चकोते समुहाचा प्रयोग सेंद्रीय शेतीचा

प्रतिनिधी 22/05/2017

_Chakote_1.pngअण्णासाहेब चकोते यांनी महाराष्ट्र - कर्नाटकाच्या सीमेवरील मानकापूर येथे पन्नास एकर क्षेत्रात विविध प्रयोग सुरू केले आहेत. त्यांची ‘गणेश बेकरी’ यशस्वी झाली. त्यानंतर त्यांनी सेंद्रीय शेतीचा उपक्रम हाती घेतला. त्यांच्या पुढाकाराखाली चाळीस एकरांवर सेंद्रीय भाजीपाला, गोशाळा, कृषिपर्यटन असे काही उपक्रम कार्यान्वित होत आहेत. त्यानिमित्त अण्णासाहेब चकोते यांच्याशी केलेली बातचीत...

प्रश्न – ‘गणेश बेकरी’च्या माध्यमातून उद्योगात यश लाभले असताना तुम्हाला शेतीकडे वळावे असे का वाटले?

चकोते – तुम्ही बेकरीचे यश म्हणता. माझी यशाची व्याख्या वेगळी आहे. यशाची उंची ही जमिनीवर टेकलेल्या पायापासून आभाळापर्यंत मोजावी. तसे नसेल तर ते यश नव्हे आणि ती उंची अजून मला गाठायची आहे! अध्यात्म, योग, संत, महात्मे, वीर यांचा वारसा सांगणारा भारत देश. जैव विविधतेपासून खाद्य संस्कृतीपर्यंत आणि ज्ञानापासून विज्ञानापर्यंत विविध विषयांत व कार्यात भारत देशाला सोनेरी इतिहास आहे. त्या इतिहासाला कोंदण आहे तेथील समृद्ध कृषी संस्कृतीचे. शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. कारण उत्तम शेती, मध्यम व्यवसाय आणि कनिष्ठ नोकरी हे तेथील पूर्वजांनी फार विचार करून लिहून ठेवले असावे.

देश स्वतंत्र झाला. शेतीमध्ये अनेक नवीन प्रयोग झाले. संकरित बियाणे, रासायनिक औषधे; तसेच, खते यांची निर्मिती झाली. किटकनाशकांचा वापर अमर्याद होत गेला. त्या सर्व कारणांमुळे भारतीय अन्नधान्यातून सत्त्व आणि चव या गोष्टी हरवत गेल्या आहेत.

मी उद्योग गेली पंचवीस वर्षें करतोय, पण मी जन्मापासून शेतकरी आहे. शेती हा आमच्या कुटुंबाचा पारंपरिक व्यवसाय आहे. माझे आजोबा, वडील सर्वजण शेती करायचे. मी उद्योगाकडे वळलो नाही, फक्त नैसर्गिक शेतीचा प्रयोग नव्याने करतोय. त्यासाठी संशोधनात्मक अभ्यास, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, सातत्याने प्रयोग या सर्व बाबी आल्याच. नव्याने काही साधायचे म्हटले, की ते करावेच लागते.

‘गणेश बेकरी’ची ओळख महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि गोवा प्रांतांतील खाद्य रसिकांत आहे, ती चव आणि गुणवत्ता यांमुळे. ती कायम राखण्यासाठी आणि नाविन्य आणण्यासाठी आम्हाला संशोधन व विकास यांवर सातत्याने काम करावे लागते. ते करत असताना अन्नधान्य - फळेभाजीपाला यांतील कमी झालेली सकसता आणि रासायनिक खते व कीटकनाशके यांचा त्यांच्यावर झालेला परिणाम पाहून माझ्यातील शेतकरी मनाला वाईट वाटू लागले. सर्वचजण त्यामुळे समाजात माणसांच्या शरीरांवर होणारे परिणाम सध्या अनुभवत आहेत.

प्रश्न – तुमच्या सेंद्रीय शेतीच्या प्रयोगाचे वैशिष्ट्य काय सांगाल? आणि त्यासाठी काय विशेष प्रयत्न केले गेले?

चकोते - आम्ही सेंद्रीय पद्धतीने शेती करण्याचे ठरवले, तेव्हापासून त्यातील तपशिलांचा अभ्यास केला. तत्संबंधी तज्ज्ञांशी चर्चा केल्या. तो प्रयोग सातत्याने चार-पाच वर्षें यशस्वी झाल्यानंतर ग्राहकांसाठी मोठ्या प्रमाणावर उत्पन्न घेण्याचे ठरवले. त्यानंतर इचलकरंजी शहरापासून सात किलोमीटर अंतरावर असणार्‍या माणकापूरशेजारी चाळीस एकर जागेची निवड केली. त्या जागेवर त्यापूर्वी कधीच कोणतीही पिके घेतली गेली नव्हती. त्यामुळे रासायनिक खते, कीटकनाशके यांचा स्पर्श त्या जमिनीला झाला नव्हता.

नैसर्गिक शेती करण्यासाठी प्रथम नैसर्गिक ऊर्जा स्रोतांचा अभ्यास केला. नैसर्गिक ऊर्जा स्रोत सूर्य, जल आणि भूमाता यांच्यामधूनच मिळून नैसर्गिक वातावरण निर्माण व्हावे यासाठी दहा एकरांमध्ये विविध जाती - प्रजातींच्या जंगली व औषधी वनस्पतींची लागवड केली. त्यामुळे विविध प्रकारचे पक्षी, पोषक जीव यांचे नैसर्गिक जीवनचक्र निर्माण झाले. त्यामधून नैसर्गिक व सेंद्रीय शेतीस पोषक असे वातावरण निर्माण होत आहे.

नैसर्गिक ऊर्जा स्रोतांमध्ये नैसर्गिक शेती करण्यासाठी शेतकर्‍यांना मिळालेले वरदान म्हणजे कामधेनू, म्हणजेच देशी गाय. तिच्याशिवाय शेती होऊच शकत नाही. ते ध्यानी घेऊन दीडशे देशी गायींचा मुक्त गोठा त्या ठिकाणी सुरू केला आहे. त्या गायींच्या सान्निध्यात शेती केली जाणार आहे. पंचमहाभूतांच्या नैसर्गिक ऊर्जा स्रोतांवर आधारित असा तो प्रयोग आहे.

_Chakote_2.pngप्रश्न – तुम्ही कोणत्या खतांचा वापर करता आणि त्यामध्ये जैव विविधतेचा उपयोग कसा होतो?

चकोते - सेंद्रीय शेतीमध्ये कीड वगैरे रोग नियंत्रण आणि खतांचे व्यवस्थापन या दोन गोष्टी महत्त्वाच्या मानल्या गेल्या आहेत. कीड नियंत्रणासाठी कामगंध सापळे, चिकट सापळे या जैविक कीड नियंत्रण पद्धती; तसेच, आधुनिक सोलार ऑपरेटेड अल्ट्रा व्हायलेट कीड नियंत्रण सापळा लावला आहे. त्यासोबत बुरशीजन्य, वनस्पतीजन्य आणि जीवाणूजन्य कीड व रोग नियंत्रक यांचाही वापर केला जात आहे. पंचगव्य म्हणजे गाईचे दूध, दही, ताक यांपासून तयार केलेले अमृतस्पाणी आणि दशपर्णी अर्क यांचाही वापर केला जातो. त्यानंतरही कीड आढळ्ल्यास ती हाताने गोळा करून नष्ट केली जाते. आवश्यकतेनुसार शेणखत, गांडुळ खत, पेंडयुक्त खत, जीवाणू खत यांचा वापर केला जातो. तसेच, गायीच्या शेणाचा व गोमूत्राचा वापर हा प्रामुख्याने केला जातो.

प्रश्न - अशा प्रकारे घेतलेल्या उत्पादनाचे वैशिष्ट्य काय सांगाल?

चकोते - एका ओळीत सांगायचे तर आमच्या भाज्यांना आजीच्या व आईच्या हाताची चव आहे. आम्ही पिकवलेल्या भाज्यांचे उत्पादन नैसर्गिक पद्धतीने झाले असल्यामुळे त्या भाज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात सर्व प्रकारची अन्नद्रव्ये आणि सर्व प्रकारचे पोषक-घातक समतोल प्रमाणात आहेत. त्या भाज्या चवीला रूचकर, खुसखुशीत लागतात आणि चव टिकून राहते. आम्ही त्या भाज्या ग्राहकांना घरपोच देत आहोत.

प्रश्न - तुमच्यासारखा विचार इतर सामान्य शेतकरी किंवा उद्योजक करताना दिसत नाहीत, असे का?

चकोते - नैसर्गिक शेती करायची म्हणजे रासायनिक अंश नसलेली जमीन हवी. तीवर प्रयोग यशस्वी होईपर्यंत अथक परिश्रम घ्यावे लागतात आणि मुख्य म्हणजे उत्पादन कमी... यांमुळे सर्वसामान्य शेतकरी त्या विचारापासून दूर राहतो. ते आव्हान स्वीकारण्याची मानसिकता सहसा कोणी दाखवत नाही.

प्रश्न - तुम्ही सेंद्रीय शेतीमध्ये येऊ इच्छिणार्‍यांना काय सल्ला द्याल?

चकोते - आम्ही हा प्रयोग करतानाच ठरवले होते, की आमचा हा प्रयोग या क्षेत्रात काम करणार्‍यांसाठी आदर्शवत ठरावा आणि आम्ही त्या दिशेने प्रयत्न करत आहोत. आमची भूमिका ‘या, पाहा, तंत्रज्ञान घ्या आणि तुम्हीही तुमच्या जागेत अशी शेती फुलवा’ ही आहे. अशी शेती जर व्यावसायिक पद्धतीने केली तर सेंद्रीय उत्पादनांना बाजारमूल्य चांगले मिळते. त्यामुळे कमी क्षेत्रात चांगले उत्पादन मिळू शकते. अभिनव प्रयोग होत राहिले आणि भारतीय लोक त्यांच्या मूळ संस्कृतीप्रमाणे पुन्हा शेती करू लागले तर ती शेतकरी आणि ग्राहक यांनाच नव्हे तर येणार्‍या पिढीसाठीदेखील अतिशय चांगली बाब आहे.

प्रश्न – ‘जंगल फ्रेश’ या तुमच्या पिकांच्या नावामागची संकल्पना काय?

चकोते - सूर्यदेवता, जलदेवता, वायुदेवता यांचा वापर करून, भूमातेला कसून जंगलात नैसर्गिक पद्धतीने पिकवलेला भाजीपाला जंगलातून थेट ग्राहकांच्या घरात! म्हणून त्यास नाव दिले आहे ‘जंगल फ्रेश’!

प्रश्न – ‘जंगल फ्रेश’ माल ग्राहकांपर्यंत पोचवण्यासाठी काय नियोजन केले आहे?

चकोते - त्या त्या हंगामातील आठ ते दहा भाज्या आमच्याकडे उपलब्ध आहेत. त्यांपैकी कोणत्याही तीन ते पाच प्रकारच्या भाज्या अडीच किलोच्या एका पॅकमध्ये असणार आहेत. आम्ही त्या भाज्या आठवड्यातून एकदा याप्रमाणे महिन्याला दहा किलो घरपोच देणार आहोत. मुंबई - पुणे येथील मोठ्या मॉल्समधून आणि निर्यातीसाठी देखील या भाज्यांसाठी मागणी येत आहे.

संपर्क - 8805999877, 9689889822

मूळ लेख – शेतीप्रगती, जानेवारी २०१७

लेखी अभिप्राय

मला आपल्या कार्यक्रमाचे. कौतुक. करावै तेवढे थाेडे आहे
खुप चांगला उपक्रम

S d KULKARNI 23/05/2017

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.