‘समर्थ दर्शन’ थीम पार्क


मी चाफळ येथील समर्थस्थापित श्रीराम मंदिराचा विश्वस्त म्हणून १९९९ पासून काम पाहू लागलो. तेव्हा जाणीव झाली, की ज्ञानेश्वर, तुकाराम, रामदास, नामदेव, एकनाथ ही महाराष्ट्राची संतांची परंपरा. आळंदी, देहु, सज्जन गड, पंढरपूर ही त्यांची ठिकाणे. तरुण पिढी त्यांच्याकडे पर्यटनस्थळे म्हणून पाहते. तरुणाईला दृक्श्राव्य माध्यमाची ओढ आहे. संजय दाबके याने अमेरिकेतून उच्च तंत्रज्ञानाचे शिक्षण घेतले आहे. त्याच्याकडे सांस्कृतिक वैभवाची दृष्टी आहे. माझा संजय दाबके याच्याशी स्नेह जुळला आणि त्यातून चाफळच्या मंदिराचा इतिहास डॉक्युमेंटरीद्वारे दाखवण्याचे ठरले. ‘कराड अर्बन बँके’ने त्या उपक्रमाचे महत्त्व जाणून प्रायोजकत्व स्वीकारले आणि अल्पावधीत प्रकटली ‘श्रीराम, चाफळ’ ही चोवीस मिनिटांची डॉक्युमेंटरी. ती दाखवण्यासाठी मंदिराच्या आवारातच ‘महाकवी वाल्मिकी प्रेक्षागृह’ हे साठ आसनी प्रेक्षागृह तयार झाले. त्याचे मार्च २०१२ ला उद्घाटन झाले. त्याला भरभरून प्रतिसाद मिळू लागला.

त्या यशामुळे संतांचे ‘थीम पार्क’ उभे करण्याची प्रेरणा मिळाली. त्यासाठी दीड एकर जागा लागली असती. तिचा शोध आळंदी, देहु आणि सज्जनगड परिसरात सुरू केला. त्यात सज्जनगडाच्या रस्त्यावर सहकारातील ज्येष्ठ कार्यकर्ते भाई वांगडे यांनी उभारलेली ‘ज्ञानश्री टेक्निकल इन्स्टिट्युट’ आहे. त्यांनी योजनेचे स्वागत केले आणि त्या प्रांगणातील दीड एकर जागा ‘थीम पार्क’ प्रकल्पासाठी लीजने दिली.

समर्थांच्या आयुष्यातील दहा-पंधरा महत्त्वाचे प्रसंग निवडून ते साकार करणारा सहा हजार चौरस फूटांचा एक हॉल, समर्थस्थापित अकरा मारूतींच्या प्रतिकृतींचा तीन हजार चौरस फुटांचा दुसरा हॉल व लघुपट दाखवण्यासाठी दीडशे सीट्सचे मिनी थिएटर असे ‘थीम पार्क’चे स्वरूप आहे. त्याला जोडून बुक स्टॉल, उपहारगृह व चार-पाच दुकाने आणि प्रसाधनगृहे ही सारी योजना आहेच. बाबासाहेब पुरंदरे, मारूतीबुवा रामदासी, मोहनबुवा रामदासी, चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी यांचे सहकार्य मिळत गेले. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पर्यटन तज्ज्ञ राजीव जालनापूरकर यांनी काही महत्त्वाच्या सूचना दिल्या. त्याचे एकूण बजेट दीड कोटींवर गेले.

प्रकल्प व्यावसायिक नसून सांस्कृतिक असल्याने त्याला व्यवसायाची नफातोट्याची गणिते नाहीत. भाई वांगडे आणि त्यांचे सहकारी व पुण्याच्या ‘गार्डियन ग्रूप’चे सर्वेसर्वा मनीष साबडे या दोघांनी त्यासाठी आनंदाने सहकार्य देऊ केले आणि ‘समर्थ दर्शन टुरिझम व्हेंचर’ या नावाने प्रकल्पाची उभारणी सुरू झाली.

ऐतिहासिक भासावे म्हणून सर्व बांधकाम जांभा दगडात केले आहे. तो कोकणातून आणण्यात आला. कोल्हापूरचे विजय डाकवे यांनी सिव्हिल वर्क केले. कलादिग्दर्शक अभय एकवडेकर यांनी समर्थ जीवनातील प्रसंगांच्या उभारणीची धुरा सांभाळली. त्यासाठी फायबरचे पुतळे, अन्य साहित्य यांचे काम सुरू झाले. कट-आऊटसाठी वेशभूषा करून, कलाकार निवडून फोटोग्राफी करण्यात आली. अकरा मारूतींच्या प्रतिकृतींचे काम बंगाली कलाकार चॅटर्जी यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. लायटिंगची जबाबदारी राहुल दीक्षितने तर फोटोग्राफी विजयेंद्र पाटील यांनी सांभाळली. पाटील यांनीच समर्थांच्या तीर्थस्थानांच्या लघुपटाचे शुटिंग जांब, टाकळी, चाफळ, शिवथरघळ आणि सज्जनगड येथे जाऊन केले. त्याचे संकलन महेश फुंडकर यांनी केले, तर त्याचे; तसेच, ‘समर्थ दर्शन’च्या कॉमेंट्रीचे ध्वनिसंयोजन अतुल ताम्हनकर यांनी पार पाडले. त्या कॉमेंट्रीचे लेखन ज्येष्ठ समीक्षक द.भि. कुलकर्णी यांनी प्रेमाने करून दिले. सर्व कलाकुसरीबाबत चंद्रमोहन कुलकर्णी मार्गदर्शन करत राहिले. बाबासाहेब पुरंदरे वारंवार कामाचे कौतुक करत आणि महत्त्वाच्या सूचनाही देत. भाई वांगडे दहा-पंधरा दिवसांनी येऊन पाहणी करत, पण कोणतीही ढवळाढवळ न करता स्थानिक बाबींच्या विचारातून काही सुचवत.

समर्थांचे घर, जन्म, बालपण, उपासना, विवाहमंडपातून पलायन, टाकळीतील वास्तव्य - तेथील तपस्या, गोमय मारुतीची स्थापना, मोगली अत्याचार, बद्रिनाथला हनुमंत स्थापना, महाराष्ट्रात आगमन, चाफळ, दासबोध लेखन व आनंद भुवन हे प्रसंग उत्कट रीत्या हुबेहूब साकार झाले. मारुती दर्शन हॉलमध्ये अकरा मारुतींच्या प्रतिकृती, त्याच्या पार्श्वभूमीवर तेथे जाण्याचा नकाशा व तेथील नवी मंदिरे असे सर्व तयार झाले. प्रत्येक मारुतीची माहिती देणारे फलकही लागले. दीडशे क्षमतेचे चित्रपटगृह, प्रोजेक्टर, साऊंड व तेथे दाखवण्याची डॉक्युमेंटरी पूर्ण झाली. त्या दरम्यान दोनदा मनीष साबडे स्वतः येऊन गेले. त्यांनी सिव्हिल वर्कमधील आधुनिक सुधारणा सांगून, त्या पुण्याहून तज्ज्ञ व स्टाफ पाठवून करूनही घेतल्या. प्रवेशद्वार, फलक, दरवाजे तयार होऊन पीटरने त्याला कलात्मक रंगकाम केले. भाई वांगडे यांच्या हस्ते शास्त्रोक्त उदकशांत करून प्रकल्प मार्च २०१२ मध्ये पूर्णत्वाला आला.

तेथे माहिती देणे व मेंटेनन्स यासाठी गजवडी, परळी या परिसरातील बारा मुला/मुलींची टीम निवडली. त्यांना ट्रेनिंग दिले. अयाझ पटेल हा गडवडीतील युवक त्या स्टाफ टीमचे नेतृत्व करतो.

आम्ही समारंभाविना ‘समर्थ दर्शन थीम पार्क’ जनतेसाठी खुला केला.

‘समर्थ दर्शन’ने एक वर्ष यशस्वी रीत्या पूर्ण केले. तेव्हा वर्धापनदिनानिमित्त तब्बल एक हजार समर्थभक्त व पर्यटक यांनी त्याचा लाभ घेतला. पार्कला भेट देणाऱ्यांची ती वर्षातील उच्चांकी संख्या होती. समर्थांचे दैवत असलेल्या हनुमंताचा दहा फुटी भव्य पुतळा दर्शनी भागात उभारण्यात आला आहे. तोही आकर्षण बनला आहे. वर्षापूर्वी  मारुतीचा फायबरचा पस्तीस फुट उंचीचा भव्य पुतळा दर्शनी भागात उभारण्यात आला असून तो पर्यटकांचे आकर्षण बनला आहे. तेथील ग्रंथभांडारात मोहन कुलकर्णी यांनी समग्र संतसाहित्य ठेवले आहे तर प्रख्यात मसालेवाले काटदरे, राऊत यांचे उत्तम टी स्टॉल्स आणि अद्ययावत उपहारगृह व मुलांसाठी चिल्ड्रन्स गेम पार्क हीसुद्धा आकर्षणे आहेत.

तिकिट काढून समग्र संतदर्शन ही नवीन कल्पना हळुहळू रूजू लागली आहे. प्रवेश शुल्क मोठ्या व्यक्तीस चाळीस व मुलास तीस रूपये असे आहे. वर्षात सुमारे पन्नास हजार लोक भेट देऊन गेले आहेत. रोज किमान तीनशे पर्यटक आल्याशिवाय प्रकल्प स्वयंपूर्ण होणार नाही.

प्रकल्पात माझी भूमिका केवळ ‘फोडिले भांडार। धन्याचा हा माल। मी तो हमाल भार वाहे।’ अशी निर्लेप समन्वयकाची आहे.

समर्थ दर्शन थिम पार्क

ज्ञानश्री महाविद्यालयाच्या पटांगणामध्ये, सज्‍जनगड रोड,
सोनवडी-गजवडी, तालुका-जिल्‍हा सातारा - 415013
संपर्क - 9763995514 (अयाज पटेल), 9527005509 (पुष्‍कराज महाजन)

 

- अरुण गोडबोले

लेखी अभिप्राय

कल्पना उत्तम आहे. आज युवकांमध्ये राष्ट्रभक्ति आणि व्यायामाची सवय रुजवण्याची अत्यंत गरज आहे. यासाठी समर्थांशिवाय सर्वच असमर्थ आहोत.
या थीमपार्कला भेट द्यायला नक्कीच आवडेल.
Thanx to team Think maharashtra

Dr. Madhura Ba…19/05/2016

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.