अळकुटी गावचा सरदार कदमबांडे यांचा वाडा


अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्‍यात अळकुटी गावी सरदार कदमबांडे पाटील यांचा ऐतिहासिक भुईकोट गढीचा वाडा उभा आहे. सरदार कृष्णाजी कदमबांडे व व्यंकोजी कदमबांडे हे शहाजीराजांच्या कारकिर्दीत निजामशाहीतील मातब्बर सरदार होते. ते दोघे निजामशाहीचा अस्त झाल्यावर मोगल सत्तेकडून अळकुटी गावी जहागीरदार म्हणून कारभार पाहू लागले. त्यांनी साधारणतः अठराव्‍या शतकात अळकुटी या गावी चार एकरांवर देखणा आणि मजबूत गढीचा वाडा बांधला.

त्या भुईकोटाचे प्रवेशद्वार भव्य असून ते पूर्वाभिमुख आहे. दरवाजाच्‍या कमानीवर कमळपुष्‍पे कोरलेली आहेत. दरवाजावर विटांनी केलेल्‍या बांधकामाची सुंदर दुमजली इमारत आहे. प्रवेशद्वाराला जोडून असलेली तटबंदीची भिंत तत्कालीन स्थापत्यशास्त्राचा उत्कृष्ट नमुना आहे. तिचा खालचा भाग मजबूत घडीव दगडांचा असून वरचा भाग उत्तम रेखीव विटांनी युक्त आहे. तटबंदी तीन मीटर रुंदीची असून त्यास चुन्याचा स्लॅब आहे. तटबंदीतील चारही बुरुज घडीव दगड व रेखीव वीटकामामुळे आजही नवीन बांधकामासारखे नजरेत भरतात. तटबंदी त्यावरून एखादे वाहन सहज जाऊ शकेल इतकी मजबूत आहे. तटबंदीत अनेक जंग्‍या (तटबंदीला असलेली छिद्रे. त्‍यातून बंदुकीने शत्रूंवर मारा करण्‍यात येत असे.) आजही सुस्थितीत असलेल्या पाहण्यास मिळतात.

वाड्याच्या भव्य दरवाजातून प्रवेश केल्यावर दोन्ही बाजूंस दोन प्रशस्त अशा ढेलजा आहेत. मुख्य दरवाजा मात्र आज दिसत नाही. प्रवेशद्वाराचे बांधकाम लाल रंगाच्या दगडांनी केल्यामुळे ते आकर्षक दिसते. प्रवेशद्वारावरील दोन्ही मजल्यांच्या खिडक्यांना मोगली पद्धतीच्या जाळ्या आहेत. प्रवेशद्वाराच्या भिंतीवर रूंडभिरूंड हे शिल्प असून; दुसरे, एक वाघ व त्याच्या पायात हत्ती असे चित्र कोरले आहे. आत प्रवेश केल्यावर चौसोपी वाड्याच्या भक्कम जोती दिसतात. समोरच्या जोत्यावर एक सोपा आजही तग धरून उभा आहे. त्याच्या तुळयांच्या बाहेरील भागावरील कलाकुसरीचे काम नजरेत भरते. कदमबांडे यांच्या वंशजांचे एक कुटुंब वाड्यात राहते. त्यांच्याकडून वाड्यातील नक्षीकाम असलेले खांब, सिंहासन, मोठमोठी दालने, भुयार अशा वाड्याच्या भुतकाळातील भव्यतेचे वर्णन ऐकण्यास मिळतात. मात्र वाड्याचे ते वैभव कालपरत्वे नष्ट झाले आहे. वाड्यात ३० x २० आकाराचे तळघर आहे. वाड्यास पाणीपुरवठ्यासाठी त्‍या काळी बांधलेली विहीर आजही उत्तम स्थितीत आहे.

जुन्या काळी नाणेघाट-जुन्नर-पैठण असा वाहतुकीचा मार्ग होता. अळकुटी हे त्या मार्गावरील गाव होते. त्या भागावर सातवाहन राजे राज्य करत होते. पैठण ही सातवहानांची राजधानी व जुन्नर ही उपराजधानी होती. इसवी सनाच्या दुस-या आणि तिस-या शतकात त्या भागात मोठा व्यापार चाले. अंबरिष ऋषींची तपोभूमी म्हणून त्या गावास पूर्वी ‘अमरापूर’ असे नाव होते. संत ज्ञानेश्वर व त्यांची भावंडे आळंदीस जाताना अमरापूर येथे थांबल्याचा उल्लेख आढळतो. शहाजीराजांच्या व छत्रपती शिवाजीराजांच्या कारकिर्दीत कदमबांडे हे मातब्बर सरदार होते. इंग्रजांनी त्या घराण्याचा उल्लेख स्वत:स राजे समजणारे, स्वतंत्र सिंहासन, स्वतंत्र ध्वज, घोडदळ, पायदळ बाळगणारे असा केला आहे. छत्रपती शाहुमहाराज औरंगजेबाच्या कैदेतून सुटल्यावर अमृतराव कदमबांडे यांना येऊन मिळाले. त्यानंतर अमृतराव व कांताजी यांनी गुजरात स्वारीतून प्रचंड धन प्राप्त केले. कांताजींच्या घोडदळात मल्हारराव होळकर होते. ते पुढे मोठे सरदार झाले. बाजीराव पेशव्यांच्या कारकिर्दीत कांताजीरावांनी गुजरात मोहिमेत पराक्रम गाजवला. त्यावेळी त्यांना धुळे, रनाळा, कोपर्ली, तोरखेळ हा भाग जहागिरी म्हणून मिळाला. शाहुराजांनी कांताजीपुत्र मल्हारराव यांच्यासोबत त्यांची कन्या गजराबाई हिचे लग्न लावून दिले आणि भोसले-कदमबांडे यांची सोयरीक झाली. त्यांनी अळकुटी येथील वाड्याच्या तळघरात त्र्यंबकेश्वराहून आणलेल्या शिवलिंगाची स्थापना केली. मल्हारराव तोरखेड येथे स्थायिक झाले.

रघोजीरावांचा दुसरा पुत्र कमळाजी हा मात्र अळकुटी येथे राहिला. त्याने खर्ड्याच्या लढाईत पराक्रम केला. त्याने इसवी सन १७५० मध्ये वाड्याजवळच सुंदर शिवमंदिर बांधले. ते आजही पाहता येते. मंदिरातील शिलालेख पुढीलप्रमाणे आहे –

“श्री सविचरणी दृढभाव कमळाजी
सुत रघोजी कदमराव
पाटील
मोकादम मौजे अमरापूर
ऊर्फ आवळकंठी
प्रगणे कर्डे सरकार जुन्नर
शके १६७२
श्री मुख नाम संवत्सरे
मार्गशीर्ष शुक्ल प्रतिपदा”

अळकुटी गावास उत्तर व दक्षिण भागात दोन वेशी असून त्याला जोडून पूर्वी तटबंदी व आठ बुरूज होते. मुक्ताई हे त्या गावचे ग्रामदैवत असून तेथे नवरात्रौत्सव साजरा केला जातो.

- डॉ. सदाशिव शिवदे
(सर्व छायाचित्रे - सदाशिव शिवदे)

Last Updated On - 11th March 2016

लेखी अभिप्राय

Very good information, interesting.

Samuel I. Kaley.11/03/2016

कंठाजी कदमबांडे असा उल्लेख मराठ्यांच्या इतिहासात आहे तेच कांताजी आहेत काय? शिलालेखातील परगणे कर्डे म्हणजे नेमके कोणते गाव आहे?

सुरेश विठ्ठल जगदाळे11/03/2016

किरण क्षीरसागर यांनी ग्रॅज्‍युएशननंतर पत्रकारितेचे शिक्षण घेतले. त्‍यानंतर वृत्‍तसंस्‍था, दैनिक 'मुंबई चौफेर' आणि आकाशवाणी अशा ठिकाणी कामांचा अनुभव घेतल्‍यानंतर 'थिंक महाराष्‍ट्र'सोबत 2010 साली जोडले गेले. त्‍यांनी चित्रपट निर्मितीचे शिक्षण घेतले असून त्‍यांचा 'डिपार्टमेन्‍ट', 'अब तक छप्‍पन - 2', 'अॅटॅकस् ऑफ 26/11', 'क्विन', 'पोस्‍टर बॉईज' अाणि 'शेण्टीमेन्टल' अशा व्‍यावसायिक चित्रपटांच्‍या संकलन प्रक्रियेत सहभाग होता. ते 'बुकशेल्फ' नावाचे पुस्तकांचा परिचय करून देणारे युट्यूब चॅनेल त्यांच्या सहकाऱ्यांसोबत चालवतात.

लेखकाचा दूरध्वनी

9029557767

सुरेश विठ्ठल जगदाळे, तुमच्‍या प्रश्‍नांसंदर्भात सदाशिव शिवदे यांनी उत्‍तरे दिली आहेत. कंठाजी कदमबांडे हेच कांताजी होय. शिलालेखात उल्‍लेखलेले कर्डे हे गाव शिरूळपासून चार किलोमीटर अंतरावर स्थित आहे.

किरण क्षीरसागर21/03/2016

अतिशय छान माहिती. सर्व सामान्य नागरीकांना सदरचा वाडा हा बघायला परवानगी आहे का?

भाग्येश वनारसे01/05/2016

अतिशय छान माहिती उपक्रम

डॉ प्रमोद भ पाटील29/07/2016

कंठाजी कदमबांडे यांचे बारगीर व सुभेदार मल्हारराव होलकर यांचे मामा तलोदा जहागिरदार श्री भोजराज बारगल यांची माहिती उपलब्ध करुन द्यावी
कथमबांडे यांचे बांडेनिशान पुढे नेण्याचे काम मल्हारराव होलकर यांनी केले आहे

रामभाऊ लांडे अ…23/12/2016

खान्देशात रनाळे,कोर्पली,तोरखेड येथील माहिती होती तसेच दक्षिणेतील मराठा सरदारांच्या कैफियती आणि ईनाम कमिशनयात हेघराणे मुळचे वडगाव येथील असल्याची माहिती होती पण आपणअधिक माहिती विस्तृत दिल्याबद्द्ल धन्यवाद

अमोल जगताप 31/05/2018

खूप छान माहिती आहे.फोटो पण खूप छान आहेत

अनंत ढवळे09/08/2018

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.