क्रीडामृग


‘मृग’ या शब्दाचा हरीण हा अर्थ सर्वांच्या परिचयाचा आहे. ‘हरीण’ या अर्थाने मृग शब्दापासून अनेक शब्द तयार झाले आहेत. जसे, सीतेला ज्या हरणाची भुरळ पडली, तो सुवर्ण वा कांचन-मृग, ज्याच्या नाभीत सुवासिक कस्तुरी असते, तो कस्तुरीमृग किंवा हरणासारखे डोळे असलेली ती मृगनयनी इत्यादी.

चंद्रावरील खड्ड्यांमध्ये काहीजणांना हरणाची आकृती दिसते. म्हणून चंद्राला ‘मृगधर’ असा संस्कृत शब्द आहे. पूर्वी ऋषीमुनी हरणाच्या कातड्यावर बसून ध्यानधारणा करत. त्या कातड्याला ‘मृगाजिन’ संबोधले जाई. तसेच, ते ऋषीमुनी रानावनांत कंदमुळे खाऊन जी दिनचर्या आचरत, तिला ‘मृगचर्या’ असे म्हटले जाई. असे अनेक शब्द मृग या शब्दापासून तयार झाले आहेत.

खरे म्हणजे संस्कृतमध्ये ‘मृग’ या शब्दाचा पशू किंवा श्वापद असा अर्थ आहे. तरी रुढार्थाने तृणभक्षी प्राण्यांना मृग म्हटले जाते. वाघ, सिंह यांसारखे मांसभक्षक प्राणी तृणभक्षी प्राण्यांची शिकार करून, त्यांना खातात. त्यावरून शिकारीला ‘मृगया’ असा संस्कृत शब्द आहे. तसेच, पशूंचा राजा या अर्थाने सिंहाला ‘मृगेंद्र’ असे म्हटले जाते. 

संस्कृतमध्ये वानरांना ‘शाखामृग’ असाही एक शब्द आहे. त्याचे सुरेख स्पष्टीकरण ज्येष्ठ निसर्गअभ्यासक मारुती चितमपल्ली यांनी दिले आहे. ते म्हणतात, ‘जंगलात वानरांची टोळी झाडांवरून उड्या मारत हिंडत असते. वानरे झाडांची फुले, फळे, कोवळी पाने खातात. पण खाण्यापेक्षा विध्वंसच जास्त करतात आणि फुले, फळे, पाने झाडांवरून खाली टाकतात. मात्र, ती वाया जात नाहीत. कारण हरणांना वानरांची ती सवय माहीत असते. त्यामुळे जेथे झाडांवर वानरांची टोळी असते, तेथेच खाली हरणांचा कळपही चरत असतो. झाडांच्या शेंड्यांवर बसलेल्या वानरांना दुरून येणारा वाघासारखा शिकारी प्राणी आधी दिसतो आणि ती ओरडून हरणांना सावध करतात. अशा तऱ्हेने वानरे आणि हरणे यांच्यात एक अनोखे सहजीवन आढळते. म्हणून वानरांना ‘शाखामृग’ असे म्हणतात.’

असाच अंती मृग असलेला दुसरा शब्द आहे क्रीडामृग. ज्ञानेश्वरीत अकराव्या अध्यायातील -

पढविले पाखरू ऐसे न बोले |
यापरी क्रीडामृगही तैसा न चले |
कैसे दैव एथे सुरवाडले |
तें जाणों न ये |

या ओवीत तो शब्द आढळतो. त्याचा अर्थ क्रीडेमध्ये म्हणजेच खेळांत प्रवीण असलेला पशू असा नसून करमणुकीसाठी पाळलेले वानर, हरीण, घोडा यांसारखे जनावर असा होतो. लग्नाच्या वरातीत शिकवलेला घोडा मालकाच्या इशाऱ्यावर नाच करताना दिसतो. सर्कसमधील  कुत्रा, माकड, घोडा, हत्ती यांसारखे शिकवलेले आणि प्रेक्षकांची करमणूक करणारे प्राणी क्रीडामृग या प्रकारात येतात. त्यावरूनच, दुसऱ्याच्या कह्यात वागणारा माणूस, ताटाखालचे मांजर, लाळघोट्या माणूस ह्या अर्थाने ‘क्रीडामृग’ शब्द वापरला जातो. अर्थात तो अर्थ अनेकांना माहीत नसतो. परंतु वरिष्ठांची हांजी हांजी करणाऱ्या किंवा राजकारण्यांच्या तालावर नाचणाऱ्या व्यक्तींचा ‘क्रीडामृग’ असा हेत्वाभासाने म्हणजेच सॉफिस्टिकेटेड भाषेत उल्लेख करण्यास काय हरकत आहे?

- डॉ. उमेश करंबेळकर

(राजहंस ग्रंथवेध ऑक्टोबर-नोव्हेंबर २०१५ वरून उद्धृत)

Last Updated On - 7th Jan 2017

लेखी अभिप्राय

Nice article.

sandhya joshi07/12/2015

शब्दव्युत्पत्ति समर्पक. लेख सुंदर. मृग नक्षत्र. ज्या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र मृगनक्षत्रात असतो, तो महिना मार्गशीर्ष!

भालचंद्र अवधूत नाईक.07/12/2015

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.