तणमोरांचा प्राणहर्ता रक्षणकर्ता होतो तेव्हा...


_Tanmor_1.jpgतणमोरांची संख्या जगभरात साधारणत: फक्त बाराशेच्या आसपास आहे. मात्र, त्या नामशेष होत जाणा-या पक्ष्यांना वाचवण्यासाठी महाराष्ट्रात पट्टीचे शिकारी गणले गेलेले फासेपारधीच पुढे सरसावले आहेत! ‘वडाळा’ नावाचा फासेपारधी जमातीचा तांडा अकोला जिल्ह्यातील बार्शी-टाकळी तालुक्यात आहे. त्या तांड्यावरील फासेपारधी हिंमतराव पवार व कुलदीप राठोड हे ‘संवेदना’ संस्थेच्या मदतीने तणमोर संवर्धनाचे काम करत आहेत. त्यांनी तणमोरांच्या सुरक्षिततेकरता शिबिरे, कार्यशाळा यांच्या माध्यमातून तांड्यावर प्रबोधनास सुरुवात केली. त्यामुळे लोकांमध्ये निसर्गचक्राबद्दल जाणीव-जागृती झाली आहे. त्यामुळेच लोक तणमोर नजरेस येताच त्याची शिकार करण्याऐवजी हिंमतराव, कुलदीप यांना किंवा ‘संवेदना’ यांपैकी कोणाला तरी कळवतात. अकोला व वाशीम जिल्ह्यांत तणमोरांचे वास्तव्य आहे. अतिदुर्मीळ होत चाललेल्या तणमोर पक्ष्याच्या संवर्धनासाठी वेगवेगळ्या संस्था व लोक यांच्याकडून प्रयत्न सुरू आहेत. कसारखेडा, जणूना, मोरळ व काजळेश्वर या भागांत ते विशेष जाणवतात. वडाळा तांड्याची लोकवस्ती साडेतीनशे आहे. तेथे फासेपारध्यांकडून तणमोरांच्या घरट्यांचे संरक्षण केले जाते. तणमोर संवर्धनाच्या कामात ‘संवेदना’ संस्थेचे संस्थापक कौस्तुभ पांढरीपांडे, फासेपारधी समूहाचे कुलदीप राठोड व हिंमतराव पवार हे मार्गदर्शन करतात.

जंगले कमी झाली, फासेपारधी व इतर शिकारी यांच्या शिकारीला तणमोर बळी पडत गेले, त्यामुळे तणमोर, माळढोक या प्रजातीतील पक्षी अतिदुर्मीळ झाले आहेत. विणीच्या हंगामात एकाच वेळी चार-पाच तणमोर माद्यांना आकर्षित करण्यासाठी ‘कर्रर्र’ असा आवाज करत, सहा ते दहा फूट उंच अर्धवर्तुळाकार उडत जमिनीवर उतरतात. तणमोर त्यांच्या त्या कृतीमुळे लोकांच्या चटकन नजरेस येतात व तोच क्षण त्यांच्या शिकारीचा असतो. तणमोरांचा उपयोग मांसाहारासाठी केला जातो.

कौस्तुभ पांढरीपांडे हे पक्षी अभ्यासक. त्यांना विदर्भातील माळढोक, तणमोर या पक्ष्यांचा अभ्यास करत असताना फासेपारध्यांचे संदर्भ सापडले. त्यांना ब्रिटिशांपासून मारुती चितमपल्ली यांच्यापर्यंतच्या सर्व लेखनात तणमोराबरोबर फासेपारध्यांचा उल्लेख आढळला. ह्युम आणि मार्शल लिखित ‘गेम बर्ड्स ऑफ इंडिया, बर्मा अँड सिलोन’ या १८७९ च्या पुस्तकातदेखील पारधी व त्यांची शिकारपद्धत यांचे उल्लेख आहेत. पांढरीपांडे यांनी तणमोर १९९८ साली पहिल्यांदा पाहिला. हिंमतराव पवार यांनी तो दाखवला. पांढरीपांडे यांनी दीड वर्षेंपर्यंत पारध्यांच्या साहाय्याने तणमोराच्या जीवनपद्धतीचा अभ्यास केला. हिंमतराव पवार त्यांच्याबरोबर होतेच. फासेपारधी विदर्भात संख्येने जास्त आहेत. पांढरीपांडे यांनी पारध्यांच्या मदतीने त्या दुर्मीळ पक्ष्यांच्या संवर्धनाचे व पर्यावरण रक्षणाचे काम हाती घेण्याचे ठरवले. त्या अनुषंगाने पांढरीपांडे यांनी ‘संवेदना’ संस्थेची स्थापना २००१ साली केली.

फासेपारध्यांना शिकारबंदी, लाकूडतोडबंदी, गवत कापण्यास बंदी घालावी हे काम कठीण होते. त्यासाठी फासेपारधी हिंमतराव पवारांनी पुढाकार घेतला. त्यांनी तांड्यावरील लोकांना बदलत्या काळात त्यांची जीवनपद्धत बदलणे कसे गरजेचे आहे ते पटवून दिले. पांढरीपांडे यांनीदेखील फासेपारध्यांची निसर्गाबद्दलची आत्मीयता ओळखून त्यांना तणमोराची व इतर पक्ष्यांची शिकार करणे पर्यावरणाला कसे घातक आहे हे समजावले. फासेपारध्यांच्या ‘तांडा पंचायती’त तणमोर दिसला तरी शिकार करायची नाही असे ठरवण्यात आले.

पारध्यांना शिकारबंदी करण्याच्या आधी उदरनिर्वाहासाठी पर्यायी मार्ग निर्माण करणे महत्त्वाचे होते. ते विकासापासून कोसो दूर होते. तरीही, त्यांचा शिकारीचा एक नियम होता : ते पक्ष्यांच्या घरट्याला, त्यांच्या पिलांना हात लावायचे नाहीत, त्यांची अंडी गोळा करून विकायचे नाहीत. फासेपारधी ज्या पशुपक्ष्यांवर त्यांचे जीवन अवलंबून आहे, त्यांची संख्या कमी होणार नाही याची काळजी घेतात. पांढरीपांडे यांनी ‘संवेदना’ संस्थेद्वारे पारधी लोकांना रोजगाराची विविध साधने पुरवणे सुरू केले. फासेपारध्यांचे आयुष्य माळराने धुंडाळण्यात गेले. त्यांना निसर्गाबद्दल सूक्ष्म माहिती आहे हे लक्षात घेऊन, त्यांना बकरीपालनाचा कमी खर्चात होणारा व्यवसाय उपलब्ध करून देण्यात आला. वडाळ्यातील पवार व राठोड या दोन कुटुंबांनी प्रथम सहा एकर जमिनीत बक-यांचे खाद्य असणारी खैर व बाभूळ यांची झाडे लावली. झाडांच्या बरोबरीने तेथे विविध जातींचे गवत उगवले. त्यामुळे त्या कुटुंबांना बक-यांसाठी चारा मिळाला व गवत विकून त्यातून पैसेही मिळू लागले. ते पाहून वडाळा परिसरातील इतर कुटुंबेही त्यात सहभागी झाली. त्यांनी तो प्रयोग चाळीस एकर जमिनीवर केला. पर्यावरणरक्षण व पक्षीसंवर्धन यासाठी नियम ठरवला गेला - वनखात्याच्या जमिनीवर कुंपण टाकायचे, तेथे चराई व वृक्षतोड करायची नाही, निसर्गाच्या कामात हस्तक्षेप करायचा नाही. परिणामी, अकरा तणमोरांना २००४ मध्ये सुरक्षित ठिकाणी सोडण्यात आले, त्या सर्व माद्या होत्या.

_Tanmor_2.jpgतणमोर भारतात महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश या राज्यांतील गवताळ माळराने व नेपाळचे तराई क्षेत्र येथे आढळतो. तो स्थलांतर करणारा पक्षी आहे. तणमोर प्रजननास पोषक वातावरण व खाद्य उपलब्ध असेल त्या ठिकाणी स्थलांतर करतो. त्यामुळे त्याच्यासाठी अभयारण्य करणे अशक्य आहे. तणमोराचे संवर्धन स्थानिक लोकांच्या मदतीनेच होऊ शकते. तणमोर कुंदा गवतात घरटी करतात. फासेपारध्यांव्यतिरिक्त इतर गावांतील लोकदेखील कुंदा गवताचे संवर्धन करू लागले आहेत. लोक त्या गवताच्या बिया जमिनीवर पडल्याशिवाय गवत कापत नाहीत. तणमोराचे खाद्य गवताचे कोंब, मूग, उडीद, तीळ व ज्वारी यांसारखी पिके व त्यावरील कीटक हे आहे. शेतक-यांना तणमोरांचे स्थलांतर थांबवण्यासाठी ती पारंपरिक पिके लावण्यास प्रोत्साहन दिले जाते.

तणमोरांची संख्या गवताळ माळरानांकडे दुर्लक्ष झाल्याने १९७० पासून घटू लागली. त्यानंतरच्या १९८० च्या दशकात तर तो नामशेष होतो, की काय ही भीती निर्माण झाली. पक्षी निरीक्षक डॉ. सलीम अली यांना वाटत होते, की तणमोर महाराष्ट्रातून हद्दपार झाला. पण त्याच वेळी फासेपारध्यांतील रामदास पवार यांनी १९८२ च्या ‘महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलना’त जिवंत तणमोर आणून हजर केला व सर्वांना सुखद धक्का दिला! तणमोराचे घरटे त्यानंतर बर्‍याच कालावधीने, २००९ साली अकोल्यात सापडले. ‘युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम’ने तणमोराचे संवर्धन करावे म्हणून फासेपारध्यांसाठी उपजीविकेचा मार्ग निर्माण करण्याचा प्रकल्प सुरू केला. त्या प्रकल्पांतर्गत फासेपारध्यांनी तणमोराचे घरटे शोधावे, त्याचे संरक्षण करावे, त्याची माहिती संबंधित संस्था व व्यक्ती यांना पोचवावी हे अपेक्षित होते. त्यानुसार, फासेपारध्यांनी अकोला व वाशीम जिल्ह्यांत तणमोराची पाच घरटी २००९ ते २०११ या दोन वर्षांत शोधली, त्या घरट्यांचे रक्षण केले. तणमोराची दहा पिल्ले त्या पाच घरट्यांतून जन्माला आली. भारत सरकारतर्फे वने व पर्यावरण मंत्रालयाच्या आंतरराष्ट्रीय जैवविविधता परिषदेत फासेपारध्यांचा त्या कामासाठी ‘इंडिया बायोडायव्हर्सिटी’ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

भारत सरकारच्या वने व पर्यावरण विभागाने तणमोर व माळढोक यांच्या संवर्धनासाठी २०१३-१४ मध्ये पक्षिसंवर्धन आराखडा तयार केला. त्यामध्ये पक्ष्यांना पोषक परिस्थितीचा अभ्यास करणे, पक्षिगणना करून त्यांची संख्या नोंदणे, त्याच्या अधिवासातील धोके शोधणे, त्यांच्या अधिवासांचा अभ्यास व संवर्धन करणे, तसेच, राज्यस्तरावर व त्या-त्या क्षेत्रानुसार कृती आराखडा तयार करणे या बाबींचा समावेश करण्यात आला. अतिदुर्मीळ होत जाणा-या पक्ष्यांचे संवर्धन कसे करावे याचे मॉडेल उभे करणे हा त्या आराखड्याचा हेतू आहे.

पावसाळा सुरू झाला, की साधारण ऑगस्ट ते नोव्हेंबर या तीन महिन्यांच्या काळात तणमोराच्या घरट्यांचे व पिलांच्या संरक्षणाचे काम केले जाते. त्या कामात तरुणांपासून वृद्धांपर्यंत सर्वांचा सहभाग असतो. अकोला व वाशीम जिल्ह्यांत तणमोरांची संख्या वीस ते पंचवीस आहे. त्यांच्या संवर्धनाचे काम बारा-तेरा जणांची टीम मिळून सकाळी सात ते नऊ व संध्याकाळी चार ते सहा या वेळात करते. कारण तणमोर सूर्योदय-सूर्यास्ताच्या वेळी विशेषत: दृष्टिपथात येतात. त्या कामासाठी येणा-या व्यक्तीला दोनशे रुपये मजुरी दिली जाते. त्या दोन महिन्यांच्या कालावधीत जेवणापासून मजुरीपर्यंतचा माणशी खर्च नऊ हजार येतो. तो खर्च तणमोर संवर्धनासाठी ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च’, ‘राजीव गांधी सायन्स अँड टेक्नॉलॉजी’ या संस्था आर्थिक साहाय्य करतात, त्याद्वारे व लोकवर्गणीतून भागवला जातो. कुलदीप राठोड पक्षीसंवर्धनाच्या कामाबरोबर दुर्लक्षित पारधी समाजाच्या विकासाच्या दृष्टीनेही पावले उचलत आहेत.

कुलदीप एकतीस वर्षांचा आहे. तो आठवीपर्यंत शिकलेला आहे. त्याची दोन एकर शेती आहे. तो त्यात तूर व सोयाबिन पिकवतो. तो ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघा’त जात होता. तो म्हणतो, की “त्यामधून माझ्या मनात सेवाभाव तयार झाला.”

कुलदीप राठोड ९५४५२७९९७२

- वृंदा राकेश परब

लेखी अभिप्राय

पाराभवानी येथे २०१४ पासून जैवविविधता समितीचे काम मोठ्या प्रमाणात चालू आहे कौस्तुभ पांढरी पांडे यांच्या नेतृत्वाखाली १२ हेक्टरवर काम चालू आहे.

uddhav dnyande…17/04/2018

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.