श्रद्धेचे व्यवस्थापन - श्री गजानन महाराज संस्थान
मी शेगावला कामानिमित्त जाणार आहे, असे बायकोला सांगितल्यावर तिने सात्त्विक राग व्यक्त केला. मग म्हणाली “मी महाराजांची पोथी वाचते आणि तुला महाराज बोलावतात. हे काय चाललं आहे? जा जा, तुम्हाला महाराज बोलावतायत तर दर्शन करून या.”
क्षेत्राच्या ठिकाणी बोलावणे यावे लागते, ही भारतीय मनाची घट्ट धारणा. अर्थात त्या समजुतीला चॅलेंज करण्यात काहीही अर्थ नसतो. व्यवसायात देखील कस्टमर शोधता शोधता दमछाक होणारे आपण, जर कस्टमरने आपण होऊन बोलावले तर त्यासारखे भाग्य नाही असे समजतोच की! व्यवसायात तसे भाग्य नेहमी नेहमी मिळत नाही, पण क्वचित आणि अवचित घडून येते. येथे तर ‘संत गजानन महाराज इंजिनीयरिंग कॉलेज’ने आम्हाला आमचे software घेण्यासाठी बोलावले होते आणि त्यातच महाराजांचे दर्शन होणार होते हा अलभ्य लाभ होता! ‘दुधात साखर’ म्हणा वा ‘सोनेपे सुहागा’ म्हणा, पण हा योग जुळून आला होता हे खरे.
तो जुळून आला उमेश कौल या महाराजांच्या भक्तामुळे. कौल यांची सात-आठ महिन्यांपूर्वी अशीच अवचित ओळख झाली. एका Multinational मध्ये उच्चपदस्थ असलेले उमेश कौल महाराजांच्या नावाने स्थापन झालेल्या इंजिनीयरिंग कॉलेजच्या १९८७ च्या पहिल्या बॅचचे, विद्यापीठात पहिले आलेले विद्यार्थी. कौल मूळ काश्मीरचे. पण ते पूर्ण महाराष्ट्रीय झाले आहेत. त्यामुळे त्यांचे शेगावशी ऋणानुबंध जुळले आहेत. कौल ‘सॅप’ या जगप्रसिद्ध software प्रणालीचे तज्ज्ञ आहेत आणि त्या निमित्त जग फिरले आहेत, मात्र महाराजांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी नित्य येत असतात. तेथे वारंवार येण्यासाठी संधी मिळावी म्हणून त्यांनी स्वत:ला कॉलेजशी आणि ‘गजानन महाराज संस्थान’शी जोडून घेतले आहे. त्यांच्या त्या भेटीचा योग त्यांचेच एक सहकारी श्री. मिलिंद निघोजकर यांच्यामुळे आला.
कौल यांनी आमच्या भेटीसाठी संस्थेचे विश्वस्त श्रीकांत पाटील यांची शनिवारची वेळ घेतली. मी स्वत:, निघोजकरसर, कौल आणि magic software चे नितीन भोसले यांनी शेगावला शुक्रवारी दुपारी दोन वाजता पुण्याहून प्रयाण केले व मजल दरमजल करत रात्री अकराच्या दरम्यान कॉलेजच्या गेस्टहाउसवर पोचलो. एखाद्या कॉलेजचे गेस्टहाउस इतके स्वच्छ, सुंदर आणि सुविधायुक्त असेल हा विश्वासच बसणार नाही. पण नऊ तासांच्या अखंड प्रवासाचा शिणवटा आल्याने आणि रूम AC असल्याने लगेच झोपलो. पहाटे सहा वाजताच सातभार्इंच्या कलकलाटाने जाग आली. म्हणून बाहेर आलो. वीस-पंचवीस सातभाई जमिनीवर उड्या मारताना दिसले. एकदम त्यांना काय वाटले कोणास ठाऊक, सगळे ओरडत उडाले आणि झाडावर जाऊन बसले. फक्त पाच मिनिटेच काय ते स्थिरावले, तोच परत कोलाहल करत जमिनीवर आले. उड्या मारणे सुरू झाले परत झाडावर बसले. झाडावर मग जमिनीवर असा दहा ते पंधरा वेळा तोच उद्योग चालला होता. मी मनापासून बघत होतो. तसे करण्याचा त्यांचा उद्देश काय असेल हे समजून घेण्याचा प्रयत्न केला, पण हाती काही आले नाही. बहुधा तो त्यांचा खेळ असावा किंवा ती त्यांची उगवत्या सूर्याचे स्वागत करण्याची पद्धत असावी.
चहा घेऊन कॉलेजच्या आवारात चक्कर मारली. सेहेचाळीस एकरांचे प्रचंड आवार. जागोजागी जाणीवपूर्वक लावलेली आणि जोपासलेली विविध झाडे. सिमेंटचे उत्तम आणि रुंद रस्ते. संतांची नावे दिलेल्या वेगवेगळ्या विभागांच्या इमारती. संत गुलाबराव महाराजांच्या नावाने असलेली लायब्ररीची प्रचंड मोठी इमारत. पलीकडे उत्तम जोपासलेली हिरवळ असलेले क्रिकेटचे मैदान. टेनिस-व्हॉलीबॉल इत्यादीची व्यवस्थित राखलेली मैदाने, संत रामदासांच्या नावे असलेले भव्य इनडोअर स्टेडियम. बाराशे खुर्च्यांचे एक आणि चारशे खुर्च्यांचे दुसरे, अशी दोन सभादालने. डोळ्यांना सुखावणारी इमारतींची रंगसंगती. हे सगळे सकाळच्या फेरीत बघून घेतले. कॉलेजचे वेगळेपण जाणवले.
आठ वाजता फिरून परत गेस्ट हाऊसला आलो. कॉलेजचे एक जुने विद्यार्थी तेथेच उतरले होते, त्यांची ओळख झाली. ‘एअरटेल’मध्ये अधिकारी असलेले मनीष कामानिमित्त अमरावतीस आले होते, त्या भागात आले, की तेथे महाराजांचे दर्शन आणि कॉलेजला भेट देणे हा त्यांच्या आवडीचा कार्यक्रम. तेथे आले, की मनास समाधान मिळते असे ते म्हणाले. ते त्यांचे सहाध्यायी असलेल्या श्रीकांत पाटील यांना भेटून आणि श्रीदर्शन घेऊन मुंबईस जाणार होते. व्हरांड्यात सर्वजण जमले. तेवढ्यात विश्वस्त श्रीकांत पाटील आले. ओळख करून देण्याचे सोपस्कार झाले. ते स्वत: त्याच कॉलेजचे विद्यार्थी आणि ‘गजानन महाराज संस्थाना’चे मुख्य विश्वस्त शिवशंकर पाटील यांचे धाकटे चिरंजीव. साधे पण बोलके आणि अभ्यासू व्यक्तिमत्त्व. त्यांनी आमचे स्वागत करून आमच्या दिवसभराच्या कार्यक्रमाच्या रुपरेखेची कल्पना दिली. ब्रेकफास्ट झाल्यावर, त्यांनी कॉलेजची गाडी आणि संजय हा वाटाड्या बरोबर दिमतीला दिला आणि आम्ही मंदिराकडे प्रयाण केले.
मंदिरात सकाळपासूनच गर्दी होत असल्याने गर्दी व्यवस्थापन करणारे सेवक कार्यरत होते. संजयमुळे आम्हाला महाराजांचे दर्शन सुलभ झाले. बाहेर देणगी स्वीकारणारे वेगवेगळे काउंटर होते. उत्साही उमेश कौल संस्थानाविषयी भरभरून माहिती पुरवत होते. संस्थानचे आर्थिक आणि इतर व्यवहार ‘सॅप’ प्रणालीशी २००६ पासून जोडलेले आहेत. ‘गजानन महाराज संस्थान’ ही अशी software प्रणाली वापरणारी जगातील पहिली NGO. संस्थानचे व्यवहार चोख आणि पारदर्शक असावेत म्हणून मुख्य विश्वस्त शिवशंकर पाटील यांनी ती प्रणाली बसवून घेतली. मी पण देणगी देऊन रीतसर पावती घेतली. मंदिराच्या अकौंटस विभागात साधा पांढरा शर्ट, लेंगा व टोपी घातलेले अनेक कर्मचारी SAP प्रणालीवर काम करताना दिसत होते. चित्र डोळ्यांना जरा वेगळे दिसले.
पुन्हा कॉलेजमध्ये आलो. छोट्या सभागृहात अडीचशे ते तीनशे विद्यार्थी जमले होते. नितीन भोसले यांनी तेथे जमलेल्या IT व computer विषयाशी संबंधित विद्यार्थ्यांना व शिक्षकांना Magic software या प्रणालीविषयी दीड तास माहिती दिली. ते सर्व करत असताना इतर कॉलेजांमध्ये अभावाने आढळणारी शिस्त तेथे अनुभवत होतो.
प्रेझेण्टेशन झाल्यावर विश्वस्त श्री. श्रीकांत पाटील आणि प्रिन्सिपॉल डॉ. सोमाणी यांनी कॉलेजचे वेगवेगळे विभाग दाखवले. एक लाख पुस्तके आणि सातशे मुले एकावेळी बसू शकतील एवढी मोठी लायब्ररी तेथे आहे. त्या लायब्ररीची इमारत इकोफ्रेंडली आहे. बाहेर कितीही उन्हाळा असला तरी आत नैसर्गिक गारवा राहील याची व्यवस्था केली आहे. त्यामुळे विद्यार्थी मोठ्या संख्येने लायब्ररीचा वापर करतात. विविध विषयांची टेक्निकल मासिके, कॅटलॉग तेथे उपलब्ध आहेत. IT व computer विभागात संस्थेचे आणि संस्थानचे web server, SAP servers आहेत. कॉलेज व्यवस्थापन स्वत: त्यांची निगा बाराही महिने आणि चोवीस तास राखते. संस्थानचा पैसा म्हणजे भक्तांचा पैसा ही धारणा असल्याने प्रत्येक बाबतीत स्वनिर्भर राहण्याचा प्रयत्न दिसून आला. software दुरुस्ती व वार्षिक देखभालीचा अवाढव्य खर्च संस्थेबाहेर देण्यापेक्षा शिक्षकांनी स्वत: देखभाल केली तर संस्थेच्या पैशाची मोठी बचत होते व शिक्षकांचे ज्ञानदेखील अद्ययावत राहते याची जाणीव प्रत्येकास आहे. विदर्भात कमालीची उष्णता असल्याने प्रत्येक इमारतीच्या उभारणीत, तिच्या आत नैसर्गिक रीत्या गारवा राहील अशी व्यवस्था केली आहे. विश्वस्त श्रीकांत पाटील यांनी संस्थेची उभारणी प्रत्येक ठिकाणी अभ्यासपूर्वक केलेली आहे हे जाणवते. चांगले शिक्षक विदर्भासारख्या भागात यावेत यासाठी त्यांना सहकुटुंब कॉलेजच्या आवारातच राहता येईल असे क्वार्टर्स बांधले आहेत.
कॉलेजने स्वत:चे भव्य Incubation center उत्तम उद्योजक निर्माण करण्यासाठी काढले आहे. सेंटर देखणे असे व अत्याधुनिक सुविधायुक्त आहे. तेथे नवउद्योजकास जागेपासून संशोधनाच्या सर्व सोयी दिल्या जातात. त्यासाठीचा सर्व खर्च संस्था स्वत:च्या अंगावर घेते. संशोधन पूर्ण झाले तर उद्योजकास मार्केटिंगसाठी मदत देखील करते. तो लवकरात लवकर स्वनिर्भर होईल असे बघते. त्या ठिकाणी सोलर सिस्टिमवर संशोधन करून अनेक उत्तमोत्तम Products बनवली गेली आहेत. ते ग्रामीण भागात सहज वापरले जाऊ शकतात. त्यात सोलर lighting, सोलर पंप असे काही products आहेत. पाच-सहा तरुण उद्योजक त्यांचे संशोधन तेथे करत असताना दिसले. यांत्रिकी विभागात पंचवीस CNC machine simulators बसवले आहेत. ते खास अमेरिकेतून आणवले आहेत. दहा-बारा पास मुलांना त्या विभागात CNC चे ट्रेनिंग दिले जाते. अशी साडेतीन हजार मुले शिकून तयार केली गेली आहेत. त्यातील सत्तर टक्के मुलांना नोकऱ्या मिळवून दिल्या गेल्या आहेत. तेथेच एक workshop आहे. तेथे प्रेस्ड पार्टससाठी लागणारे साचे (डाय) बनवले जातात. तशा प्रकारचे डाय बनवण्यासाठी काटेकोरपणा लागतो. त्या सुविधेचा फायदा काही मोठे उद्योग घेतात. ते सर्व विद्यार्थ्यांकडून करून घेतले जाते. इतर कॉलेजांमध्ये शिक्षण-उद्योग नात्याची चर्चा होते. तेथे ते प्रत्यक्षात आणले आहे, ते देखील पुण्या-मुंबईपासून दूर आडजागी. गरीब व कमी शिकलेल्या मुलांसाठी कुशलता निर्मिती हा मोठा कार्यक्रम कॉलेज व्यवस्थापन चालवते. कॉलेजमधील सुविधा इंजिनीयरिंगच्या मुलांसाठी असल्या तरी, त्या वापरून इतर गरीब मुलांचा स्तर कसा उंचावता येईल हे विश्वस्त या नात्याने पाटील स्वत: बघतात. कॉलेजमध्ये मुले मोकळेपणाने हिंडत होती, पण कोठेही पुण्या-मुंबईत दिसणारा पोशाखी वाह्यातपणा दिसला नाही.
श्रीकांत पाटील यांच्याशी पुन्हा मीटिंग दुपारी झाली. त्यात त्यांनी आमच्या software मधील बारकावे समजून घेतले. अतिशय नेमके प्रश्न विचारून स्वत:च्या सर्व शंकांचे निरसन करून घेतले. त्यांची कामाची एकंदर शैली समोरच्यावर कोणतेही दडपण येणार नाही अशी जाणवली.
शेगाव संस्थानचे स्वत:चे अत्याधुनिक किचन बघण्यासारखे आहे. दर ताशी चाळीस हजार पोळ्या करणारे मशीन तेथे आहे. ते मशीन जर बंद पडले तर ताशी दहा हजार पोळ्या बनवणारी दोन मशिने पर्यायी म्हणून आहेत. एका बाजूने कणिक घातली, की दुसर्या बाजूने भाजलेली पोळी बाहेर पडते. एका वेळी शंभर किलोंचा भात, पंच्याहत्तर किलो भाजी, पन्नास किलो डाळ, शंभर डिशेस शिरा-पोहे-उपमा इत्यादी सर्व करणारी अवाढव्य मशीन्स अव्याहत भक्तांना अन्न पुरवत असतात. सर्व मशिनरी स्टेनलेस स्टीलमध्ये बनवली गेलेली आहे. तेथे कमालीची स्वच्छता आहे. अन्नगृहाला अव्याहत शुद्ध पाणी मिळण्यासाठी प्रचंड मोठे RO plants उभारले आहेत. तेथे बनवलेले पदार्थ संस्थानच्या स्पेशल गाड्यांतून गावातील वेगवेगळ्या भोजनगृहात, भक्त निवासात, कँटिन इत्यादीमध्ये तत्परतेने पोचवले जाते. त्या ठिकाणी येणाऱ्या भक्तांचा अंदाज घेऊन वेगवेगळ्या ठिकाणावरून डिमांड स्वयंपाकघरास मोबाईलवरून कळवली जाते. आणि त्या अंदाजाने अन्न बनवून पुरवले जाते. त्या कामाची अवाढव्यता वर्णन करण्यासारखी नाही. पण ती द्रौपदीची थाळी अव्याहत अन्नदान करत असते. तेथील व्यवस्थापन भल्याभल्यांना (म्हणजे व्यवस्थापन तज्ज्ञांना) तोंडात बोट घालायला लावणारे आहे. कोठेही गोंधळ नाही, अन्नाची नासाडी नाही, कोणीही उपाशी राहणार नाही.
स्वयंपाकघराला लागून मोठी लाँड्री आहे. तेथे संस्थानाच्या भक्त निवासातील बेडशीटे, अभ्रे, सेवकांचे युनिफार्म धुऊन, वाळवून इस्त्री केले जातात. मोठमोठी वॉशिंग मशीन तेथे आहेत. तेथे देखील कमालीची स्वच्छता. मुख्य म्हणजे कोणताही कामगार (खरे म्हणजे सेवक) अवांतर टाईमपास करताना दिसला नाही. साडेतीन हजार सेवक व स्टाफ असलेले ते संस्थान आहे. सर्वजण त्यांचे काम महाराजांची सेवा या भावनेतून करत असल्याने त्यात ओलावा आहे. सेवक आनंदाने, आत्मीयतेने मदत करत असताना दिसतात. आपल्या स्टाफ व कामगारांना शिस्त लावताना दमछाक झालेल्या उद्योजकांना संस्थानचे HR (ह्युमन रिलेशन्स) हा अभ्यास विषय आहे.
‘शेगावला गेलात की आनंदसागर बघाच’ असे अनेकांनी सांगितले. मनात एखादी बाग असेल अशी कल्पना केली. तेथे गेलो तर माझी कल्पनाशक्ती किती खुजी आहे याची जाणीव झाली. एका प्रचंड मोठ्या कृत्रिम तलावात कृत्रिम बेटे बनवली गेली आहेत. रात्री दिव्यांची रोषणाई डोळ्यांचे पारणे फेडते. त्यातील टेकडीसदृश बेटावर देखणे ध्यानमंदिर केवळ अप्रतिम! मनोहारी landscape आणि waterscape डोळ्यांचे पारणे फेडते. पाण्याचे दुर्भीक्ष्य असलेल्या भागात अडवलेल्या पाण्यातून साकारलेले ते लेणे बघण्यासारखे तर आहेच, पण अचंबित करणारे आहे. श्रीकांत पाटील यांचे थोरले बंधू नीलकंठ पाटील यांनी ते साकारले आहे. आनंदसागराचे वर्णन मी करण्यापेक्षा बघणे जास्त श्रेयस्कर ठरेल.
श्रीकांत पाटील रात्री पुन्हा आमची खुशाली समजून घेण्यास आले. त्यांनी काही त्रास झाला नाही ना अशी विचारणा केली. त्रास होण्यासारखे तेथे काही नाहीच आहे. शेगावचे पाणी आणि माती वेगळी आहे हे नक्की. संध्याकाळी पाटीलसाहेबांचे काही मित्र आले होते. शेगावच्या ‘श्री’ टॉकीजचे मालक श्री मोहंमद असिफ (आडनाव कदाचित वेगळे असेल) आले होते, त्यांची ओळख झाली. ते देखील कॉलेजचे माजी विद्यार्थी व विश्वस्त. त्यांच्या आजी महाराजांच्या भक्त. त्यांनी महाराजांना प्रत्यक्ष बघितले होते. त्यांनी ते मशिदीत येत असत असा उल्लेख केला. ते गजानन महाराजांविषयी भरभरून बोलत होते. श्री गजानन महाराज फकिरी आयुष्य जगले. ती अवस्था सन्याशाच्या पलीकडची. तेथे अंगावरचे कपडे देखील ‘इस्टेट’ ठरते, म्हणून त्याज्य! माझे काहीच नाही अशी ती अवस्था. ते शरीरदेखील त्याने दिले आहे, तो म्हणेल तोपर्यंत वापरणार. अशा फकिराच्या पश्चात त्याच्या नावे भावनेचे-श्रद्धेचे एवढे साम्राज्य उभे राहते, खरेच अनाकलनीय आहे! जगात प्रत्येकाला आयुष्यातील कोणत्या तरी अनाकलनीय भीतीने ग्रासले आहे. माझे ठीक चालले आहे, पण महाराज पुढेदेखील माझे असेच सुरळीत चालू द्या. काही विघ्न नको. तर काहींना काहीतरी विघ्न आहे-आजारपण आहे, धंद्यातील आर्थिक खोट आहे, मुलांचे प्रश्न आहेत आणि हे मलाच का? माझ्याच वाट्याला का? ह्या प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत. महाराज उत्तर नाही दिले तरी चालेल, पण सुटकेचा मार्ग दाखवा, असे काहीतरी भक्तांचे ‘आतील’ म्हणणे असावे.
१९८१ साली येथे आलो होतो. मंदिर लहान होते, जेमतेम रांग होती, पाच-दहा मिनिटांत दर्शन झाले. आता नेहमीच्या दिवशी दर्शनास तास लागू शकतो. सुबत्ता आली, तांत्रिकता आली तशी आयुष्यातील अनाकलनीयता, आकस्मितता, अस्थिरता क न होता, वाढली आहे. तेथे काही जण आपले दुख: सांगण्यास येतात. काही जण मनास बरे वाटते म्हणून येतात, काही संकटांशी सामना करण्यास शक्ती मागण्यासाठी येतात. काहींना काहीतरी मिळालेले असते म्हणून महाराजांचे दर्शन हवे असते. एकंदर आम्ही ‘विषया’तच राहणार, पण हे फकिरा, आम्हाला सुखी कर असे मागणे. ही थोडी विसंगती आहे, पण एक लक्षात घ्या, सामान्य माणूस असेच करणार! त्याला संसारपण हवाय, विषयपण हवाय आणि सुखदेखील हवे आहे. महाराज त्यासाठी मार्ग दाखवतात ही त्याची श्रद्धा. श्रद्धा ही तेथील शक्ती आहे, प्रेरणा आहे, भविष्याची आशा आहे. गजानन महाराज संस्थान हे अव्याहत चालणारे मशीन आहे. तेथे श्रद्धेचा बाजार नाही तर तेथे माणसांच्या श्रद्धेचे व्यवस्थापन केले जाते. शेगावला मोहमयी बोलणारे कोणी नाही. महाराजांचे केवळ दर्शन आत्मिक आनंद देते. देणगी देणे हे ऐच्छिक. पैसा न दिला तरी प्रसाद मिळेलच; त्या बरोबर दर्शनांदही मिळेल, अगदी फुकट. ते तेथील वेगळेपण आहे.
संस्थानचे अनेक भक्त निवास आहेत. तेथे शेकडो खोल्या AC सारख्या सुविधांसकट आहेत. सवलतीच्या किंमतीत तेथे राहण्याची सुविधा मिळते. सुविधा इतकी, की कोठेही तक्रार करण्यास वाव नाही. येणाऱ्या भक्तास खात्रीने समाधान मिळते. भक्तांची फसवणूक कोठेही होणार नाही याची काळजी घेतली जाते. शेगाव हे खऱ्या अर्थाने तीर्थक्षेत्र आहे. त्यात प्रचंड मोठा वाटा श्रीकांत पाटील यांचे पिताश्री शिवशंकर पाटील यांचा आहे. ते नव्वदीच्या घरात आहेत. त्यांची गाठ पडू शकली नाही. पण लोकांच्या बोलण्यातून जे कळले ते असे, की शेगावचा कायापालट शिवशंकर पाटील यांनी त्यांच्या कल्पनेतून साकारला. महाराजांच्या पोथीत उल्लेख असलेल्या भक्त कडताजी आणि कुकाजी पाटील यांचे ते वंशज. त्यांच्या नेतृत्वाच्या, कर्तृत्वाच्या आणि कणखरपणाच्या पाउलखुणा शेगावात जागोजागी दिसतात. तेथे येणारा प्रत्येक माणूस गजानन महाराजांबरोबर शिवशंकर पाटील यांच्या पुढे नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही. खऱ्या अर्थाने विश्वस्त असलेले शिवशंकर आणि त्यांचे कुटुंबीय हे निस्वार्थीपणाची कमाल आहेत. लोकांनी श्रद्धेने दिलेल्या देणग्यांचे व्यवस्थापन ‘इदं न मम’ म्हणत करणे अवघड आहे. तेथे लोकांनी दिलेल्या प्रत्येक पैशाचा विनियोग केवळ लोकांसाठी केला गेलेला आहे. मग गावातील रस्ते असोत, भक्त निवास असोत, शाळा-कॉलेज असो, भोजनव्यवस्था असो, की आनंदसागर सारखे सौदर्यस्थळ असो. उमेश कौल सांगत होते, की शिवशंकर पाटील त्यांच्या ऑफिसमध्ये पाणी आणि चहाचा थर्मास देखील घरून घेऊन येतात. आधुनिक शेगावच्या या निर्मात्याचा किती हा निर्मोहीपणा! ‘गण गण गण गणात बोते’ या महाराजांच्या उक्ती प्रमाणे गणांचा (भक्तांचा) पैसा गणात बोणाऱ्या (रुजवणाऱ्या) महाराजांच्या ह्या भक्तास त्रिवार नमस्कार!
- श्रीकांत कुलकर्णी
Shrikantkulkarni5557@gmail.com, shrikaant.blogspot.com
लेखी अभिप्राय
सुंदर लेख. तंतोतंत शेंगाव व तिथले वैभव ????
Gan Gan ganat botey
There is no other Sansthan like Gajanan maharaj Sansthan Shegaon in our country as far as my knowledge is concern.
प्रत्येकानेएकदा तरी शेगांवचा हा प्रेरक अनुभव घ्यावा
Good
Add new comment