महाराष्ट्र धर्म म्हणजे काय?

प्रतिनिधी 21/10/2015

महाराष्ट्र राज्याची स्थापना १ मे १९६० रोजी झाली. महाराष्ट्र हे नाव त्या राज्यास कसे प्राप्त झाले? महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या अगोदर त्या प्रदेशाची स्थिती काय होती? तेथे कोण लोक राहत होते? त्यांचा महाराष्ट्राच्या जडणघडणीत वाटा किती होता? महाराष्ट्र धर्म म्हणजे काय? मराठा या शब्दाचा अर्थ काय? अशा प्रश्नांचा मागोवा घेताना अनेक जनजाती; तसेच, त्यांचे मूळ स्थान आणि त्यांचे या प्रदेशात आगमन कधी झाले याबाबतचा संदर्भ लागतो.

महाराष्ट्राचे आद्य रहिवासी भिल्ल, कातवडी (कृत्तिपट्टिन), वारली (वारुडकी), कोळी (कोल) यांची मूळ भाषा कोणती? ते जी भाषा बोलतात त्यामध्ये जुने गावंढळ शब्द (म्हणजे देशी शब्द, ज्यांचे मूळ संस्कृतात सापडत नाही) आहेत. ते शब्द, प्राकृत शब्द आणि जुनी मराठी भाषा यांच्या सरमिसळीतून मराठी भाषा उदयास आली का? महाराष्ट्र प्रदेशात भिल्ल, वारली, ठाकरी, कातकरी, कोळी, मांगेली, कुणबी, पातेणी, चित्पावनी, कऱ्हाडी, सारस्वती, गोमांतकी, मिरजी, पंढरपुरी, नांदेडी, लाडी इत्यादी प्रांतिक आणि जातिक महाराष्ट्रीय भाषांचे लहान लहान पुंज वसाहत करून होते. सुमारे दोन-अडीच हजार वर्षांपूर्वीपासून म्हणजे पाणिनीकाळाच्या नंतर महाराष्ट्री भाषेचे (मराठी भाषेच्या जवळ जाणारी भाषा) छोटे छोटे पुंज महाराष्ट्रात वसाहती करून स्थिर झाले. उदाहरणार्थ - नागपुरी, वऱ्हाडी, खानदेशी, पैठणी, नाशिकी, पुणेरी, जुन्नरी, कोल्हापुरी, मावळी अशा मराठीसदृश थोड्याफार भिन्न प्रांतिक भाषा बोलणारे पुंज महाराष्ट्रात होते. मराठीसदृश बोली बोलणाऱ्या त्या पुंज्यांच्या व्यावहारिक भाषेचा संकर होऊन प्रातिनिधीक भाषा उदयास आली. शालिवाहनाच्या पाचव्या शतकाच्या सुमारास महाराष्ट्रिक आणि नाग संस्कृती यांच्या मिश्रणातून बनलेल्या मराठ्यांच्या भाषेस मराठी असे नाव पडले. त्या भाषेचा उत्कर्ष हळुहळू होत गेला आणि तिची राजकीय, व्यापारी, धार्मिक, वांङ्म यीन प्रगती होऊन प्रगल्भ मराठी भाषा उदयास आली. म्हणजे मराठी भाषेचा उगम होण्याअगोदर महाराष्ट्रातील छोटे छोटे पुंज कोणती भाषा बोलत होते? त्यांची भाषा लोप पावून मराठीचा जन्म झाला का? किंवा त्या सर्व घटक भाषांच्या सरमिसळीतून मराठी भाषेचा उगम झाला? याचा इतिहास अस्तित्वात नाही. परंतु महाराष्ट्रातील वारली जे डोंगरकपारीत राहतात, जे स्वत:मध्ये सहसा बदल घडवून आणण्यास तयार नाहीत, त्यांची पुरातन भाषा मराठीच्या जवळपास जाणारी होती आणि ते चांगले मराठी बोलतात. त्यांची मूळ भाषा कोणती? ती लोप पावली का? किंवा वारली भाषेत जे जुने मराठी शब्द येतात त्यावरून त्यांनी मराठी भाषा कशी आत्मसात केली? याचा माग लागत नाही. अर्वाचीन महाराष्ट्रात राहणाऱ्या त्या पुंजांची भाषा आणि आधुनिक मराठी भाषा; तसेच, प्राचीन महाराष्ट्रीय संस्कृती यांचा सुंदर मेळ म्हणजे महाराष्ट्र धर्म होय ! शिवरायांनी त्यांचे राज्य स्थापन करताना ज्यांनी त्यांचे सर्वस्व पणाला लावले त्या मावळ्यांमध्ये दऱ्याखोऱ्यात राहणारे ज्यांना रट्ट अथवा मरहट्ट असे संबोधले जायचे, असे काटक, कणखर मनाचे वीरही होते. यवनांचे अन्याय, अत्याचार यांविरुद्ध बंड करून उठलेला तो मर्द मराठा एका संकुचित जातीचा नव्हता तर तो दऱ्याखोऱ्यात राहणारा महाराष्ट्राचा सुपुत्र होता. महाराष्ट्रिकांनी वसवलेला देश तो महाराष्ट्र. महाराष्ट्र या शब्दाचा अपभ्रंश माराष्ट्र. माराष्ट्र म्हणजे मराठा. मराठा शब्दाचे दोन अर्थ त्याकाळी प्रचलित होते. एक म्हणजे शिवरायांच्या काळात जे क्षत्रिय कूळ होते (भोसले, चव्हाण, जाधव) त्यांना मराठा ही संज्ञा प्राप्त झाली. त्याअगोदर त्यांना महाराष्ट्रिक अशी प्राचीन संज्ञा होती. दुसऱ्या अर्थाने त्याकाळी ब्राह्मणांपासून अंत्यजांपर्यंत जेवढ्या म्हणून महाराष्ट्रातील जाती होत्या त्यांना माराष्ट्र ऊर्फ मराठी ही व्यापक संज्ञा लावण्याचा प्रघात पडला. रामदास स्वामींनी ‘मराठा तितुका मेळवावा’ असा संदेश शिवरायांना दिला. त्या संदेशात व्यापक अर्थ आहे. त्यातील मराठा हा शब्द व्यापक अर्थाने योजला आहे. मराठा हा शब्द जातिवाचक नसून तो महाराष्ट्रातील समस्त जनतेला उद्देशून समर्थांनी वापरला आहे.

महाराष्ट्र धर्म या शब्दाचा अर्थही व्यापक आहे. भिन्न भाषा, भिन्न वर्ण, भिन्न गोत्र, भिन्न कर्म, भिन्न आचार, भिन्न पेहराव, भिन्न भूषणे ही महाराष्ट्राची ओळख असतानाही महाराष्ट्रातील जनतेचा धर्म एकच होता. परकियांच्या आक्रमणास सामोरे जाण्यासाठी उत्तर कोकणातील अथवा हिंदुस्थानातील लोकांनी एक व्हावे. त्यांच्या जाती कुरवाळत बसू नये असे वाटून शके १३७० साली महिकावतीची बखर लिहिणाऱ्या केशवाचार्य आणि नायकोजीराव या उद्धारकांनी माल्हजापुरात महाराष्ट्रातील समस्त जनतेला एकत्र आणले. त्यामागे त्यांचा हेतू परकियांना हाकून देणे हा नव्हता तर महाराष्ट्र धर्म म्हणजे काय याची जाणीव लोकांना करून देणे हा होता. कारण त्या काळी अस्तित्वात असलेल्या हिंदूंच्या वंशभेद, जातिभेद, हिंदू-अहिंदू भेद अशा तुटक वागण्यामुळे परकियांच्या घुसखोरीला आयतीच संधी मिळत होती. राजकारण आणि समाजकारण यांपासून दूर गेलेल्या त्या सर्व महाराष्ट्रीय समाजाला एकत्र आणण्यासाठी केशवाचार्यांनी महाराष्ट्र धर्माचा अर्थ जनतेला सांगितला. देशधर्म-कुलधर्म-वंशधर्म आणि देवधर्म हे सर्व धर्म मिळून महाराष्ट्र धर्म होतो असे त्यांचे म्हणणे होते. महाराष्ट्रातील सर्व कुळांमध्ये त्यांचे कुटुंब आणि त्यांचा धंदा या पलीकडे पाहण्याबाबत जी उदासीनता होती ती दूर करण्याचे काम केशवाचार्यांनी केले. त्यांनी धाडसी पूर्वज, उच्च आचारविचार, उज्ज्वल पूर्वपीठिका सांगून सद्यस्थिती कशी शोचनीय झाली आहे, त्यासाठी काय केले पाहिजे याचा वृत्तांत लिहिला. त्यांच्या नकला काढून त्या त्यांनी जनतेला फुकट वाटल्या. परंतु त्याचा काडीमात्र परिणाम महाराष्ट्रीयांवर झाला नाही. त्यांच्या उदासीनतेचा फायदा उठवून परकियांनी राज्य केले. मुसलमानी राजवट जाऊन पोर्तुगीज महाराष्ट्रात आले तरीही महाराष्ट्र सुखासीन झोपलेला होता. त्याला अपवाद ठरले चिमाजी अप्पा. त्यांनी पोर्तुगीजांचे राज्य उलथवले आणि तेथील शोषित जनतेला दिलासा देण्याचे कार्य केले.

केशवाचार्य आणि नायकोजीराव यांच्या काळात परिस्थिती वेगळी होती. सर्वसामान्य जनता त्या काळात राज्य करणाऱ्या सर्वांना फुकट खाणाऱ्या उपटसुंभांची टोळी असे समजत होती. सर्व राज्यकर्त्यांवर त्यांचा रोष होता. त्यामुळे ते सर्वांना परकीय समजत होते. महाराष्ट्रात राहणारा आणि मेहनत करून खाणारा तो महाराष्ट्रिक. आणि महाराष्ट्रिकांचा देश तो महाराष्ट्र असे त्यांचे म्हणणे होते. त्यात महाराष्ट्रातील सारी कुळे - उदाहरणार्थ, देसले, म्हात्रे, नायक, राऊत, माच्छी, वैती, कोळी, माळी, मांगेली, आगरी, चौधरी, पाटील, ठाकूर, दरणे हे आणि व्यवसायाने शेतकरी, बुरुड, चर्मकार, सुतार, मच्छिमार हे सर्व महाराष्ट्रीय ऊर्फ मराठा या संज्ञेत मोडत होते. त्यांपैकी भोसले, जाधव, चव्हाण या क्षत्रियांनी महाराष्ट्रावर राज्य केले. इतर जातींनी काही अपवाद वगळता राजकारणापासून फारकत घेतली ती आजतागायत. अलिकडच्या काळात काही राजकीय पक्ष अस्तित्वात आले आणि त्या पक्षांनी दलितांना व इतरेजनांना राजकारणात येण्याची संधी दिली. त्या सकलजनांच्या मदतीने त्यांनी सत्ताही काबीज केली, परंतु ती फार काळ टिकली नाही. त्याच काळात राजकीय घराणेशाही म्हणजे राजकारणाची सूत्रे त्यांच्याचकडे राहवी म्हणून अस्तित्वात आली. एकाच कुटुंबातील अनेकजण राजकीय वारसदार म्हणून पुढे आले आणि त्यांनी सहकार, शिक्षण व उद्योग यांक्षेत्रात त्यांची त्यांची मक्तेदारी स्थापन केली. खरे म्हणजे शिक्षणाच्या माध्यमातून सामान्य जनतेचा विकास आणि सहकार क्षेत्राच्या माध्यमातून लोकसंग्रह हा जो मूळ हेतू होता त्यालाच बगल देऊन सहकार आणि शिक्षणक्षेत्र याचा एक बाजारपेठ म्हणून वापर करण्यात आला. त्यामुळे पूर्वीचे सकलजन संवर्धक असे राजकारण होते ते लोप पावून राजकारणाचे बाजारीकरण झाले. लोकशाहीत निवडणुका लढवून, सत्ता काबीज करणे आणि ती स्वहितासाठी राबवणे असे एक सोपे समीकरण अस्तित्वात आले आहे. निवडणूक जिंकण्यासाठी विविध तंत्रे आणि बेसुमार पैसा यांचा वापर होऊ लागला. हवालदिल झालेली जनता त्यामुळे भरडली जात आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात सामान्य जनांची होणारी फरफट केविलवाणी आहे. त्यांना हवा आहे जाणता राजा. शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा, गरिबांचा कैवार घेणारा राजा. महाराष्ट्र धर्म जाणणारा, सकलजनांचा कैवारी असा लोकांचा राजा.

१ मे १९६० या दिवशी कै. यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राच्या मंगलकलशाची स्थापना केली. तो मंगलकलश महाराष्ट्रात वसलेल्या समस्त कुळांचा आहे. सर्वांचा त्यावर सारखा हक्क आहे. जरी त्या कुळांना राजकारणात रस नसला तरी त्यांना सुखाने जगण्याचा हक्क आहे हे नाकारून चालणार नाही. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी नेतृत्व स्वीकारलेला महाराष्ट्र हा सकलजनांचा होता. तो केवळ मराठा या जातीभोवती रेंगाळणारा नाही. बहुजन समाज समावेशक होता. परंतु प्रत्यक्षात मात्र महाराष्ट्रातील राजकारण हे मराठ्यांभोवती फिरू लागले. मराठ्यांमध्ये घराणेशाही निर्माण झाली. त्या घराण्यांव्यतिरिक्त इतरांना राजकारणात सहजी प्रवेश मिळेनासा झाला. ऐंशीनंतर मराठा या नावाभोवती वलय निर्माण होऊन राजकारणात मराठा नेतृत्वावर अन्याय, मराठा आरक्षण, जेम्स लेन प्रकरण अशा अनेक प्रकरणांमुळे ‘जात अस्मिता’ उदयास आली. ज्या मराठा शब्दाभोवती राजकारण फिरत आहे त्या मराठा शब्दाचा खरा अर्थ काय याचा मागोवा घेण्याची वेळ आली आहे. मराठा म्हणजे माराष्ट्र म्हणजे महाराष्ट्रीय हा सर्वसमावेशक अर्थ ज्या शब्दात सामावलेला आहे तो शब्द म्हणजे महाराष्ट्र धर्म होय. हा सकलजनवाद महाराष्ट्रातील समस्त जनांना कळावा !

- चंद्रकांत मेहेर

9820878857

(जनपरिवार, दिवाळी विशेषांक २०१४वरून उद्धृत)

लेखी अभिप्राय

Nice

ganesh tawde21/10/2015

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.