पक्षीमित्र दत्ता उगावकर


दत्ता उगावकर हे निफाडच्या माणकेश्वर वाचनालयाचे चिटणीस न्या. महादेव गोविंद रानडे यांच्या स्मारकाचे कर्ते! पण त्यांची खरी ओळख ही पक्षीमित्र आणि पक्षीनिरीक्षक अशी आहे. त्यांची पक्ष्यांशी मैत्री कशी आहे हे त्यांच्या निफाडमधील राहत्या घरी समजते. त्यांच्या हॉलमध्ये दोन भिंतींवर सर्वत्र पक्ष्यांचे साम्राज्य आहे. त्यामध्येच डॉक्टर सलीम अली यांचा छान फोटो आहे!

दत्ता उगावकर यांनी नाशिक येथे बी.ए. आर्ट्स शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर पुणे विद्यापीठातून अर्थशास्त्रातील एम. ए.ची पदवी १९६२ साली मिळवली. त्यांनी १९६२ ते १९७४ च्या काळात मुंबई येथे काही वर्षें सचिवालयात व काही वर्षें स्वस्तिक टेक्सटाईल्समध्ये काम केले. ते १९७४ साली निफाडला परत आले, कारण त्यांना मुंबईचे धकाधकीचे जीवन आवडले नाही. त्यांनी गेल्या चाळीस वर्षांत corrugated boxes चे उत्पादन, झेरॉक्स सेवा, शेती आणि डेअरी व्यवसाय अशी निरनिराळी कामे करून पाहिली. मात्र त्यांचे खरे आवडते काम आणि छंद फोटोग्राफी हे आहे.

उगावकर यांना पक्षीनिरीक्षणाचा छंद जडण्यास नांदूर मधमेश्वर हे ठिकाण कारणीभूत आहे. डॉ. सलीम अली नांदूर मधमेश्वर या ठिकाणी १९८२ साली आले होते. तेव्हापासून उगावकर पक्षीनिरीक्षणाचा छंद जोपासत आहेत.

उगावकरांनी मधमेश्वर येथे आढळणाऱ्या स्थानिक व स्थलांतरित पक्ष्यांची यादी १९८९ साली प्रकाशित केली. ती यादी  दोनशेतीस पक्ष्यांची आहे. त्या कामासाठी त्यांनी  तत्पूर्वीच्या चार-पाच वर्षांतील पक्षीनिरीक्षकांच्या नोंदी, ‘बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी’, ‘वन्य जीवनिधी’ (मुंबई), ‘पक्षी मित्र मंडळ’ - नाशिक व ‘निसर्ग मित्र मंडळ’ - निफाड यांनी केलेल्या नोंदींचा उपयोग केला. त्यामध्ये स्थानिक, सर्वत्र आढळणारे, इतरत्र फिरणारे, हिवाळ्यात स्थलांतरित होणारे व मधून मधून येणारे या प्रकारे पक्ष्यांचे वर्गीकरण केले आहे.

दत्ता उगावकर ‘बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी’ या संस्थेचे सभासद आहेत. त्यांना सोसायटीकडून निरनिराळी मासिके, पुस्तके यांमधून पक्षी, सरपटणारे प्राणी, फुलपाखरे, खडक अशा विषयांची माहिती मिळते. उगावकर यांच्याकडेही स्वत:ची पुष्कळ पुस्तके आहेत. त्यांच्या घराचा हॉल पुस्तकांनी आणि पक्ष्यांच्या छायाचित्रांनी भरलेला आहे.

उगावकर निसर्गशिक्षणासाठी नांदूर मधमेश्वर अभयारण्यात मुलांच्या सहली घेऊन जात. उगावकर एकूण तेरा गावांमधील हायस्कूल्सच्या विद्यार्थ्यांसाठी भाषणे देणे, स्लाइडशोज करणे, वन्यजीवांविषयी मुलांच्या चित्रकला व निबंध स्पर्धा आयोजित करणे व त्यांना बक्षीस देऊन त्यांचा हुरूप वाढवणे असे कार्यक्रम करत. ते मधमेश्वर अभयारण्यात पर्यटकांना नोव्हेंबर ते मार्च या काळात घेऊन जात असत. त्यांनी त्या ठिकाणी माहिती देण्याचे काम करण्यासाठी दहा तरुण मुलांना प्रशिक्षण दिले. ते दहा जण पर्यटकांना माहिती देण्याचे काम करत असून ते त्यांच्या उपजीविकेचे साधन झाले आहे. ‘निफाड निसर्ग मित्र मंडळा’च्या वर्षाकाठी एक-दोन सहली निघतात.

दत्ता उगावकर 'महाराष्ट्र पक्षी मित्र मंडळा’चे उपाध्यक्ष आहेत. ते ‘नेचर कन्झर्वेशन सोसायटी’चे नाशिकमधून सभासद आहेत. उगावकर यांनी त्या सोसायटीतर्फे संशोधन करणारे सभासद बी. राहा यांना त्यांच्या कामात आठ वर्षें मदत केली आहे. त्यानुसार त्यांनी लांडग्यांसंबंधी  आणि ग्रेट इंडियन बस्टर्डविषयी राहा यांना माहिती पुरवली.

‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ वाईल्ड लाईफ’ (डेहराडून)तर्फे नवीन प्रजातींविषयी संशोधन करण्यात येते. त्यासाठी उगावकरांनी नांदूर मधमेश्वर येथील पक्ष्यांची यादी तयार केली आहे. ‘दि फ्लोरा ऑफ नांदूर मधमेश्वर’ या विषयात ‘सेंट झेवियर’ मुंबई यांनी प्रबंध तयार केला. त्या प्रबंधासंबंधी माहिती देण्याचे काम उगावकरांनी केले आहे. त्यांचा नांदूर मधमेश्वर येथील पाणथळ व जैव विविधता यांविषयी मार्गदर्शिका करण्याच्या कामात सहभाग होता. ‘नेचर कन्झर्वेशन सोसायटी’कडून ‘दि बर्डस ऑफ नाशिक डिस्ट्रीक्ट’ हे पुस्तक तयार करण्यात आले. त्या कामात उगावकर यांचे सहकार्य आहे.

‘महाराष्ट्र पक्षिमित्र संघटने’चे २९वे संमेलन २३ -२४ जानेवारी २०१६ या दोन दिवशी सावंतवाडी येथे पार पडले. उगावकर यांनी त्या संमेलनात त्यांच्या स्वत:कडील सर्व माहिती सादर केली. उगावकर त्यांच्याकडील माहितीचा प्रसार करण्यासाठी पक्ष्यांचे फोटो व माहितीचे स्टिकर्स बनवतात. ते काम ‘नेचर कन्झर्वेशन सोसायटी’द्वारा होते.

उगावकर शासकीय पातळीवर ‘नाशिक जिल्हा व्याघ्र कक्ष कमिटी’चे सभासद आहेत. ते ‘कन्झर्वेशन रिझर्व कमिटी’चे सभासद असून, त्यांनी येवला तालुक्यातील ‘काळवीट कन्झर्वेशन रिझर्व व्यवस्थापन कमिटी’मध्ये काम केले आहे. ते ‘पर्यावरण दिन’, ‘अर्थ डे’, ‘ओझोन डे’ अशा दिनानिमित्त शासनातर्फे कार्यशाळा आयोजित करतात. उगावकर आठ ते दहा वेळा हिमालयात निसर्ग निरीक्षणासाठी ट्रेकिंग ग्रूप्सबरोबर जाऊन आले आहेत. त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना २०१३ चा ‘किर्लोस्कर वसुंधरा पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.

त्यांनी हिमाचल प्रदेशमधील ट्रेकिंग मध्ये भाग घेतला असताना ते अपघातातून बचावले. डोंगरावरून खाली उतरत असताना त्यांचा तोल सुटला आणि ते घसरले. थोड्या अंतरावर खोल दरी होती. पण वेळेतच त्यांनी स्वतःला सावरले. ते सुरक्षित राहिले.
 
‘ऑक्सफोर्ड विद्यापीठा’तर्फे ‘डूक्स, गीज अॅण्ड स्वान्स ऑफ इंडिया’ हे पुस्तक ‘बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी’ यांच्या सहकार्याने प्रकाशित झाले. उगावकर यांनी त्या पुस्तकासाठी माहिती पुरवली आहे.

उगावकर त्र्याऐंशी वर्षांचे आहेत. त्यांचा अधिकाधिक वेळ ‘माणकेश्वर वाचनालया’च्या  कामात आणि ‘पक्षीमित्र संघटना’ यांच्या कामात जातो. त्यांनी छंद जोपासल्यामुळेच त्यांचे  जीवन आनंदी आहे असे ते म्हणतात. उगावकर संसाराच्या व्यापात न पडता स्वत:चे काम आणि छंद यांमध्ये व्यस्त राहून स्वच्छंदी जीवन जगत आहेत.

दत्‍ता उगावकर - 927 284 7808

- पुरुषोत्तम क-हाडे

Last Updated On - 9th Jan 2017

लेखी अभिप्राय

Great man after Dr. Salim Ali.Who devoted everything for birds.

Satish Patil Jalgaon16/11/2016

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.