कल्‍याण तालुका संस्‍कृतिवेध

प्रतिनिधी 24/01/2017

'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलकडून कल्‍याण तालुक्‍यातील वर्तमान कर्तृत्‍व, सेवाभावी कामे आणि गावागावांना लाभलेला सांस्‍कृतिक वारसा अशा माहितीचे संकलन करण्‍याकरता 'कल्‍याण तालुका संस्‍कृतिवेध' या मोहिमेचे आयोजन करण्‍यात आले आहे. ती मोहिम २६ जानेवारी २०१७ ते २९ जानेवारी २०१७ या कालावधीत राबवली जाणार आहे. मोहिमेत मुंबई, ठाणे, कल्‍याण, डोंबिवली, पनवेल आणि नाशिक अशा परिसरांतून विविध व्‍यक्‍ती आणि गोवेली महाविद्यालयाचे विद्यार्थी 'माहिती संकलक कार्यकर्ते' म्‍हणून सहभागी होत आहेत.

कल्‍याणचा विचार करताना चटकन डोळ्यांसमोर उभा राहतो तो त्‍याचा इतिहास. कल्याण शहराचे उल्लेख इतिहासात मौर्य काळापासून दिसतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या आरमाराची सुरुवात कल्याण बंदरात केली होती. कल्‍याणच्‍या सुभेदाराच्‍या सुनेची कथा, पेशवा बाजीरावाचा विवाह, शंबरिका खरोलिकाचे निर्माते पटवर्धन किंवा पहिल्‍या महिला डॉक्‍टर आनंदीबाई जोशी... विविध घटना आणि थोर व्‍यक्‍तींचे अस्तित्‍व यांमुळे कल्‍याणला गौरवशाली इतिहास लाभला आहे. दुर्गाडी किल्‍ला, अंबरनाथचे शिवमंदिर, काळा तलाव अशा अनेक वास्‍तू-ठिकाणे त्या इतिहासाची आठवण करून देतात. मात्र कल्याणचा वर्तमानसुद्धा तेवढाच जागृत आहे. तेथे सुरू असलेल्‍या 'सुभेदार वाडा कट्टा'सारखे उपक्रम, 'कल्‍याण सार्वजनिक वाचनालय', 'कल्‍याण गायन समाज' यांसारख्‍या विविध संस्‍था, काका हरदास, सदाशिवभाऊ साठे, कल्‍पना सरोज, चित्रकार राम जोशी, श्रीनिवास साठे अशा कित्‍येक व्‍यक्‍ती आणि जागोजागी आढळणारी स्‍थानिक वैशिष्‍ट्ये हा सारा कल्‍याणचा वर्तमान! त्‍या परिसरातील माणसांचे कर्तृत्व आणि तेथील सामाजिक कार्यातून व्‍यक्‍त होणारा माणसांचा चांगुलपणा हेच तर कल्याणचे वैशिष्‍ट्य! तेथील वर्तमान धगधगता आहे म्‍हणूनच कल्‍याणच्‍या इतिहासाला झळाळी प्राप्‍त होते.

'कल्‍याण तालुका संस्‍कृतिवेध' ही मोहिम म्‍हणजे, कल्‍याण परिसराच्‍या ढोबळ नोंदींपलिकडे जाऊन तेथील गावागावांमध्‍ये काय घडले-घडते हे समजून घेण्‍याचा, इतिहासाच्‍या थोरवीसोबत कल्‍याणच्‍या वर्तमान श्रेष्‍ठतेचा आढावा घेण्‍याचा प्रयत्‍न आहे.

‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ या वेबपोर्टलची सुरूवात मराठी माणसातील ताकद आणि चांगुलपणा यांची नोंद करावी, त्‍यांस व्‍यासपीठ मिळवून द्यावे आणि मराठी भाषा आणि संस्कृती यांचे जतन-संवर्धन करावे या हेतूने सुमारे २०१० साली करण्‍यात आली. वेबपोर्टलवर महाराष्ट्रभरातील कर्तृत्ववान, सेवाभावी व्यक्तींची छोटी चरित्रात्मक माहिती आणि गावोगावचा सांस्कृतिक वारसा यांचे दर्शन घडवले जाते. 'थिंक महाराष्‍ट्र'ने माहिती संकलनासाठी तालुका हे केंद्र कल्पिले आहे. त्यानुसार तालुक्‍यातालुक्‍यात माहिती संकलनाच्‍या मोहिमांचे आयोजन केले जाते. 'थिंक महाराष्‍ट्र'च्‍या मोहिमांचा आरंभ सोलापूर जिल्ह्यापासून २०१४ मध्‍ये झाला. त्‍यानंतर नाशिक-औरंगाबाद जिल्‍ह्यातील काही तालुक्‍यांमध्‍ये तशा मोहिमा घडल्या. 'थिंक महाराष्‍ट्र'कडून जानेवारी महिन्‍यातील २६ ते २९ अशा चार दिवसांमध्‍ये 'कल्‍याण तालुका संस्‍कृतिवेध' ही माहिती संकलनाची मोहिम राबवण्‍यात येणार आहे.

कल्‍याण मोहिमेत सहभागी होणारे कार्यकर्ते दररोज दोन व्‍यक्‍ती किंवा संस्‍था यांना भेट देऊन त्‍यांची माहिती टिपून घेणार आहे. ते त्‍यावर लिहिलेले लेख 'थिंक महाराष्‍ट्र'कडे पाठवतील. ज्या स्‍थानिक अथवा इतर ठिकाणच्‍या व्यक्तींना या मोहिमेमध्ये सक्रीय सहभागी व्हायचे आहे त्यांनी पुढील पत्त्यावर-क्रमांकांवर संपर्क साधावा.

शैलेश पाटील - ९६७३५७३१४८
किरण क्षीरसागर - ९०२९५५७७६७

व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन
२२ मनुबर मॅन्शन, १९३ डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, चित्रा सिनेमासमोर, दादर (पूर्व), मुंबई ४०० ०१४
(०२२) २४१८३७१०,
info@thinkmaharashtra.com

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.