कुंभारी गावचे राघवेश्वर शिवमंदिर

प्रतिनिधी 24/05/2017

_Raghaweshwar_1.jpgहेमांडपंथी शिवमंदिर शृंखलेतील पुरातन राघवेश्वर मंदिर कोपरगाव तालुक्यातील पश्चिमेला आठ किलोमीटर अंतरावर कुंभारी गावी गोदावरीच्या तीरावर उभे आहे. राघोबादादा कोपरगाव -हिंगणी- कुंभारी अशा भुयारी मार्गाने मंदिरात येत. म्हणून त्या मंदिरास राघवेश्वर देवस्थान असे नाव देण्यात आले आहे अशी आख्यायिका आहे. भुयारी मार्ग सध्या बंद आहे. मंदिर अखंड शिळेमध्ये आहे व त्यावर अप्रतिम कलाकुसर आहे. सुमारे एक हजार वर्षांपूर्वीचे ते मंदिर आहे असे सांगितले जाते. गौतमऋषींचे वास्तव्य त्या ठिकाणी होते; तसेच, पेशवे राघोबादादांचेही वास्तव्य त्या परिसरात होते. पेशवे मंदिराची देखभाल करत. बाबासाहेब पुरंदरे यांच्या म्हणण्यानुसार पेशव्यांच्या फौजा पुण्याहून ग्वाल्हेरला पुणे, संगमनेर, वावी, मंजुर, मुखेड, येवला या मार्गाने जात, तेव्हा त्या राघवेश्वर मंदिर परिसरात काही काळ थांबत. पुरंदरे यांनी त्या मंदिराची पाहणी केलेली आहे. मंदिरात महादेवाची पिंड असून सुर्यकिरणे सकाळच्या वेळी शिवाला साक्षात अभिषेक घालतात. तो क्षण बघण्यासारखा असतो.

मंदिर गोदावरीच्या काठावर असून नदीपासून पंचवीस फूट उंचावर आहे. मंदिराचे प्रवेशद्वार उत्तरेस आहे. एक दरवाजा पश्चिमेसही आहे. मंदिराखाली शंभर फूट खोल जागेत अखंड दगडांचा भराव करून एक एकर जागेवर गोलाकार पद्धतीच्या मंदिराची रचना करण्यात आलेली आहे. बालकाला घेऊन उभी असलेली महिला, चक्र, फुले काही चित्रांमध्ये दिसतात तर काही ठिकाणी पाण्याने भरलेले हंडे व त्यावर बारीक कोरीव काम करून सौंदर्य व्यक्त करण्यात आले आहे. त्याकाळी पाण्याची असलेली मुबलकता शिल्पातून दर्शवण्यात आली आहे. मंदिराच्या चौकटीवर फणा उभारलेल्या नागाची प्रतिमा आहे. मंदिरातील कोरीव काम पाहून अजिंठा, वेरूळ, खजुराहो आदी लेण्यांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. मंदिराचा सभामंडप पस्तीस फूटांचा असून गाभार्‍यात शिवलिंग आहे. कळसाची उंची साठ फूट आहे. सभागृहाला बारा खांब आहेत. त्यावर विविध धार्मिक प्रसंग व देवदेवतांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. कळसाच्या आतील बाजूसही नक्षीदार कोरीव काम केलेले आहे. मूर्ती व कोरीव काम सर्वधर्मभाव व ऐक्य यांचा संदेश देतात.

_Raghaweshwar_2.jpgमंदिरातील शिवलिंगाचे वैशिष्टय असे, की मंदिरातील शाळुंका पूर्व-पश्चिम अशी आहे. शिवलिंगाच्या समांतर पूर्व दिशेस मंदिरात कवडसा ठेवलेला आहे. त्या कवडशातून सूर्याची पहिली किरणे बरोबर शिवलिंगावर पडतात! जणू सूर्यदेव प्रकट होताच सर्वप्रथम भगवान शिवाला वंदन करतात. मंदिरातील पिंड भक्तांची मनोकामना पूर्ण करते. मनोभावे भक्ती करणार्‍याला चमत्कारांची अनुभूती व राघवेश्वराचा दृष्टांत झाल्याशिवाय राहत नाही. शाळुंका पूर्वाभिमुख असलेले महाराष्ट्रातील ते शंकराचे एकमेव मंदिर आहे. गोदावरीला वारंवार येणार्‍या पुरांचे हे मंदिर साक्षीदार आहे. तथापी मंदिराला गोदावरीच्या पुराचा स्पर्श झालेला नाही. गोदामाई पुढील प्रवासाला मंदिराच्या पायर्‍यांना स्पर्श करूनच जाते. मंदिराच्या आतील भागातील गणेशमूर्तीही भाविकांचे लक्ष वेधून घेते. मंदिराचे बांधकाम भक्कम स्थितीत आहे.

रोहीलबाबांचे मंदिरात वास्तव्य बर्‍याच वर्षांपासून आहे. गोविंद सोनवणे, पवार व कापूर हे मंदिराची देखभाल करतात. गावचे पुरोहित चंदू पैठणे दररोज रूद्राभिषेक करतात. श्रावण महिन्यात मंदिरास विशेष महत्त्व प्राप्त होते; महाशिवरात्रीला यात्रा भरते.

ह. भ. प. राघवेश्वरानंदगिरीजी व दानशूर भक्त यांच्या सहकार्याने मंदिराचा कायापालट झालेला आहे. महाराजांनी मंदिराचा महिमा ग्रामस्थांना साध्यासोप्या भाषेत सांगितला आणि मंदिर नावारूपाला आले. मंदिराची गोशाळा आहे.

- सतीश निळकंठ, 9960121381

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.