बाबा डिके - पुरुषोत्तम इंदूरचे


बाबा या नावाने ओळखली जाणारी कोठलीही व्यक्ती ही सुमार असूच शकत नाही! बाबा सत्ता गाजवणारा, सगळ्यांशी प्रेमाचे संबंध ठेवूनही त्यांच्यावर धाक जमवणाराच असला पाहिजे. व्यक्तीचे कोठलेही प्रश्न सोडवणारी व्यक्ती ही बाबा असते. बाबा नावाच्या व्यक्तीबद्दल संबंधितांना प्रेम तर असतेच, पण त्यांचे काही चुकले तर त्याबद्दल शिक्षा मिळेल याची भीतीही असते. तशी एक व्यक्ती म्हणजे माझे जन्मदाता, माझे बाबा तर होतेच; पण मला वयाच्या विसाव्या वर्षी तसे दुसरे एक बाबा लाभले. ते म्हणजे बाबा डिके. मी ‘नाट्यभारती’त नाटकात कामे करू लागलो तेव्हा मी त्यांना बाबासाहेब असे म्हणत असे. त्यातील साहेब हा शब्द त्यांच्याबद्दल धाकाचा प्रतीक होता. पण साहेब केव्हा हटला आणि इतरांप्रमाणे, मीही त्यांना फक्त बाबा केव्हा म्हणू लागलो ते माझे मलाच कळले नाही. नुसते बाबा म्हणणे हे प्रेमाचे प्रतीक झाले. आणि बाबा डिके प्रेमळच होते.

वा.य. गाडगीळ यांनी एका लेखात लिहिले आहे, “महाराष्ट्र शासनातर्फे दरवर्षी होणाऱ्या नाट्यस्पर्धा म्हणजे जणू समुद्रमंथनच, त्या मंथनातून कितीतरी रत्ने बाहेर पडली आणि ती मराठी रंगभूमीला ललामभूत होऊन बसली. बाबा डिके हे सरकारी स्पर्धांमुळे मुंबईकर रसिकांना दिसलेले एक चमकदार रत्नच होय. इंदूरच्या ‘नाट्यभारती’ संस्थेचे नाटक ‘कारकून’ पाहून मुंबईकर चक्रावून गेले. ते नाटक वाटलेच नाही. एका दरिद्री कारकुनाची काळीज हेलावून टाकणारी कर्मकहाणीच ती. ‘कारकून’चा लेखक, दिग्दर्शक आणि नट इतक्या विविध आणि विकट जबाबदाऱ्या पेलणारा पुरुष हा साधा पुरुष असूच शकत नाही, तो असतो पुरुषोत्तम आणि ते पुरुषोत्तम म्हणजे इंदूरचे बाबा डिके.”

बाबांनी १९९६पर्यंत (निधन १५ नोव्हेंबर १९९६) जवळपास पंच्याहत्तर नाटके, एकांकिका (स्वत: लिखित, भाषांतरित व रूपांतरित) प्रेक्षकांसमोर सादर केल्या. आमच्यासारख्या मुला-मुलींना बरोबर घेऊन चाळीस वर्षें हौशी संस्था चालवली. संस्था वयाची साठी ओलांडून प्रौढ झाली आहे. हिंदी प्रांतात मराठी झेंडा फडकावणारे बाबा यांनी त्या काळात नाटकात भरपूर प्रयोग केले. त्यांच्या नाटकात अभिनयावर जास्त जोर असे. त्यांनी नवीन प्रयोग करून प्रेक्षकांची दाद मिळवली, पण स्वत:ला जयजयकारापासून लांब ठेवले. त्यांच्या नाटकात टोमणे असायचे पण नारेबाजी नव्हती.

बाबांचा जन्म इंदूरजवळच्‍या कन्नोद या खेडेगावात ७ मे १९१९ साली झाला. वडिल महादेव डिके सहकार विभागात निरीक्षक पदावर होते, पण त्यांच्या कर्तव्यपरायण नोकरीमुळे त्यांना होळकर शासनाचा पद्मश्री पुरस्‍काराच्‍या योग्‍यतेचा 'रायरतन सन्‍मान' मिऴाला होता. बाबांची पत्नी जळगांवची करकरे कुटुंबातली कुसुम. बाबा मुंबईला सार्सापरिला कंपनीत नोकरीला असताना कुसुम यांना क्षयरोग झाला व बाबांनी मुंबईला कायमचा रामराम ठोकला. त्‍यांनी इंदूरला कंपनीची विक्रेता दुकानदारी सुरु केली. जोडीला सीआयडीमध्‍ये कारकुनी केली. बाबा मुंबईला असताना दादा पेंडसे (लालजींचे भाऊ) यांचे मल्लशिष्य होते. ते चांगले वक्तेदेखील होते. ते गोविंदस्वामी आफळे यांच्या खालोखाल बक्षिस पटकावत. बाबा पुण्याच्या शिवा दामले यांंच्‍याजोडीने अट्टल पोहणारे म्‍हणून ओळखले जात.

बाबांनी पत्‍नीच्‍या निधनानंतर सुशीला तारे यांच्‍यासोबत संसार थाटला. त्यांना अजय नावाचा मुलगा होता. मात्र त्‍याचे अल्पआजारामुळे वयाच्या सहाव्या वर्षी निधन झाले. बाबांनी त्‍यांच्‍या दोन धाकट्या भावांचे व बहिणीचे शिक्षण, लग्न अशा सर्व जबाबदा-या चोख बजावल्‍या. ते वयाच्या तेहतीसाव्‍या वर्षी बी.ए.ची परीक्षा उत्तीर्ण झाले. बाबा मध्यप्रदेश शासनात आठ वर्षे सनदी अधिकारी होते, पण त्‍यांनी अन्यायाविरुद्ध चिडून त्‍या नोकरीचा राजीनामा दिला. पुढे त्‍यांचा संसार कसातरी निभावला. त्‍या काळात दोन्ही भावांची व बायकोची मिळकत याचा त्‍यांना आधार लाभला.

ते नाटककार, दिग्दर्शक, अभिनेता म्हणून श्रेष्ठ होतेच, पण व्यक्ती म्हणूनही श्रेष्ठ होते. त्यांच्याकडून कितीतरी गोष्टी नकळत शिकण्यास मिळाल्या. ते तुम्ही असे करा किंवा असे करू नका हे कधी सांगत नसत. पण त्यांनी केलेल्या कृतीमुळे, व्यवहारामुळे तुम्ही काय करायला हवे- काय नाही ते आपोआप कळे. उदाहरणार्थ, मी काही प्रसंग येथे लिहित आहे त्यापासून आपण काय शिकावे हे प्रत्येकाने ठरवावे.

बाबा स्वत: देवाला मानत नव्हते, पण दुसऱ्यांनी पण तसेच वागावे असा आग्रह कधी धरला नाही. ते वेळेच्या बाबतीत कठोर होते. नाटकाची जी वेळ दिली आहे त्या वेळेला सभागृह भरले असो-नसो प्रयोग सुरू होऊन जायचा. ते त्यांच्या मीटिंगच्या वेळेच्या पाच मिनिटे आधी पोचण्याची खबरदारी घेत. ती त्यांची सवय सगळ्यांच्या परिचयाची झाली होती. बाबा नाटकांच्या संदर्भात कोठल्याही माणसाला केव्हाही मदत करण्यास तत्पर असत. ते त्यांच्या आयुष्यभर अगदी शेवटल्या दिवसापर्यंत प्रसंगावधान सांभाळून गंभीर किंवा विनोदी बोलणे किंवा जिंदादिलीने वागणे यांचे प्रात्यक्षिक देत राहिले.

मी त्यांच्या सांगण्यावरून एक नाटक बसवण्यास घेतले. त्यात काम करणारा प्रमुख कलाकार हवा तसा सपोर्ट करत नव्हता. बाबा मला फक्त एवढे बोलले, की स्पर्धेच्या तीन दिवसांपूर्वीपर्यंत वाट बघ. Up to the mark नसला तर शेवटच्या तीन दिवसांत तो ‘रोल’ मी करेन, काळजी करू नको.

एके दिवशी, रिहर्सलच्या वेळी बाबांना एक व्यक्ती भेटण्यास आली. बाबा त्यांच्याशी बोलताना ‘आपले पंतप्रधान काहीही कामाचे नाही, देश चालवू शकत नाही हा माणूस’ असे म्हणत त्यांच्या विरूद्ध विचार मांडले. आणि चार दिवसांनी कोणा दुसऱ्यासमोर, ‘पंतप्रधानांसारखा चांगला माणूसच जगात नाही’ असे ठामपणे बोलले. नंतर आम्ही त्या विषयावर त्यांच्याशी बोललो तर म्हणतात, “चांगलं काय वाईट काय, आपले विचार ठामपणे मांडता यायला हवे.”

बाबा पंच्याहत्तर वर्षांचे झाले, तरीही स्टेज लावण्याचे आणि स्टेजचे सामान आवरण्याचे काम आम्हा तरुण मंडळींच्या बरोबरीने करायचे. रिहर्सल करताना काही कारणांनी कोणाला रागावले तरीही दुसऱ्या क्षणाला असा काही विनोद करायचे, की झालेले टेन्शन संपायचे.

माझा-त्यांचा नाटकांव्यतिरिक्त सहवास सोळा-सतरा वर्षांचा. मला त्यांच्या अन्य कितीतरी गोष्टी शिकण्यास मिळाल्या. त्यांच्याकडून मिळालेला तो ठेवा फार महत्त्वाचा आहे.

आणि हो, ते कोठल्याही पत्रावर हस्ताक्षर करताना, आधी ‘वावा’ डिके असे लिहायचे आणि मग शेवटी ‘वावा’च्यामध्ये एकेक दांडी मारून त्या ‘वावा’चे बाबा करायचे. जणू हे भासवायचे, की ‘वावा’ तर देवाने दिलेला आहे पण त्या ‘वावा’मध्ये आपला स्वत:चा स्ट्रोक लावला तर त्याचा ‘बाबा’ होतो. कलेत व्यक्तीला ‘बाबा’ माणूस म्हणून जगायचे असेल तर देवाने दिलेल्या व्यतिरिक्तही व्यक्तीने स्वत:चे शिकून टाकावेच लागते.

- श्रीराम जोग

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.