शुभांगी साळोखे - कृषी संशोधक


डॉक्टरकी, इंजिनीयरिंग, विमानसेवा, अंतराळभ्रमण, कॉम्प्युटर, आयटी... भारतीय नारी सगळ्या क्षेत्रांमध्ये स्थिरावली आहे. ती नवनवीन क्षेत्रे धुंडाळत आहे. परंतु भारत देशाचा पारंपरिक आणि सर्वात मोठा व्यवसाय म्हणून जो ओळखला जातो त्या शेतीमध्ये मात्र आधुनिक शिक्षण घेणाऱ्या स्त्रिया संख्येने कमी आहेत. खरे तर, स्त्रियाच प्रत्यक्ष शेतीमध्ये पेरणी, निंदणी, खुरपणी इत्यादी बहुतांश कामे करत असतात. परंतु आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून किफायतशीर शेती कशी करता येईल, शेतकऱ्यांच्या उत्पादनाचा दर्जा वाढवता कसा येईल याचा विचार करणाऱ्या स्त्रिया दुर्मीळ आहेत. डॉ. शुभांगी साळोखे या शेतीमध्ये संशोधन करून डॉक्टरेट मिळवणाऱ्या विदर्भामधील पहिल्या महिला आहेत. त्यांना ‘मराठाभूषण’ हा सन्मान मिळाला आहे. त्‍यांनी त्यांचे संशोधनकार्य मांजरी येथील ‘वसंतदादा पाटील शुगर इन्स्टिट्यूट’मध्ये पूर्ण केले.

शुभांगी यांचा जन्म १२ मे १९६६ रोजी अकोला जिल्ह्यात राजंदा येथे झाला. त्या पूर्वाश्रमीच्या शुभांगी जानोलकर- उत्तम व प्रतिभा जानोलकर यांच्या कन्या. शुभांगी यांच्या माहेरी शैक्षणिक, प्रगतीवादी वातावरण होते. त्यांचे आईवडील, दोघे प्राध्यापक होते. त्यांच्या आईला, प्रतिभातार्इंना विदर्भातील राजकारण, समाजकारण यांमध्ये मानाचे स्थान आहे. प्रतिभा राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष आहेत. तसेच त्या ‘जनता कमर्शियल को.ऑप.बँक, (अकोला)’ येथे महिला शाखेचे अध्यक्षपद भूषवत आहेत. त्यांचे वडील, उत्तमराव अमरावती जिल्ह्यात दर्यापूर तालुक्यात बडनेर-गंगाई येथील महाविद्यालयाचे निवृत्त प्राचार्य आहेत. उत्तमरावांनी अकोल्यात शाळा काढली. लहानग्या शुभांगीनेदेखील पहिल्या बॅचसाठी मुले मिळवण्याच्या कामात आईला मदत केली होती. वडिलांनी सुरू केलेल्या ‘ज्योती शिक्षण प्रसारक मंडळ’ या संस्थेची शाळा आणि महाविद्यालयही उभे राहिले. शुभांगी यांचे बालपण, दहावीपर्यंतचे शिक्षण वडनेरमध्येच झाले.

शुभांगी आणि त्यांची भावंडे शिक्षणामध्ये कायम पहिल्या तीन क्रमांकांत असत. त्यांचे कबड्डी, बॅडमिंटन यांसारख्या खेळांमध्येही प्रावीण्य होते. शुभांगी सांगतात, “आमचे घर सुधारणावादी. माझ्या आईची आईदेखील इंग्रजी सहावी शिकलेली होती. माझ्या आईने लग्नानंतर शिक्षण पूर्ण केले. आई आणि मी, दोघी बरोबरच अभ्यास करत असू. मी बारावीला असताना आई एम.ए. करत होती.” डॉ. शुभांगी यांची मोठी बहीण डॉक्टर, भाऊ कॉम्प्युटर इंजिनीयर, तर धाकटा भाऊ एम.सी.एम. झाला आहे.

शुभांगी सांगत होत्या, “मी बारावी झाल्यानंतर काय करायचं याचा घरात विचार सुरू झाला. आमच्या घरात शेती होतीच. आम्ही सुट्टीत दोन-तीन महिने आजोबांकडे गावी जायचो. तेव्हा जेवणसुद्धा शेतातच घेत असू. मला शेतकी शाखेला जायचं होतं. घरातून विरोध झाला. परंतु मी निश्चय केला होता, की शेतकी कॉलेजमध्येच प्रवेश घ्यायचा. तेव्हा ‘अकोला कृषी विद्यापीठा’ची मुलींना प्रवेश देणार म्हणून प्रथमच जाहिरात आली होती. मी प्रवेश घेतला. माझ्याबरोबर चार-पाच मराठी मुलीदेखील होत्या. पण त्या मुली बी.एससी.पर्यंत जाऊ शकल्या नाहीत.”

शुभांगी यांनी एम.एससी.नंतर पीएच.डी.साठी ऊतिसंवर्धन (टिश्यू कल्चर), जनुकशास्त्र आणि झाडाची उत्पत्ती याचा संबंध शोधण्यासाठी संशोधन केले. तो विषय ‘डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठा’त नव्हता. त्यामुळे त्यांनी मुंबईच्या ‘भाभा अणुसंशोधन केंद्रा’मधील ऊतिसंवर्धन विभागाचे प्रमुख डॉ. पी.एस. राव यांचे मार्गदर्शन मिळवले. त्यांचे ‘अकोला विद्यापीठा’तील को-गाईड होते डॉ. राऊत. शुभांगी यांनी काम अकोल्यात आणि मार्गदर्शन मुंबईला असे संशोधन केले. शुभांगी साळोखे या त्या विषयात डॉक्टरेट मिळवणाऱ्या ‘अकोला विद्यापीठा’च्या पहिल्या विद्यार्थिनी आहेत.

शुभांगी यांचा विवाह त्यांचे प्रबंधलेखन सुरू असताना १९९२ मध्ये सुनील साळोखे यांच्याशी झाला. सुनील कोल्‍हापूरचे. त्‍यांनी प्लॅस्टिक इंजिनीयरिंगमध्ये एम.ई. केले आहे. त्यामुळे शुभांगी यांना सुनील यांचे प्रोत्साहन आणि सहकार्य लाभले; एकूणच, त्यांना साळोखे कुटुंबीयांकडून शिक्षण व करियर यासाठी भरघोस पाठिंबा मिळाला. मेहनत, जिद्द आणि आत्मविश्वास ही शुभांगी यांच्या यशाची त्रिसूत्री आहे. शुभांगी यांचा आणखी एक विशेष गुण म्हणजे उत्तम व्यवस्थापन!

शुभांगी यांना केवळ करिअरमध्ये नव्हे; तर अनेकविध गोष्टींमध्ये रस आहे. पेंटिंग, कलरिंग, सिरॅमिक्स, एम्बॉसिंग, ग्लासपेंटिंग, कॅनव्हास पेंटिंग, थर्मोकोल वर्क अशा अनेक कलांमध्ये त्यांनी प्रावीण्य मिळवले आहे. त्यांच्या घरातील भिंती त्यांच्या कलानैपुण्याची साक्ष देतात.

शुभांगी त्यांना पीएच.डी. मिळण्याआधीच ‘वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट’मध्ये ज्युनिअर रिसर्च असिस्टंट म्हणून रुजू झाल्या होत्या. त्यांना संस्थेत ऊसाच्या संवर्धनाच्या प्रकल्पावर काम करण्याची संधी मिळाली. त्या तेथेच संशोधक म्हणून १९९६ साली कायम झाल्या.

शुभांगी सांगत होत्या, “ऊसाचं चांगल्या दर्ज्याचं बेणं शेतकऱ्यांना कसं पुरवता येईल यावर संशोधकांचा आमचा संच विचार करत होता. आम्ही चांगलं बेणं, मूलभूत बेणेमळा तयार करताना उतिसंवर्धित रोपांचा वापर सुरू केला. त्या रोपांच्या वापरामुळे ऊसाचे उत्पादन आणि साखरेचा उतारा वाढवण्यासाठी मदत झाली. त्याचबरोबर ऊसाचा दर्जासुद्धा सुधारला. ऊसाचे नवीन वाण तयार करण्यासाठी संशोधन सतत सुरू आहे.

नवीन तंत्रज्ञान विकसित करताना, सामान्य शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीवर जाऊन प्रात्यक्षिक करून दाखवावे लागते. ते जेव्हा संस्थेत येतात तेव्हादेखील सतत त्यांच्याशी त्या विषयावर बोलावे लागते. सुधारित बियाण्यांची रोपे शेतकऱ्यांना कमीतकमी पैशांत कशी देता येतील यावरही सतत विचार चालू असतो. अर्थात ते टीमवर्क असते.” शुभांगी सांगत होत्या.

शुभांगी यांनी वैयक्तिक पातळीवर ऊसाला पर्याय म्हणून ‘शुगर बीट’चे वाण तयार केले आहे. त्यांचे ते काम दोन-तीन वर्षांपासून चालू आहे. त्यांनी ‘शुगर बीट’चा प्रोटोकॉल तयार केला आहे. त्यांचे शुगर बीट बरोबरच केळी, जर्बोरा यांच्यावरील संशोधन पूर्ण होत आले आहे. संस्थेने त्यांच्यावर टाकलेली ती वैयक्तिक जबाबदारी होती.

शुभांगी यांनी प्रायोगिक पातळीवर शेतकऱ्यांचे प्लॉट घेऊन, त्यामध्ये नवे तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्यांना त्यांचे महत्त्व पटवून दिले. सुरूवातीला प्रॉडक्शन युनिट सुरू केले तेव्हा त्या सांगत होत्या, “पहाटे चारला उठून जावं लागे. शिवानी तेव्हा चार महिन्यांची, तर शुभम तीन वर्षाचा होता. रात्री आठला शिफ्ट संपायची. तेव्हा मिस्टरांची खूप मदत होई. सासुबार्इंनीही वेळोवेळी मुलं सांभाळली.

शुभांगी यांनी 'मिटकॉन' या शैक्षणिक संस्थेत डीन आणि अॅग्रीबिझिनेस अँड बायोटेक्नॉलॉजी मॅनेजमेंट विभागाची प्रमुख म्हणून २००८ ते २०१५ या काळात धुरा सांभाळली. त्‍या आज पुण्यातील 'सिम्बॉयसिस इन्स्टिटयूट ऑफ इंटरनॅशनल बिझिनेस' या आंतरराष्ट्रीय संस्थेत प्राध्‍यापक म्हणून कार्यरत आहेत.

शुभांगी यांनी पूरक शिक्षणही घेतलेले आहे. उदा. हळद, मिरची यांसारख्या वस्तूंमधील पदार्थांतील भेसळ शोधणे या विषयात सर्टिफिकेट कोर्स केला आहे. तसेच, त्यांनी बिझनेस कसा करायचा, सर्व्हे कसा करायचा, कॉस्टिंग कसे काढायचे या संदर्भात entrepreneurship development in agro based products याचे शिक्षण घेतले आहे. त्यांचे शोधप्रबंध राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रकाशित झाले आहेत.

चक्का बांधल्यानंतर जे पाणी बाहेर पडते त्यात भरपूर प्रमाणात पोषणमूल्ये असतात. त्यापासून शीतपेये बनवण्याचा प्रोजेक्ट शुभांगी यांनी तयार केला होता. त्यासाठी त्यावेळचे राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा यांच्या हस्ते त्यांना बक्षीसही मिळाले होते.

शुभांगी यांना अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे ‘मराठाभूषण’ हा पुरस्कार देण्यात आला आहे.

- अंजली कुलकर्णी

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.