ऐतिहासिक मंगळवेढा


भीमेच्या सुपीक खोऱ्यात, काळ्या मातीच्या कुशीत वसलेले मंगळवेढा! ती संतभूमी म्हणून ओळखली जाते. नामदेवकालीन संत परंपरेतील संतांच्या मांदियाळीच तेथे नोंदली. टाळ, मृदंग आणि अभंग यांचे नाद शतकानुशतके घुमत राहिले. इतिहास, परंपरा आणि प्राचीन श्रेष्ठत्त्व ही मंगळवेढ्याची अलौकिक उंची आहे!

मंगळवेढा प्राचीन काळी महामंडलेश्वर, मंगलवेष्टक अशा नावांनी प्रसिद्ध होते. मंगळवेढ्याचा इतिहास इसवी सनाच्या चौथ्या-पाचव्या शतकापर्यंत पोचतो. दक्षिण भारतातील चालुक्य/राष्ट्रकुट यांच्या काळात भरभराटीला आलेले ते शहर. ते नंतर देवगिरीच्या यादवांकडे आले. तेथे बहामनी राजवट इसवी सनाच्या चौदाव्या शतकात सुरू झाली. नंतर, 1489 साली ते गेले विजापूरच्या आदिलशहाकडे. मोगलांनी विजापूरची आदिलशाही 1686 साली नष्ट केली आणि मंगळवेढा मोगलांच्या ताब्यात आले. औरंगजेबाचा मृत्यू 1707 मध्ये झाला. त्यानंतर शाहूंच्या पश्चात, संस्थाने खालसा होईपर्यंत मंगळवेढा सांगलीच्या पटवर्धनांच्या ताब्यात होते.

राष्ट्रकुटांचे उत्तराधिकारी कलचुरी, त्यांच्या राज्यात मंगळवेढे हे राजधानीचे शहर होते. वीरशैव पंथाचे संस्थापक महात्मा बसवेश्वर हे कलचुरी राज्याचे मुख्य प्रधान होते. म्हसवड, तेर, अक्कलकोट येथील शिलालेखांतून कलचुरी राजसत्तेत महामंडलेश्वर राजधानी असल्याचे उल्लेख आलेले आहेत. राजवाडे, धर्मस्थळे, तीर्थस्थळे यांचे भग्नावशेष मंगळवेढ्यात सर्वत्र विखुरलेले पाहण्यास मिळतात. त्यात कोरीव स्तंभ, भग्न मूर्ती, शिलालेख आहेत. शिवरायांचा मुक्काम सोलापूर जिल्ह्यात झाल्याची दाखवणारी एकमेव नोंद मंगळवेढे येथेच आहे. शिवरायांचा मुक्काम तेथील भुईकोट किल्ल्यात 18 नोव्हेंबर 1665 या दिवशी होता.

मंगळवेढ्यातील भुईकोट किल्ला, काशी विश्वेश्वर मंदिर, महादेवाची विहीर, ज्योतिबा माळावरील मंदिरे, गैबीसाहेब दर्गा या इतिहासाच्या खुणा सांगणाऱ्या वास्तू.

पुष्कर येथील ब्रम्हदेवाच्या मूर्ती नंतर किल्ल्यापाठीमागील महादेव विहिरीत आहेत. भारतातील एकमेवाद्वितीय ती ब्रम्हदेवाची मूर्ती सहा फूट उंच व साडेतीन फूट रुंद काळ्या पाषाणात कोरलेली आहे. त्याशिवाय महिषासूर मर्दिनी, तीर्थकर यांच्या मूर्ती तेथे आढळतात.

चंद्रभागेच्या वाळवंटातील मुख्य प्रवर्तक संत नामदेव. त्यांचे सांगाती म्हणजे संत चोखामेळा व त्यांचे कुटुंबीय. काळाच्या आणि समाजव्यवस्थेच्या दारात उभे राहून समतेचा आर्त आणि करुणामय आक्रोश करणारे चोखामेळा. ते मंगळवेढ्याचे. चोखामेळा यांच्याबरोबर त्यांच्या कुटुंबीयांनी केलेली अभंगरचना हा त्या भक्ती चळवळीचा आत्मा आहे. सरकारी 'सकल संतगाथे'त संत चोखामेळा यांचे तीनशे एकोणपन्नास अभंग आहेत. त्यांच्या पत्नी संत सोयराबाई यांचे बासष्ट अभंग, संत कर्ममेळा यांचे सत्तावीस अभंग, संत बंका यांचे एकोणचाळीस अभंग आणि संत निर्मळा यांचे चोवीस अभंग आहेत.

मोकलोनी आस | जाहले उदास | घेई कान्होपात्रेस | हृदयात || असा धावा करणाऱ्या संत कान्होपात्रा यांची मंगळवेढा हीच भूमी. नायकीणीच्या घरात जन्माला आलेल्या कान्होपात्रा स्वत:च्या चारित्र्यसंपन्न अस्मितेसाठी लढा देतात आणि स्वत:चे अस्तित्व सिद्ध करतात! त्यांच्या अभंगरचनांनी संतवाङ्मयाची समृद्धी वाढवली आहे.

अनुभव मंटपाच्या माध्यमाने लोकशाहीची मूळे रुजवणारे संत बसवेश्वर यांची कर्मभूमी  म्हणूनही मंगळवेढ्याचा लौकिक आहे. समतेचा ध्वज घेऊन लोककल्याणाची बीजे पेरणारे संत बसवेश्वर यांनी बाराव्या शतकात परिवर्तनाची क्रांती उभी केली ती त्याच भूमी सन 1468 ते 1475 या कालखंडातील दुर्गादेवीच्या दुष्काळात संत दामाजीपंतांनी गोरगरिबांसाठी धान्याची कोठारे लुटली आणि उपाशी जनतेची भूक भागवली. त्या इतिहासाने मंगळवेढा चौमुलखात गौरवशाली झाला.

त्या संतांबरोबरच मंगळवेढ्यात टिकाचार्य, लतिफबुवा, सीताराम महाराज खर्डीकर, मौनीबुवा, गोपाबाई, संत गोविंदबुवा, संत वडरी महाराज, संत बागडे महाराज, संत बाबा महाराज आर्वीकर. स्वामी समर्थ यांच्या पवित्र कर्माने, वाणीने संस्कारित झालेली ती भूमी आहे. महाराष्ट्राच्या सहिष्णू अभंग काव्याचे सार मराठी माणसाच्या रक्तात श्रद्धेचे अभिसरण करणारे आहे.

- इंद्रजीत घुले

Last Updated On - 14th July 2017

लेखी अभिप्राय

संपूर्ण अभ्यासपूर्व लिखाण केले आहे. अभिनंदन.

गं. नि. हळणकर.09/08/2015

khup chan mahiti

gajanan maydev 12/08/2015

Sundar mahiti dili ahe. Abhinandan

Sanjay Sawant jitti13/08/2015

धन्यवाद. मला थोडा इतिहास माहिती होता. आपल्या लेखामुळे संपूर्ण माहिती प्राप्त झाली.

Bharat sadu Da…23/10/2015

कविवर्य, फारच सुंदर माहिती आहे.

नितिन कांबळे ,…03/02/2016

Congrats...for remembering history.

Shivaji Kshirsagar03/02/2016

धन्यवाद, महत्वपूर्ण माहिती मोजक्या शब्दात मांडली. मंगळवेढ्याचा इतिहास नव्या पिढीस समजेल.

संग्राम शिवाजी…04/02/2016

खूप सुंदर माहिती आहे

अज्ञात28/04/2016

आपण मंगळवेढ्याचा इतिहास चांगला सांगितल्याबद्दल धन्यवाद.

तुकाराम ठोंबरे08/06/2016

धन्यवाद. मला थोडा इतिहास माहिती होता. आपल्या लेखामुळे संपूर्ण माहिती प्राप्त झाली.

संतोष गोडबोले …01/09/2016

धन्यवाद. मला थोडा इतिहास माहिती होता. आपल्या लेखामुळे संपूर्ण माहिती प्राप्त झाली.

संतोष गोडबोले …01/09/2016

संत वडरी महाराज यांच्या बद्दल माहिती मिळेल का..

अमोल वडेर ब्रम्हनाळ 18/11/2016

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.