महाराष्ट्राचा महावृक्ष


_Maharashtracha_Mahavruksha_1.jpgसंगमनेर तालुक्यातील पेमगिरी येथील भीमगडच्या (ऊर्फ शहागड) दक्षिणेस दोन किलोमीटर अंतरावर मोरदरा भागात विशाल वटवृक्ष आहे. तो तेथे वादळवाऱ्याला तोंड देत अनेक वर्षांपासून उभा आहे. महाकाय वटवृक्ष दोन एकरांवर पसरलेला आहे. त्याच्या मुख्य खोडाचा घेर साठ फूट आहे. त्याच्या एकूण पारंब्या शंभराच्या जवळपास आहेत. झाडाचा उत्तर-दक्षिण व्यास तीनशे फूटांपर्यंत तर पूर्व-पश्चिम व्यास दोनशेऐंशी फूट इतका मोठा आहे. वडाच्या झाडाखाली भिल्ल-रामोश्यांची 'जाखाई-जाकमतबाबा' ही दैवते आहेत.

दैवतांची दंतकथाही मोठी रंजक आहे. गुरे-शेळ्यांची राखण करणाऱ्या रामोशी समाजातील जाकमतबाबाची जंगली वाघाशी झुंज झाली. ते रक्तबंबाळ झाले, पण दोघेही हटले नाहीत. अगदी अखेरपर्यंत! त्या रोमांचक संघर्षात वाघ आणि जाकमतबाबा या दोघांनीही अखेरचा श्वास तेथेच घेतला!

भावाची अशी अवस्था पाहिल्यावर बहीण जाखाईला दु:ख अनावर झाले आणि तिनेही भावाच्या कलेवरावर पडून आक्रोश करत तेथेच प्राण सोडला. रामोश्यांनी त्यांच्या मूर्तीची त्या जागेवर स्थापना केली.

मूर्तीची स्थापना झाल्यानंतर त्या वडाच्या झाडाचेही 'दैवतीकरण' झाले. कोणी झाडाच्या फांद्या जाणीवपूर्वक तोडल्या, पाने तोडली तर जाकमतबाबा त्यांना चांगलाच धडा शिकवतो, यावर लोकांची दृढ श्रद्धा वगैरे बसली! त्यामुळे झाडाचा विध्वंस कोणी करत नाही. परिणामी झाडाचे रूपांतर विशाल वटवृक्षात होत गेले.

झाडाच्या वरच्या बाजूला मोरदऱ्याचा मोठा तलाव आहे. झाडाच्या परिसरातील शेती काही वर्षांपूर्वी जिरायत होती. तेथे तलाव झाल्यावर मात्र विहिरी खणल्या गेल्या. शेती ओलिताखाली आली. झाडाच्या चहुबाजूंनी बारमाही शेती सुरू झाली आणि कदाचित, त्यामुळे झाडाच्या पारंब्यांचा विस्तार आखडला गेला. काही वृक्षप्रेमींनी तेथील शेतकऱ्यांनी पारंब्यांचे शेंडे छाटल्याची तक्रार केली होती. 2006 च्या पावसाळ्यात तुफान पाऊस झाला. झाडाच्या बगलेतून वाहणाऱ्या ओढ्याला मोठा पूर आला होता. त्यात पारंब्यांची मुळे उघडी पडली होती. त्यानंतर तेथे सिमेंट-काँक्रिट ओतून ओढ्यातून वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाला वाट करून देण्यात आली आहे.

तो महाराष्ट्रातील सर्वात विशाल वटवृक्ष आहे, हे नक्की. महाराष्ट्रातील महावृक्ष पाहण्यासाठी वनस्पतीशास्त्राचे अभ्यासक, निसर्गप्रेमी, विद्यार्थी त्या ठिकाणी येत असतात. भारतातील सर्वात विशाल वटवृक्ष कोलकात्याजवळील बोटॅनिकल गार्डनमध्ये आहे. पेमगिरी येथील हा वटवृक्ष विस्ताराने त्याखालोखाल मोठा असल्याचा दावा केला जातो.

- भाऊसाहेब चासकर

Last Updated on 27th Sep 2018

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.