अनुराधा राव - संवेदनशील गाईड


मी अंदमानच्या रॉस आयलंड बेटावर फिरत असताना आमच्‍या टूरिस्ट कंपनीने एक गाईड बोलावली होती. तिचे नाव अनुराधा राव. तिला पाहिल्‍यानंतर प्रथम दर्शनी तिच्याविषयी कुतूहल वाटत नाही. तरी तिने दंडात घातलेल्या पितळी देवदेवतांच्या मूर्तीवरून ते रसायन वेगळे असल्याचे लक्षात आले.

अनुराधा राव ही बंगाली स्त्री. तिच्या चार पिढ्या अंदमान बेटावर नांदल्या. तिचे एकत्रित कुटुंब होते. ते आज राहिले नाही.

अनुराधा राव ही रॉस आयलंड बेटावरची खाजगी गाईड. मात्र ती कोरडी, तांत्रिक माहिती सांगत नाही. तिच्या बोलण्यात त्या बेटांचा इतिहास आणि भूगोल तर असतोच, पण त्याहून अधिक असते ती करुणा! ब्रिटीशांनी ते बेट ‘पॅरिस ऑफ द ईस्ट’ अशी उपमा देऊन विकसित केले. बेटावर चर्च होते. आयुक्तांचे निवासस्थान होते. सैनिकांची राहण्याची व्यवस्था होती. एक बेकरीही होती. रॉस आयलंड बेट म्हणजे ब्रिटीशांची श्रीमंती होती. अनुराधाच्या चार पिढ्या त्या बेटाशी संबंधित आहेत. त्‍यापैकी एका पिढीने दुसऱ्या महायुध्दात त्या बेटांना बसलेली झळ पाहिली. दुसऱ्या महायुद्धात जपानी फौजांनी केलेल्या बॉम्ब हल्ल्यात रॉस आयलंडबरोबरच तेथील सेल्युलर जेलचेही नुकसान केले. जेलच्या काही विंग कोसळल्या. काळ्यापाण्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या त्‍या जेलची अवस्था केविलवाणी करून झाली. बेटावर तीन वर्षे जपानचा ताबा होता. अनुराधा तोंडून बेटाचा इतिहास जिवंत होऊन वाहत असतो. त्‍या बेटांना 2004 साली त्सुनामीच्या लाटांनी तडाखा दिला. अनुराधा ती करुण कहाणी सांगते तेव्हा आपण एका गाईड ऐवजी एखाद्या साक्षीदाराची करुणेने भरलेली कैफीयत ऐकत आहोत असे वाटत राहते.

अनुराधा राव स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी म्हणते, ''ऐसा सच्चा देशभक्त न आज होगा, न कल होनेवाला है!'' ती पुढे सावरकरांनी भिंतीवर लिहिलेल्या ‘कमला’ या खंडकाव्याचा दाखलाही देते. तिचा कल्पनाविलास सेल्युलर जेलमधील छळ छावणीचे वर्णन करता करता बहराला येतो. सावरकरांनी कागद बनवण्यासाठी भाताच्या शितांनी भिंत सारवली. सावरकरांच्या कोठीसमोर एक बुलबुल येऊन सावरकरांना रिझवायची. तेव्हा सावरकर सारवलेल्या भिंतीवर पाणी शिंपडून भिंतीचे पोपडे (भाताचे कण) बुलबुल पुढे टाकत. तो कल्पनाविलास ऐकून नवल वाटत राहते.

अनुराधाचे रूप बावळे. तिच्या खांद्यावर एक पिशवी असते. पुरूषी मॅनेला, ढगळ पँट घातलेल्या अनुराधाच्या खिशात खारूताईचे पिल्लू असते. ती आता तेथील पक्ष्यांविषयी, प्राण्याविषयी, झाडाफुलांविषयी बोलू लागते. ती जपानच्या हल्ल्यात आणि त्सुनामीच्या तडाख्यात भग्न झालेल्या वास्तूविषयी माहिती देत राहते. ती एखाद्या झाडाखाली उभे राहून रॉस बेटावरील पक्ष्यांची ओळख करून देत असते आणि अचानक ती त्या पक्ष्यांशीच बोलू लागते. खांद्यावरच्या पिशवीतून ती बोलता बोलता ब्रेडचे तुकडे भिरकावते आणि बघता बघता त्या विशिष्ट पक्ष्यांचा किलबिलाट होतो. तिचा आवाज ऐकून मोरांचा थवाही तेथे येतो. ती त्यांनाही खायला देते. मग हळूच एक-दोन ससेही येतात. ती त्‍यांच्‍याशी सतत बोलत राहते. मी ‘मै तो ऐसीही बोलती रहती हू’ असे म्हणत असताना तिचा आवाज ऐकून दोन-चार हरणेही येतात. ती त्यांनाही खायला घालते. मग ती आपल्‍याला एक विस्तिर्ण झाडाजवळ घेऊन जाते. त्या पाचशे वर्षे जुन्या झाडाची माहिती देते. ती बुडाजवळ झाडांना आलेला वक्र दाखवते.

तो पाचशेबहात्तर बेटांचा समुह, पण त्यातील अनेक बेटे भुकंप, त्सुनामीने गिळंकृत केली आहेत. तेथील छत्तीस बेटांवर मानवी वस्ती आहे. पुढील पन्नास वर्षांत प्राकृतिक बदल होऊन मानवी वस्तीला त्याची झळ बसेल असे म्‍हटले जात आहे. मात्र अनुराधा राव त्‍या बेटांना घट्ट चिकटून आहे. ती नुसती बोलत राहते. तिला प्राण्यांचा स्वभाव, त्यांची दुखणी कळतात. आम्‍ही एका काळ्या सशासमोर बिस्कीट टाकल्यावर ती चटकन म्हणाली, ''त्याला असे खायला घालू नका. तो आजारी आहे. त्याला औषध चालू आहे.'' एका हरणाला खायला दिल्यावर ती खट्याळपणे म्हणते, ''त्याच्यापासून दूर राहा. तो बदमाश आहे.''

अनुराधा राव प्रायव्हेट गाईडचे काम करून उपजिविका चालवते. ती म्हणते, ''मला बॉयफ्रेंड नाही. हे बेट, त्यावरचे पशुपक्षी, झाडे, फुले हेच माझे सोयरे आहेत.'' ती तिला मिळालेल्या पैशांतून पशुपक्ष्यांसाठी मुक्त हस्ते उधळण करते. तिचा रिकाम्या वेळेत पशुपक्ष्यांशी संवाद चालू असतो. अनुराधा अतिशय संवेदनशील स्त्री आहे. रॉस बेटाची सफर करताना ती आम्‍हा पर्यटकांना उद्देशून म्हणाली, “माझे एक ऐकाल? तुम्ही गावाकडे गेल्यावर गावाजवळ असणारा वृद्धाश्रम काढून फेकून द्या. तुम्हाला दुनिया दाखवली ते आईबाप तुमचे ईश्वर आहेत. तुम्हाला प्रथम आईने जन्म दिला. देव दाखवला. धर्म शिकवला. त्या देवांना वृद्धाश्रमात ठेवणे पाप आहे. माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे, की तुम्ही तुमच्या आजूबाजूचे वृद्धाश्रम काढून फेका.” अनुराधाच्या आवाजातील कारूण्याने डोळे भरुन येतात.

अनुराधाला तिच्या लाघवी स्वभावामुळे, करूणमयी भाषेमुळे फॅनही भरपूर आहेत. कोणीतरी तिच्या नावे गुगलवर पेजही सुरू केले आहे. कोणी तिला त्यांच्याकडे येण्याचे निमंत्रणही पाठवतात. कोणी तिला खरोखर विमानाची तिकीटही पाठवतात. ती कशालाही दाद देत नाही. विमानाचे तिकीट रद्द करून ती पैसे परत पाठवून देते. आम्ही तिला भेटलो. तिला ऐकले आणि प्रेमातच पडलो. ती फक्त कोरडी तांत्रिक माहिती सांगणारी गाईड नाही. ती त्या बेटांशी, त्याच्‍या इतिहासाशी, तिथल्‍या निसर्गाशी, प्राणी आणि पक्ष्‍यांशी तादात्म्य पावलेली संवेदनशील गाईड आहे.

- शंकर बोऱ्हाडे

लेखी अभिप्राय

Sir, I salute you for your observation & humanity!

Prashant Ahire19/01/2016

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.