वेध जलसंवर्धनाचा - औरंगाबाद तालुक्यातील सद्शक्‍तीचा परिचय


_Vedh_Jalsanvardhanacha_1_0.jpg'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम'च्या 'वेध जलसंवर्धनाचा' या राज्यव्यापी माहितीसंकलनाच्या मोहिमेचा आरंभ ९ डिसेंबरला झाला. तालुक्या तालुक्यात जाऊन तेथील पाणी निर्माण करण्याचे, वाढवण्याचे, टिकवण्याचे व अनुषंगिक कार्य टिपायचे हे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे. आरंभ औरंगाबाद तालुक्यापासून योजला गेला होता. मोहिमेची आखणी औरंगाबाद तालुक्‍याला केंद्रस्‍थानी ठेवून करण्‍यात आली होती. 'थिंक'च्‍या दोन कार्यकर्त्‍यांनी 'पाणी' या विषयाभोवती तालुक्‍यात सुरू असलेल्‍या विविध प्रयत्‍नांचा परिचय ९-१०-११ डिसेंबर या तीन दिवसांत करून घेतला.

विजयअण्‍णा बोराडे हे राज्यभर माहीत असलेले तालुक्यामधील माननीय व्‍यक्‍तिमत्त्व. प्रांजळ आणि मनमोकळे. ते शहरातील सिडको परिसरात राहतात. बोराडे यांनी 'मराठवाडा शेती सहाय्यक मंडळ' संस्‍थेच्‍या माध्‍यमातून शेतकरी आणि शेती यांसाठी सत्‍तरच्‍या दशकात भरीव काम केले. त्‍यांच्‍याशी बोलत असताना मराठवाड्यातील शेती आणि पाणी यांसंबंधीची स्थित्‍यंतरे समजत गेली. त्‍यांच्‍या कामात आधी शेतीबद्दल असलेला विचार हळुहळू पाण्‍याकडे केंद्रित होत गेला. बोराडे स्‍वतःच्‍या संस्‍थेचे काम सांगत असताना त्‍या कथनात 'मी किंवा आम्‍ही केले' अशी भावना नव्‍हती. ती एका कार्यकर्त्‍याची निरीक्षणे होती. त्‍यांच्‍या मनात काम करताना ते 'संस्‍थेसाठी नव्‍हे तर लोकांसाठी' हा विचार कायम होता, त्‍यामुळे त्‍यांच्‍या कामाचा आलेख विविध संस्‍था-व्‍यक्‍ती यांच्‍या माध्‍यमातून जनमानसात पोचताना दिसतो.

शहरातील विजय दिवाण यांचे वर्णन करताना 'जागल्‍या' हा शब्द योग्‍य वाटतो. ते तेथील पाण्‍याच्‍या विविध प्रश्‍नांवर अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. त्‍यांचे आतापर्यंतचे मुख्‍य काम 'लोक आणि प्रशासन यांना जाग आणणे' हे राहिले आहे. त्‍यासाठी ते महापालिका आणि सर्वसामान्‍य जनता अशा दोन्‍ही पातळ्यांवर कार्यरत आहेत. एकीकडे ते प्रशासनापुढे विविध प्रश्‍न मांडून शासकीय अधिकाऱ्यांना त्‍यावर कार्यप्रवृत्‍त करतात तर दुसरीकडे जनमानसात त्‍या प्रश्‍नांविषयी जागृती साधून त्‍याविषयी जनमत तयार करतात. ते औरंगाबादला भेडसावणारा पाण्‍याच्‍या प्रदूषणाचा भयंकर प्रश्‍न पोडतिडकीने मांडतात. त्‍यांचे बोलणे ऐकताना त्‍यातील भयावहता उपऱ्या माणसांच्‍याही अंगावर काटा आणते. त्‍यांनी औरंगाबादमधील पाण्‍याच्‍या खाजगीकरणाबाबत आंदोलन केले. उच्‍च न्‍यायालयात केस दाखल केली. सोबत जनमताचा प्रभाव तयार केला. महापालिकेला पाण्याच्या खाजगीकरणाचा तो निर्णय रद्द करावा लागला. मात्र अद्याप दिवाण यांनी ती केस मागे घेतलेली नाही. त्‍यांचा आग्रह उच्‍च न्‍यायालयाने त्‍यावर निर्णय द्यावा असा आहे. जेणे करून तो संपूर्ण देशभर लागू होईल.

किशोर शितोळे हा उद्योजक तरूण. मात्र भवतालचे पाण्‍याचे प्रश्‍न पाहून तो जलसंवर्धनाच्‍या कामात गुंतला. त्‍याने 'जलदूत' नावाची संस्‍था सुरू केली आहे. त्‍याने पैठण तालुक्यातील येळगंगा नदीचे पात्र रुंद करण्‍याचे काम हाती घेतले. त्‍याने नदीवर बंधारे बांधले. वीस फुटांचे पात्र तीनशे फुटांपर्यंत वाढवले. त्‍या प्रयत्‍नांतून नदीच्‍या पात्रात-बंधाऱ्यात सुमारे आठ कोटी लिटर पाण्‍याचा साठा झाला. तो आणि त्‍याची पत्‍नी, दोघेही त्‍या कामात गुंतलेले असतात.

प्रकाश कुलकर्णी यांची तऱ्हाच वेगळी. ते भूगर्भशास्‍त्रज्ञ. त्‍यांची धडपड जमिनीखाली पाणी किती आहे, जमीन आणि त्‍यातील खडक यांचा अभ्‍यास करून किती पाऊस पडल्‍यास किती पाणी जमिनीत साठले जाईल याचे मोजमाप करण्‍याची आहे. त्‍यासाठी त्‍यांनी चांगली टीम बांधली आहे. ती औरंगाबाद जिल्‍ह्यात आणि जिल्‍ह्याच्‍या बाहेर कार्यरत आहे. काही संस्‍था-व्‍यक्‍ती त्‍यांच्‍या अभ्‍यासाचा उपयोग करून घेतात.

'जानकीदेवी बजाज ट्रस्‍ट', नरहरी शिवपुरे आणि त्‍यांची 'ग्रामविकास' संस्‍था अशा लोक-संस्‍थांच्‍या भेटी होत गेल्‍या. 'जानकीदेवी...'चे काम त्‍या त्‍या गावांमध्‍ये पाणी आणि इतर ग्रामसुधारणा इत्‍यादींमध्‍ये बदल घडवणारे ठरत आहे. शिवपुरे यांची 'ग्रामविकास' संस्‍था शासकीय योजनांना योग्‍य रीतीने राबवून पाणी आणि त्या जोडीला गावात इतर सकारात्‍मक बदल अशा पातळ्यांवर कामे घडवण्‍यासाठी प्रयत्‍नशील आहे. संस्‍थेकडून सध्‍या तालुक्‍यातील चित्‍ते नदीच्‍या पुनरूज्‍जीवनाचे काम हाती घेण्‍यात आले आहे.

औरंगाबाद तालुक्‍याच्‍या उत्‍तरेकडे डोंगराळ भागातील बोरवाडी आणि डोणवाडा नावाची गावे आहेत. 'सावित्रीबाई फुले महिला एकात्‍म समाज मंडळ' या संस्‍थेकडून तेथे ग्रामविकासाचे प्रयत्‍न सुरू आहेत. संस्‍थेचे औरंगाबाद आणि पैठण अशा दोन तालुक्‍यांतील तेरा गावांमध्‍ये शेती, आरोग्‍य, शिक्षण आणि आर्थिक सबलीकरण या संदर्भात काम सुरू आहे. संस्‍थेच्‍या मार्गदर्शनाखाली बोरवाडी-डोणवाडा या गावांतील अठरा शेतक-यांनी 'नवलाई' ही शेतीमालाच्‍या विक्रीसाठी कंपनी स्‍थापन केली आहे. संस्‍थेचे डॉ. प्रसन्‍न पाटील आणि कृषितज्ज्ञ सुहास आजगावकर त्या कामाचे नेतृत्‍व करतात. ती दोन्‍ही व्‍यक्‍तीमत्त्वे 'प्रसन्‍न'!

'लुपीन फाउंडेशन' तालुक्‍याच्‍या पूर्वोत्‍तर भागातील गावांमध्‍ये ग्रामविकासाकरता प्रयत्‍नशील आहे. माणूस हा विकास प्रक्रियेच्‍या केंद्रस्‍थानी गृहित धरून तेथे ग्रामविकासाची चाललेली धडपड दिसते. लोकांनी 'लुपीन'च्‍या साथीने शेती, लघुउद्योग, शेळीपालन अशा वेगवेगळ्या तऱ्हांनी आर्थिक स्‍थैर्याच्‍या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. 'लुपीन'चे कार्यकर्ते त्‍यांच्‍या प्रयत्‍नांतून कन्‍नड तालुक्‍यातील हस्‍ता हे गाव प्रगतीपथावर वाटचाल करत असल्‍याचे अभिमानाने सांगतात. हस्‍ता हे आदर्श गाव म्‍हणून विकसित करण्‍याचा 'लुपीन'च्‍या कार्यकर्त्‍यांचा प्रयत्‍न आहे. त्‍या गावाची कहाणी सकारात्‍मकतेने भारलेली आहे!

'थिंक महाराष्‍ट्र'च्‍या कार्यकर्त्‍यांना लोकांनी स्‍थानिक पातळीवरील प्रश्‍न आणि त्‍यावर शोधलेले मार्ग, विकासाकरता वैयक्‍तिक ते संस्‍थात्‍मक पातळीवर चाललेली धडपड अशी अनेक उदाहरणे पाहता आली. त्‍या पाहणीत क्वचित प्रसंगी स्‍थानिक कर्तृत्‍वही नजरेस पडले. लामकाना या डोंगररांगांनी वेढलेल्‍या गावात कृष्‍णा बारबैले या शेतकऱ्याने स्‍वतःचा आर्थिक विकास डाळींब शेतीतून साधला आहे. तो डाळिंबांच्‍या लागवडीतून वार्षिक सव्‍वा ते दीड कोटी रुपयांचे उत्‍पन्‍न घेतो. त्‍याने दोन मोठाली शेततळी शेताकरता तयार केली आहेत. त्‍यांचे उत्‍पन्‍न एक कोटी अकरा लाख रुपये गेल्या वर्षी होते. परिसरातील जवळपास प्रत्‍येक शेतकऱ्याने त्‍यांचे अनुकरण करत डाळिंबाचे उत्‍पादन सुरू केले आहे. बारबैले यांच्याप्रमाणे काही शेतक-यांनी शेततळी निर्माण केली आहेत. गावकऱ्यांनी शेजारच्‍या डोंगरावरील माळरान जमीनही लागवडीखाली आणली आहे. त्‍यांनी त्‍यासाठी दोनेक किलोमीटर अंतरावर डोंगरात पाईपच्‍या साह्याने पाणी पोचवले आहे.

डॉ. भगवानराव कापसे या शेतीतज्ञाशी मोहिमेदरम्‍यान गप्‍पा झाल्‍या. त्‍यांचा आग्रह शेतकऱ्यांना फक्‍त पैसे मिळू नयेत तर त्‍यांनी श्रीमंत व्‍हावे हा! त्‍याकरता त्‍यांनी विविध तऱ्हेचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोचवून त्‍यांना गटशेतीसाठी प्रवृत्‍त केले आहे. त्‍यातून औरंगाबाद आणि जालना जिल्‍ह्यांतील निवडक शेतकरी लक्षावधी रुपयांचे उत्‍पन्‍न घेताना दिसत आहेत. तालुक्‍याच्‍या दक्षिणेकडे असलेले पाटोदा हे गाव विशेष वाटले. गावाला दोन वेळा राष्‍ट्रपती पुरस्‍कार प्राप्‍त झाला आहे. भास्‍करराव पेरे-पाटील हे त्‍या गावचे शिल्‍पकार. अवघी पाच हजार लोकसंख्‍या. त्‍या गावाने गेल्‍या अकरा वर्षांत आदर्श गावाची उपाधी प्राप्‍त केली आहे. गाव आधी हागणदारीमुक्‍त झाले. त्‍या पाठोपाठ ग्रामस्‍वच्‍छता, सांडपाण्‍याचे नियोजन असे बदल घडले. गावक-यांनी शेतातील पिकासाठी औरंगाबाद शहरातून सोडल्‍या जाणा-या सांडपाण्‍याचा वापर केला आहे. ग्रामपंचायतीकडून गावात अनेक कल्पक व मोफत योजना राबवल्‍या जात आहेत. गावाने त्‍या योजनांचा लाभ फक्‍त कर भरणाऱ्या गावकऱ्यांना करून घेता येईल असा दंडकही तयार केला आहे.

प्रदीप क्षीरसागर गेल्‍या पंचवीस वर्षांपासून औरंगाबादमध्‍ये 'अफार्म' या राज्यव्यापी संस्थेचे प्रोजेक्‍ट मॅनेजर म्‍हणून काम पाहतात. संस्‍थेचे काम शेतीविषयक जलसंवर्धन आणि पशुसंवर्धन अशा दोन पातळ्यांवर चालते. दिलीप यार्दी आणि त्‍यांचे 'निसर्ग मित्र मंडळ' या संस्‍थेचे मोठे काम आहे. संस्‍थेने पक्षी आणि निसर्गातील इतर घटक यांच्‍या सर्वेक्षणाचे काम सातत्‍याने केले आहे. त्‍यातून जमा झालेला डाटा औरंगाबाद येथील जैवविविधतेची कहाणी कथन करतो.

लामकाना गावाबाहेरच्‍या वाडीवर कृष्‍णा बारबैले (हा दुसरा!) नावाचा तरूण शेतकरी 'लुपीन'च्‍या माध्‍यमातून शेतक-यांना मदत करताना भेटला. अंजनडोहचे गणेश शेजूळ शेळीपालनात विविध तंत्रांचा वापर करून आर्थिक उन्‍नतीच्‍या नव्‍या वाटा शोधताना दिसले. त्‍यासोबत आप्‍पासाहेब उगाळे आणि त्‍यांची 'मराठा ग्रामीण विकास संस्‍था', अंबिका टाकळकर यांची 'आरंभ', 'सेवा संस्‍था', 'साकार', 'मानव', 'आय.आय.आर.डी.' अशा विविध संस्‍था आणि त्‍यांच्‍याशी संलग्‍न असलेल्‍या व्‍यक्‍ती यांच्याशी मोहिमेच्‍या अनुषंगाने संपर्क घडून आला. त्‍यांच्‍या माध्‍यमातून तालुक्‍यातील प्रामुख्‍याने पाणी आणि इतर क्षेत्रे यांतील घडामोड व लोकांची धडपड समजली. जलसंवर्धनाची कामे पाण्‍यासोबत जमीन, शेती, शेतकरी, नद्या, बंधारे, गाव अशा विविध कोनांतून पाहता आली. काही गावांचा परिचय करून घेता आला.

'थिंक महाराष्‍ट्र'ने आयोजलेल्‍या 'वेध जलसंवर्धनाचा' या मोहिमेचे तीन दिवस चटकन सरले. कार्यकर्त्‍यांच्‍या तालुक्‍यात झालेल्‍या भटकंतीतून माहिती हाती तर आलीच, जोडीला तेथे कार्यरत व्‍यक्‍तींचे त्‍या- त्‍या प्रश्‍नांवर काम करताना घडलेले विचारही जाणून घेता आले. मात्र तेथून परतताना काही गोष्‍टी राहून गेल्‍यासारखे वाटले. विजय बोराडे यांच्‍याशी झालेल्‍या गप्‍पांमधून तो माणूस कळण्‍यासाठी आणखी वेळ द्यावा असे वाटले. दिवाणांसोबत आणखी राहून त्‍यांचे पाण्‍याच्‍याही पलीकडे गावांसाठी सुरू असलेले काम पाहवे असे वाटले. कार्यकर्त्‍यांच्‍या केवळ कथनातून ऐकलेले हस्‍ता गाव पाहण्‍याची अनिवार ओढ तशीच राहिली. शहरातील निना निकाळजे यांचा बुक क्‍लब किंवा 'रमाई' मासिकाच्‍या कर्त्‍या रेखा मेश्राम यांची भेट घेण्‍याची संधी हुकली. 'थिंक महाराष्‍ट्र'ची टीम केवळ पाणीविषयाची माहिती करून घेण्‍यासाठी औरंगाबादला गेली होती. मात्र समाजातील इतर विधायक कामे आम्‍हाला सतत खुणावत राहिली. 'थिंक'च्‍या माहिती संकलनाच्‍या कामामध्‍ये तेथील जर्नालिझमच्‍या विद्यार्थ्‍यांनी मदत करण्‍याची तयारी दाखवली. ते शहरातील तशा राहून गेलेल्‍या व्‍यक्‍ती-संस्‍थांची माहिती घेणार आहेत. आम्‍ही ती माहिती विद्यार्थ्‍यांच्‍या सहाय्याने ऑनलाइन आणण्‍यासाठी प्रयत्‍न करत आहोत. औरंगाबादच्या गोळा झालेल्‍या माहितीची तजवीज झाली, की पुढचा तालुका ठरवायचा आहे. तो तालुका कोठला असेल?

- किरण क्षीरसागर/ शैलेश पाटील

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.