शेतकरी एकत्र आला तरच टिकू शकेल


'उत्‍सव चांगुलपणाचा' कार्यक्रमात विलास शिंदे यांचे प्रतिपादन

महाराष्‍ट्रातला शेतकरी हा प्रामुख्‍याने अल्‍पभूधारक आहे. जमिनीचा लहानसा तुकडा कसणारा शेतकरी मोठा फायदा मिळवू शकत नाही, मात्र त्‍याचवेळी त्‍याचा सामना जागतिक बाजारपेठेशीही असतो. त्‍यामुळे यापुढे शेतक-याला टिकायचे असेल तर त्याला एकत्र येऊन स्‍वतःची ताकद वाढवावी लागेल असे मत नाशिकचे शेतकरी आणि तीन हजार शेतक-यांच्‍या संघटनातून कोट्यवधींची कंपनी उभारणारे विलास शिंदे यांनी व्‍यक्‍त केले. ते 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलच्‍या सहाव्‍या वर्धापनदिनानिमित्‍त शनिवार, १९ मार्च रोजी ठाण्‍यात रंगलेल्‍या 'उत्‍सव चांगुलपणाचा' या सांस्‍कृतिक कार्यक्रमात बोलत होते. त्‍यावेळी मुलाखतकार किरण भिडे यांनी विलास शिंदें यांसोबत थॅलिसिमिया या दुर्मिळ रोगाने ग्रस्‍त असलेल्‍या मुलांसाठी कार्यरत असलेल्‍या सुजाता रायकर आणि देवरायांचे अभ्‍यासक डॉ. उमेश मुंडल्‍ये यांच्‍याशी संवाद साधला. प्रत्‍येक मुलाखतीपूर्वी त्या त्‍या व्‍यक्‍तीवर तयार करण्‍यात आलेली छोटेखानी फिल्‍म पडद्यावर दाखवण्‍यात आली. त्‍या कार्यक्रमास 'ठाणे जनता सहकारी बँके'चे प्रायोजकत्‍व लाभले. तर 'तन्‍वी हर्बल प्रॉडक्‍ट' यांनी सहप्रायोजकाची भूमिका निभावली.

कार्यक्रमाची सुरूवात वनस्‍पतीशास्‍त्रज्ञ आणि देवरायांचे अभ्‍यासक डॉ. उमेश मुंडल्‍ये यांच्‍या मुलाखतीने झाली. देवराई म्‍हणजे काय हे सांगताना डॉ. मुंडल्‍ये यांनी साधे जंगल आणि देवराई यातील फरक स्‍पष्‍ट केला. मुंडल्‍ये यांनी त्‍यांच्‍या संशोधनाचा प्रवास कथन करताना म्‍हटले, की महाराष्‍ट्रात सुमारे साडेतीन हजार देवराया असून कोकणात त्‍यांची संख्‍या अधिक आहे. देवराया हे देवाच्‍या नावाने राखलेले जंगल असते. ते आजपर्यंत टिकण्‍यामागे लोकभावना कारणीभूत आहे. उमेश मुंडल्‍ये यांना दोन-तीनशे वर्षांपूर्वी जंगले मोठ्या संख्‍येने उपलब्‍ध असताना देवराया राखून ठेवण्‍यामागे कारण कोणते? या प्रश्‍नाचे उत्‍तर त्‍यांच्‍या संशोधनादरम्‍यान स्‍पष्‍ट होत गेले. ते म्‍हणाले, की नव्‍वद टक्‍के देवरायांमध्‍ये पाण्‍याचा स्रोत असतो. तो पाण्‍याचा साठा राखला जावा या उद्देशाने देवरायांमध्‍ये देवाची स्‍थाने निर्माण झाली आणि पर्यायाने देवराया टिकून राहिल्‍या. देवराईतील पाण्‍याचा स्रोत किती मोठा असतो याचे उदाहरण देताना त्‍यांनी कोल्‍हापूरात एका देवराईतील पाण्‍याच्‍या स्रोतावर तीनशे एकर ऊस पिकवला जात असल्‍याचे सांगितले. देेवराईमध्‍ये वृक्षसंपदेचे जतन झाल्‍यामुळे तेथे अनेक वैशिष्‍ट्यपूर्ण झाडे-वेली-झुडपे पाहण्‍यास मिळतात. तसेच, देवराई हे त्‍या त्‍या गावाचे सांस्‍कृतिक केंद्र असल्‍याचे सांगत त्‍यांनी देवराईचा स्‍थानिक लोकजीवनातील सहभाग आणि महत्‍त्‍व विषद केले.

त्यानंतर व्‍यासपिठावर आलेल्‍या सुजाता रायकर यांनी उपस्थितांना 'थॅलिसिमिया' या आजाराची माहिती दिली. तो रक्‍ताचा विकार असून जन्‍मजात बालकांमध्‍ये आढळतो. कोणत्‍याही व्‍यक्‍तीला 'थॅलिसिमिया मायनर' असू शकतो आणि त्याचा त्‍याला काहीच त्रास होत नाही. मात्र दोन 'थॅलिसिमिया मायनर' व्‍यक्‍तींच्‍या संबंधातून जन्‍माला येणा-या बालकाला 'थॅलिसिमिया मेजर' हा रोग होतो. त्‍या आजाराची लागण झालेल्‍या बालकाला आयुष्‍यभर दर पंधरा दिवसांनी रक्‍त बदलावे लागते. तसेच दररोज रात्री झोपताना पोटात सुई खुपसून पंपाद्वारे शरिरात तयार होणारे अतिरीक्‍त लोह काढून बाहेर टाकावे लागते. त्‍या जोडीला इतर औषधोपचार असतोच. ती सारी प्रक्रिया किती त्रासाची आणि खर्चाची आहे ते रायकर यांनी काही उदाहरणांच्‍या साह्याने स्‍पष्‍ट केले. त्‍या आजारामुळे कुटुंबांवर त्‍याचा विपरीत परिणाम कसा होते हे त्‍यांच्‍या मुलाखतीतून उलगडत गेले. रायकर यांनी, तो आजार होऊ नये याकरता लग्‍न करण्‍याचा निर्णय घेतलेल्‍या व्‍यक्‍तींनी थॅलिसिमियाची चाचणी करणे अत्‍यावश्‍यक असल्‍याचे ठासून सांगितले. जगात एकट्या स्‍पेन या देशाने केवळ रक्‍त तपासणी अनिवार्य करत तो रोग हद्दपार केला असल्‍याचे त्‍या म्‍हणाल्‍या. रायकर यांनी या कामासाठी SAATH (साथ) नवाच्‍या ट्रस्‍टी स्‍थापना केली असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

किरण भिडे यांनी नाशिकचे शेतकरी विलास शिंदे यांच्‍याशी गप्‍पा मारल्‍या. त्यातून शिंदे यांचा 'कर्जात बुडालेला शेतकरी ते यशस्‍वी व्‍यावसायिक' असा प्रेरणादायी प्रवास उपस्थितांना उमगला. विलास शिंदे यांनी तीन हजार शेतक-यांच्‍या संघटनातून २००६ साली 'सह्याद्री फूड प्रोड्यूसर कंपनी'ची निर्मिती केली. ती द्राक्ष आणि भाजीपाला यांवर प्रक्रिया करत निर्यातीचा व्‍यवसाय करते. त्‍या कंपनीची वार्षिक उलाढाल दोनशे पंचवीस कोटी रुपयांची असून ती द्राक्ष निर्यातीच्‍या क्षेत्रात भारतात अग्रेसर असल्याचे शिंद यांनी सांगताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. मात्र शेती करण्‍यास सुरूवात केल्‍यानंतर कोणत्‍याही सामान्‍य शेतक-याप्रमाणे आपल्‍यालाही अडचणींचा सामना करावा लागला असल्‍याचे विलास शिंदे यांनी सांगितले. सुरूवातीच्‍या काळात शिंदे यांना झालेले सत्‍तर लाख रुपयांचे कर्ज, ते संकट मागे सारून पुढे वाटचाल करताना पुन्‍हा झालेला साडेसहा कोटी रुपयांचा तोटा आणि त्‍यानंतर शेतक-यांच्‍या संघटनातून निर्माण केलेली 'सह्याद्री...' कंपनी अशी त्‍यांची कहाणी उपस्थितांना मोहित करून गेली.

महाराष्‍ट्रातील प्रज्ञा आणि प्रतिभेला व्‍यासपीठ मिळवून देण्‍याच्‍या उद्देशाने सकारात्‍मक गोष्‍टींचे माहितीसंकलनाचे करणा-या 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलच्‍या सहाव्‍या वर्धापनदिनानिमित्‍त 'उत्‍सव चांगुलपणाचा' हा कार्यक्रम ठाण्‍यात सहयोग मंदिर येथे १९ मार्च २०१६ रोजी आयोजित करण्‍यात आला होता. वेबपोर्टलवर भेटणा-या नमुनेदार माणसांना प्रत्‍यक्ष कार्यक्रमातून लोकांपुढे आणण्‍याचा हा प्रयत्‍न असल्‍याचे कार्यक्रमाचे संयोजक महेश खरे यांनी सांगितले. तसेच, या कार्यक्रमात भेटलेल्या या वैशिष्‍ट्यपूर्ण व्‍यक्‍तींप्रमाणे तुमच्‍या परिसरात असलेल्‍या व्‍यक्‍तींची माहिती लिहून ती 'थिंक महाराष्‍ट्र'कडे पाठवावी असे आवाहन उपस्थितांना करण्‍यात आले. मुलाखतींपूर्वी 'थिंक महाराष्‍ट्र'ने डिसेंबर २०१४ मध्‍ये राबवलेल्‍या 'सोलापूर जिल्हा संस्‍कृतिवेध' या माहितीसंकलनाच्‍या मोहिमेसंदर्भातील माहितीपट पडद्यावर दाखवण्‍यात आला.

- आशुतोष गोडबोले

छायाचित्र - गंगाधर हळणकर

लेखी अभिप्राय

श्री उमेश मुंडल्‍ये, श्री विलास शिंदे ,सौ. सुजाता रायकर यांचे कार्य समाजापुढे आदर्श निर्माण करणारे आहे. त्यांना, त्यांच्या कार्याला सलाम!

महेंद्र भास्कर…22/03/2016

दैदिप्यमान कर्तृत्वाचा, त्यांच्या कार्याचा परिचय ही फार मोठी चळवळ आपण उभारलीत. महाराष्ट्राच्या भावी जडणघडणीत या कामाचं फार मोठं योगदान असणार आहे. आपल्‍या भावी रचनात्मक वाटचालीस शुभेच्छा. - कमलाकर सोनटक्के

कमलाकर सोनटक्के22/03/2016

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.