कुंभमेळ्यातील महाइव्हेंट


हिमालयबाबाचा एकशेआठ दिवसांचा यज्ञ

नाशिकला कुंभमेळा चोवीसशे कोटींवर पोचला आहे! महापालिका, जिल्हाधिकाऱ्यांचे कार्यालय, आरोग्यविभाग आणि पोलिस या यंत्रणांचा आधुनिक हायटेक यंत्रणा उभारण्याकडे कल आहे. साधुग्राम नावाचे नवे तात्पुरते गाव वसवण्यात आले आहे.

साधुग्राममध्ये विविध आखाड्यांच्या साधुंसाठी प्लॉट वाटप झाले आहे. तेथे सजावट, रोषणाई अशी यंत्रणा सज्ज झाली आहे. काही ठिकाणी रोषणाई हायटेक आणि डोळे दिपवणारी आहे. तेथे पुजापाठाला प्रारंभ झाला आहे. विविध पध्दतींनी उपासना करणारेही साधू असून कोणी उभे राहून साधना करतो तर कोणी एका पायावर उभा राहून, तर कोणी मचाणावर बसून! सत्तावीस वर्षे उभ्या असणाऱ्या खडेश्वर महाराजांभोवती लोकांची गर्दी होत आहे. साधु महाराजांसमोर पैशांची रास पडत आहे. खालसे सजवण्यात येत आहेत. सजावटीसाठी टेण्ट उभारणारे व्यावसायिक अयोध्या, अलाहाबाद, वाराणसी येथून आले आहेत. ऐश्वर्यसंपन्न साधू पाहून डोळे दिपून जातात. एक साधू गळयात दोनचार किलो सोने घालून फिरत होता. त्याच्याजवळ स्वतःची सुरक्षा यंत्रणा होती.  2003 च्या कुंभमेळयात एका साधूने सरदार चौकात चांदीची नाणी उधळली आणि चेंगराचेंगरी होऊन मोठी दुर्घटना घडली होती. या कुंभमेळ्यातही तशी श्रीमंती दिसून येत आहे.

गायत्री उपासक, श्री श्री 1008 हिमालय पिठाधीश्वर, जगदगुरू रामानुजाचार्य हिमालय बाबा यांचा सलग एकशेआठ दिवस चालणारा अखंड ज्ञानयज्ञ चौदा जुलैपासून सुरू झाला आहे. भजन, पूजन, भागवत कथा असा कार्यक्रम तेथे असतो. अखंड ज्योत एकशेआठ दिवस तेवत राहणार आहे. ती खास इचलकरंचीवरून बनवून घेतली आहे. ती तिळाच्या तेलावर जळणार आहे. त्यासाठी भक्तांना चाळीस रुपयांना दोनशे ग्रॅम तेल विकत घ्यावे लागते. तिळाचे तेल बाजारात शंभर ग्रॅम मिळते.

होमहवनासाठी एकशेआठ कुंड बांधण्यात आले आहेत. एकावेळी एकशेआठ कुटुंबे पूजेला बसतील. त्यासाठी प्रत्येकी साडेतीन हजार रुपये खर्च करावा लागतो. या ठिकाणी ब्रह्मा, विष्णु, महेश स्वर्ण मंदिराची उभारणी करण्यात आली आहे. तेथे नारळ वाहून भक्त त्याची मनोकामना पूर्ण करू शकतो. भक्ताच्या नावाने नारळ होमहवनात वापरले जातील. असे एक कोटी नारळ होमहवनासाठी वापरले जाणार आहेत. नारळ प्रत्येकी वीस रुपयाला तेथेच उपलब्ध आहेत.

हिमालयाबाबांना राजाश्रयही लाभला आहे. महाराष्ट्र राज्याचे माजी समाज कल्याण मंत्री बबनराव घोलप यांच्या आवाजाची ध्वनिफित यज्ञाचा उदात्त उद्देश सांगत असते.  बबनराव घोलप व त्यांचे चिरंजीव आमदार योगेश घोलप हे या ‘इव्हेंट’चे नासिकमधील सूत्रधार आहेत. बबनराव घोलप यांना अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचारविरूद्ध आंदोलनामुळे मंत्रीपद सोडावे लागले होते. पण शिवसेना प्रमुखांनी त्यांना अभय दिले. घोलप प्रतिकूल परिस्थितीतून आले. पण नंतर ते पंचवीस वर्षें आमदार होते. आता ते खासदारही झाले असते पण न्यायालयाचा निकाल त्यांच्या विरूध्द गेला. मग तडजोड म्हणून त्यांनी मुलाला आमदार करून घेतले. घोलपांना मधल्या काळात महामंडलेश्वर ही साधूंना दिली जाणारी पदवीही मिळाली आहे.

हिमालयाबाबांचा ज्ञानयज्ञ सायंकाळी सुरू होतो. त्यांची श्रीमद्भगवत गीताबरोबरच वामनावतार, रामावतार, कृष्णजन्म, भक्तियोग आदी विविध विषयांवर प्रवचने होतात. त्यानंतर दीर्घ अशी महाआरती होते. त्यासाठी खास काशीहून आरती करणारे आणि गाणारे आणले गेले आहेत. सायंकाळी खास मंडळी आरतीत सहभागी होतात. त्यांचा यथोचित सत्कारही होत असतो. हिमालयाबाबांविषयी महंत ग्यानदास यांनी टिका केली होती व आर्थिक बाबींविषयी आक्षेप घेतले होते, त्यावेळी हिमालयाबाबांनी शासनाकडे संरक्षणाची मागणी केली होती!

महायज्ञात मोठी आर्थिक उलाढाल अपेक्षित आहे. फक्त नारळाच्या विक्रीतून वीस कोटींचे उत्पन्न मिळणार असून चार कोटींहून अधिक रक्कम होमहवनातून उपलब्ध होणार आहे. तिळाच्या तेलाची विक्री, प्रसादाचे लाडू विक्री यांतून मोठी रक्कम उभी राहील अशी अपेक्षा आहे. अनेक ठिकाणी मोठमोठ्या दान पेट्या लावण्यात आल्या आहेत. गर्दी खेचण्यात हिमालयाबाबांची मॅनेजमेंट यशस्वी झाली असून महाकुंभ यज्ञाचा कुंभमेळ्याच्या पहिल्या टप्यात सर्वत्र बोलबाला आहे. शासन, प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था मिळून चोवीसशे कोटी रुपये कुंभमेळ्यासाठी खर्च होणार असले तरी फार मोठी उलाढाल साधुग्राम मध्ये सुरू आहे. त्यात हिमालयाबाबांचा महाकुंभ यज्ञ आघाडीवर आहे. मेला या शब्दाचा अर्थ यात्रा असा होतो.

- शंकर बोऱ्हाडे

(छायाचित्रे - शंकर बो-हाडे)

लेखी अभिप्राय

Mahiti aavadli

anil r.more30/08/2015

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.