सिन्नरचा क्रांतिकारक जलसा


जेथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची सभा आहे तेथे ‘जलसा’ नाही असे क्वचित कधी घडले असेल. सिन्नरच्या ‘क्रांतिकारक जलसा’चा त्याच कालखंडात उदय झाला. ते सिन्नर तालुक्याचे भूषण ठरले. सिन्नर तालुका हा आंबेडकरांच्या चळवळीतील एक बालेकिल्ला होता. आंबेडकरांनी सिन्नरला तीनदा भेटी दिल्या आहेत. महसूल ‘जादा जुडी आकारणी’ (ब्रिटीश सरकारने महसूलावर केलेली जादा आकारणी.) विरुद्धच्या चळवळीची सुरुवात सिन्नरच्याच सभेत १६ ऑगस्ट १९४१ रोजी झाली. आंबेडकरांनी सिन्नरमधील ‘जाधव विरुद्ध देशमुख’ ही केस खास लोकाग्रहास्तव लढवली होती. लोकांनी आंबेडकरांना बघण्यास त्यावेळी इतकी गर्दी केली होती, की सिन्नरच्या जुन्या कोर्टाच्या (नृसिंह मंदिराजवळ) काचेचे तावदान फोडले गेले होते. बाबासाहेब आंबेडकर सिन्नर येथे मनमाडच्या सभेला जाताना थांबले होते. लोककवी वामनदादा कर्डक हेही सिन्नर तालुक्यातील देसवंडी या गावचे. असा हा ऐतिहासिक वारसा लाभलेला हा सिन्नर तालुका आणि सिन्नरचा क्रांतिकारक जलसा.

सिन्नरच्या ‘क्रांतिकारक जलसा मंडळा’त जे कलावंत होते त्यातील एक नोकरी करणारा, एक-दोन अक्षरओळख असलेले आणि बाकीचे अक्षरशत्रू होते, पण सर्वांना कलेची जबरदस्त ओढ आणि आंबेडकरांच्या विचारांवरील पक्की निष्ठा. सुंदर लयबद्ध आवाजाची देणगी असलेला तो जलसा संच थोड्या अवधीत लोकप्रिय झाला. त्यांनी काव्य, संवाद, फार्स यांच्या माध्यमातून समाजप्रबोधन केले.

वडनेर भैरवचे (तालुका चांदवड) गांगुर्डेतात्या हे सिन्नरच्या जलसा मंडळाला काव्य पुरवत. त्या क्रांतिकारक जलशात १. बंडू ठकाजी जाधव, २. मुरलीधर काळुजी जाधव, ३. किसन बापू जाधव, ४. हिरामण गोपाळा जाधव, ५. शंकर मनाजी जाधव, ६. नारायण दगडू जाधव, ७. काशिनाथ सावळीराम जाधव, ८. ढोलकी पटू ऋषी कोळगे (दोन्ही डोळ्यांनी अंध ) असे कलाकार होते. सर्व राहणारे सिन्नरचेच. गाणारी पहिली फळी हिरामण जाधव, बंडू जाधव, किसन जाधव यांची. झिलकरी शंकर जाधव, नारायण जाधव व काशिनाथ जाधव. फार्सचे सादरीकरण मुरलीधर जाधव, हिरामण जाधव व बंडू जाधव. त्याच क्रांतिकारी जलशाची दुसरी शाखा मुंबई येथे सुरू करण्यात आली. दोन्ही शाखांचे कलावंत वेगवेगळे होते. मुंबईची दुसरी शाखा शाहीर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाली. त्यात अशोकराव दोंदे, हरिभाऊ जाधव, सुखदेव जाधव, ग्यानू जाधव, बाबुराव खडताळे, शेजवळ, कुंभारीकर हे कलावंत होते.

या जलसाकारांच्या प्रेरणेमुळेच नाशिक काळाराम मंदिराच्या प्रवेशाचे सत्याग्रही निवडले गेले. महाराष्ट्रात काळाराम मंदिर प्रवेश, महाड चवदार तळे सत्याग्रह, मुखेड पांडवप्रताप ग्रंथ मिरवणूक अशा सामाजिक लढ्यांत जलशांची योजना प्रेरणा देणारी ठरली.

सिन्नरच्या ‘क्रांतिकारक जलसा मंडळा’ने समाजपरिवर्तनासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला प्रत्येक विषय हाताळून समाजात जागृती केली होती. आंबेडकरांच्या मनमाड येथील सभेत अनेक जलसे आले होते. त्यात सिन्नरच्या ‘क्रांतिकारक जलशा’चीही हजेरी लागली होती. त्यांचा कार्यक्रम बघून आंबेडकरांनी शाबासकी दिली होती आणि औरंगाबादच्या कार्यक्रमाचे निमंत्रणही दिले होते. सिन्नरच्या ‘क्रांतिकारक जलशा’ने जे काव्य सादर केले त्यातील काही रचना अशा - 

 

१. येड्या धोंडीबाच्या पोरा, हट्ट तुझा नाही बरा.

२. चला बंधुनो ! जावू चला हो ! नासिक सत्याग्रहाला.
 

३. ऐकाहो मंडळी गोष्ट सांगतों तुम्हाला समाज क्रांतीची
   काळाराम मंदिर प्रवेश चवदार तळ्याच्या सत्याग्रहाची
   तयारी झाली का साऱ्या दलित वीरांची
   शक्तीपणाला लागली होती दलित नेता भीमरायाची ऽऽऽ

आज सिन्नरच्या ‘क्रांतिकारक जलसा मंडळ’मधील एकही कलावंत हयात नाही. त्या कलावंतांच्या वारसदारांपैकी एकही जण समाज-चळवळीत खास कार्यरत नाही. मात्र मुरलीधर काळुजी जाधव यांचा मुलगा, प्रस्तुत लेखक, जलशाच्या चळवळीचा एक धागा पकडून ‘सम्यक प्रबोधन ग्रूप, सिन्नर’ या नावाने फुले-आंबेडकरी चळवळगीतांच्या माध्यमातून सांगून समाजप्रबोधनाचे कार्यक्रम जिल्ह्यात सादर करत असतो.

(आंबेडकरी जलसे डॉ. भगवान ठाकूर आणि आमचे ज्येष्ठ गुरुवर्य आयु. धनाजी क. अढांगळे यांच्या सहकार्याने)

- मधुकर मुरलीधर जाधव

 

लेखी अभिप्राय

very good information

SHRIKANT BAPUR…22/12/2016

daya pawar yanchya baluta madhyhi sinnarcha jalsyacha ullekh ahe .

shankar borhade 26/12/2016

डाॅ बाबा साहेब आंबेडकर यांच्या बरोबर व नंतर ही जलसाकारांनी चांगले प्रकारे समाज प्रबोधनाचे काम केलेअशा सर्व जलसाकारांना मानाचा जयभिम
मधुकर जाधव यांना शुभेच्छा

अरूण खरात27/12/2016

खूप खूप धन्यवाद सर.. आम्हाला ही माहिती तुमच्यामुळे कळाली.. आपणास कायम शुभेच्छा..

जय भिम

Kiran shinde05/05/2018

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.