प्रगती प्रतिष्ठान - आदिवासी विकासासाठी प्रयत्‍नशील


‘प्रगती प्रतिष्ठान’ ही संस्था पालघर जिल्ह्यामध्ये जव्हार व मोखाडा तालुक्यांत आदिवासींच्या विकासासाठी काम करते. त्या संस्थेने शिक्षण, अपंगांचे पुनर्वसन, स्वयंरोजगार व ग्रामविकास यांच्या माध्यमातून आदिवासी लोकांचे जीवनमान उंचावण्यात मोलाचे कार्य साधले आहे. संस्थेने गावातील लोकांच्या गरजेनुसार विकास आराखडा बनवून ग्रामविकासाला चालना दिली. त्यामध्ये नळपाणी योजना, जलसंवर्धन, शेती विकास, सौरऊर्जा, शेतीला सौर पंपाने पाणी देण्याचे नियोजन या मुख्य गोष्टींना प्राधान्य आहे. तसेच, कौशल्याधारित प्रशिक्षणाद्वारे स्वयंरोजगाराची कवाडे आदिवासींसाठी खुली केली गेली आहेत.

वसंत पटवर्धन हे 'प्रगती प्रतिष्ठान’चे संस्थापक. ते बी.कॉम झालेले. पटवर्धन ‘इंडियन ह्यूम पाइप’ कंपनीत नोकरीला होते. त्यांचे कामानिमित्त पालघरमध्ये १९६२ ते १९७२ या दहा वर्षांच्या काळात येणे-जाणे होत होते. तेव्हा त्यांच्या लक्षात आले, की जव्हार-मोखाडासारख्या आदिवासी भागातील लोक देवभोळे व अंधश्रद्धाळू आहेत. त्यामुळे भोंदू भगत त्यांचा गैरफायदा घेतात. पालघरमध्ये ऐंशीच्या दशकात प्राथमिक सुविधांची वानवा होती; आरोग्य सुविधा मिळणे दुरापास्तच! त्यामुळे कुपोषण, गरोदर मातांच्या मृत्यूचे प्रमाण जास्त होते. ती परिस्थिती पाहून वसंत पटवर्धन यांनी ‘प्रगती प्रतिष्ठान’ या संस्थेची १९७२ मध्ये स्थापना केली. संस्थेने आरंभी वैद्यकीय सेवेसाठी एक पूर्ण वेळ डॉक्टर नेमला; त्याच बरोबर वैद्यकीय पथकाद्वारे आदिवासीबहुल भागात फिरता दवाखाना सुरू करण्यात आला. दोन तालुक्यांत तीन आरोग्य केंद्रे होती. वैद्यकीय पथक दर आठवड्यात आरोग्य केंद्रांना भेट देऊन रुग्णांवर औषधोपचार करत असे. संस्थेने तशी वैद्यकीय सुविधा सतरा वर्षें पुरवली; शासनाचे आरोग्य केंद्र स्थापन झाल्यावर ती सुविधा बंद केली गेली.

‘प्रगती प्रतिष्ठान’च्या उपक्रमांसाठी जव्हारमध्ये सरकारकडून एक एकर जागा देणगी म्हणून मिळाली, तर संस्थेने अर्धा एकर जागा विकत घेतली. त्या जागेवर १९८५ मध्ये ‘निवासी निलेश लक्ष्मण मुर्डेश्वर कर्णबधिर विद्यालया’ची स्थापना करण्यात आली आहे. विद्यालयात बालवर्ग ते चौथीपर्यंत चौसष्ठ विद्यार्थी शिक्षण घेतात. ती मुले चौथीनंतरचे शिक्षण ‘एकात्मिक शिक्षण योजने’अंतर्गत घेतात. शाळेत मुलांना विविध कौशल्ये शिकवली जातात. त्यामुळे विद्यार्थी स्वयंरोजगार मिळवून स्वावलंबी होऊ शकतात. त्या विद्यालयात पालघर जिल्ह्याच्या आठ तालुक्यांतील नव्वद टक्के आदिवासी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. संस्थेची ती सेवा तीस वर्षांपासून अखंडित सुरू आहे. मुंबईतील अँकर ‘इलेक्ट्रिकल्स प्रा. लि. कंपनी’च्या सहकार्याने तेरा विद्यार्थ्यांना २०१५-१६ या शैक्षणिक वर्षात डिजिटल श्रवणयंत्रे देण्यात आली. विद्यालयाकडून त्या श्रवणयंत्रांचा व मौखिक पद्धतीचा वापर करून मुलांचे संवादकौशल्य वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

‘प्रगती प्रतिष्ठान’चे ‘प्रगती विद्यार्थी वसतिगृह’ मोखाड्यामध्ये पस्तीस वर्षांपासून सुरू आहे. वसतिगृहात आठवी ते दहावी इयत्तेतील अठ्ठावीस विद्यार्थी राहतात. ते विद्यार्थी ‘कर्मवीर भाऊराव पाटील रयत शिक्षण संस्थे’त शिक्षण घेतात. वसतिगृहाचा २०१५-१६ या शैक्षणिक वर्षाचा निकाल शंभर टक्के लागला आहे. सातशेबहात्तर पाड्यांमधील सातशेएकोणऐंशी विद्यार्थ्यांनी त्या वसतिगृहाचा फायदा घेतला आहे.

जव्हार, मोखाडा यांसारख्या आदिवासी भागात गोरगरीब लोकांना पोटाची खळगी भरण्याची भ्रांत होती. ‘प्रगती प्रतिष्ठान’ने रोटरी क्लब व इतर संस्था यांच्या सहाय्याने वाड्या-पाड्यांवर सौरदीप वाटले. संस्थेच्या प्रयत्नातून पाच हजार सातशेसत्तेचाळीस कुटुंबांची अंधारमय घरे सौर ऊर्जेवर चालणा-या एलईडी दिव्यांनी प्रकाशित झाली आहेत. मोखाडा तालुक्यातील सहा आश्रमशाळांना सौर ऊर्जेद्वारे वीज व्यवस्था पुरवण्यात आली आहे. कर्णबधिरांच्या ‘सौर आशा केंद्रा’मार्फत गावात सौरदीपांची जोडणी करणे, त्यांची देखभाल करणे ही कामे केली जातात.
संस्थेने ‘आयसीआयसीआय बँके’च्या सहकार्याने व ग्रामस्थांच्या सहभागातून जव्हार तालुक्यातील एैना, झाप व पाथर्डी ग्रामपंचायतींच्या सात पाड्यांत ‘सौरग्राम प्रकल्प’ राबवला आहे. प्रकल्प स्वतंत्र ऊर्जा केंद्रांद्वारे यशस्वी करण्यात आला. त्या सौर सिस्टिमवर टीव्ही, पंखा, तसेच धान्य गिरणीदेखील सुरू होते. ‘सौर प्रकल्पा’चा दोनशेपाच कुटुंबांना फायदा झाला आहे. सर्व कुटुंबे नियमितपणे वीजबिले भरतात. ‘सौरग्राम योजने’तील घरांतील दिव्यांची जोडणी कर्णबधिर युवकांनी केली आहे.

संस्थेने लोकांना पिण्यास शुद्ध पाणी मिळावे व महिलांच्या कष्टाला न्याय मिळावा यासाठी जव्हार, मोखाडा व विक्रमगड तालुक्यांत ‘ग्रामीण नळपाणी योजना’ राबवली आहे. दूरवरील पाणी असलेल्या विहिरींवर वीज पंप बसवून गावात पाणी आणले जाते. विजेची व्यवस्था नसलेल्या ठिकाणी सौर पंपांचा वापर केला गेला आहे. संस्थेने त्या योजनेअंतर्गत चाळीस ठिकाणी ‘नळपाणी योजना’ राबवल्या. त्यातील तीस ‘नळपाणी योजना’ सौर ऊर्जेवर चालत आहेत. त्या योजनेचा लाभ एकोणसाठ पाड्यांतील तीन हजार दोनशेपन्नास कुटुंबांना झाला आहे. सौर पंपांसाठी पाँडेचरी येथील ‘ग्रुण्डफोस कंपनी’ने सहकार्य केले. तर त्या योजनेला पुण्याच्या ‘ग्राम ऊर्जा सोल्यूशन प्रा. लि.’ या कंपनीने तांत्रिक सहकार्य केले. त्या योजनेच्या गावपातळीवरील व्यवस्थापनासाठी ग्रामस्थांनी ‘नळपाणी योजना समिती’ स्थापन केली आहे. ‘नळपाणी योजने’च्या देखभाल-दुरुस्तीसाठी प्रत्येक कुटुंबाकडून दरमहा पन्नास रुपये समितीच्या बँक खात्यात जमा करण्यात येतात.

संस्थेने जव्हारमध्ये जलसंधारणाची मोहीम हाती घेतली आहे. त्यासाठी नैसर्गिक नाले, ओहोळ यांवर तेहतीस बंधारे बांधले आहेत. त्याचा फायदा दोनशेचाळीस शेतकरी कुटुंबांना पिण्यासाठी व शेतीसाठी झाला आहे. संस्थेने मोगरा लागवड केलेल्या काही शेतक-यांना शेततळी बांधून दिली आहेत. त्यामुळे त्या शेतक-यांचे उत्पन्न वाढले आहे. संस्थेने भविष्यात पाणीप्रश्न गंभीर होऊ नये, यासाठी उपाययोजना करण्याचे ठरवले आहे. संस्थेने नैसर्गिक पाणी स्रोतांवर सिमेंट बंधारे, वनराई बंधारे, वायरमेश, तसेच शेततळी बांधण्यावर भर दिला आहे. ओढ्यातील गाळ, रेती, दगड काढून पाणीसाठा वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

संस्थेने कृषी विकासाला चालना म्हणून ‘सिजेण्टा फाउंडेशन इंडिया’ यांच्या सहकार्याने विविध गावांत ‘शेती सुधार उपक्रम’ सुरू केला. त्या उपक्रमाद्वारे शेतक-यांना शेतीतील सुधारित तंत्राची माहिती, पीक हंगाम नियोजन, भात आणि भाजीपाल्याच्या योग्य जातीची निवड, पीक व्यवस्थापन यांबाबत मार्गदर्शन केले जाते. प्रशिक्षण कार्यक्रमांद्वारे शेतकऱ्यांना शेणखत, जीवामृत, पिकांसाठी खत व्यवस्थापन, कीड व रोग नियंत्रणाबाबत माहिती दिली जाते. प्रशिक्षण कार्यक्रमाचा तीन हजार शेतकऱ्यांना फायदा झाला. खरीप हंगामात भातशेतीच्या बरोबरीने भाजीपाला पिकवला जातो. पाण्याच्या उपलब्धतेनुसार हिवाळ्यातही शेतकरी कारली, भेंडी, मिरची, दुधी, शिराळी, फरसबी, वांगी यांसारखी पिके घेतात. संस्थेकडून शेतकऱ्यांना विविध भागांतील बाजारपेठ उपलब्ध करून दिली जाते. संस्थेच्या मार्गदर्शनाखाली सुमारे नऊशे एकोणचाळीस शेतकरी दोनशेएकोणनव्वद एकरांवर भाजीपाला करतात. संस्थेने आधुनिक पद्धतीने भाजीपाला रोपे तयार करण्यासाठी पॉलिहाऊसची उभारणी केली आहे. तसेच, संस्थेने ‘आयडीबीआय बँके’तून शेतकऱ्यांना ‘किसान क्रेडिट कार्ड’ मिळवून दिली आहेत. त्यामुळे शेतक-यांना पीक कर्ज व दीर्घ मुदतीचे कर्ज मिळवणे सोपे झाले आहे. ‘प्रगती प्रतिष्ठान’ने शेतकऱ्यांना ठिबक सिंचनाचे महत्त्व पटवून दिले. पावसाळ्यानंतरही शेतीसाठी पाणी उपलब्ध व्हावे यासाठी जव्हार तालुक्यातील आळ्याचीमेट, तसेच विक्रमगड तालुक्यातील डोंगरीपाडा येथील शेतकरी गटांना सौर पंपांद्वारे ठिबक सिंचन यंत्रणा बसवून देण्यात आली. या भागातील शेतकरी गटांची फार्मर्स प्रोड्यूस ऑर्गनायझेशनमध्ये नोंदणी झाली आहे. त्यामुळे त्यांना त्यांचा शेतमाल थेट ग्राहकांना विकता येतो. साधारणत: शेतक-याला एका हंगामात दहा गुंठा जागेतील भाजीपाला लागवडीतून सुमारे वीस हजार रुपये उत्पन्न मिळते.

संस्थेच्या ‘पाणी प्रथम व स्वच्छता प्रकल्पा’द्वारे लोकांचे प्रबोधन करण्यात येते. त्यामुळे पाणीवापर आणि स्वच्छता यांचे महत्त्व गावकऱ्यांना कळले आहे. नऊ पाड्यांतील तीनशेअठ्ठावीस कुटुंबांना त्या प्रकल्पाचा लाभ झाला आहे. आकरे ग्रामपंचायतीमधील पाड्यांत एकात्मिक ग्रामीण विकास प्रकल्पांतर्गत स्वच्छ, शुद्ध पिण्याचे पाणी पोचवले जाते.

‘प्रगती प्रतिष्ठान’च्या वतीने जव्हार तालुक्यातील आकरे ग्रामपंचायतीच्या वाकीचा पाडा व बेहेडपाडा येथे बालवाडी सुरू आहे. त्यात तीन ते सहा वर्षें वयोगटातील पस्तीस बालकांना खेळ, गाणी, गोष्टी यांच्या माध्यमांतून शिकवले जाते. त्यांना सकस आहारही देण्यात येतो. ‘प्रगती प्रतिष्ठान’ने ‘अपंग पुनर्वसन व आदिवासी युवक स्वयंरोजगार केंद्रा’मार्फत ‘कर्णबधिर विद्यालया’तील विद्यार्थ्यांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे. त्या विद्यालयातील काही माजी विद्यार्थी वारली चित्रकार, तर काही मूर्तिकार आहेत. संस्थेने त्या युवकांनी बनवलेल्या वारली चित्रकलेच्या विविध वस्तू व पेपरमॅशच्या (रंगीत कागदांची आभूषणे) वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून दिली आहे.

‘प्रगती प्रतिष्ठान’च्या विविध उपक्रमांसाठी वार्षिक खर्च चार कोटींच्या वर येतो. तो खर्च संस्थेच्या ‘कॉर्पस फंडा’च्या व्याजातून, विविध बँकांच्या-संस्थांच्या मदतीतून व लोकांनी दिलेल्या देणग्यांतून चालवण्यात येतो. संस्थेचा कार्यभार बेचाळीस लोक मिळून सांभाळतात. ‘प्रगती प्रतिष्ठान’च्या उल्लेखनीय सामाजिक कार्याबद्दल ‘विद्यार्थी सहायक समिती, वरोरा, जि. चंद्रपूर’ या संस्थेकडून २०१६ चा ‘श्रद्धेय बाबा आमटे मानवता पुरस्कार’ उज्ज्वल निकम यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे.

सुनंदा पटवर्धन ९४२३०२७९३१

- वृंदा राकेश परब

लेखी अभिप्राय

आपल्या संस्थेचे नाव मी ऐकूण आहे.पण वास्तवात भेट होत नाही.काम उत्तम आहे.सौरऊर्जा व जल नियोजन हे उत्तम.पण सर शासन अशा संस्थांना जलयुक्त शिवार ची कामे देत नाही.असो. काम चांगले.
एन.बी.भारती[डा.तिवारी निवास.]
RTI महासंघ प्रतिनिधी.
मु.पो.ता.हदगाव जि.नांदेड.
मोबा.९५९५६०१६४३
email..narenbharati4@gmail.com

NAREN BHARATI07/03/2017

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.