केळवण


मराठी घरात लग्न किंवा मुंज यांसारखे मंगल कार्य ठरले, की लगेच केळवणाची आमंत्रणे येण्यास सुरुवात होते. केळवण हा लग्न, मुंज यांसारख्या मंगलकार्यापूर्वी होणारा समारंभ आहे. त्यामध्ये वधू आणि वर यांच्या स्वतःच्या घरी स्वतंत्रपणे थाटाने मेजवानी करून नातेवाईकांना जेवायला घातले जाते. तसेच, नातलगही त्यांच्या त्यांच्या घरी वधूला किंवा वराला मेजवानी देतात आणि भोजनोत्तर घरचा अहेरही देतात. त्याला यजमानांनी केळवण केले असे म्हटले जाते. ते सहसा वधुवरांचे नातेवाईक व मित्रमंडळी यांजकडून होत असते. लग्नासाठी तयार (वॉर्मअप) करण्याचा हा प्रकार!

केळवण याचा एक अर्थ काळजी घेणे किंवा काळजीपूर्वक सांभाळणे असाही आहे. केळीच्या पिकाची काळजी घेऊन मशागत करावी लागते. नाहीतर केळीची रोपे सुकून जातात. त्यामुळे लग्न ठरलेल्या वधूची माहेरी जशी काळजी घेतली जाते तशीच सासरीही घेतली जावी हाही केळवण करण्यामागचा हेतू असावा.  

केळवणाला गडगनेर असेही म्हटले जाते. गडगनेरचा गडंगनेर किंवा गडंगणेर असे दोन्ही उच्चार आढळतात. गडू आणि नीर यांपासून गडगनेर हा शब्द बनला आहे. गडू म्हणजे पाण्याचा तांब्या आणि नीर म्हणजे पाणी. परंतु गडगनेर याचा शब्दशः अर्थ नुसता पाणी भरलेला तांब्या असा धरला जात नाही तर तो शब्द पाहुण्यांना देण्याची मेजवानी अशा अर्थाने येतो.

महाराष्ट्रात जेवणाच्या पंगतीसाठी केळीची पाने वापरण्याची प्रथा आहे. मुळात केळीचा उगम भारतात, विशेषतः पश्चिम घाट आणि ईशान्य भारत येथे झाला. मुसा ऍक्युमिनाटा आणि मुसा बाल्बिसिआना ह्या प्रजाती केळ्यांच्या मूळ जाती समजल्या जातात. जगातील केळीच्या उत्पादनाचा अठरा टक्के वाटा भारताचा आहे.

केळवण झालेल्या मुलीस केळवली असे म्हणतात. तिला सासरचे वेध लागलेले असतात. तिचे मन सासरी धाव घेऊ लागते. केळवली नवरीची ती भावावस्था ज्ञानेश्वरांनी एका ओवीत टिपली आहे. त्यांनी ज्ञानी व्यक्तीचे वर्णन करताना म्हटले आहे - केळवली नवरी माहेराविषयी जशी उदासीन असते तसा ज्ञानी माणूस जगण्याविषयी उदासीन असतो आणि तो त्याच्या अंतःकरणाला न मरताच मृत्यूची सूचना देतो. ज्ञानेश्वरीतील ती ओवी अशी –

ना तरी केळवली नोवरी |
कां सन्यासी जियापरी |
तैसा न मरतां जो करी |
मृत्युसूचना || 13.451 ||

केळवण घालण्याची प्रथा महाराष्ट्रात ज्ञानेश्वरांच्या आधी काही शतके रूढ होती एवढे त्यातून दिसून येते. केळवण हा अस्सल मराठी शब्द आहे.

- डॉ. उमेश करंबेळकर

लेखी अभिप्राय

धन्यवाद डॉ. अत्यंत सुरेख माहिती मिळाली.

Girish.T. Kulkarni11/11/2018

Telugu madhye kay mhantat

Ramesh Suram28/11/2018

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.