My second trip to Europe


भोर हे एकेकाळचे पुणे प्रांतातील (दख्खन प्रांतातील) मोठे संस्थान. आकाराने औंध संस्थानच्या दीडपटीहून मोठे. त्या संस्थानाच्या राजांना नऊ तोफांची सलामी होती. संस्थानचे त्यावेळचे राजे रघुनाथराव पंडित, पंत सचिव हे १९३७ साली लंडन येथे झालेल्या सहाव्या जॉर्ज यांच्या राज्यारोहण समारंभाला हजर राहण्यासाठी त्यांची चार मुले, खाजगी सचिव, खाजगी डॉक्टर इत्यादी लवाजम्यासकट लंडनला गेले होते. राजेसाहेब त्या सोहळ्यानंतर व्हिएन्ना व पॅरिस येथेही गेले. ते स्वत:ची व मुलाची प्रकृती दाखवण्यासाठी व्हिएन्ना येथे तर औद्योगिक प्रदर्शन बघण्यासाठी पॅरिस येथे गेले होते. ते त्यापूर्वी १९३० साली युरोपला गेले होते. त्यांनी त्या प्रवासावर आधारित ‘विलायतेतील एकवीस आठवडे’ हे पुस्तक मराठीत लिहिले. ते पुस्तक दुस-या प्रवासाला निघण्यापूर्वी काही दिवस अगोदर प्रकाशित झाले होते.

‘माय सेकंड ट्रिप टु युरोप’ या पुस्तकाची काही वैशिष्ट्ये सांगता येतील. ती म्हणजे राजघराण्यातील व्यक्ती काही लेखन करत असतील किंवा त्या व्यक्ती संस्थाने अस्तित्वात असताना तसे करत होती असे वाचकांना सामान्यपणे वाटत नाही. गायकवाड घराण्यातील संपतराव गायकवाड औंधच्या भवानराव पंत प्रतिनिधींचे चिरंजीव यांनी लेखन केल्याचे दिसले होते. त्यानंतर सर रघुनाथराव यांचे उदाहरण समोर येते. राजेसाहेब यांनी हा प्रवास केला तेव्हा ते पंचावन्न वर्षांचे होते आणि पुस्तक प्रकाशित झाले ते त्यांची षष्ट्यब्दिपूर्ती पार पडल्यानंतर. दुसरे म्हणजे हे पुस्तक त्यांनी इंग्रजीत लिहिले (पहिले मराठीत लिहून झाल्यावर). त्यामुळे त्याचा वाचक वर्ग तसा मर्यादित राहणे अपेक्षित होते. किंबहुना हे पुस्तक लोकांनी विकत घेऊन वाचावे असा उद्देश होता, की नाही याची शंका वाटते. कारण पुस्तकावर किंमत छापलेली नाही. त्यांनी ते पुस्तक बहुधा ब्रिटिश अधिकारी, वृत्तपत्रे, मासिके यांना पाठवण्यासाठी छापले असावे. ब्रिटिश सरकारने कोल्हापूर व दख्खन प्रांतातील संस्थानिकांसाठी रेसिडेंट म्हणून पी. गेसफोर्ड यांची नेमणूक केली होती. त्यांनी या पुस्तकासाठी लिहिलेल्या प्रस्तावनेनंतर ‘द मऱ्हाटा’, ‘प्रोग्रेस ऑफ एज्युकेशन’, ‘इंडियन स्टेट्स गार्डियन’, ‘चित्रमय जगत’, ‘ऐक्य’, ‘टाइम्स ऑफ इंडिया’ आणि ‘एशियाटिक रिव्ह्यू’ यांनी लिहिलेले पुस्तकावरचे अभिप्राय दिले आहेत. सर्वांत विस्तृत अभिप्राय ‘ऐक्य’मधील आहे. तर सर्वांत छोटा ‘टाइम्स ऑफ इंडिया’मधील आहे. ‘चित्रमय जगत’ने त्यांची कुंडलीच मांडली आहे. ‘रॉयल साइज’च्या एकशेचाळीस पानांच्या पुस्तकातील पन्नास पाने राज्याभिषेकाच्या वर्णनांनी व्यापली असून शेवटच्या चौतीस पृष्ठांत प्रवासाची रोजनिशी व मानपत्रे यांचा समावेश आहे. पुस्तक इतके चित्रमय आहे, की जवळ जवळ दर पानाआड एक चित्र आहे. एकूण छायाचित्रे एकशेएक.

छायाचित्रांचे विषय काय? किंवा त्यांचा स्रोत काय? लेखक संस्थानिक होते. राजनिष्ठ होते. त्यामुळे ब्रिटिश राजघराण्यातील व्यक्ती, प्रस्तावनाकार रेसिडेंट यांची छायाचित्रे तर आहेतच. शिवाय मुख्य हेतू-प्रवासाचा, राज्यारोहण समारंभ बघणे हा असल्याने त्या समारंभाचीही भरपूर छायाचित्रे आहेत. त्या बरोबरच, त्यांनी ज्या स्थळांना भेटी दिल्या तेथीलही भरपूर छायाचित्रे आहेत. नोंद करण्यासारखी गोष्ट (जी राजेसाहेबांनीही नोंदली आहे) म्हणजे राज्यारोहण समारंभात राजे सहावे जॉर्ज यांचे आसन पाच पायऱ्यांच्या चबुतऱ्यावर, तर त्यांच्या पत्नीचे (राणीचे) तीन पायऱ्यांच्या चबुतऱ्यावर (राजेसाहेबांनी त्यावर भाष्य मात्र केलेले नाही). राजेसाहेबांची मुले गाढवाची गाडी हाकतानाचा एक फोटो आहे. तसाच, आयफेल टॉवर हातात घेतल्याचे किंवा त्यावर विमान टेकवल्याचे (ट्रिक फोटोग्राफी) असेही फोटो आहेत. काही फोटो बहुधा छापील कार्डावरून घेतले आहेत.

मात्र वैशिष्ट्य हे, की सारी छायाचित्रे अत्यंत स्पष्ट आहेत आणि छपाईला सत्तर वर्षे लोटली तरी ती अजून खराब झालेली नाहीत. पुस्तकाची छपाई पुण्यात झाल्याचे पुस्तकावर लिहिले आहे.

‘ऐक्य’ने त्यांच्या अभिप्रायात म्हटले आहे, ‘या पुस्तकाचे वैशिष्ट्य काय?...  फार मोठेही नाही, फार छोटेही नाही असा एका संस्थानाधिपतीला विलायतेत कोणत्या प्रकारच्या समाजात मिसळता येते व त्या समाजाच्या जीवनक्रमात काय आढळते या दृष्टीने राजेसाहेबांनी लिहिलेले वर्णन वाचनीय वाटेल यात शंका नाही.’

प्रत्यक्षात असे दिसते, की लेखकाचा वावर बहुधा उच्च वर्तुळात झाला. त्यामुळे त्यांची जनसामान्यांच्या जीवनाबद्दल निरीक्षणे फार येत नाहीl. तरीही त्यांनी एकदोन गोष्टी सांगितल्या आहेत. ‘व्हिएन्नाच्या नगरपालिकेने घरांचा प्रश्न गंभीरपणे हाती घेतला आहे. गरिबातील गरिबाला आरामदायी आणि माफक किंमतीची घरे उपलब्ध आहेत. चाळ पद्धतीच्या या इमारती खूप प्रशस्त आहेत आणि चित्रपटगृह, पोहण्याचा तलाव अशा सुखसोयी (Luxuries’) रहिवाशांना मिळतात’ (पृष्ठ ५८)

‘इंडियन इन्स्टिट्युट ऑफ सायन्स अँड कॉमर्स’ या संस्थेची स्थापना भारतीय शेतीचा विकास वैज्ञानिक दृष्टीने व्हावा व उद्योगधंदे फायदेशीर व्हावेत या हेतूंनी झाली आहे. तिच्या प्रवर्तकांच्या म्हणण्याप्रमाणे या दोन्ही गोष्टींसाठी व्हिएन्ना हे उचित स्थान आहे. कारण ऑस्ट्रियाचे क्षेत्र आता घटून फार कमी झाले असल्याने तेथे तंत्रविशारद मुबलक प्रमाणावर उपलब्ध आहेत.’ (पृष्ठ ६१)

‘आणखी एक गोष्ट माझ्या लक्षात आली, ती म्हणजे इतर अनेक देशांप्रमाणे इथे क्रिकेटचा खेळ अस्तित्वात नाही. ‘युरोपात एकवीस आठवडे’ या पुस्तकात व्यक्त केलेल्या माझ्या समजुतीला त्यामुळे पुष्टीच मिळाली – ती म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी किरकोळ आहेत. त्यामुळे अशा गोष्टींच्या असण्याचा किंवा नसण्याचा त्या देशाच्या वा तेथील लोकांच्या योग्यतेवर काही परिणाम होत नाही.’ (पृष्ठ ६७)

लेखकाने राज्यारोहणाबरोबर ऑस्ट्रिया व फ्रान्स या देशांनाही भेटी दिल्या होत्या. त्याचा वृत्तांत देताना, प्रत्यक्ष प्रवास करताना निसर्ग कसा आढळला, त्या त्या देशातील महत्त्वाची स्थळे, त्यांची प्रत्यक्ष वर्णने – म्हणजे कमानी कशा, किती इत्यादी असे प्रवासवर्णनाचे नियम पाळलेले आहेत. व्हिएन्नामधील बाथ सिस्टिम आणि उष्ण व औषधी पाण्यांचे झरे यांची विस्तृत माहिती दिलेली आहे. त्याचबरोबर, औषधी झऱ्यांचा उपचार गुणकारी व आरामदायी आणि सुनियोजित असला तरी गरिबांना परवडणारा नाही याचीही कबुली ते देतात.

ज्यावेळी प्रवास कमी होत होते त्यावेळीही सुसंस्कृत व ज्ञानपिपासू प्रवासी अनेक गोष्टी कुतूहल म्हणून बघत असत. राजेसाहेबांना युरोपच्या त्या प्रवासात झेकोस्लाव्हाकियातील पोर्सेलिनची फॅक्टरी बघता आली नाही पण त्यांनी काचवस्तू करण्याची पद्धत कौतुकाने पाहिली; रेडियम माइन, कोळसा खाणी बघितल्या. इंग्लंडमध्ये कीट्संचे घर बघितले. कीट्सबद्दल ते लिहितात, ‘कीट्स अशा अगदी थोड्या लोकांपैकी एक होता, की ज्यांनी अल्प आयुष्यात नाव कमावले. त्याच्या बैठकीची खोली होती तशीच ठेवली आहे. हे फार नवलाचे होते... पण आश्चर्याची गोष्ट अशी, की त्याचे स्मारक उभारण्यासाठी १८२०-२१ सालात लोकांकडून वर्गणी जमा करावी लागली आणि बहुतांशी तिचा भरणा अमेरिकनांकडून झाला.’ (पृष्ठ ३९) राजेसाहेबांनीअगदी घोड्यांची शाळासुद्धा बघितली.

इतक्या विविध विषयांत रस असलेले राजेसाहेब त्यावेळच्या अनेक संस्थानिकांसारखे राजनिष्ठ-ब्रिटिशनिष्ठ होते हेही जाणवते. ‘डॉ. डेव्हिस यांच्या निबंधावरून हे समजले, की जी व्हिक्टोरिया महाराणी दूरदर्शी, उदार वृत्तीची होती. तिने संस्थानिक व सरकार यांच्यातील वाद सोडवण्यासाठी स्वतंत्र न्याय प्राधिकरण नेमण्याचा विचार केला होता. तीच स्त्रियांच्या हक्कांच्या विरूद्ध होती आणि भारतीय महिलांना वाजवीपेक्षा जास्त शिक्षण देऊ नये अशा मताची होती.’ पृष्ठ (६)

‘राज्यारोहणाचा समारंभ कॅथलिक पद्धतीने झाला. मात्र अखेरीस नव्या राजांनी जाहीर केले, की पार्लमेंटच्या कायद्याने ठरवल्याप्रमाणे ते प्रॉटेस्टंट विचारांशी एकनिष्ठ राहतील.’ (पृष्ठ १३)
ते राज्याभिषेकातील ब्रिटिशांचे विधी आणि भारत देशातील विधी यांतील साम्य जाणवल्याचेही नोंदवतात.

राज्यारोहणाची हकिगत व तीही पंचाहत्तर वर्षांपूर्वी झालेल्या समारंभाची... ती हकिगत आणि त्याबरोबर इतर प्रवासाचे वर्णन वाचताना भोरसारख्या छोट्या संस्थानाचा राजाही किती राजनिष्ठ तरी सजग, सुसंस्कृत होता आणि किती चांगल्या छपाईचे पुस्तक त्यावेळी निघू शकत होते याचा विस्मय वाटल्याखेरीज राहत नाही.

Royal Coronation and my second trip to Europe
लेखक - राजा श्रीमंत सर रघुनाथराव शंकरराव पंडित पंत सचिव के.सी.आय.ई. भोरचे राजे
प्रकाशक - एल. अार. साने, (भोरच्‍या राजांचे खासगी सचिव)
प्रकाशन वर्ष - १९४२
पृष्‍ठसंख्‍या - १३९
प्रकाशन स्‍थळ - भोर
छपाई - एस. आर. सरदेसाई, नवीन समर्थ विद्यालय, 'समर्थ भारत प्रेस', ४१, बुधवार, पुणे - २

- मुकुंद वझे

सर रघुनाथराव शंकरराव पंडित यांनी लिहिलेले 'My second trip to Europe' हे पुस्‍तक डाऊनलोड करण्‍यासाठी येथे क्लिक करा.

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.