भुईंजकर जाधव – ऐतिहासिक घराणे


सिंदखेडकर लुकजी (लखोजी) जाधव यांच्या घराण्याचे वंशज पुणे-सातारा महामार्गावर कृष्णाकाठी वसलेल्या भुईंज या गावी राहतात. लुकजीराजे निजामशहाकडे पाच हजारी मनसबदार होते. त्यांच्या कर्तबगारीच्या जोरावर पुढे त्यांना दहा हजारी मनसबदारी, अठ्ठावीस महाल व बावन्न चावड्यांचे वतन मिळाले. त्यामुळे त्यांना निजामशाहीत मोठे महत्त्व प्राप्त झाले. अकबराने निजामशाहीवर आक्रमणे केली (१५९४ ते १६००), त्यावेळी चाँदबीबीने त्यास यशस्वी तोंड दिले, ते जाधवरावांच्या सहकार्यामुळेच. चाँदबीबीचा खून झाल्यावर, निजामशाही अस्तंगत होत असताना, ती वाचवण्यासाठी, मुर्तजा नावाच्या वारसास परिंडा येथे तख्तावर बसवण्याचा जो प्रयत्न झाला, त्यात जाधवरावांचा हात होता. निजामशाही वाचवण्याचा प्रयत्न करणा-या जाधवरावांची पुढे मुला-नातवांसह निजामशहाकडूनच हत्या झाली! त्यानंतर जाधव कुटुंबातील काहीजण स्थलांतरित झाले. त्यांतील खंडोजीराव हे पुत्र भुईंज येथे वास्तव्यास आले. जाधवांचे ते घराणे भुईंज येथे नांदत आहे.

जाधव घराण्‍याचे दोन वाडे भुईंज गावात होते. त्‍यापैकी एक वाडा पडला आहे. एक सुस्थितीतील चौसोपी आहे. त्‍या वाड्याचे दोन बुरुज दिसतात. वाड्यात जाण्यासाठी दोन बाजूंनी दहा-दहा रुंद पाय-या आहेत. वाड्याचा दरवाजा भक्कम स्थितीत आहे. आत शिरताच दोन प्रशस्त ‘ढेलजा’ दृष्टीस पडतात. जाधवरावांची कुटुंबे, वाटण्या झाल्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी राहतात. वाड्याचा दिवाणखाना उत्तम स्थितीत असून तेथे प्रशस्त देवघर आहे. देवघरातील मूर्ती सुंदर असून त्यातील गणपतीची मूर्ती विलोभनीय आहे. दिवाणखान्याच्या बाजूस असलेल्या प्रशस्त दालनात प्रभू रामचंद्रांच्या मूर्ती आहेत. ते दालन ‘राममंदिर’ असल्याचे मानले जाते. वाड्यात रामनवमीचा उत्सव साजरा केला जातो. पूर्वी, तो मोठ्या प्रमाणावर होत असे. कालपरत्वे त्याचे स्वरूप लहान होत चालले आहे. राममूर्तीसंबंधी आख्यायिका सांगितली जाते. ती अशी - एकदा एक घोडा गावात फिरत होता. त्या घोड्यास पकडून जाधवरावांच्या वाड्यावर आणले गेले. त्या घोड्याच्या गळ्यात वस्त्रात गुंडाळलेली प्रभू रामचंद्राची मूर्ती दिसून आली. त्या मूर्तीची प्रतिष्ठापना जाधवरावांनी त्यांच्या वाड्यात केली. जाधव घराण्‍याचे वारस त्यांच्याकडे ती मूर्ती ‘समर्थ रामदास स्वामींकडून आली’ असे सांगतात.

जाधव घराण्यातील रायाजीराव नावाचे पुरुष २५ फेब्रुवारी १७२८ रोजी पालखेडच्या लढाईत धारातीर्थी पडले. त्यांची छत्री (समाधी/घुमट) भुईंज गावात उभी आहे. दगडकाम भक्कम आहे. त्या समाधीवरील शिल्पांमुळे तिला विशेष सौंदर्य प्राप्त झाले आहे. ती शिल्पे म्हणजे शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना आहेत. समाधीच्या जोत्यावर चारही बाजूंस सिंहाच्या तोंडात हत्ती असल्याचे शिल्प आहे. ते शिल्प यादवकालीन शिल्पकलेत पाहण्यास मिळते, त्यामुळे ते घराणे सिंदखेडकर जाधवराव या घराण्यातील आहे हे सिद्ध होते.

त्यांच्याकडे महजराच्या नकलेशिवाय एकही कागद शिल्लक नाही. त्या महजरात जमिनीच्या वाटणीचा व्यवहार नमूद केला आहे. त्यावर अठरा लोकांच्या निशाण्या आहेत. त्यांत तीन शेट्टी यांच्या तराजूच्या, तर पंधरा पाटलांच्या नांगरांच्या निशाण्या आहेत. त्याशिवाय गुरव-मृदंग, कुंभार-चाक, चांभार-इंगो, माळी-खुरपे, मांग-चर्हाोट, न्हावी-आरसा, महार-विळा, दोरी, जंगम-घंटा, परीट-मोगरी, सोनार-सांडशी, तेली-घाणा, भोई-पालखी, तराळ-काठी, चौगुला-अधोली अशा निशाण्या आहेत.

त्या महजरात खंडो नारायण कुलकर्णी, बाबाजी बानाजी चौगुले, सुभानजी चौगुले यांची नावे आहेत. कसबे वाई, कसबे किकली, जांब, सुरुर, कवठे, केंजळ, कडेगाव, बावधन, ओझर्डे, गुळुंब, शेंदुरजणे इत्यादी ठिकाणच्या पाटलांच्या निशाण्या आहेत. महादजी गणेश, भागवत देशमुख, भगवंत सामराज, गिरजाजी सुंगो - देशकुलकर्णी, रामाजी अप्पाजी, जनार्दन - सुभेदार प्रांत वाई, राजाजी बाळाजी – सभासद प्रांत वाई हे प्रमुख अधिकारी असल्याचे त्या कागदपत्रांवरून समजते.

जाधवरावांच्या जहागिरीसंबंधीची आकडेवारी त्यांच्या घराण्यातील ब्रिटिश आमदानीतील एका कागदपत्रातून मिळते. त्यांना पंधरा लाखांपर्यंत जहागिरी होती.

जाधवराव घराण्याने वंशाच्या कर्तबगारीचा वारसा स्वातंत्र्योत्तर काळातही भुईंज येथे चालवला. तात्यासाहेब जाधवराव हे त्यांपैकी एक कर्तृत्ववान पुरुष होते. त्यांनी काही सार्वजनिक कामे केली. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विनंतीवरून रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक विद्यालयाच्या इमारतीसाठी त्यांनी व त्यांचे बंधू नानासाहेब ऊर्फ माधवराव व बाळासाहेब यांनी पाच एकर जमीन दिली. तात्यासाहेबांचे पुत्र विजयसिंह ऊर्फ बाबासाहेब हे भुईंज गावचे काही काळ सरपंच होते व किसनवीर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष होते. त्यांच्या पत्नीदेखील काही काळ भुईंज गावच्या सरपंच होत्या. नानासाहेब जाधवराव हे अश्वारोहणात प्रवीण होते. त्यांचे साता-याच्या राजघराण्याशी निकटवर्ती संबंध होते. त्यांना शिकारीचा छंद होता. त्यांनी वाघ, रानडुकरे यांच्या शिकारी केल्याची वर्णने मी स्वत: ऐकली आहेत.

त्या घराण्याचे सोयरसंबंध सातारकर छत्रपती, दत्तवाडीकर, राजेघोरपडे, म्हसवडकर राजेमाने, माहूरकर, सासवडकर, जाधव, राजेशिर्के, खानविलकर, बडोदेकर, गायकवाड इत्यादी राजघराण्यांशी आहेत.

– डॉ. सदाशिव शिवदे

(छायाचित्र - सदाशिव शिवदे)

लेखी अभिप्राय

मी परभणीला स्थायीक झालो माझी शेती वाकद परगण्यात लोणी बु|||येथे आहे.
मला खुप चांगली माहिती मिलाली धन्यवाद
डॉ गणेश दौलतराव देशमुख जाधव वाकद -लोणी ता.रीसोड जि.वाशिम

Dr Ganesh Deshmukh30/11/2017

आम्हाला अभिमान आहे आमच्या सुनबाई याच घराण्यातील आहेत.

Mrs Nimbalkar …25/12/2017

माहेगाव (माळेगाव)ता.कोपरगावयेथील राजे जाधवरावांची माहिती हवी आहे

अमोल जगताप 18/07/2018

मि माझा पुर्वाध शोधत आहे.

सुर्याजी जाधव पाटील15/12/2018

मला माझा पुर्वाध माहिती करून घेणे आहे

सुर्याजी जाधव पाटील15/12/2018

सुदर्शन जाधव मी सिंदखेड ता निलंगा जि. लातुर चा रहीवासी आहे छान माहिती धन्यवाद

सुदर्शन जाधव 12/01/2019

mala mazya garanyachai history Janun gyaychi aahe.
Pankaj Jadhav.
chalisgaon ( Pachora ) Dist.-Jalgaon.
Maharashtra.

Pankaj Jadhav.17/04/2019

पोतले गावच्या जाधव घराण्याची माहिती हावी आहे

गणेश अरुण जाधव26/04/2019

मी जाधवराव घराण्यातील वंशज आहे. मला माझ्या पिढीची वंशावळ जाणून घ्यायची आहे.

Suvarna Jadhavrao16/06/2019

मला माझ्या चिंचोली ता कंधार जि नांदेड पूर्वजांची माहिती मीळेल का?

Maheshwar jadh…10/12/2019

मी भुईंजच्या वाड्यात खूप वेळा गेलिये... माझी आत्त्या व तीचे कुटुंब त्या वाड्यात राहतात...तिथे असलेल्या मंदिराची पूजा आणि त्याचा ऊत्सव अत्त्यंत आनंदात तिथे साजरा करतात...ते जाधवराव घराण्याचे वंशज आहेत

Chitra konde17/12/2019

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.