नवभारत छात्रालय – दापोलीचे लेणे

प्रतिनिधी 15/06/2017

_Navbharat_Chatralay_1.jpgदापोलीचे ‘नवभारत छात्रालय’ हे नाव सुचवते त्याप्रमाणे फक्त विद्यार्थ्यांसाठी निवास, भोजन यांची सोय नाही. ते परिसरातील सर्वात जुने छात्रालय असूनही ते जोमाने वाढत आहे! सहा जणांपासून १९४७ साली सुरुवात झालेल्या त्या छात्रालयात दरवर्षी सव्वाशेहून जास्त मुले-मुली राहून जातात (आजपर्यंत चार हजारांच्या वर).

‘कुणबी सेवा संघ’ या संस्थेने छात्रालय चालवले असले तरी सर्व जातींच्या, धर्मांच्या विद्यार्थ्यांची तेथे राहण्याची व्यवस्था केली जाते. छात्रालयाचे संस्थापक सामंतगुरुजी यांची कडक शिस्त व छात्रालयाच्या स्थापनेपासून आजीवन व्यवस्थापक असलेले शिंदेगुरुजी यांचा प्रेमळ पितृभाव यांचा सुरेख मिलाफ छात्रालयाच्या व्यवस्थेत दिसून येतो. तेथे विद्यार्थ्यांमध्ये कष्ट करा व शिका, काम करण्यातून शिका हे धोरण राबवले जाते.

छात्रालयास सरकारी अनुदान आहे, तरी ते स्वत:च्या भक्कम आर्थिक पायांवर उभे आहे. शिंदे गुरुजींनी छात्रालयाच्या प्रक्षेत्रात मुलांकडून भाजीपाला पिकवून आणि भाज्यांची कलमे व रोपे तयार करून त्यांच्या विक्रीतून संस्थेला आर्थिक स्थैर्य प्राप्त करून दिलेले आहे. त्याबरोबर संस्थेचा कार्यभार विस्तारला आहे. संस्थेच्या ‘बाळासाहेब खेर कृषी उद्योग व प्रशिक्षण केंद्रा’त फळप्रक्रिया पदार्थ व खाद्य पदार्थ तयार केले जातात. ते पदार्थ तयार करण्याचे प्रशिक्षण वर्ग घेतले जातात. केंद्रात तयार झालेले काजुसरबत, कोकमसरबत, काजुखजूर, आवळासरबत, नाचणीपापड, तांदुळपापड असे पदार्थ विक्रीसाठी छात्रालयाच्या विक्रीकेंद्रात उपलब्ध आहेत. छात्रालयाच्या व्यवसाय शिक्षण विद्यालयात संगणकाचा प्रमाणपत्र अभ्यासक्रमही शिकवला जातो.

छात्रालय स्वत:च्या सात एकर जमिनीवर उभे आहे. मुलांसाठी व मुलींसाठी राहण्यासाठी सर्व प्राथमिक सोयींनी युक्त अशा दोन स्वतंत्र इमारती आहेत. ‘बाळासाहेब खेर कृषी उद्योग व प्रशिक्षण केंद्रा’ची सुसज्ज इमारत नव्यानेच बांधली गेली आहे. व्यवसाय शिक्षण विद्यालयाचा संगणक कक्षही त्याच आवारात आहे.

_Navbharat_Chatralay_2.jpgभाजीपाला लागवड, आंबा, काजू, नारळ लागवड व रोपवाटिका प्रक्षेत्रेही त्या आवारात आहेत. तीस फूट व्यासाची भव्य विहीर छात्रालयातील सर्व प्रकल्पांना चोवीस तास पाणी पुरवत आहे. छोटे सुसज्ज विक्री केंद्र छात्रालयाच्या आवारात आहे.

पांडुरंग गणपत शिंदे हा साखळोली गावातील विद्यार्थी दापोली येथे इतर पाच-सहा जणांबरोबर भिकाजी लक्ष्मण मोरे यांच्या घरात राहून ‘ए.जी. हायस्कूल’मध्ये शिकत होता. ही गोष्ट १९४६ सालची. शामराव पेजे कामानिमित्त दापोलीत १९४७ साली आले होते. तेव्हा शिंदे व त्यांचे मित्र शामरावांना भेटले. त्यांनी शामरावांना मुलांची शिकण्यासाठी चाललेली धडपड व परवड दाखवली. ते अप्पासाहेब पटवर्धन यांना भेटले. अप्पासाहेबांनी लांज्याच्या छात्रालयातील शिक्षक द.सी. सामंत यांना दापोली येथे छात्रालय सुरू करण्यासाठी पाठवले. सामंतगुरुजींनी दापोलीत येऊन, जुन्या मामलेदार कचेरीच्या पाठीमागे आंब्याच्या बागेत केंबळी (शाकारलेल्या) घरात १९४७ सालीच छात्रालय सुरू केले.

दत्तात्रय सिताराम सामंतगुरुजी हे गांधीविचारांनी झपाटलेले व्यक्तिमत्त्व. त्यांनी अप्पासाहेब पटवर्धन यांच्या सांगण्यावरून, छात्रालयाची देखभाल १९४७ पासून १९६५ पर्यंत केली. ते शिस्तीचे कडक होते; उत्तम हस्ताक्षराचे आग्रही होते. ते स्वत: कष्टाळू होते; त्याच प्रमाणे - त्यांचा कटाक्ष विद्यार्थ्यांनी कष्टाला कंटाळता कामा नये असा होता. ते काटकसरीचे भोक्ते होते. त्यांच्या व्यवस्थापनाच्या वैशिष्ट्यांचा ठसा छात्रालयावर स्पष्टपणे उमटलेला दिसतो.

छात्रालयाला १९४८ च्या मार्चमध्ये सरकारी मान्यता मिळाली; थोडेफार अनुदान मिळू लागले. त्याच वेळेस छात्रालय ज्या जागेत आहे तेथील सरकारी मालकीची बंद गोसेवा चर्मालयाची जागा मिळाली. त्या जागेत तीन कच्च्या इमारती होत्या. त्यांत छात्रालय सुरू झाले. शिंदेगुरुजी सहव्यवस्थापक म्हणून छात्रालयाचे काम १९४७ पासून पाहत होते. छात्रालयाला सामंतगुरुजी व शिंदेगुरुजी यांच्या रूपाने भक्कम खांब लाभले! सामंतगुरुजींनी त्यांच्या आयुष्याची एकोणीस वर्षें तर शिंदेगुरुजी यांनी त्यांच्या आयुष्याची साठ वर्षें छात्रालयाला दिली. त्यांनी उत्कृष्ट कर्मचारीवर्ग जमवला. माजी विद्यार्थ्यांची मजबूत फळी उभी केली. कामाचा व्याप वाढला. शिंदेगुरुजी हयात असतानाच हरिश्चंद्र गीते, हरिश्चंद्र कोकमकर, गोविंद जोशी, प्रभाकर शिंदे या ‘खांबां’ची उभारणी झाली. शिंदेगुरुजी यांच्या निधनानंतर त्यांचे चिरंजीव प्रभाकर शिंदे कृषी विद्यापीठातील नोकरी सोडून उपाध्यक्ष म्हणून संस्थेची धुरा सांभाळत आहेत. छात्रालयाला मदत करणारे प्रत्यक्ष – अप्रत्यक्ष असंख्य हात आहेत.

‘नवभारत छात्रालय परिवार’ या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना लागवडीविषयी तांत्रिक मार्गदर्शन केले जाते. ‘कोकण गांधी अप्पासाहेब पटवर्धन स्मृती निधी’, ‘छात्रभूषण प्रा. रघुनाथ गीते शिक्षण सहाय्य निधी’ या ठेवींतून आर्थिक दृष्ट्या कमकुवत मुलांना शिकण्यासाठी मदत दिली जाते. ‘सेवाव्रती पांडुरंग शिंदेगुरुजी स्मृती पुरस्कार’ या उपक्रमांतर्गत आदर्श प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षक, उत्कृष्ट कृषी विस्तार कार्यकर्ता, प्रगतीशील शेतकरी इत्यादींना पुरस्कार देण्यात येतात.

संस्थेने दापोलीपासून पंधरा किलोमीटर अंतरावर कोळबांद्रे येथे साडेबारा एकरांचे स्वतंत्र प्रक्षेत्र विकत घेऊन लागवडीखाली आणले आहे. रोपवाटिकेसाठी लागणारे मातृवृक्ष, फळझाडे; तसेच, वनौषधी इत्यादींची लागवड तेथे केली आहे.

परिसरातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतांच्या बांधावर लावण्यासाठी साह व खैर या वृक्षांची किमान प्रत्येकी पन्नास रोपे देण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम आखला जात आहे. ते वृक्ष ‘लावा व विसरा’ अशा प्रकारचे आहेत - त्यांना देखभाल लागत नाही. ते वीस वर्षांनी तोडून विकता येतात. त्या पैशांतून शेतकऱ्यांचे प्रासंगिक खर्च निभावेत अशी अपेक्षा आहे. तो उपक्रम शिंदेगुरुजींच्या मनात फार काळ घर करून होता.

आधुनिक साधनांनी युक्त असलेली व्यायामशाळा, प्रशस्त ग्रंथालय व कार्यालय असलेली नवीन इमारत पूर्वीच्या इमारतीच्या जागी बांधण्याचे नियोजन झाले आहे. आठशे प्रेक्षक बसतील इतके मोठे सुसज्ज प्रेक्षागृह बांधण्याचे कामही प्रगतिपथावर आहे. ‘कृषी पर्यटन’ हा महत्त्वाकांक्षी उपक्रम आखला जात आहे. छात्रालयाच्या आवारातच सर्व प्राथमिक सोयींनी युक्त अशी अतिथी गृहाची इमारत बांधून तेथे पर्यटकांना माफक दरात निवास व्यवस्था पुरवून छात्रालयाच्या विविध प्रक्षेत्रांमधून सैर घडवून आणणे व कृषी उद्योगांची ओळख करून देणे हा त्यामागील हेतू आहे.

संस्था शेतीव्यवसायाला केंद्रिभूत मानून शैक्षणिक सुविधांची सर्व अंगाने वाढ करतानाच नव्या-जुन्याचा योग्य मेळ घालण्याचे धोरण राबवत आहे. संस्थेचे रोप महावृक्षात रूपांतरित होत आहे! ते दापोली तालुक्याचे अद्वितीय लेणे ठरले आहे.

- विद्यालंकार घारपुरे ९४२०८५०३६०

लेखी अभिप्राय

नवभारत छात्रालय हे माझ्या आयुष्याला खरी कलाटणी देणारे विद्यापीठ आहे. शिंदे गुरुजींसारख्या अपार मायेने विस्तारलेल्या वटवृक्षाची सावली व सहवास मला लाभला हे माझं भाग्य , व त्यांची स्वावलंबनाची शिकवण हीच माझ्या आयुष्याची खरी शिदोरी आहे.

SAMIR KANSE04/07/2018

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.