सरदार शामराव लिगाडे - बहुजनांचे उद्गाते


सरदार शामराव लिगाडे यांनी शाहु महाराजांच्या नेतृत्वाखाली सत्यशोधक चळवळीचा विचार लोकमानसात पोचवून त्यांना संघटित व जागृत करण्याचे कार्य सांगोला, पंढरपूर, मंगळवेढा परिसरात केले.

माँटेग्यू चेम्सफर्ड सुधारणेमुळे (1919) स्वातंत्र्याचे वेध लागले. शामराव लिगाडे यांनी स्वातंत्र्याची पेशवाई होऊ नये म्हणून सत्यशोधकी चळवळीत कार्य करून शेतकरी, कामगार व पददलित यांच्या ठायी स्वाभिमान जागृत केला. उच्चवर्णियांच्या अन्यायाविरुद्ध लढा उभा केला. त्यांच्या या लढ्याचे वर्णन ‘केसरी’ने असे केले आहे - 'कोल्हापूर परवडले पण सोलापूर नको'!

शामराव पांडुरंग लिगाडे यांचा जन्म सांगोले तालुक्यातील अकोले या गावी 1880 च्या सुमारास झाला. त्यांचे शिक्षण मराठी चौथीपर्यंत झाले होते. त्यांचे घराणे पेशवेकाळापासून सैन्य बाळगणारे लढाऊ घराणे म्हणून प्रसिद्ध होते. म्हणून शामरावांना ‘सरदार’ म्हणत. त्यांच्या पाच-सात गावांत इनामी जमिनी होत्या. कुळकायदा झाल्यानंतर त्या लोकांच्याकडे गेल्या.

शामराव लिगाडे यांचे व्यक्तिमत्व रुबाबदार होते. काळासावळा रंग, उत्तम शरीरयष्टी, कडक सरदारी पोशाख आणि झुपकेदार मिशा असे त्यांचे व्यक्तिमत्व होते. ते सरंजामी संस्कारांत वाढल्याने तसेच वागत. लोक माणसांवर त्यांचा मोठा दरारा होता. ते गोरगरिबांच्या अडचणीला धावून जात. त्यांना घोडे पाळण्याचा आणि शिकारीचा छंद होता. ते अचूक गोळीबार करत. शिकारीच्या छंदामुळे छत्रपती शाहुमहाराज यांच्याशी व सत्यशोधक चळवळीशी संबंध आला असावा. त्यातून प्रेरणा घेऊन त्यांनी सोलापूर जिल्ह्यात कार्य केले.

शामराव लिगाडे यांनी उच्च वर्णियांच्या सामाजिक व धार्मिक गुलामगिरीविरूद्ध आवाज उठवला. ग्रामीण भागात शिक्षणप्रसारासाठी प्रयत्न केले. पंढरपूरचे बाळासाहेब मोरे, मंगळवेढ्याचे नागणे, सांगोल्याचे रावसाहेब पतंगे, सोनंदचे भाऊसाहेब बाबर, जवळ्याचे बाजीराव देशमुख, पाऱ्याचे सदाशिव पाटील हे त्यांचे कार्यकर्ते. लिगाडे यांनी वाटंबरे गावी पुढाकार घेऊन 1922 साली ब्राम्हणेत्तर परिषद घेतली. त्यावेळी कर्मवीर भाऊराव पाटील, पुण्याचे सत्यशोधक केशवराव बागडे वकील उपस्थित होते. त्या परिषदेने बरीच लोकजागृती केली. लिगाडे यांनी काल्याच्या शाहीर रामचंद्र घाडगे यांच्या सत्यशोधकीय जलशाचे कार्यक्रम त्या भागात घडवून आणले होते. त्या काळात त्यांनी पंढरपूर येथे स्वत:च्या खर्चाने 'मराठा बोर्डिंग' काढले. तेथे तुकाराम शिंदे नावाचा व्यवस्थापक नेमला. सांगोल्यात त्‍याच प्रकारचे वसतिगृह काढण्यासाठी त्यांनी जागा दिली होती. लिगाडे हे 1927 साली वाई येथे झालेल्या ब्राम्हणेतर परिषदेचे अध्यक्ष होते. ती परिषद दिनकरराव जवळकर आणि रावसाहेब पतंगे यांनी त्यांच्या प्रभावी वक्तृत्वाने गाजवली.

सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागाचे पहिले नेतृत्व शामराव लिगाडे यांनी केले. ते सांगोला नगरपरिषदेचे सदस्य काही काळ होते. त्यावेळी ठरावीक कर भरणाऱ्या श्रीमंत लोकांना मतदानाचा अधिकार असे. लिगाडे 1919 नंतर झालेल्या जिल्हा लोकल बोर्डाचे अध्यक्ष होते. बहुजन समाजातील एक मोठा शेतकरी अध्यक्ष झाल्याने तत्‍कालिन गव्हर्नर त्यांना 'शेतकऱ्यांचा खरा प्रतिनिधी शोभतो' असे म्हणत असत.

शामराव लिगाडे 1926 साली झालेल्या मुंबई कौन्सिलच्या निवडणुकीत बहुजन समाजाचे उमेदवार म्हणून सोलापूर ग्रामीणमधून उभे राहिले. त्या अटीतटीच्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेस पक्षाचे आराध्ये वकील व स्वराज्य पक्षाचे नागप्पा काडादी यांचा पराभव केला. जोशीवृत्तीचा उच्छाद, स्थानिक स्वराज्य संस्थांना शिक्षणविषयक अधिकार आणि सार्वजनिक मंदिरे दलितांना खुली करणे हे प्रश्न त्यांच्या काळात मुंबई असेंब्लीमध्ये मान्य करण्यात आले.

सरदार शामराव लिगाडे यांना मुलगा नव्हता. राजाक्का आणि आमण्याक्का अशा दोन कन्या होत्या. 1930 च्या सुमारास राजाक्काचे मोठ्या थाटामाटात लग्न झाले. त्यानंतर 5 मार्च 1932 रोजी शामराव लिगाडे यांना देवाज्ञा झाली.

- प्राचार्य डॉ. कृष्णा इंगोले


(या लेखाकरता छायाचित्रे उपलब्‍ध झाली नाहीत. वाचकांनी यासंदर्भात सहकार्य करावे . - टिम 'थिंक महाराष्‍ट्र')

लेखी अभिप्राय

छान. आणखी माहिती उपलब्ध व्हावी सर.

समाधान क्षीरसागर 11/02/2016

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.