अभ्यंगस्नान


अंगाला तेल, उटणे व अत्तर लावून उष्णोदकाने (गरम पाण्याने) स्नान करणे याला अभ्यंगस्नान करणे म्हणतात. त्याला मांगलिकस्नान असेही नाव आहे. ती चाल प्राचीन काळापासून भारतात आणि आणि इतरही देशांत आहे. आयुर्वेदात अभ्‍यंगाला महत्त्वाचे स्‍थान आहे. दिवाळीतील नरक चतुर्दशी दिवशी अभ्‍यंगस्‍नान करण्‍याची परंपरा आहे. दिवाळीच्‍या सुमारास भारतात थंडी सुरू होते. त्‍या काळात त्वचेची विशेष काळजी घेणे आवश्‍यक ठरते. त्‍याकरता अभ्‍यंगस्‍नानाचा आणि त्‍यात वापरल्‍या जाणा-या उटण्‍याचा फायदा होतो.

पूर्वी घराघरातील स्त्रिया अभ्‍यंगस्‍नानाची तयारी करत असत. त्‍या शिकेकाई, रिठा, कडुनिंब यांसारख्या औषधी वनस्पती तांब्याच्या भांड्यात ठेवलेल्‍या पाण्यात घालून ते पाणी चूलीवर किंवा बंबामध्‍ये उकळून घेत. ते पाणी केस धुण्यासाठी वापरले जात असे. अंघोळीपूर्वी स्त्रिया घरातील पुरुषांना आणि मुलांना तेलाने मालीश करत. ते तेल प्रामुख्याने जाईच्या सुवासिक फुलांचे असे. जाईचे फुल सात्विक मानले जाते. राधाकृष्णासाठी जाईजुईच्या फुलांची, तुळशीची आरास करायची असा उल्लेख लोककथा आणि गीतांमध्ये आहे. मालीश केल्‍यानंतर बेसन, हळद, चंदन, गुलाबपाणी यापासून तयार केलेले सुगंधी उटणे अंगाला लावले जाई. आजच्या काळात जसे स्क्रब वापरले जाते, तसे उटणे हे निसर्गातील वस्‍तूंपासून तयार केलेले स्‍क्रब म्‍हणता येईल. उटण्याच्या वापरामुळे मृत त्वचा नष्ट होऊन त्वचेची रंध्रे मोकळी होतात. त्वचा कोमल आणि सुगंधी होते. काही घरांत उटणे तयार करताना कापूर, साय आणि संत्र्याची सालही वापरली जाते. आता घराघरातून उटणे तयार करण्‍याची प्रथा फार कमी ठिकाणी पाळली जाते.

अभ्यंगस्नान घालताना व्यक्तीला कुंकवाचा टिळा लावण्यात येतो. त्‍यानंतर तिच्या शरिराला खालच्‍या भागाकडून वरच्‍या भागाकडे, अशा त-हेने तेल लावण्यात येते. त्यामुळे तेल अंगात मुरते. त्‍वचेचा रखरखीतपणा दूर होतो. तेल मुरल्‍यानंतर अंदाजे वीस ते तीस मिनीटांनंतर अंघोळ केली जाते. त्‍यावेळी शरिरास उटणे लावून ते त्‍वचेवर चोळले जाते. त्यानंतर त्‍या व्‍यक्‍तीने दोन तांबे उष्ण पाणी अंगावर घेतल्यावर तिच्यावरून आघाडा किंवा टाकळा या झाडाची फांदी मंत्र म्हणत तीनदा फिरवली जाते. अंघोळीनंतर त्‍या व्‍यक्‍तीला ओवाळण्‍याची प्रथा आहे. स्‍नानंतर हाताला अत्तर लावणे हा अभ्‍यंगस्‍नानाचाच भाग समजला जातो.

माणूस ऐहिक सुखोपभोगासाठी तेले व सुगंधी द्रव्ये वापरू लागल्यावर अभ्यंगस्नानाचा विधी रूढ झाला. शरीराचे स्नायू बलवान व्हावे व बल, पुष्टी आणि कांती वाढावी या उद्देशाने अभ्यंगस्नान करण्याची पद्धत निर्माण झाली. आरोग्यवृद्धी हा त्याचा पहिला उद्देश होता. पुढे पुढे या प्रकाराला धार्मिक स्वरूप आले. या कामी तीळ किंवा खोबरे यांचे तेल व तूप वापरतात. त्यात चंदन, गुलाब, मोगरा वगैरे फुलांची अत्तरे मिसळतात. तेलात हळदही टाकतात. लग्नाच्या आधी वधु-वरांना हळद लावतात, तोही अभ्यंगाचाच प्रकार आहे. मंगलकार्याच्या प्रारंभी यजमान दंपतीने अभ्यंगस्नान करावे असा विधी आहे. महापूजेत देवालाही अभ्यंगस्नान घालतात.

बळी देण्याच्या पूर्वी पशूच्या अंगाला अभ्यंग करण्याची प्रथा सर्व मागासलेल्या जातींत आहे. मृताच्या शरीरालाही तेल, तूप, हळद लावून स्नान घालतात. विशिष्ट प्रसंगी वेदी, देवळे, धार्मिक उपकरणे, शस्त्रे, यंत्रे, वाहने यांनाही तेल लावण्याची प्रथा आहे. राज्याभिषेक, राजसूय, अश्वमेध इत्यादी प्रसंगी अभ्यंगस्नानाला विशेष प्राधान्य असून, त्याला अठरा द्रव्यांची आवश्यकता असते. ज्यू लोकांत राजे आणि धर्माधिकारी यांना अधिकारासंबंधी अभिषेक करण्याच्या प्रसंगी तेल लावत. ख्रिस्ताचे मसीह असे जे नाव आहे, त्याचा अर्थ तैलाभिषिक्त असाच आहे. रोमन कॅथॉलिकांच्या मंदिरांतून विशेष प्रसंगी अभ्यंगविधी होत असतो. हिंदूंतही वर्षप्रतिपदा, दिवाळी इत्यादी सणावारी अभ्यंगस्नान करण्याची चाल आहे.

आजारीपणात, आशौचकालात, स्त्रियांच्या मासिक रजोदर्शनात, उपवासाच्या दिवशी, विद्यार्थीदशेत अभ्यंग करू नये असे सांगितले आहे. संन्यासी व बैरागी यांनाही अभ्यंग निषिद्ध आहे.

- आशुतोष गोडबोले

(आधार - भारतीय संस्कृतिकोश)

लेखी अभिप्राय

खूपच छान माहिती... शेअर करण्यासाठी आभारी आहे.

स्मिता पवार08/11/2015

Nice website

Namdev Telore17/10/2017

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.