एकांडी शिलेदार शोभा बोलाडे


_Shobha_Bolade_1_0.jpgशोभा बोलाडे पनवेल तालुक्यातील गावागावांमध्ये पाणीप्रश्न व रेशनप्रश्न यांवर कार्यरत आहेत. त्यांनी त्या प्रश्नांवर उत्तरे मिळवण्यासाठी महिलांचे संघटन करून महिलांना मार्गदर्शन केले; तसेच, महिलांना गावातील इतर प्रश्नांविरूद्धही आवाज उठवण्यास प्रवृत्त केले. त्यामुळे शोभा यांना गावातील पुढारी, राजकारणी यांनी त्रास दिला, गुंडांकरवी जीवे मारण्याच्या धमक्याही दिल्या. तरी त्या बधल्या नाहीत. उलट, त्यांनी त्या सर्वांना आव्हान देत, स्त्रियांना त्यांच्या स्वत:च्या हक्कांबाबत जागृत केले. त्यामुळे डोक्यावरून पदर ढळू न देणा-या स्त्रिया संबंधितांना जाब विचारू लागल्या आहेत. ते शोभा बोलाडे यांच्या सामाजिक कामाचे फलित म्हणावे लागेल.

शोभा समाजकार्याकडे अनपेक्षितपणे वळल्या. त्या फावल्या वेळात काहीतरी करावे म्हणून शेजारपाजारच्या मुलांना जमवून त्यांच्याशी बैठे खेळ खेळत, त्यांना अभ्यासात मदत करत. तेव्हा त्यांची त्या मुलांच्या आयांबरोबर ओळख झाली, संवाद वाढला. गप्पा मारत असताना महिलांना होणारे त्रास, गावचे प्रश्न यांवर चर्चा व्हायची. त्या वेळी महाळुंगी गावात पाणीप्रश्न भीषण होता. महिलांना दोन मैल पायपीट करून पिण्यासाठी एखाद-दुसरा हंडा पाणी मिळे. कधी कधी तर, त्यांना दोन-दोन दिवस पाण्याशिवाय काढावे लागत. तेवढे करून महिलांना शेतीची कामे, घरची कामेही करावी लागत. दरम्यानच्या काळात आमदार रामशेठ ठाकूर व विवेक पाटील महाळुंगी गावात निवडणुकीच्या निमित्ताने येणार होते. ते साल २००४. शोभा यांनी महिलांना गावातील पाणीप्रश्न मांडण्यासाठी तीच वेळ योग्य असल्याचे सांगितले. शेतकरी कामगार पक्ष हा एकमेव पक्ष गावात होता. शोभा यांनी आमदार येण्याच्या आदल्या दिवशी गावातील महिलांची बैठक घेतली. दहा महिला आमदारांसमोर पाणीप्रश्नावर बोलण्यास तयार झाल्या. शोभा यांनी पुढाकार घेऊन आमदारांसमोर गावातील पाण्याची समस्या मांडली. तसेच, पाणीप्रश्न सोडवला नाही तर मतदान करणार नाही असे ठणकावले. महिलांनी शोभा यांना पाठिंबा दिला. तेव्हा आमदारांनी गावाचे सर्वच प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले व ते निघून गेले. त्याच्या दुस-याच दिवशी गावात टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू झाला. शोभा यांना त्यांच्या बोलण्याचा असाही परिणाम होऊ शकतो याची जाणीव झाली. त्यांचा आत्मविश्वास दुणावला.

टँकरद्वारे पाणी ही तात्पुरती सोय होती. पाणीप्रश्न कायमस्वरूपी तडीस लावण्यासाठी पाण्याच्या ठोस योजनेची आवश्यकता होती. शोभा बोलाडे यांनी त्यावर काम सुरू केले. गावात पाणी आणण्यासाठी पाण्याचा स्रोत शोधणे महत्त्वाचे होते. तेव्हा गावापासून चार किलोमीटर अंतरावर डोंगराच्या पायथ्याशी विहीर असल्याची माहिती मिळाली. पनवेल तालुक्यात पेठमध्ये ‘शांतिवन’ ही संस्था कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनासाठी व ग्रामविकासासाठी काम करते. त्या संस्थेच्या सहकार्याने व ग्रामस्थांच्या श्रमदानातून विहिरीवर बोरवेल मारून गावात नळपाणी योजना राबवली गेली. त्यासाठी ग्रामस्थांनी निधी उभारला. शोभा यांची निवड त्या योजनेच्या व्यवस्थापनासाठी स्थापन केलेल्या पाणी समितीवर झाली. समितीच्या हिशोबाठिशोबाचे काम शोभा यांच्यावर सोपवण्यात आले. शोभा यांनी ते काम एवढे चोख केले, की त्यांना गावच्या पाणी समितीचे अध्यक्ष करण्यात आले! नळपाणी योजना यशस्वी होऊन लोकांना बारमाही पाणी उपलब्ध झाले. शोभा सांगतात, “ते सर्वांच्या सामुदायिक प्रयत्नांचे यश होते. प्रशासकीय आणि आर्थिक बाबी यांच्या पलीकडे त्या प्रयत्नांतून मिळालेला अनुभव खूप काही शिकवणारा व आत्मविश्वास वाढवणारा होता.”

महाळुंगी गावाचा पाणीप्रश्न कायमचा मिटला. त्या यशाच्या निमित्त ‘शांतिवन’ संस्थेने त्या कामाच्या एका कार्यक्रमाचे आयोजन केले. त्या कार्यक्रमामध्ये इतर सामाजिक संस्था व संघटना यांच्या प्रतिनिधींना बोलावण्यात आले होते. शोभा बोलाडे यांनी त्या कार्यक्रमामध्ये छोटेखानी भाषण केले. त्यांनी त्यांच्या कामाची माहिती थोडक्यात व मुद्देसूद मांडली. ‘ग्राममित्र’ संघटनेचे अल्लाउद्दिन शेख त्या कार्यक्रमाला उपस्थित होते. पाठेपाठ शोभा यांना ‘ग्राममित्र’ संघटनेच्या कार्यशाळेस उपस्थित राहण्यासाठी शेख यांच्याकडून २००७ मध्ये निमंत्रण मिळाले. त्या कार्यशाळेत जमीन अधिकार व त्यासंबंधित विषयांची मांडणी होत होती. शोभा यांना गाव - गावातील लोक – त्यांच्या समस्या - त्या सोडवण्यासाठी प्रयत्न कसे करायचे याचा उलगडा हळुहळू होऊ लागला. शोभा यांच्या कामाला ‘ग्राममित्र’मुळे दिशा प्राप्त झाली. त्या त्यांचे महिलांच्या प्रश्नांवरील काम ‘ग्राममित्र’द्वारे करू लागल्या. त्यांना शेख यांचे मार्गदर्शन मिळाले. शोभा यांनी ग्रामपंचायत, तिचे कामकाज, पंचायतराज, गावाच्या विकासाचे मुद्दे यांविषयी समजून घेऊन कामास सुरुवात केली. शोभा यांना त्या कामादरम्यान काम समजून घेणे व त्याचा प्रत्यक्ष जीवनात उपयोग करणे या दोन गोष्टींत भिन्नता जाणवली.

महाळुंगी गावात ग्रामस्थांना रेशनप्रश्न सतावत होता. रेशन दुकानदार रेशनिंगचे धान्य काळ्या बाजारात विकत होता. त्यामुळे ग्रामस्थांना योग्य धान्यपुरवठा होत नव्हता. शोभा यांनी रेशनप्रश्नाला हात घातला. गावातील काही तरुणांनी रेशन धान्याचा अपहार करताना रेशन दुकानदार व गावातील एक पुढारी यांना रंगेहाथ पकडले. मग त्या दोघांविरुद्ध पंचायत भरवून त्यांना दंड ठोठावण्यात आला. गावातील लोक रेशन दुकानदाराच्या मुजोरीला घाबरत होते, पण शोभा यांनी त्या भ्रष्टाचाराला वाचा फोडण्याचे ठरवले. त्यांनी अर्ज लिहून त्यावर ग्रामस्थांच्या सह्या घेतल्या. तो अर्ज तहसीलदारांना दिला. त्या अर्जावर कार्यवाही होऊन दुकानाची चौकशी करण्यात आली. लोकांच्या जाबजबान्या घेऊन दुकान सील करण्यात आले. गावक-यांसाठी दुस-या रेशन दुकानाची व्यवस्था करणे गरजेचे होते. शोभा यांना धावपळ करावी लागली. त्यांच्या प्रयत्नांमुळे मोर्बा या गावातील रेशन दुकानात महाळुंगी गावातील लोकांची युनिट्स चढवण्यात आली. नवीन रेशन दुकानात
गावक-यांना रेशनवर वस्तू मिळू लागल्या. अशा प्रकारे रेशनप्रश्न निकाली निघाला. दरम्यानच्या काळात, रेशन दक्षता समिती पनवेलमध्ये स्थापन झाली. शोभा यांची त्या समितीवर निवड करण्यात आली. त्या समितीद्वारे मालाची तपासणी, मालाच्या वितरणावर लक्ष ठेवणे, लोकांच्या तक्रारी समजून घेणे अशी कामे केली जात होती. त्या निमित्ताने शोभा यांना ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यासोबत त्या समितीत काम करण्याची संधी मिळाली.

शोभा यांची ‘महिला व ग्रामसभेचे कामकाज’ या विषयाकरता ‘कोरो’च्या फेलोशिपसाठी २०११-१२ साली निवड झाली. शोभा यांनी फेलोशिपसाठी वावंजे गाव हे कार्यक्षेत्र निवडले. त्यांनी वर्षभरामध्ये वावंजे गावात वीस बचत गट स्थापन केले. महिला बचत गटाच्या बैठकांत रेशनसंबंधीच्या समस्येवर अधिक बोलत असत. त्यामुळे त्यांनी वावंजेमध्ये रेशनप्रश्न व ग्रामसभा यांवर लक्ष केंद्रित केले. शोभा यांनी महिलांनी गावकारभारात व निर्णयप्रक्रियेत सहभागी झाले पाहिजे, त्यांचे प्रश्न ग्रामसभेत येऊन मांडले पाहिजेत यावर भर दिला; तसे महिलांना पटवून दिले. वावंजे गावातील करुणा मुकादम व उज्ज्वला सांगाडे यांनी पुढाकार घेऊन महिलांना एकत्र केले, रात्री रात्रीच्याही बैठका घेतल्या. वर्षभरात महिलांच्या सहा ग्रामसभा घेतल्या गेल्या. त्या ग्रामसभांना प्रत्येकी दोनशे ते अडीचशे महिलांची उपस्थिती असे. त्यामध्ये महिलांनी महिला बालकल्याण खात्याच्या दहा टक्के निधीचे काय केले जाते? अनुसूचित जाती-जमातीसाठीचा पंधरा टक्के निधी कोठे खर्च होतो? वर्षभरातील केलेले काम, त्याचे अंदाजपत्रक, ग्रामपंचायतीचे उत्पन्न किती? येणारा निधी कसा आणि कधी येतो? या प्रश्नांवर विचारणा केली. पदाधिका-यांकडून उडवाउडवीची उत्तरे मिळाली. शोभा सांगतात, “गावात काम करत असताना अनेक लोकांनी, समाज कार्यकर्त्यांनी, राजकारणी-पुढा-यांनी खूप त्रास दिला. फोनवरून धमक्या दिल्या. त्यामुळे कामाचे नियोजन बदलावे लागले. राजकारण्यांनी कार्यक्रमाच्या वेळी लोकांना फितवण्याचे काम केले, लोकांचा सहभाग कमी करण्याचा प्रयत्न केला, गलिच्छ शब्द ऐकावे लागले, पण गावातील महिला ठाम राहिल्या. तेव्हा ग्रामसेवकाला सर्व माहिती देणे भाग पडले. त्या माहितीतून सतरा लाखांचा भ्रष्टाचार उघड झाला. त्यानंतर महिला माहिती अधिकाराचा वापर करणे, विशेष ग्रामसभा बोलावण्यासाठी आग्रह धरणे अशा संविधानिक मार्गाने गावातील प्रत्येक प्रश्नावर बोलू लागल्या. मग, महिलांनी मांडलेल्या प्रश्नांवर चर्चा होऊन ते मार्गी लावण्यासाठी ठराव होऊ लागले. त्यातून रेशनप्रश्न मार्गी लागलाच. पण लोकांमध्ये त्यांच्या हक्क-अधिकारांबद्दल जागृती निर्माण झाली. तेव्हा माझ्या कामाचे चीज झाल्यासारखे वाटले.” वावंजे गावातील करुणा मुकादम व उज्ज्वला सांगाडे या दोघी ‘कोरो’शी जोडल्या गेल्या आहेत. वावंजे गावात काही महिलांना चावडी वाचनासाठीही बोलावले जाते.

शोभा बोलाडे यांनी अशा पद्धतीचे काम पनवेल तालुक्यातील बारा ग्रामपंचायतींमध्ये केले आहे. यामध्ये वावंजे, शिरवली, चिंचवली, महाळुंगी, मोरबे, शिवणसई, केळवाडी, आसरेवाडी, पेठ, आंबे या गावांचा समावेश आहे. शोभा यांनी काम चौकटीबद्ध केले नाही. त्यामुळे त्यांना कामानिमित्त अनेक ठिकाणे पाहण्याला मिळाली. बंगळुरू हे त्यामधील एक. शोभा सांगतात, “आपण केलेले काम परकीय देशातील, विविध राज्यांतील लोक येऊन पाहतात, समजून घेतात, तेव्हा त्या कामाची पोचपावती मिळते. मला या कामामुळे ओळख मिळाली. समाजासाठी अविश्रांत मेहनत व कठीण परिश्रम यांतच माझी श्रीमंती व मोठेपण आहे. पण त्या कामासाठी लागणारी सांघिक भावना व नेतृत्वगुण माझ्या ‘आजीवली हायस्कूल’मध्ये जोपासला गेला. मला शाळेत मैदानी खेळ व लेझीम यांमध्ये संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. तेथेच हे नेतृत्वबीज रोवले गेले.”

शोभा बोलाडे यांनी अशा पद्धतीचे काम पनवेल तालुक्यातील बारा ग्रामपंचायतींमध्ये केले आहे. यामध्ये वावंजे, शिरवली, चिंचवली, महाळुंगी, मोरबे, शिवणसई, केळवाडी, आसरेवाडी, पेठ, आंबे या गावांचा समावेश आहे. शोभा यांनी काम चौकटीबद्ध केले नाही. त्यामुळे त्यांना कामानिमित्त अनेक ठिकाणे पाहण्याला मिळाली. बंगळुरू हे त्यामधील एक. शोभा सांगतात, “आपण केलेले काम परकीय देशातील, विविध राज्यांतील लोक येऊन पाहतात, समजून घेतात, तेव्हा त्या कामाची पोचपावती मिळते. मला या कामामुळे ओळख मिळाली. समाजासाठी अविश्रांत मेहनत व कठीण परिश्रम यांतच माझी श्रीमंती व मोठेपण आहे. पण त्या कामासाठी लागणारी सांघिक भावना व नेतृत्वगुण माझ्या ‘आजीवली हायस्कूल’मध्ये जोपासला गेला. मला शाळेत मैदानी खेळ व लेझीम यांमध्ये संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. तेथेच हे नेतृत्वबीज रोवले गेले.”

शोभा बोलाडे यांनी अशा पद्धतीचे काम पनवेल तालुक्यातील बारा ग्रामपंचायतींमध्ये केले आहे. यामध्ये वावंजे, शिरवली, चिंचवली, महाळुंगी, मोरबे, शिवणसई, केळवाडी, आसरेवाडी, पेठ, आंबे या गावांचा समावेश आहे. शोभा यांनी काम चौकटीबद्ध केले नाही. त्यामुळे त्यांना कामानिमित्त अनेक ठिकाणे पाहण्याला मिळाली. बंगळुरू हे त्यामधील एक. शोभा सांगतात, “आपण केलेले काम परकीय देशातील, विविध राज्यांतील लोक येऊन पाहतात, समजून घेतात, तेव्हा त्या कामाची पोचपावती मिळते. मला या कामामुळे ओळख मिळाली. समाजासाठी अविश्रांत मेहनत व कठीण परिश्रम यांतच माझी श्रीमंती व मोठेपण आहे. पण त्या कामासाठी लागणारी सांघिक भावना व नेतृत्वगुण माझ्या ‘आजीवली हायस्कूल’मध्ये जोपासला गेला. मला शाळेत मैदानी खेळ व लेझीम यांमध्ये संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. तेथेच हे नेतृत्वबीज रोवले गेले.”

शोभा त्यांच्या आयुष्याचा पट मागे वळून पाहतात, तेव्हा त्यांना काही चांगल्या-वाईट आठवणी अस्वस्थ करतात. शोभा यांच्या वडिलांची काही कारणास्तव ‘कोकण भवन’मधील सरकारी नोकरी सुटली. त्यांच्या वडिलांनी कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी खाणावळे गावामध्ये अल्पोपाहाराची गाडी टाकली. शोभा त्या वेळी चौथीत होत्या. शोभा भावंडांमध्ये मोठ्या. त्यांना शाळा सांभाळून वडिलांना मदत करण्यासाठी जावे लागे. त्यांना घरच्या जबाबदारीमुळे बालपण अनुभवता आले नाही याची खंत जाणवते. शोभा यांना काही कटू अनुभवांनाही सामोरे जावे लागले. त्यांच्या नात्यातील एक मवाली मुलगा शोभा यांच्या प्रेमात पडला. शोभा यांची काहीही चूक नसताना त्यांच्या वडिलांनी दहावीतच त्यांची शाळा बंद केली. त्यामुळे शिकण्याची इच्छा असूनही त्या शिकू शकल्या नाहीत. त्यातच शोभा यांचे त्यांच्या वडिलांनी त्यांचे लग्न कमी वयात १९९७ साली करून दिले. त्यामुळे शोभा व त्यांचे वडील यांच्यात अढी निर्माण झाली. लग्नानंतर शोभा पनवेलमधील महाळुंगी गावच्या रहिवासी झाल्या. त्यांचे पती संतोष बोलाडे हे मच्छी व्यवसाय करणा-या खासगी कंपनीत नोकरीला होते. पण त्यांच्या नव-याच्या वागण्यात बेफिकिरी होती, जबाबदारीची जाणीव नव्हती. साहजिकच, शोभा यांना त्याची झळ बसली. काही दिवसांत मातृत्वाची चाहूलही लागली, पण तो आनंद अनुभवण्याची परिस्थिती व मनस्थिती नव्हती. त्यांना माहेराहूनही कोणी बोलावले नाही. त्यांचा मुलगा, ऋषीकेशच्या जन्मानंतर मात्र तुसडेपणाने वागणारे वडील प्रेमळपणे वागू लागले. किंबहुना, वडिलांनी मुलीची संसारातील ओढाताण पाहून नातवाला त्याच्या भविष्यासाठी स्वत:कडे ठेवून घेतले. शोभा यांना अशा प्रतिकूल परिस्थितीमुळे मातृत्वसुखही अनुभवता आले नाही. ते दु:ख त्यांना डाचत राहते.

शोभा बोलाडे - ९२७३५५७७१५/ ९२७३४३३७३२

- वृंदा राणे

Last Updated - 14th July 2017

लेखी अभिप्राय

कोणत्याही प्रकारचे अर्थकारण न करता खर्‍या अर्थाने समाजकार्य करणार्‍या शोभा बोलाडे यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा

Rajani06/05/2017

अशा अनेक शोभा गावागावात तयार झाल्या तर गाव विकास नक्की होईल आणि गाव विकास झाला तर देश विकास होण्यासाठी वेळ नाही लागणार....उच्च शिक्षणाशिवाय ही गरजेची आहे सामाजिक समस्यांची जाणीव आणि प्रत्यक्ष कृती

vaishali rayate06/05/2017

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.