सुमंतभाई गुजराथी - इतिहास संवर्धनाचे शिलेदार


सुमंतभाई गुजराथी म्हणजे सिन्नर तालुक्यातील गेल्या पाच दशकांतील सांस्कृतिक व ऐतिहासिक घटनांचे साक्षीदार. नव्वदाव्या वर्षांतही ताजेतवाने. तो माणूस म्हणजे ऊर्जास्रोत होता. त्यांनी नोकरी म्हणाल तर एस टी महामंडळात कारकुनाची केली. पण एरवी, ते सतत काही करत असायचे. त्यांचे संपर्काचे साधन होते पोस्ट कार्ड. पोस्ट कार्डच्या बळावर सुमंतभार्इंनी अनेक गोष्टींचा पाठपुरावा केला.

शाहिरी परंपरेतील वरदी परशराम हे शाहीर सिन्नर तालुक्यातील वावी गावचे. सुमंतभार्इंनी परशरामांचे मोठेपण त्यांच्या भाऊबंदाना समजावून सांगितले. मग सुरू झाला परशरामाच्या लावण्यांचा शोध. त्यांच्या लावण्या सिन्नर तालुक्यातील अनेक शाहीर म्हणत असत. यात्रांच्या निमित्ताने कलगी तुरा होत असे. कलगी आणि तुरा हे शाहिरांचे संघ किंवा गट; त्यांच्यातील सामना दिवस दिवस रंगे. भाऊ त्यांना भेटत. प्रोत्साहन देत आणि सांगत, “अरे, हे आपल्या शाहिरांचे महत्वाचे साहित्य आहे. ते मौखिक परंपरेतच राहिले तर टिकणार नाही. त्याचे जतन, संवर्धन आणि संशोधन होऊ द्या”.

महाराष्ट्रातील अनेक गावांत शाहिरी वाङ्मय मुखोद्गत असणारे शाहीर आहेत. काहींनी ते वहीतही लिहून ठेवले आहे. कवित्व शक्तीचा प्रत्यय देणारे, काव्यनिर्मितीचे अनेक बंध मांडणारी शाहिरी कविता मौखिक परंपरेने टिकून आहे, पण अप्रकाशित आहे. भाऊंनी शाहिरांच्या कविता जतन करण्यासाठी वणवण केली. ते डॉ. गंगाधर मोरजे यांना अहमदनगरला जाऊन भेटले. त्यांच्याकडून शाहीर परशरामाच्या कवितांचे संशोधन, संपादन, संकलन झाले. मराठी वाङ्मयाच्या इतिहासात शाहिरांना सन्मान मिळाला. शाहीर परशरामाचे स्मारक उभे राहिले. ते सारे घडले सुमंतभाई गुजराथी या माणसामुळे. तो माणूस पदरमोड करून हे संस्कृतिसंचित टिकावे यासाठी प्रयत्न करत राहिला.

औंढापट्टा हा सिन्नर तालुक्यातील दुर्लक्षित किल्ला. छत्रपती शिवाजी महाराज सुरतेची लूट करून परतताना नाशिक जिल्ह्यातील काही गडकिल्ल्यांवर थांबले होते. त्या ऐतिहासिक घडामोडींचा संदर्भ असणारी ‘शोध’ ही महत्त्वाची कादंबरी मुरलीधर खैरनार यांनी लिहिली आहे. सुमंतभाई लिहीत असले तरी ते यशस्वी लेखक नव्हते. त्यांना लेखनात करियरही करायचे नव्हते. पण इतिहास संस्कृतीचे जतन व संवर्धन व्हावे यासाठी ते प्रयत्नशील होते. औंढापट्टा ही ऐतिहासिक निशाणी इतिहासात वाचताना त्यांच्या लक्षात आली. भाऊंनी त्या किल्ल्यांकडे लोकांचे लक्ष वेधले. ‘चलो औंढापट्टा’ ही काही काळ त्यांची घोषणा होती. पुढे त्यांना दुसरे तुकोजीराव होळकर यांचे जन्मस्थान सिन्नर- निफाड तालुक्यांच्या सीमेवर करंजी येथे असल्याचा शोध लागला. ते करंजीत जाऊन तेथे तुकोजीरावांचा जन्मोत्सव करत. ते वडांगळीचे संतकवी बाळाबुवा कबाडी यांच्याबद्दलची माहिती लोकांना देत. बाळाबुवांची गाथा शंभर वर्षांपूर्वी प्रसिद्ध झाली. तेच इंग्रजांविरुद्ध बंडाचे निशाण रोवणा-या भागोजी नाईक यांच्याविषयी. नाईक यांनी तशीच जागृती केली. नांदूरशिंगोटे येथे भागोजी नाईक यांचे स्मारक करण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले. भाई सिन्नर तालुक्यातील ऐतिहासिक प्रतीकांचे पूजक होते. त्यांना ऐतिहासिक पुरुषांविषयी अभिमान वाटे, पण तो दुरभिमान मात्र नव्हता.

निकोप समाजमन घडवण्यासाठी विविध उपक्रम राबवणा-या सुमंत भाई गुजराथी यांनी सीमेवर देशाचे रक्षण करणा-या सैनिकांसाठी राख्या पाठवण्याचा उपक्रमही केला. त्यासाठी त्यांनी शाळा शाळांत जाऊन प्रबोधन केले. वडांगळी गावी बाळाबुवा कबाडी नावाचे वीरशैव समाजाचे संत हाेऊन गेले. त्‍यांनी 1912 साली लिहिलेली अभंगाची गाथा गावक-यांना मठात मिळाली. सुमंतकाकांनी त्‍यानिमित्‍ताने बाळाबुवांच्‍या जन्‍मोत्‍सवादिनी उत्सव सुरू केला. पांगरी गावातील नाथ पंथाचे माधव महाराज यांचा उत्‍सव किंवा जॅक्सन प्रकरणातील अनंत कान्‍हेरे यांचे सहकारी विनायक देशपांडे यांच्‍या पत्‍नीची समाधी अशा घटनांमध्‍ये सुमंतकाकांचा पुढाकार होता.

सिन्‍नरचे शिव पंचायतन गोंदेश्‍वर मंदिर प्रसिद्ध आहे. मुख्‍य मंदिर शिवाचे आणि भोवतालची चार मंदिरे इतर दैवतांची. त्‍यापैकी एक मंदिर सूर्याचे आहे. महाराष्‍ट्राचे सूर्यमंदिरे दुर्मिळ. सुमंतभाईंनी वीसेक वर्षांपूर्वी रथसप्‍तमीला मंदिराच्‍या परिसरात सूर्यनमस्‍कारांची प्रात्यक्षिके आणि स्‍पर्धा आयोजित केली. ती परंपरा आजही सुरू आहे. सिन्‍नरच्‍या जवळपास सर्व शाळा त्यामध्‍ये भाग घेतात.

भाऊ जातपात, सोवळेओवळे पाळत नसत. एकदा त्यांनी मला घरी जेवण्यासाठी बोलावून घेतले; पाट मांडून, रांगोळी घालून चक्क देवघराजवळ जेवायला बसवले. त्यांना महाराष्ट्र शासनाने दलितमित्र पुरस्कार दिला तेव्हा मला त्याचे औचित्य लक्षात आले.

सुमंतभार्इंनी एस. टी. महामंडळातून निवृत्त झाल्याच्या दुस-याच दिवशी एस टी तिकिट काढल्यावर कंडक्टरही अचंबित झाला! घटना साधी पण नैतिक आचरणाचा वस्तुपाठ!

सुमंतकाका प्रसिद्धी सत्‍कारापासून नेहमी दूर राहिले. त्‍यांनी इतिहास संशोधक-संवर्धकाच्या भूमिकेतून काम करताना नाव प्रसिद्ध होण्‍यासाठी आटापीटा केला नाही. म्‍हणूनच सिन्‍नर किंवा नाशिकसंबंधात लेखन करणा-या लेखकांच्‍या पुस्‍तकांमध्‍ये त्‍यांचा मोठा वाटा राहिला. तेे राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाचे कार्यकर्ते. मात्र त्‍यांच्‍याठायी इतर विचारसरणींबाबत कटुता नव्‍हती. त्‍यांच्‍या देवघरात गोळवलकर गुरूजी आणि साने गुरूजी अशा प्रतिमा एकत्र नांदत असत. त्‍यांच्‍या कार्याची नोंद घेऊन त्‍यांना 'सिन्‍नर भूषण' हा पुरस्‍कार प्रदान करण्‍यात आला. 'दैनिक देशदूत'चे देवकिसन सारडा आणि सुमंतकाका या दोघांना तो पुरस्‍कार एकाच वेळी देण्‍यात आला.

नियतीने त्यांना मोठा तडाखा दिला. त्यांना एक मुलगा व दोन मुली. मुली दिल्याघरी सुखी. मुलगा वकिली करत होता. पण त्याचे मन वकिलीत रमेना. गुजराथी माणूस उद्यमशील. भाई महामंडळातून रिटायर झालेले. मुलाने व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला; हार्डवेअरचे दुकान थाटले. भाऊंनी सेवानिवृत्तीची रक्कम मुलाच्या व्यवसायात गुंतवली. दुकान व्यवस्थित चालत असताना एका रात्री घरी अपघाताची बातमी येऊन धडकली. घरातील कमावता आधार गेला आणि निवृत्तीची पुंजीही उधळली गेली! त्या रात्री भार्इंनी एक करूण घटना सांगितली. दुचाकीच्या अपघातातील मुलाचा मित्र बचावला होता. त्याने बाहेर पडताना भार्इंना हातरुमालाचा सेट गिफ्ट केला होता. भाऊ म्हणाले, “जणू डोळे पुसण्याची व्यवस्था करुनच ते दोघे बाहेर पडले.” आणि त्या रात्री दाबून धरलेल्या दुःखाला त्यांनी जणू वाट मोकळी करून दिली. त्यांनी त्या दुःखाला कवेत घेऊन पुढील पाव शतक मजल दर मजल करत वाटचाल केली.

सुमंतभार्इंनी नियतीशी सामना केला. ते एकाकीपण वाट्याला येऊनही कुढत बसले नाहीत. त्यांनी नवा डाव मांडला. घर सावरले आणि स्वतःलाही; कधी कडवटपणा दाखवला नाही.

भाऊ सिन्नरच्या सार्वजनिक वाचनालयात रमले. वाचनालयात महापुरुषांच्या जयंत्या-पुण्यतिथ्यांना निदान स्मरण म्हणून हार घातला जावा, ही सुरुवात त्यांनी केली. त्या त्या महात्म्याचे लोकांनी स्मरण करावे, त्यातून प्रागतिक विचारांचे पोषण व्हावे असा वाचनाचा संस्कार वृद्धिंगत व्हावा यासाठी ते प्रयत्नशील होते. वाचनामुळे ते स्वत: सजग होते. वाचनालयाकडे लोक आले पाहिजेत हा त्यांचा प्रयत्न असे. सिन्नरला ‘साहित्य रसास्वाद मंडळा’च्या संस्थापकांपैकी ते एक. कविता, पत्रलेखन यांबरोबरच ते प्रासंगिकही लिहीत. त्यांच्या कवितांचे स्वरूप आठवणी, प्रतिक्रिया स्वरूपाचे आहे. ‘दिसामाजी काहीतरी लिहीत जावे’ या वृत्तीने त्यांनी अष्टाक्षरी कविता विपुल लिहिल्या आहेत. त्यांच्या लेखनात डॉक्युमेंटेशनच्या अंगाने तपशील अधिक असत. त्यांना लेखक होण्याची हौस नव्हती.

त्यांचा पिंड समाज संस्कृतिसंपन्न व्हावा असा होता. वाचन, लेखन, डॉक्युमेंटेशन ही त्यांची साधने होती.

त्यांनी वयाच्या नव्वद्दीत जगाचा निरोप घेतला. त्या दिवशी ते ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’च्या संस्कृतिवेधचाच विचार करत होते. ते त्यांच्या जवळचे डॉक्युमेंट झेरॉक्स करायला गेले आणि तेथे त्यांना हृदय विकाराचा झटका येऊन त्यांनी अखेरचा श्वास घेतला! एवढा सत्शील माणूस त्यापूर्वी मी पाहिला नव्हता.

- शंकर बो-हाडे

(सुमंत गुजराथी आणि 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम'चा परिचय केवळ एका बैठकीचा. 'नाशिक जिल्‍हा संस्‍कृतिवेध' मोहिमेच्‍या पूर्व तयारीसाठी 'थिंक महाराष्‍ट्र'चे अधिकारी-कार्यकर्ते यांनी सिन्‍नर येथे बैठक घेतली. त्यावेळी गुजराथी उपस्थित होते. त्‍यांनी माहितीसंकलनात मदत करण्‍याची इच्‍छा व्‍यक्‍त केली. मुंबईतून मोहिमेची तयारी सुरू असताना सिन्‍नरच्‍या सूत्रांकडून गुजराथी यांनी स्‍वयंप्रेरणेने मोहिमेसाठी सुरू केलेली हालचाल थोड्याफार प्रमाणात कळत राहिली. मोहिमेच्‍या पूर्व संध्‍येला 'थिंक महाराष्‍ट्र'च्‍या कार्यकर्त्‍यांची टिम सिन्‍नरला पोचली आणि गुजराथी यांच्‍या मृत्‍यूची बातमी येऊन थडकली. दुस-या दिवशी सिन्‍नरच्‍या माहितीसंकलनास सुरूवात झाली. 'थिंक महाराष्‍ट्र'च्‍या माहितीसंकलकांना पुढील तीन दिवस गावागावातील स्‍थानिकांकडून 'सुमंत गुजराथी आणि त्‍यांनी 'थिंक महाराष्‍ट्र'साठी चालवलेली तयारी' याचे किस्‍से ऐकण्‍यास मिळत राहिले. गुजराथी यांच्‍या अंत्‍ययात्रेस जमलेल्या 'थिंक महाराष्‍ट्र'च्‍या स्‍थानिक सहका-यांनी गुजराथी यांच्‍या अंत्‍यसंस्कारसमयी 'थिंक महाराष्‍ट्र'ची सिन्‍नर मोहिम यशस्‍वी करणे हीच सुमंतकाकांना श्रद्धांजली' असा जाहीर विचार बोलून दाखवला. त्‍याप्रमाणे त्‍यांचे सहकार्यही लाभले. सिन्‍नरचे चांगले माहितीसंकलन होऊ शकले. या लेखाद्वारेे सुमंत गुजराथी यांच्‍याप्रती आदरांजली व्‍यक्‍त करत आहोत. - टिम 'थिंक महाराष्‍ट्र')

लेखी अभिप्राय

Borade Sir. Good Information about Sumantbhai.

shrikant petkar15/06/2016

अविरत कामात मग्न असलेले काका. धन्यवाद बो-हाडे सर.

मधुकर जाधव16/06/2016

Thanks for sharing this valuable information through this media. Thanks Borade Sir and ThinkMaharashtra.com team!

Suyog Gujarathi16/06/2016

'थिंक महाराष्‍ट्र' टिमने सुमंतकाका यांचा लेख आपल्या वेबपोर्टलवर टाकून त्यांना श्रध्दांजलीच वाहिली आहे. धन्यवाद. सर्व टिमसाठी.

संजय क्षत्रिय …16/06/2016

यात उल्लेख आहे कि जॅक्सन वधातील अनंत कान्हेरेचे सहकारी विनायक देशपांडेंच्या पत्नीची समाधी ती कुठे आहे ते कळावे कृपया मला ती माहिती हवी आहे.

हेमंत टिळे28/08/2016

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.