स्वप्नील गावंडे देतो आहे अंधांना प्रकाशाची दिशा


_Swapnil_Gawande_1.jpgस्वप्नील गावंडे हा अमरावती जिल्ह्यातील तरुण त्याच्या वयाच्या तेराव्या वर्षापासून नेत्रदानासंबंधी जनजागृतीच्या कामाला लागला आहे. त्याने ‘दिशा ग्रूप’च्या माध्यमातून दहा वर्षांत दहा लाख लोकांपर्यंत नेत्रदानाचा संदेश पोचवला, तर चार लाख लोकांकडून नेत्रदानाचे फॉर्मस भरून घेतले आहेत. स्वप्नीलने तरुण पिढी त्या कार्यात जोडली जावी म्हणून महाराष्ट्र राज्यातील सातशे शाळा-महाविद्यालयांमध्ये नेत्रदान जागृतीपर कार्यक्रम घेतले. त्याच्या त्या कामात अभियांत्रिकी, विधी व वैद्यकीय क्षेत्रातील अठराशे तरुण जोडले गेले आहेत. स्वप्नील नेत्रदानासोबत अवयवदानाच्या कामातदेखील सक्रिय आहे.

स्वप्नीलला लहानपणापासून संगीताची आवड आहे. त्याने हुबळी येथील ‘डॉ. गंगुबाई हंगल गुरुकुल ट्रस्ट’मध्ये संगीताचे प्रशिक्षण घेतले. तो संगीत विशारद २००९ मध्ये झाला. स्वप्नीलला संगीत प्रशिक्षणादरम्यान दृष्टिहीन कलाकार भेटले. त्यात त्याचे मित्रही होते. ते कलाकार वैविध्याने नटलेले जग न पाहताही कलेमध्ये जीव ओततात. त्यांनी जर ही दुनिया प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिली तर? असे विचार स्वप्नीलच्या मनात आले आणि तो त्याच प्रेरणेने नेत्रदान जनजागृतीच्या कामात आठवीपासून सक्रिय झाला. त्याने त्याच्या मित्रमैत्रिणींपासून कामाला सुरुवात केली. स्वप्नीलने विद्यार्थी दशेत पाच वर्षें नेत्रदान जागृतीचे काम केले. त्याने त्याच्या वयाची अठरा वर्षें पूर्ण झाल्यावर, २००९ साली कुंदा गावंडे, विराग वानखेडे, विवेक भाकरे, चंदा भाकरे, अरुण गावंडे व राजीव वानखेडे यांच्या सहकार्याने ‘दिशा ग्रूप’ची स्थापना केली. दिशा ग्रूपतर्फे जेथे जास्त लोक जमतात (जत्रा, नाकी) अशा ठिकाणी स्टॉल लावून नेत्रदानाचे महत्त्व पटवून दिले जाते.

‘दिशा ग्रूप’ने अमरावती व यवतमाळ या दोन ठिकाणी डॉ. मनीष तोटे यांच्या मदतीने ‘दिशा आय बँक’ नावाची नेत्रपेढी स्थापन केली आहे. ती अमरावती जिल्ह्यातील मानवी अवयव प्रत्यारोपण कायद्यांतर्गत मान्यता मिळालेली सक्रिय नेत्रपेढी आहे. नेत्रदानानंतर नेत्रबुब्बुळांची सुरक्षा व संग्रह यासाठी वैद्यकीय प्रक्रिया करावी लागते. एका नेत्रबुब्बुळाच्या सुरक्षिततेसाठी साधारण साडेचार हजार रुपये खर्च येतो.

‘दिशा ग्रूप’ व ‘दिशा आय बँक’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘रोशनी जिंदगी में’ ही नेत्रदान जनजागृती मोहीम महाराष्ट्रभर सुरू आहे. महाराष्ट्रात शासकीय नेत्रपेढ्यांबरोबर खासगी नेत्रपेढ्या आहेत. मात्र, नेत्रपेढ्यांमध्ये परस्पर समन्वय नसल्यामुळे त्यांच्याकडील रुग्णांची संख्या, नेत्रगोलांची स्थिती व उपलब्धता यांची माहिती उपलब्ध होत नाही. ‘दिशा ग्रूप’ व ‘दिशा आय बँक’ यांनी पुढाकार घेऊन ती माहिती सर्वत्र उपलब्ध व्हावी यासाठी नेत्रपेढ्या ऑनलाइन कराव्यात असे निवेदन सरकारला २०१५ साली दिले आहे. स्वप्नील सांगतो, “आम्ही आरोग्य संचालकांना मेल व पत्रव्यवहार करूनदेखील नेत्रपेढ्या ऑनलाइन करण्याबाबत त्यांच्याकडून काहीच प्रतिसाद मिळत नाही. त्यांच्याकडून ‘कार्यवाही करतोय, फंड संपलाय’ असे बहाणे सांगून बोळवण केली जाते. सरकारकडून नेत्रदानातील एका नेत्रबुब्बुळासाठी आठशे ते नऊशे रुपये अनुदान मिळते, परंतु तेदेखील २०११ पासून मिळालेले नाही. स्टोरेज बॉटलसाठी आधी पैसे पाठवावे लागतात. नेत्रबुब्बुळाची सुरक्षितता व संग्रह याकरता येणारा खर्च लोकांकडून मिळणा-या देणग्यांतून भागवला जातो. सर्वसामान्य लोक पाच रुपयांपासून देणगी देतात. आम्ही मिळेल ती देणगी स्वीकारतो. नेत्रदानासाठी यवतमाळला संजीवनी हॉस्पिटलतर्फे इन्स्ट्रुमेंट पुरवली जातात. डॉ. मनीष तोटे यांनी एक लाखाची देणगी दिली आहे. ‘दिशा’चा वार्षिक खर्च दहा लाख रुपये आहे. संस्थेच्या नेत्रदानविषयक कामाला ‘गाइड स्टार इंडिया’ने २०१६ सालचे ‘ट्रान्स्परन्सी की अवॉर्ड’ देऊन गौरवले आहे.

_Swapnil_Gawande_2.jpg‘दिशा ग्रूप’ व ‘दिशा आय बँके’द्वारा २०१० ते २०१७ दरम्यान सत्तावीसशे नेत्रदान करण्यात आली, तर चौदा नेत्रगोलांचे प्रत्यारोपण करण्यात आले. महाराष्ट्रात विविध नेत्रपेढ्यांद्वारे साडेसात हजार नेत्रदान झाले आहे. देशात नेत्रदानाचे सरासरी प्रमाण चाळीस ते बेचाळीस हजार आहे. ती संस्था गरज असेल तिथे रक्तदानासाठीही सहकार्य करते. ‘दिशा’ या धर्मादाय संस्थेला वाशीम व बुलढाणा या जिल्ह्यांत नेत्रपेढी सुरू करायच्या आहेत. अमरावतीमध्ये ‘दिशा अवयव प्रत्यारोपण केंद्रा’ची स्थापना करायची आहे. त्यासाठी संस्थेचे प्रयत्न सुरू आहेत.

अंधांना नवी दृष्टी देणारा स्वप्नील इंजिनीयर आहे. त्याने ‘प्रोफेसर राम मेघे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च’ कॉलेजमधून अभियांत्रिकीची पदवी २०१५ मध्ये मिळवली. स्वप्नीलने पद्मविभूषण डॉ. एन. राजम यांच्याकडे व्हायोलिनवादनाचे प्रशिक्षण घेतले. त्याला म्युझिक फेस्टिव्हल व व्हायोलिनवादन यांच्या निमित्ताने थायलंड, श्रीलंका, येथे जाण्याची संधी मिळाली. स्वप्नील सांगतो, “वेगवेगळ्या देशांच्या, राज्यांच्या भेटीदरम्यान नेत्रदानाविषयी शिकता आले. श्रीलंकेमध्ये नेत्रदान केल्याशिवाय मृतावर अंतिम संस्कार केले जात नाहीत. तसा कायदा आपल्या देशातदेखील झाला पाहिजे.”

स्वप्नील अंधेरी येथील ‘एस.पी. जैन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च सेंटर’मधून एम.बी.ए. करतोय. त्याचा लोकांना दर्जेदार शिक्षण व सुदृढ आरोग्य देण्याचा मानस आहे.

स्वप्नील गावंडे ९४२३४२४४५०

www.deeshagroup.org

deeshagroup@gmail.com

- वृंदा राकेश परब

लेखी अभिप्राय

दिशा उद्याची,नव्या युगाची ।
स्रूष्टी आजची द्रूष्टी उद्याची ।

Arun M. Gawande09/01/2018

दिशा उद्याची,नव्या युगाची ।
स्रूष्टी आजची द्रूष्टी उद्याची ।

Arun M. Gawande09/01/2018

"the man with Nobel direction".

MANGESHKUMAR R…09/01/2018

You're the best. I'm proud of myself that I'm your friend.

Ms.Swinkle M. …24/06/2019

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.