संत एकनाथांची भारुडे


संत एकनाथांच्या वाङ्मयाचा प्रभाव तत्कालीन समाजावर झाला आणि देव, देश, धर्म या बाबतींत जागृती घडून आली. एकनाथांसारखा तळमळीचा समाजसुधारक जन्मास येणे ही त्या काळाची गरज होती. त्यांनी धर्माचा खरा अर्थ सांगत समाजाला निर्भय बनवले. नाथांनी मोठा लेखनप्रपंच केला आहे. त्यांच्या रचनेत विविधता आहे. त्यांनी एकनाथी भागवताबरोबर चतुरश्लोकी भागवत, शुकोष्टक, हस्तामलक, आनंदलहरी, स्वात्मसुख, रुक्मिणी स्वयंवर, भावार्थ रामायण, अनुभवामृत, आनंदानुभव, चिरंजीवपद, गीतासार, ध्रुव-प्रल्हाद-ज्ञानदेव-नामदेव इत्यादी संतांची चरित्रे, तीन हजारांच्या आसपास अभंग व पदे आणि साडेतीनशेच्या आसपास भारुडे असे विविध वाङ्मय निर्मिले.

मराठीत भारुडांची निर्मिती प्रथम केली ती ज्ञानदेवांनी. त्यानंतर काही संतांनी आणि संप्रदायांनी तो काव्यप्रकार हाताळला. परंतु भारुडे या लोकसाहित्याला शिखरावर आरूढ करण्याचे काम केले ते संत एकनाथांनी. त्यांनी लोकोद्धाराच्या तळमळीमुळे भारुडे लिहिताना लौकिक छंद वापरले. त्यांनी वासुदेव, भराडी, गोंधळी, भुत्या, पोतराज, जोशी, दरवेशी, पिंगळा, शकुनी, कोल्हाटी, माळी, मांड, जोगी, जागल्या यांसारख्या लोकभूमिकांचे माध्यम वापरले. त्या लोकभूमिकांबरोबर शिमगा, होळी, गोंधळ, फुगडी यांसारखे खेळ व सण आणि विंचू, सर्प, गाय, एडका, पोपट, पाखरू यांसारखे पशुपक्षी उपयोगात आणले. जोहार, आशीर्वादपत्र, चोपदार यांसारखे दरबारी विषय आणि रहाट, बाजार(हाट), सासुरवास, यांसारखे संसारी विषय ही त्यांची सामग्री होती. त्याचबरोबर महालक्ष्मी, अंबा, कान्होबा यांसारख्या दैवी भूमिका त्यांनी लेखनात हाताळल्या. नाथांनी अशा विविध तऱ्हांनी ‘रूपक पद्धती’ने भारुडे लिहिली आहेत. ते जणू हातात दिमडी घेऊन, स्वत:च वाघ्या होऊन ‘अहं वाघ्या, सोहं वाघ्या प्रेमनगारा वारी | सावध होऊन भजनी लागा देव करा कैवारी |’ असा जयघोष करत निघाले आहेत आणि खंडेरायाच्या जागरणाचे माध्यम वापरून, सावध होऊन (अंधश्रद्धा टाकून) श्रद्धेने भक्ती करण्याचा उपदेश त्यान्वये देत आहेत.

भागवत धर्मातील सदाचार, सर्वांभूती भगवंत पाहण्याचा भगवतभाव आणि विवेकाची शिकवण देणारे नाथांचे प्रत्येक भारुड हे जीवनाचे व्यक्त नि साक्षात्कारी स्वरूप आहे. ‘जनसामान्यांचे अनुभवविश्व’ भारुडांच्या माध्यमातून वैशिष्ट्यपूर्ण रीतीने मांडून सामाजिक विवेकाला आवाहन केले गेले आहे. नाथांनी भारुडातून ‘सदाचार आणि नीती’ यावर भर दिला आहे. नाथांच्या भारुडातून समाजाला कळणारी भाषा आणि पेलणारे तत्त्वज्ञान आढळते. नाथांच्या भागवत या मोठ्या ग्रंथाची रचना प्रौढ आणि पढीक जनांसाठी झाली. परंतु त्यांनी त्यांचे विचार भोळ्या भाविक सामान्यजनांना पटवून देण्याकरता आणि ते परिणामकारक होण्यासाठी भारुडांची निर्मिती केली.

एकनाथांनी दीडशे विषयांवर अंदाजे साडेतीनशे भारुडे लिहिली आहेत. विषयांची विविधता आणि भारुडातून मांडलेले तत्त्वचिंतन लक्षात घेता नाथांच्या भारुडांचे पुढील प्रकारांत वर्गीकरण करता येते.

अ. मानवी भूमिका दर्शवणारी भारुडे – या भारुडांचे पुन्हा सात उपप्रकार पडतात.

१. प्रबोधनात्मक मानवी भूमिका दर्शवणारी भारुडे. उदाहरणार्थ, वासुदेव, जोशी, पागुळ, पिंगळा, सरवदा इत्यादी.

२. जाती-व्यवसाय दर्शवणारी भारुडे. उदा. भट-भटीण, महार-महारीण, माळी, कंजारीण, वैदीण इत्यादी.

३. शारीरिक व्यंग दर्शवणारी भारुडे. उदा. मुका, आंधळा, बहिरा, नकटी इत्यादी.

४. ‘सौरी’ व्यवसायात्मक भारुडे. उदा. सौरी, कुंटीण, जगझोडी इत्यादी.

५. नाती-गोती सांगणारी भारुडे. उदा. दादला, बायकला, पोर, मुलगी इत्यादी.

६. सामाजिक वृत्तिदर्शक भारुडे. उदा. चोपदार, जागल्या इत्यादी.

७. गावगुंडी विषयावरील भारुडे. उदा. गावगुंड, आडबंग इत्यादी.

ब. दैवी-भूमिका व भूत-पिशाच्चविषयक भारुडे. उदाहरणार्थ, महालक्ष्मी, जोगवा, भुत्या, कान्होबा इत्यादी.

क. पशु-पक्षीविषयक भारुडे. उदा. गाय, विंचू, एडका, पोपट, पाखरू, टिटवी, बैल, कुत्रे इत्यादी.

ड. ‘कूटे-कोडी-नवल’विषयक भारुडे. उदा. कोडे, नवलाई इत्यादी.

इ. खेळ-सण व उत्सवविषयक भारुडे. उदा. होळी, फुगडी, हळदुली, शिमगा, जाते, पिंगा, एकीबेकी, हमामा, हेतूतू, झोंबी इत्यादी.

फ. जोहार-दरबारी पत्रे व दरबारी विषयावरील भारुडे. उदा. जोहार, आशीर्वादपत्र, अर्जदस्त, अभयपत्र, जाबचिठ्ठी, ताकीदपत्र इत्यादी.

ग. संसारातील व्यवहारी गोष्टी – वस्तू आणि नैतिक बाबींविषयक भारुडे. उदा. बाजार-हाट, सासूरवास, व्यापार, नीती, थट्टा, रहाट, संसार इत्यादी.

विषयांची आणि रूपकांची विविधता हे तर नाथांच्या भारुडांचे वैशिष्ट्य आहे. त्यांनी काही भारुडांमधून सद्धर्माचे दान मागितले तर काही भारुडांतून विवेकाचा होरा सांगितला आहे. काही भारुडांतून सामाजिक दुष्ट प्रवृत्तींविरूद्ध जोरदार फटके मारले तर काहींमधून सामाजिक विकारांचे व्यंगात्मक विनोदी पद्धतीने लोकांसमोर उभे केले. काही भारूंडामधून आत्मानंदाचा खेळ वर्णन केला तर जीवात्म्याने देहगावची सनद वाया घालवल्याबद्दल त्याला शिवात्म्याकडून जाब विचारला. कूटांमधून आध्यात्मिक कोडी मांडली तर काही भारुडांतून देहाहंकारी वृत्ती आणि त्यातून उद्भवणाऱ्या आसक्ती विकारांनी होणाऱ्या नाशाची जाणीव करून दिली.

भारुडातील रूपक-तत्त्वचिंतन : नाथांनी त्यांच्या भारुडांतून मनोरंजनाबरोबरच अध्यात्मविचारांचीही मांडणी केली आहे. भारुडात तत्त्वज्ञान आहे. ते रूपकात्मक पद्धतीने मांडलेले असते. उदाहरणार्थ -
वासुदेव माझे नाव : वासुदेव ही ‘मऱ्हाटी’ लोकसंस्कृतीतील सात्त्विक लोकभूमिका. वासुदेव पहाटेच्या वेळी गावात येतो. रामप्रहरी लोकांना जागे करतो. रामनामाचा महिमा गातो आणि त्याच्याच नावाने दान मागतो. वासुदेवाची वेशभूषाही त्याच्या प्रबोधनकार्याला साजेशी आहे. त्याने अविद्येला घालवून डोक्यावर मोरपिसांचा, श्रीविद्येचा ‘टोप’ घातला आहे. ज्ञान हे पूर्ण आहे, ते संपूर्ण विश्वाला व्यापून राहिले आहे. म्हणूनच त्याने पूर्ण ज्ञानाचा घोळदार अंगरखा अंगावर चढवला आहे. भारतीय तत्त्वज्ञानात ब्रह्म-माया, प्रकृती-पुरुष ह्या जोड्या आढळतात. त्या जोडीतूनच विश्वाची निर्मिती होते, ज्ञानदेवांनी त्या प्रकृती-पुरुषाला ‘देवो-देवी’ या नावाने संबोधले आहे. त्या वासुदेवाने त्या देवोदेवीची चिपळी हाती घेतली आहे. सात्त्विकतेचे प्रतीक म्हणून गळ्यात माळ, हातात टाळ आणि पायांत चाळ बांधलाय. तो नादब्रह्माचा पावा वाजवतो आणि संतांघरचा वासुदेव भोग सांडून त्यागाचे दान मागतो. जीवाने काय दान मागितले असता जीवाचे कल्याण होईल हे सांगण्यासाठी तो घरोघरी जाऊन रामनामाचे दान मागतो. लोक दान घालतात आणि गिरकी मारून पावा वाजवून तो म्हणू लागतो.

 

‘दान पावलं दान पावलं भीमाशंकरी महादेवाला |
कोल्हापूरात महालक्ष्मीला, पंढरपुरात विठूरायाला |
जेजुरीमधी खंडेरायाला, आळंदीमधी ज्ञानदेवाला |
देहूगावात तुकारामाला, पैठणमधी एकनाथाला |
सज्जनगडी रामदासाला, दान पावलं पावलं सद्गुरुरायाला |
दान पावलं पावलं जनता-जनार्दनाला’

वासुदेवाच्या या रूपातून सकल संतांनी भक्तीचे दान मागितले आणि जीवनमुक्तीचा आनंद वर्णिला. मायेमुळे किंवा अज्ञानामुळे जीवाच्या मूळ सत्यस्वरूपावर आवरण घातले जाते. मी आत्मा नसून मी देह आहे ही भावना बळावते. मग देहाच्या, इंद्रियांच्या सुखासाठी जीव विषय-वासनांच्या आहारी जातो. म्हणूनच भारुडातील वासुदेव सांगतो, ह्या विषयांमध्ये न गुंतता विषयावर ताबा मिळवून त्या परमात्म्याचे स्वरूप आठवा आणि मनामध्ये साठवा.

 

 

कर जोडोनि विनवितो तुम्हा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा
नको गुंतू विषयकामा तुम्ही आठवा मधुसूदना

मानवी जीवनाचे श्रेष्ठत्व सांगताना वासुदेव म्हणतो, ‘मानवी देह प्राप्त होणे हे दुर्लभ आहे. त्याच देहात जीवाचा उद्धार करता येतो आणि जीवनमुक्तीचा मार्ग गवसतो.’ म्हणून हा वासुदेव सद्गुरूंना शरण जाण्याची विनंती करत आहे.

 

 

हेचि माझी विनवणी | जोडितो कर दोन्ही |
शरण एका जनार्दनी | तुम्ही वासुदेव म्हणा अनुदिनी |

तो संतांची शिकवण समाजापुढे जीवाला सुखी होण्यासाठी मांडतो. संतांची शिकवण समाजात रुजली आहे. त्याप्रमाणे वाटचाल करून श्रेष्ठ जीवनमूल्ये जपण्याचे श्रेष्ठ दान समाजाकडून मिळाले आहे. म्हणून हा वासुदेव आनंदाने बेहोष होऊन सांगतो. ‘लोकहो, तुमचे विवेकाचे आणि सत्प्रवृत्तीचे दान सद्गुरूंना आणि आत्मरूपी परमात्म्याला पावले आहे.’ तो गिरकी घेतो आणि म्हणू लागतो – ‘दान पावलं... दान पावलं...’

भविष्य किंवा होरा सांगणारे जोशी गावगाड्यात हिंडत असत. ती मंडळी पाऊस पडेल की नाही? धान्य पिकेल की नाही? गावावर कोणते संकट येईल? सुबत्ता कशी नांदेल? वर्षभरात विशेष काय काय घडेल? अशा स्वरूपातील ‘होरा’, काही आडाखे बांधून सांगत असत. भारुडातील जोशीसुद्धा देहगावचा होरा सांगायला आला आहे. ‘मी आलो रायाचा जोशी | होरा ऐकाजी मायबाप’

आजपर्यंत तुम्ही अज्ञानामध्ये आणि अविवेकात वावरत होता. त्यामुळे आत्मज्ञानापासून वंचित होऊन विकारांच्या आहारी गेला होता. तुमच्यातील द्वैतभावना आणि विषमता वाढली आहे. पण तुम्ही सद्गुरूंना शरण गेलात तर ते अज्ञानाला आणि अविवेकाला घालवून शुद्ध ज्ञानाची प्राप्ती करून देतील. हा होरा सांगताना जोशी म्हणतो,

 

 

‘येथून पुढे बरे होईल | भक्ती सुखे दोंद वाढेल ||’

नाथांचा काळ अत्याचारी राज्यकर्ते, अनाचार आणि राजकीय अस्थैर्य असा होता. गुंडगिरी वाढली होती आणि दुष्ट प्रवृत्ती, विषयवासना, अज्ञान - त्याने होणारी अवनती यांमुळे एकनाथ हळहळतात. नाथांनी सामाजिक संतुलन राखण्यासाठी दैवीशक्तीचे प्रकटीकरण होणे आवश्यक आहे हे जाणले आणि ‘बये, दार उघड’ असे म्हणून दार लावून बसलेल्या अंबेला सगुणाचे दार उघडण्यास सांगितले.

नाथांनी भारुडांमधून रूपकांचे भांडारच खुले केले आहे. भोग सोडून त्यागाचे दान मागणारा आणि त्यासाठी रामनामाची महती गाऊन समाजाला उठवणारा पहाटसमयीचा ‘वासुदेव’, अविवेकाने देहगावचा नाश होत आहे म्हणून ‘सत्गुरूला शरण जा आणि विवेकसंपन्न व्हा’ असा होरा सांगणारा ‘जोशी’ समाजाच्या स्वास्थ्यासाठी दैवीशक्तीला आवाहन करून तिला सगुण-साकार रूपात प्रकट होण्यासाठी ‘बये दार उघड’ म्हणून सांगणारा ‘पोतराज’... किती रूपके सांगावी?

हातात संबळ घेऊन जगदंबेसाठी भाव-भक्तीचा गोंधळ घालणारा ‘गोंधळी’, ‘सोऽहं’ शब्दांची दिमडी वाजवत भजन करण्याचा उपदेश करणारे ‘वाघ्या-मुरळी’, ज्ञानाची दिवटी पेटवून त्याच्या उजेडात विकारांच्या अंध:काराला नाहीसा करणारा ‘भुत्या’, सगुण मायारूपी ‘कोल्हाटीण’, अज्ञानाने आत्मदृष्टीस अंधत्व आलेला ‘आंधळा’, शरीराने धडधाकट असूनही संकल्प-विकल्पाने पंगू झालेला ‘पांगळा’, ज्ञानाच्या गर्वामध्ये, देहरूपी जमिनीतील विषय-वासनांचे ‘तण’ काढून मशागत करणारा ‘माळी’, जीवाला दंश करून मोहरूपी विष चढवणारा ‘सर्प’, अद्वैताच्या महाद्वारात भावभक्तीचा मिलाफ झालेली एकत्त्वाची ‘फुगडी’... भारुडातून साकारलेली ही सारीच रूपके नाथांच्या प्रबोधनाकारी लोकान्मुख वृत्तीची साक्ष देत आहेत.

- डॉ. रामचंद्र देखणे

(आदीमाता दीपावली विशेषांक २०१५ वरून उद्धृत)

Last Updated On - 19th April 2016

 

लेखी अभिप्राय

अतिशय मोजक्या शब्दात डॉक्टर देखणे यांनी भारुडाचा विशाल पट आणि त्यातील मर्मस्थळं उलगडून दाखवली. अभिनंदन.
कमलाकर सोनटक्के

कमलाकर सोनटक्के18/04/2016

Bharudabaddalchya serva shanka dur zalya

Madhavi Gokhale20/04/2016

Khupach Chan
aj phitle maze kode.....

Dharmendra Pawar 30/09/2016

sarve sante samagame , bhakti nitya karm tech jane !

shubham bambal13/10/2016

छान खूप

प्रमोद कुमावत 09/03/2017

very nice

राजू ठोंबरे24/09/2017

एकनाथानी रचलेली भारुडे आजही आपणाला प्रेरणादायी वाटतात, खूप छान लेख लिहीला आहे

Ajitkumar Jadhav 05/11/2017

रखूप छान लेख

Ajitkumar Jadhav 05/11/2017

khup chan bharud

vinod waghmare28/12/2017

संत एकनाथांची भारुडे आजच्या पिढीला प्रेरणादायी आहेत.खूप छान

नारायण माहोरे11/02/2018

संत एकनाथांची भारुडे आजच्या पिढीला प्रेरणादायी आहेत.

Narayan Mahore…11/02/2018

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.