विवेक सबनीस - जुन्या पुण्याच्या शोधात


'स्मरणरम्य पुणे' किंवा 'पुणे नॉस्टॅल्जिया' हे कॅलेंडर मराठी आणि इंग्रजी अशा दोन भाषांत तयार केले गेले आहे. पुणे शहर काळाच्या ओघात बदलत गेले. ते कॅलेंडर जुन्या काळच्या आठवणी जागवण्याचे काम करते. त्यावेळी पुणे शहर बकाल नव्हते, तेथे रहदारी नव्हती, स्वच्छता आणि शांतता नांदत होती. विवेक सबनीस यांची ती निर्मिती. सबनीस म्हणतात, की “पुस्तकांपेक्षा कॅलेंडर सर्वसामान्य माणसांपर्यंत चांगल्या रीतीने पोचते. ते भिंतीवर सतत डोळ्यांपुढे राहते.”

सबनीसांचे कॅलेंडर म्हणजे केवळ जुने फोटो नव्हेत तर ते जुन्या पुण्याची भेट शब्दांमधूनही घडवून देते. सबनीस यांनी 'ते क्षण त्या आठवणी' या सदरातून दुर्मीळ छायाचित्रांच्या सोबतीने पुण्याची रंजक, मजेदार माहिती मांडली आहे.

कॅलेंडरची निर्मितीकथा सुरू होते सबनीसांच्या छंदातून. छंद आनंददायी असतो. त्यात सातत्य असले, की त्यातून संग्रह निर्माण होतो, एखाद्या गोष्टीचा शोध सुरू होतो, त्या ओघात अभ्यासाचे वेड लागते. एखादा धडपड्या त्यातून निर्मितीही करतो. विवेक सबनीस तसेच धडपडे. त्यांना तीनेक दशकांपूर्वी पुणे शहराची जुनी छायाचित्रे जमा करण्याचा छंद जडला. त्यांनी त्या छंदातून पुणे शहराच्या गतवैभवाला उजाळा देणारे 'स्मरणरम्य पुणे' नावाचे कॅलेंडर तीस वर्षांनंतर निर्माण केले आहे.

विवेक सबनीस यांनी त्यांच्या पत्रकारितेतील करिअरची सुरूवात पुण्याच्या ‘प्रभात’-‘केसरी’ वृत्तपत्रांपासून १९८३ मध्ये सुरू केली. त्या‍नंतर त्यांनी 'टाइम्स ऑफ इंडिया'मध्येे वीस वर्षे, 'महाराष्ट्र टाइम्स'मध्येे पाच वर्षे आणि 'मिड डे' या वृत्तपत्रात पाच वर्षें नोकरी केली. ते निवृत्तीसमयी सहाय्यक संपादक या पदावर कार्यरत होते. त्यांना पुण्याच्या जुन्या छायाचित्रांचा संग्रह करण्याचा छंद नोकरीच्या काळात जडला. त्यांनी त्यासाठी जुना बाजार, फोटोंचे संग्राहक अशा ठिकाणांच्या वाऱ्या केल्या. त्यांना पुण्यात १९६१ साली आलेल्या पुराचे फोटो गवसले. सबनीस त्या‍ फोटोंचे बाड १९८३ साली पाच हजार रुपयांना विकत घेतल्याची आठवण सांगतात. ते म्हणतात, मी माझे पगारच्या पगार त्या फोटोंसाठी खर्च करत असे. त्यातून त्यांच्याकडे तशा छायाचित्रांचा मोठा संग्रह निर्माण झाला आहे. ते वेड तेथे थांबले नाही. त्यांनी पुण्यासंदर्भातील माहितीपर पुस्तके जमा करण्याचा सपाटा लावला. त्यांनी छायाचित्रे आणि माहिती यांच्या आधारे इंग्रजी वृत्तपत्रांमध्ये लेख लिहिले. सबनीस म्हणतात, मी केवळ जुन्या आठवणींना उजाळा देत बसत नाही, तर त्या लेखनातून त्या जुन्या माहितीचा वर्तमानाशी संबंध लावण्याचाही प्रयत्न करतो.

सबनीस यांच्या संग्रहात अलका टॉकिज रोड, फर्ग्युसन महाविद्यालयाची इमारत, एस. पी. कॉलेजची इमारत, मुठा नदी, कालौघात नामशेष झालेली वेस्टएंड-एम्पायर-हिंदविजय ही चित्रपटगृहे, पर्वती अशा अनेक ठिकाणांचे फोटो आहेत. त्यांच्या संग्रहात विंचुरकर वाड्याच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना ‘कायद्या’चे धडे देणारे लोकमान्य टिळक असा दुर्मीळ फोटोदेखील आहे.

सबनीस पत्रकारितेतून निवृत्त झाले. तेव्‍हा त्‍यांना 'त्या दुर्मीळ ठेव्याचे काय करावे' या विचारातून कॅलेंडरची कल्पना सुचली. त्यांच्या प्रकाशक मित्राने ती कल्पना उचलून धरली आणि 'स्मरणरम्य पुणे' या कॅलेंडरची निर्मिती झाली.

सबनीस यांनी कॅलेंडरमध्ये दहा बाय चौदा इंचाचे कृष्ण धवल फोटो वापरले आहेत. त्यांच्या छपाईसाठी इटालियन पेपरची निवड केली आहे. कॅलेंडर उच्च निर्मितिमूल्यामुळे 'कलेक्टर्स आयटेम' झाले आहे. त्याची किंमत आहे दोनशे रुपये. सबनीस म्हणतात, की कॅलेंडरची दोन हजार अंकांची पहिली आवृत्ती नववर्षाच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत संपुष्टात आली. सबनीस आता दुसऱ्या आवृत्तीच्या खटपटीला लागले आहेत.

विवेक सबनीस
9373085948, sabnisvivek@gmail.com

- किरण क्षीरसागर

लेखी अभिप्राय

calender sangrahi asayalach havy.Mr.Sabanisanche kaam vishesh dakhalpatra.

Trupti sapka.21/01/2017

abhinandan ani pudhil vatchalis shubhecha !

Dr. S.R. Shende09/02/2017

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.