तत्परता व तारतम्य!

रूपक पवार यांनी त्यांचे तबला गुरू म्हणजे त्यांचे वडील पंडित सदाशिवराव पवार यांच्याकडून भारतातील प्रमुख घराणी म्हणजे दिल्ली, आग्रा, पंजाब, फरोखाबाद यांतील बारकावे संवेदनशीलपणे व गंभीरतेने आत्मसात करून घेतलेले आहेत - तपसाधना म्हणून!

ते ‘ऑल इंडिया रेडिओ’वरील ‘अ’ श्रेणीचे तबलावादक आहेत. त्यांना केंद्रीय मानव संसाधन व विकास मंत्रालयाची स्कॉलरशिपसुद्धा प्राप्त झालेली आहे. ते भारतातील सर्व प्रमुख संगीत महोत्सवात तबलावादक असतात. रूपक पवार यांच्या तबलावादन प्रवासात सर्वात मोठी सन्मानाची बाब म्हणजे भारतातील प्रमुख शास्त्रीय गायक-वादकांबरोबर ते कार्यक्रमात सामील असतात. कार्तिक कुमार, पंडित जसराज, हरिप्रसाद चौरसिया, उस्ताद अब्दुल हलीम जाफरखान, निलाद्रीकुमार, व्ही.जी. जोग, डॉ. एन. राजन, राकेश चौरसिया, बुद्धदीप्त्य मुखर्जी अशा मान्यवरांच्या मैफिलीत ते तबलावादनासाठी सामील होत आलेले आहेत. ते गेली दहा वर्षें संगीत अॅकॅडमी चालवतात.

रूपक पवार यांना ‘कलके कलाकार’मध्ये तालमणी पुरस्काराने आणि कर्नाटक व महाराष्ट्र सरकारांच्या वतीने वेगवेगळ्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्‍यांना पुण्‍याच्‍या ग्‍लोबल फाऊंडेशनकडून 'संगीतरत्‍न' हा पुरस्‍कार तर 'हलिम अॅकॅडमी ऑफ सितार' यांच्‍याकडून शारवती हा पुरस्‍कार देण्‍यात आला आहे.

रूपक सदाशिव पवार

pawarrupak@gmail.com

- मगन सूर्यवंशी, ९७६९४६८३५८

Last Updated On 2nd August 2017

लेखी अभिप्राय

काकासाहेब आपली लेखनी व् विचार अप्रतिम असतात आम्हाला नेहमी प्रेरणादायक ठरतात

vilas chavan01/08/2017

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.