काकतालीय न्याय


केवळ योगायोगाने म्हणजे यदृच्छेने एखादी गोष्ट घडते, तेव्हा कावळा बसायला आणि फांदी तुटायला एक गाठ पडली, असे म्हटले जाते. कावळ्याच्या भाराने फांदी तुटत नाही, केवळ योगायोगाने तसे घडलेले असते. त्यावरूनच तो वाक्प्रचार रूढ झाला. संस्कृतमध्ये त्याला काकतालीय न्याय असे म्हणतात.

काक म्हणजे कावळा तर ताल म्हणजे ताड वृक्ष. ताल याचा फांदी असा अर्थ शब्दकोशात नाही. त्यामुळे काकतालीय न्यायाचा योग्य अर्थ कावळा बसायला आणि ताल वृक्ष कोसळायला एक वेळ येणे असा म्हणायला हवा. मात्र मराठीत ताडाऐवजी फांदी असा शब्दभेद झाला.

ताल या संस्कृत शब्दाचे टाळी, तळहात, तसेच ताल (ठेका) असेही अर्थ कोशात दिले आहेत. त्यामुळे काकतालीय न्यायाचा टाळी वाजवावी आणि त्यात कावळा सापडावा असाही अर्थ होऊ शकतो. तशा अर्थाचा वापर ज्ञानेश्वरांनी केला आहे. ज्ञानेश्वरीतील सतराव्या अध्यायातील

‘विपाये घुणाक्षर पडे । टाळियां काऊळा सापडे ।
तैसा तामसा पर्व जोडे । तीर्थ देशी ॥17.301’

ह्या ओवीत तो आढळतो.

त्या ओवीचा अर्थ मामासाहेब दांडेकर असा देतात, की ‘घुणा नावाच्या किड्याकडून लाकूड कोरताना नकळत अक्षरे कोरली जावीत अथवा टाळी वाजवताना तीमध्ये जसा क्वचित कावळा सापडावा, त्याप्रमाणे तमोगुण्याला पुण्यस्थळी पर्वकाळाची संधी क्वचित प्राप्त व्हावी.’

ती ओवी तामस दानासंदर्भात आहे. ओवीच्या पहिल्या आणि दुसऱ्या चरणात घुणाक्षर आणि काकतालीय असे दोन्ही एकाच अर्थाचे न्याय दृष्टांत म्हणून दिले आहेत. दोन्हींचा अर्थ यदृच्छेने म्हणजेच योगायोगाने एखादी गोष्ट घडणे असा आहे. पैकी घुणाक्षर न्यायाचा उल्लेख स्पष्ट आहे, तर दुसरा ज्ञानेश्वरांनी वेगळ्या अर्थाने वापरलेला काकतालीय न्यायच आहे. ज्ञानेश्वरांनी हा वेगळा अर्थ योजण्यामागे त्यांचा काहीतरी हेतू असावा असे मला वाटते. ज्ञानेश्वरांनी केलेली योजना अधिक अर्थपूर्ण आहे. ताल म्हणजे ठेका. संगीतात सुरांइतकेच तालालाही महत्त्व असते. आरतीसार या गायनातदेखील टाळी वाजवून ठेका धरला जातो. लेखन आणि संगीत ही दोन मानवाची अनन्यसाधारण वैशिष्ट्ये आहेत. मानवाशिवाय इतर कोणताही प्राणी लेखन आणि संगीत निर्माण करू शकत नाही. त्या ओवीत तामसदानाचे वर्णन आहे. दान हादेखील मानवी गुणधर्म आहे. त्यामुळे त्यासंबंधीचे दृष्टांतदेखील मानवी जीवनाशी संबंधित असले पाहिजेत. कावळा बसला आणि फांदी तुटली काय किंवा ताड वृक्ष कोसळला काय, माणसाच्या जीवनात काय फरक पडतो? त्या उलट सहज टाळी वाजवावी आणि त्यात कावळ्यासारखा चाणाक्ष पक्षी सापडावा, ही माणसाच्या दृष्टीने योगायोगाने घडणारी गोष्ट ठरते. म्हणूनच, काकतालीय न्यायाचा ज्ञानदेवांचा अर्थ हा अधिक सूचक वाटतो. ज्ञानदेवांची अलौकिक प्रतिभा अशीच ठायी ठायी दिसून येते.

- उमेश करंबेळकर

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.