प्रतीकदर्शन रांगोळी


रांगोळी हे शुभचिन्ह म्हणून भारतीय संस्कृतीचे आणि संस्कारांचे प्रतीक आहे. भारतात घरातील देवघरापुढे किंवा अंगणात छोटीशी का होईना रांगोळी रोज काढतात. दिवाळी ह्या सणाचे आणि रांगोळीचे नाते पुरातन आहे. दिवाळीत काढायच्या रांगोळीची मजा, हौस काही और असते.

ठिपक्यांच्या, गाठीच्या, वेलबुट्टीच्या, स्वस्तिक, ज्ञानकमळ अशा शुभचिन्हांच्या आणि अगदी अलिकडील काळातील ‘संस्कारभारती’च्या मुक्तशैलीच्या, असे रांगोळ्यांचे काही प्रकार प्रचलीत आहेत. शुभ, मंगलकारक शक्तींचे स्वागत करण्यासाठी घराच्या उंबरठ्यावर, घरासमोरील अंगणात, देवघरात आणि तुळशीवृंदावनासमोर रांगोळी काढून लक्ष्मीचे - शुभ शक्तीचे, मांगल्याचे - स्वागत करण्याची प्रथा भारतात पुरातन काळापासून चालत आली आहे. घरे बैठी व पुढेमागे मोकळी जागा असणारी होती तेव्हा घरातील स्त्रिया भल्या पहाटे घरासमोरील अंगण झाडून, शेणसडा टाकून त्यावर शुभ्र रांगोळी काढत असत. रांगोळी घालणा-या स्त्रीचे वर्णन कवी केशवसुत यांनी त्यांच्या सव्वाशे वर्षांपूर्वीच्या ‘रांगोळी घालताना पाहून’ ह्या कवितेत केले आहे. केशवसूत म्हणतात,

होते अंगण गोमयें सकलही संमार्जिले सुंदर
बालार्के आपली प्रभा वितरली नेत्रोत्सवा त्यावर

रांगोळी हा स्त्रियांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. ती तिच्या मनातील प्रेमभाव, वात्सल्य, ममता रांगोळीचे ठिपके जोडून, सुंदर नक्षी रेखून आणि विविध रंग भरून, साध्यासुध्या रांगोळीचा गालिचा विणते आणि तिच्याच कलाकृतीकडे पाहून आनंदून जाते, समाधान पावते. दारासमोर, देवघरात आणि तुळशीवृंदावनापुढे रेखलेली समाधानाची रांगोळी पाहून लक्ष्मीदेवता प्रसन्नतेने आणि आनंदाने त्या घरात प्रवेश करते ही त्यामागची भावना.

चैत्र महिन्यात काढले जाणारे चैत्रांगणही
तीच जी भगिनी अशी शुभमुखी दारी अहा पातली,
रांगोळी मग त्या स्थळी निजकरे घालावया लागली
आधी ते लिहिले तिने रविशशी, नक्षत्रमाला तदा,
मध्ये स्वस्तिक रेखिले, मग तिने आलेखिले गोष्पदां,
पद्मे, बिल्वदले, फुले, तुळसही, चक्रादिके आयुधें
देवांची लिहिली; न ते वगळिले जे चिन्हलोकींसुधें

जशी लोकगीते, लोककथा, लोकनाट्य, तशी रांगोळीसुद्धा लोकपंरपरेतून जन्माला आली. रांगोळीला संस्कृतमध्ये रंगवल्ली म्हणतात. विशिष्ट शुभ्र चूर्ण चिमटीतून जमिनीवर सोडून रेखाटलेल्या आकृतीला रांगोळी म्हणतात. रांगोळी काढणे ही एक कला आहे आणि तिचा उगम धर्माच्या अनुबंधानेच झाला आहे. माणसे रांगोळी केव्हापासून काढू लागली व रांगोळीची पहिली रेघ कोणी ओढली हे निश्चित सांगणे कठीण आहे. त्या बाबतीत एवढेच म्हणता येईल, रांगोळी ही मूर्तिकला आणि चित्रकला यांच्याही आधीची आहे.

कोठल्याही धार्मिक किंवा मांगलिक कृत्यात रांगोळी आवश्यक आणि प्राथमिक गोष्ट आहे. कोणताही सण, उत्सव, मंगल समारंभ, पूजा, व्रत इत्यादी शुभ प्रसंगी प्रथम धर्मकृत्याच्या जागी रांगोळी काढण्याची प्रथा आहे. एखाद्याला किंवा एखादीला ओवाळताना ती व्यक्ती बसलेल्या पाटाभोवती आणि पुढेही रांगोळी काढतात. समारंभाच्या भोजनप्रसंगीही पाटाभोवती व पानाभोवती रांगोळी काढतात. दिवाळीच्या सणात दारापुढे किंवा अंगणात विविध प्रकारच्या रांगोळ्या काढून त्या विविध रंगांनी भरतात. जुन्या काळी प्रत्येक घरी रोज दारापुढे सडासंमार्जन करून रांगोळी काढण्याची प्रथा होती. रांगोळी शिरगोळ्याच्या चूर्णाने काढतात. कोकणात भाताची फोलपटे जाळून त्याची पांढरी राखही रांगोळी म्हणून वापरतात. रांगोळीचे पीठ सामान्यपणे भरभरीत असते. त्यामुळे चिमटीतून ते सहजपणे सुटते. जमीन सारवल्यावर तिच्यावर रांगोळीच्या चार रेघा न विसरता ओढल्या जातात. रांगोळी न घातलेली सारवलेली जमीन अशुभ समजतात.

सौंदर्याचा साक्षात्कार व मंगलाची सिद्धी हे रांगोळीचे दोन उद्देश होत. रांगोळीत ज्या आकृत्या काढतात, त्या प्रतिकात्मक असतात. सरळ रेषेपेक्षा वक्र रेषा ही सौंदर्याची विशेष अनुभूती घडवते. अशा वक्ररेषा आणि बिंदू, त्रिकोण, चौकोन व वर्तुळ यांतून विविध प्रतिकात्मक आकृत्या निर्माण करता येतात. पाटाभोवती रांगोळीचा चौकोन काढला, तर त्याला समोरच्या रेषेवर एक त्रिकोण काढतात. चौकोनाची आडवी रेघ हा त्या त्रिकोणाचा पाया असतो. त्रिकोणाच्या शिरोभागी एक वर्तुळ काढतात. असे केल्याने त्या रेषेला मखराचे स्वरूप येते. चौकोनाचे कोपरे मोकळे ठेवण्याची चाल नाही. त्या कोपऱ्यांवर रांगोळीची एक चिमूट ओढून तेथे त्रिदळाची आकृती काढतात. हे त्रिदळ त्रिभुवन, तीन देव, तीन अवस्था आणि त्रिकाल यांचे म्हणजेच पर्यायाने त्रिधा विभक्त अशा विश्वतत्त्वाचे प्रतीक असते. शंख, स्वस्तिक, चंद्र, सूर्य ही आणखी प्रतिके होत. रांगोळीच्या दोन समांतर रेषांच्या मध्यभागी दोन वक्ररेषा एकमेकींवर चढवून एक साखळी आकाराला आणतात. ती साखळी म्हणजे नागयुग्माचे प्रतीक असते. कमळ हे लक्ष्मीचे व प्रजननशक्तीचे प्रतीक असून, वैष्णव उपासनेत त्याला विशेष महत्त्व आहे. त्याशिवाय एकलिंगतोभद्र, अष्टलिंगतोभद्र, सर्वतोभद्र अशाही रांगोळ्या धर्मकृत्यात काढल्या जातात. त्यात मोठ्या चौकोनातील बारीक चौकोन विशिष्ट पद्धतीने, कुंकवाने भरून त्यातून शिवलिंगाची आकृती निर्माण करायची असते. त्या रांगोळ्या शैव धर्माशी संबंधित आहेत. श्री. अ.दि. कोकड लिहितात – रांगोळ्यांत प्रतिकांचा प्रपंच फार मोठा आहे. सुरुवातीच्या रंगावलीरचना केवळ प्रतिकांच्या भोवतीच रेंगाळत राहिल्याचे दिसते. एके काळी प्रतिके हाच रांगोळ्यांचा मोठा आधार होता. प्रतिकांच्या रचना म्हणजे एक प्रकारची सांकेतिक भाषाच आहे. प्रत्येक प्रतिकात फार मोठा अर्थ भरलेला असतो. शिवाय प्रतिकांच्या त्या आकृत्या भावनेला आवाहन करणाऱ्या, तशाच कलात्मक व आकर्षक असतात.

त्याशिवाय ठिपक्यांवरची रांगोळी या नावाचा आणखी एक रांगोळीप्रकार रूढ आहे. प्रथम भूमीवर मोजून काही ठिपके देतात व ते उभ्या आडव्या रेषांनी जोडून त्यातून मोर, कासव, कमळ, वेल इत्यादी आकृती निर्माण करतात. ठिपक्यांची रांगोळी जटिल पण आकर्षक असते.

रांगोळी मुख्यत्वे स्त्रियाच काढतात. ती काढण्यासाठी त्यांना फूटपट्टी, दोरा, कुंचला इत्यादी कोणत्याही उपकरणाची आवश्यकता नसते. त्यांची बोटे मुक्तपणे फिरून विविध आकृत्या सहजपणे निर्माण करतात. रांगोळीतील प्रत्येक आकृतीचा प्रारंभ तिच्या केंद्रातून होत असतो.

रांगोळीचे आकृतिप्रधान व वल्लरीप्रधान असे मुख्य दोन भेद आहेत. आकृतिप्रधान रांगोळी राजस्थान, महाराष्ट्र, दक्षिण भारत, उत्तरप्रदेश या प्रदेशांत आढळते. तिच्यात रेखा, कोन आणि वर्तुळे ही प्रमाणबद्ध दिसतात. वल्लरीप्रधान रांगोळी भारताच्या पूर्व भागात आढळते. तिच्यात फूलपत्री, वृक्षवल्ली व पशुपक्षी यांना प्राधान्य असते. अशी रांगोळी काढण्यात बंगाली स्त्रिया सिद्धहस्त आहेत. ती रांगोळी आकृतिप्रधान रांगोळीपेक्षा अधिक मोहक वाटते. बंगालमधील अलिपना, राजस्थानातील मांडना, मध्यप्रदेशातील चौकपूरना, उत्तर प्रदेशातील सोनारख्खा , बिहारमधील अरीपण, ओडिशातील झुंटी, गुजरातमधील साथिया, आंध्र प्रदेशातील मुग्गू, तामिळनाडूमधील कोलम, कर्नाटकातील रंगोली व केरळमधील पूविडल हे सगळे रांगोळीचेच प्रकार होत.

चौसष्ट कलांमध्ये रांगोळी या कलेचा उल्लेख वात्सायनाच्या कामसूत्रात आढळतो. त्या काळी (इसवी सनाचे तिसरे शतक) धान्याचा उपयोग करून रांगोळी काढत. सरस्वतीच्या मंदिरात, तसेच कामदेव व शिवलिंग यांच्या पूजेसाठी विविधरंगी फुलांनीही आकृतिबंधात्मक रांगोळी काढत. ‘वरांगचरित’ (सातवे शतक) यांत पंचरंगी चूर्णे, धान्ये व फुले यांनी रांगोळीचे चित्रविचित्र आकृतिबंध तयार करत असल्याचे सांगितले आहे. ‘नलचंपू’मध्ये (दहावे शतक) उत्सवप्रसंगी घरापुढे रांगोळी काढत असल्याचा उल्लेख आहे. वादीभसिंहाच्या (अकरावे शतक) ‘गद्यचिंतामणी’ या ग्रंथात भोजनसमारंभात मंगलचूर्णरेखा काढत असा रांगोळीचा उल्लेख आहे. हेमचंद्राने (अकरावे-बारावे शतक) ‘देशीनाममाला’ या ग्रंथात तांदळाच्या पिठाने रांगोळी काढत असल्याचे सांगितले आहे. ‘मानसोल्लासा’त (बारावे शतक) ‘सोमेश्वरा’ने धुलिचित्र या नावाने व श्रीकुमार याने ‘शिल्परत्ना’त धुलिचित्र किंवा क्षणिकचित्र या नावाने रांगोळीचा निर्देश केला आहे.

भास्करभट्ट बोरीकराच्या ‘शिशुपालवध’ या काव्यात रांगोळीचा उल्लेख रांगवळी असा आहे. त्यापुढील मराठी वाङ्मयात रांगोळीचे अनेक ठिकाणी निर्देश झालेले आहेत. त्या सर्व संदर्भावरून रांगोळी ही कला सुमारे दोन हजार वर्षांपूर्वीपासून प्रचलित असल्याचे कळते.

हिंदू, जैन व पारशी या धर्मांत रांगोळी ही अशुभनिवारक व शुभप्रद मानलेली आहे. श्री. आनंदघनराम रांगोळीचे तात्त्विक रहस्य विशद करताना लिहितात – ‘जमिनीवर केरसुणी फिरवताना किंवा सारवताना जमिनीवर सूक्ष्म रेषा निर्माण होतात, त्यात एक प्रकारचे कंपन असते. त्या रेखा अनियमित असल्याकारणाने त्यांचे कंपनही अनियमित असते, म्हणून ते शरीराला, नेत्रांना व मनाला हानिकारक असते. हे अनिष्ट कंपन टाळण्यासाठी सारवलेल्या जमिनीवर कोन आणि शुभ चिन्हे व्यवस्थित रूपाने रांगोळीच्या माध्यमाने काढली, की झाडल्याचे व सारवल्याचे अशुभ परिणाम दूर होऊन शुभ परिणामांची प्राप्ती होते.’

रांगोळी ही गारगोटीच्या दगडांपासून बनवली जाते. गारगोटीच्या दगडांची सफेद, मऊमुलायम पावडर म्हणजे रांगोळी होय. काही ठिकाणी तांदुळाच्या पीठानेही रांगोळी काढली जाते.

आधुनिक काळात रांगोळीच्या सजावटीत पानाफुलांचाही समावेश केला जातो. रांगोळीच्या स्पर्धांमधून आणि प्रदर्शनांमधून देवदेवतांबरोबरच थोर आणि प्रसिद्ध व्यक्तींची हुबेहूब व्यक्तिचित्रे कौशल्याने रेखाटलेली पाहण्यास मिळू शकतात. अलिकडच्या काळात प्रसिद्ध पावलेली ‘संस्कारभारती’ची रांगोळी म्हणजे मुक्तशैलीतील चित्रकलेचा नमुना आहे. त्यातही देवदेवता, ओम, श्री, कमळ, कलश, गोपद्म अशा शुभ प्रतिकांचा समावेश करून सुंदर रांगोळी रेखाटली जाते. रांगोळी ह्या कलेस प्रेरणा देण्याचे आणि भारतीय सांस्कृतिकपरंपरा नव्याने पुनरुज्जीवित करण्याचे काम ‘संस्कारभारती’ने केले आहे. रांगोळी ही केवळ स्त्रियांची मक्तेदारी नाही तर पुरुषवर्गही तेवढ्याच हिरीरीने आणि कौशल्याने रांगोळी काढताना पाहण्यास मिळतो.

शहरातील ब्लॉक संस्कृतीमुळे अंगण ही संकल्पना लोप पावली आहे. रांगोळी काढण्यास उंबरठा नाही, अंगण नाही की अंगणातील तुळशीवृंदावनही नाही. तरीसुद्धा भारतीय माणूस सणावारांच्या, शुभकार्याच्या निमित्ताने उपलब्ध असलेल्या जागेत छान रांगोळी रेखून, हौस भागवून, पावित्र्य आणि शुभसूचकता निर्माण करतो.

- प्रज्ञा कुलकर्णी
९९२०५१३८६६

(आधार - भारतीय संस्कृतिकोश – खंड सातवा)

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.