गोडसे भटजींचा - माझा प्रवास

प्रतिनिधी 18/01/2017

मराठी ऐतिहासिक चित्रपटच जणू!

पिवळसर, जीर्णशीर्ण पानांचे, छोटेसे एक पुस्तक हा माझा आयुष्यातील शंभर टक्के खात्रीलायक विरंगुळा होता. त्या पुस्तकाची भेट हा अनुभव प्रत्येक वेळी ताजा रसरशीत असे. त्या पुस्तकाला शीर्षक आहे; पण ते केवळ व्यावहारिक सोयीपुरते!

मी गोडसेभटजी नामक बोलघेवड्या ब्राह्मणाला कुमारवयात प्रथम भेटलो. म्हणजे, ‘मे महिन्याच्या सुट्टीत वाचलेली पुस्तके; वाचनाला लागलेला काळ; पुस्तकाचा सारांश’ इत्यादी इत्यादी पंचनामा वहीत लिहिण्याच्या बाळबोध काळात! पण ‘माझा प्रवास’ नावाचे ते पुस्तक वाचू लागलो आणि बघता बघता, मी पुस्तक वाचत आहे हे भानच पुसले गेले. तो अनुभव कधीच बदलला गेला नाही. पुस्तक वाचण्यास सुरुवात केली, की काही क्षणांत हातांतील पुस्तक विरघळून जाते. भोवतालचे वर्तमानकाळाचे कंगोरे वितळू लागतात. एकोणिसाव्या शतकाचा पुराणा गंध नाकाशी घोटाळू लागतो. वाचक कोकणातील वरसई नामक गावाच्या, गूढ सावल्यांनी झाकोळलेल्या वाडीतील सारवलेल्या अंगणात जातो आणि त्याला समोरच्या बाजेवर मांडा ठोकून बसलेला टुणटुणीत म्हातारा त्याच्या तरुणपणातील मोहिमेच्या आठवणी सांगू लागतो. म्हातारा जगून झालेले सारे वाचकासमवेत पुन्हा नव्याने जगू लागतो.

प्रथम येतो तो त्याचा कुलवृत्तांत! कोकणच्या घराण्यामधील त्या काळच्या हकिकतीत वेगळेपणा कसला? तेच अठराविश्वे दारिद्र्य; तीच हताश अगतिकता आणि मग त्यातून येणारी तीच अटळ ओढगस्त व कुचंबणा! पण गोडसेभटजी त्या गोष्टीही मोठ्या स्वाभाविक शैलीदारपणे सांगतात. त्यांच्या भाषेत, ‘दारिद्र्यावस्थेनं त्यांना माळ घातलेली असते’ किंवा ‘लहानपणापासूनच त्यांच्या मागीलदारी-पुढीलदारी दारिद्र्य फुगड्या घालत असते.’ साहजिकच, तरुण गोडसेभटजींच्या हृदयातील सुप्त सिंदबाद जागा होतो. ते उत्तर हिंदुस्थानात जाऊन काही धनप्राप्ती करावी असा संकल्प सोडून, घरच्यांची समजूत कशीबशी घालून निघतात आणि एका रोचक कहाणीचा आरंभ होतो.

‘तारुण्याच्या भरात, शक्तीच्या आमदानीत प्रवासासारखी मौज नाही. सुखाची, आनंद देण्याची शक्ती काही दु:खाची मिसळ असल्याशिवाय बाहेर पडत नाही. चालण्याने अंग दुखणे, एकाद्या दिवशी जेवावयास न मिळणे, दुसऱ्या दिवशी भर दोन प्रहरी एखाद्या बाभळीच्या विरल छायेत पाणी पाणी करत बसणे, तिसऱ्या दिवशी रात्रीच्या भर थंडीत अरण्यात कुडकुडत पडणे, थोडीशी भामट्यांची भीती असणे वगैरे प्रसंगी घडणाऱ्या गोष्टी प्रवासाच्या सुखात मिळून सुखरूपच होऊन जातात.’

यांसारखी वाक्ये जेव्हा भटजी ओघात बोलून जातात तेव्हा त्यांच्या तोंडून जगातील सर्व भटक्या माणसांचे मानसशास्त्रच जणू बोलू लागते. भटजी वर्षाच्या आत परतण्याचा हवाला देऊन निघाले खरे; पण ते प्रत्यक्षात एका मागोमाग एक नव्या आपत्तीत सापडत आणि त्यातून निभावत तब्बल दोन वर्षांनी पुन्हा स्वत:च्या घराची सावली पाहू शकले. कारण भटजींनी कुटुंबाचा चरितार्थ एवढ्याच माफक ध्येयाने घर सोडले असले तरी त्यांच्या भाग्यात प्रत्यक्षात देशाच्या इतिहासातील एका ज्वलंत घटनेचा प्रत्यक्ष साक्षीदार होणे लिहिलेले होते!

गोडसेभटजींच्या कहाणीला ‘कॅनव्हास’ प्रचंड मिळाला आहे तो १८५७ च्या स्वातंत्र्याचा! त्या घटनेकडे एरवी पाहिले जाते ते इतिहास म्हणून आणि काळाचे अंतर पुरेपूर राखून! पण गोडसेभटजींची हकिकत वाचताना तो इतिहास हा जणू ‘वर्तमानकाळ’ होऊन जातो. वाचकही त्या धामधुमीत भटजींबरोबर चारचौघांसारखे सामील झालेले असतात आणि त्यामागील सारा थरार जणू साक्षात् अनुभवत असतात. मग ऐतिहासिक तटस्थपणा उरत नाही, की राणा भीमदेवी अभिनिवेशही चढू शकत नाही. कारण वाचकाची भूमिका होते ती महापुरातून नाकातोंडात पाणी जाऊनही बचावून उरणाऱ्या आर.के. लक्ष्मणनिर्मित ‘कॉमन मॅन’ नामक लव्हाळ्याची! वाचक त्या हतबुद्ध ‘कॉमन मॅन’च्या नजरेतूनच साऱ्या गोष्टी पाहू लागतो. तत्कालीन सामाजिक परिस्थिती पाहतो, व्यक्तींच्या हकिकती ऐकतो.

एका सुस्वरूप भंगिणीशी स्वत: संधान जोडून, तिच्याशी चोरून संबंध ठेवणाऱ्या समस्त ब्रह्मवृंदांची ‘जानवी’ तिच्याकरवी गोळा करून अवघ्या शहरावर गोमूत्र शिंपडण्याचा प्रसंग आणणारे उपद्व्यापी शास्त्रीबुवा मग ओळखीचे होतात. दोन वेळा खाण्याची भ्रांत असलेल्या भिक्षुकाला उंची शय्यादान, हत्तीदान – कहर म्हणजे स्वरूपसुंदर ‘दासी’चे दान असल्या ‘आचरट दानशूरते’चे सोहाळे सांग्रसंगीत पाहायला मिळतात. काडतुसांना गाईची आणि डुकराची चरबी लावतात या अफवेमुळे उडालेली घबराट जणू वाचकाभोवतीच गरगरत राहते. झाशीवर कोसळणारे इंग्रजी तोफांचे लालभडक गोळे रात्रीच्या अंधारात वाचकाच्या डोळ्यांसमोर अंधारी आणू लागतात आणि त्या धडधडाटाने वाचकांच्याच कानांना कानठळ्या बसतात! शहरावर ताबा घेऊन ‘बिजन’ सुरू झाल्यावर प्राणभयाने असंख्य लोकांसमवेत वाचकही भिंतीतील छुप्या भुयारांचा आश्रय घेतो आणि एका चिंचोळ्या, अंधाऱ्या जागेत एका अनोळखी तरुण स्त्रीला बिलगून तासन् तास बसूनही भयाच्या दडपणामुळे मनाला वासनेचा स्पर्शही होऊ नये ह्याचे नंतर आश्चर्य (की पश्चाताप?) करत बसतो. मग बिमोड झाल्यानंतर नानासाहेब पेशवे देशोधडीला लागतात तेव्हा ते दृश्य पाहणाऱ्या काठावरच्या आंधळ्या गर्दीत वाचकही असतो आणि ठिकठिकाणी इंग्रज सैन्य घुसल्यावर त्यांच्यापुढे लोटांगण घालणाऱ्या पाठींमध्ये एक कुबड काढलेली पाठ वाचकाचीही असते.

गोडसेभटजींच्या कहाणीतून उभी राहिलेली सर्वांत उत्कट व्यक्तिरेखा म्हणजे झाशीची राणी लक्ष्मीबाई! झाशीच्या राणीची गोष्ट त्याच त्या ठोकळेबाज पद्धतीने लोक वर्षानुवर्षे ऐकत आले आहेत; पण पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून झुंजण्यास उभी राहिलेली आणि तरीही अखेर हाडामांसाची स्त्री असलेली झाशीची राणी ज्या हृद्यपणाने पुस्तकात पाहण्यास मिळते, त्याला तोड नाही.

राणीला झाशीपासून काल्पीपर्यंत अद्भुत दौड मारल्यावर थांबणे भागच पडले. ‘कारण तिला स्त्रीधर्माप्रमाणे अस्पर्श्य दशा प्राप्त झाली! त्यात तिचा संपूर्ण पुरुषवेश! व जवळ पैसा नाही.’ ही सारी अवस्था सांगता सांगता – ‘स्त्रियांनी अतिशौर्य केले तरी काय उपयोग? प्रसंगात घात करणारा असा त्यांचा शारीरिक धर्म त्यांजजवळ भरलेलाच आहे’ असे एखादे वाक्य भटजी लिहून जातात तेव्हा त्यातून अर्थाच्या असंख्य छटा जाणवतात.

झाशीच्या राणीला ‘माणूस’ म्हणून उभी करणारा आणखी एक हृदयस्पर्शी प्रसंग भटजींनी लिहिला आहे. झाशीहून जीव बचावून काल्पीच्या दिशेने निघालेल्या गोडसेभटजींना भल्या पहाटे एका विहिरीजवळ चार-पाच घोडेस्वार येताना दुरून दिसतात. त्यांमध्ये राणीही असते. ‘पठाणी पोषाख, अंग धुळीने भरलेले... तोंड किंचित आरक्त, म्लान व उदास!’ तिला भटजीबुवांची झाशीतील ओळख पटते. विद्याभ्यासी ब्राह्मणांना तसदी द्यायची नाही म्हणून ती स्वत: रस्सी-मडके विहिरीत टाकून पिण्यास पाणी काढते. बोलताना तिच्या अटळ भवितव्याची तिला झालेली जाणीव व्यक्त करते. तशाही परागंदा अवस्थेत राणीच्या वृत्तीने त्या भिक्षुकाचे कुशल विचारते, त्यांना मार्गदर्शन करते आणि मग पाहता पाहता, पहाटेच्या अंधुक प्रकाशात निघून जाते. ती जातेच!... मला तर नेहमीच तो प्रसंग वाचताना, मी पुस्तक वाचतोय की चित्रपट पाहतोय?... असा संभ्रम पडतो.

‘शतरंज के खिलाडी’ आणि ‘जुनून’ हे, १८५७ ची पार्श्वभूमी असलेले, दोन्ही चित्रपट मला आवडले होते; पण त्यांनाही जमीनदोस्त करेल असा खराखुरा ऐतिहासिक (मराठी) चित्रपट उभा व्हावा – अशी ताकद गोडसे भटजींच्या रसाळ हकिकतीत निश्चित आहे.

- सुधीर मोघे
(लेखकाच्या ‘निरंकुशाची रोजनिशी’ या स्फुट लेखसंग्रहातून)

लेखी अभिप्राय

ऐकोणीसावे शतकातील कागद पत्रे वाचयला आवडतात नेहमी देत जावे

रामचंद्र जाधव 19/01/2017

Pustak kuthe vikat milel? Vachanyachi tivar ichaa aahe.

trupti sapkal.19/01/2017

I HAVE READ THIS BOOK. Really Great..

SHRIKANT BAPUR…20/01/2017

Very interesting . Where the book is available

Pramod Uddhav …20/01/2017

गोडसे भटजींचा माझा प्रवास या पुस्तका बद्दल वाचल्यावर पुस्तक वाचण्याची इच्छा निर्माण झाली .

धर्मेश राजपूत23/01/2017

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.