वाडेश्वरोदय - शिवकालिन संस्‍कृत काव्‍य

प्रतिनिधी 23/07/2015

‘वाडेश्वर’ किंवा ‘व्याडेश्वर’ नावाने कोकणातील गुहागर (तालुका - गुहागर, जिल्हा -  रत्नागिरी) येथे प्राचीन देवस्थान आहे. संपूर्ण काळ्या पाषाणाचे ते भव्य मंदिर पुरातन आहे. वाडेश्वर हा अनेक कुटुंबांचे कुलदैवत मानला जातो. मुख्य शिवमंदिर मधोमध असून चार कोपऱ्यांत सूर्य, गणपती, दुर्गादेवी आणि लक्ष्मीनारायण यांची मंदिरे आहेत. महाद्वार पूर्वेला आहे. महाद्वाराच्या एका बाजूला गरूड हात जोडून उभा आहे तर दुसऱ्या बाजूला नतमस्तक मारुती आहे. प्रवेशद्वारासमोर काळ्या पाषाणाच्या दोन भव्य दीपमाळा आहेत. मंदिराच्या समोर नंदीचे गंडकी शिळेचे भव्य शिल्प आहे. नंदी ऐटबाज आहे. त्याच्या गळ्यातील घंटा, घुंगूरमाळा सजीव वाटतात. तो कोणत्याही क्षणी उठून चालू लागेल अशी सचेतनता त्या पाषाणात कलाकाराने ओतली आहे. ती कलाकृती पाहून थक्क व्हायला होते.

वाडेश्वराबद्दल आख्यायिका अनेक आहेत. त्‍यापैकी एक अशी - एक शेतकरी शेत नांगरत होता. त्‍याच्‍या शेतात एक गाय एका विशिष्ट ठिकाणी येऊन नियमितपणे पान्हा सोडत असे. शेतकऱ्याला कुतूहल वाटले. त्याने त्‍या ठिकाणावर नांगराचा फाळ खोलवर घुसवून नांगर ओढला. नांगर पुढे जाईना. त्याने रेटा लावल्यावर जमिनीत शिवपिंडिका दिसू लागली. नांगराच्या फाळाने मूळ शाळुंकेचे तीन कपचे उडाले. ते असगोली, बोऱ्याअडूर आणि अंजनवेल या ठिकाणी पडून तेथे अनुक्रमे वाळकेश्वर, टाळकेश्वर व उडालेश्वर अशी तीन मं`दिरे निर्माण झाली. ती आजही पाहणे शक्य आहे.

माझा जन्म गुहागरचा. मी वाढले-घडले गुहागरला. नंतर, माझ्या सासरचे मूळ घर गुहागरलाच. त्यामुळे त्या गावाशी माझा संबंध सतत राहिला. मध्यंतरी परशुरामाविषयी काम करताना म.स. पारखे यांच्या ‘रामयशोगाथा’ या परशुरामावरील पुस्तकात वाडेश्वर मंदिराचा उल्लेख वाचला. वाडेश्वर मंदिर परशुरामाने स्थापन केले असा तो उल्लेख होता. वाडेश्वर देवस्थानाविषयीच्या अधिक शोधात ‘वाडेश्वरोदय’ नावाचे काव्य माझ्या हाती आले. ते काव्य शिवकालीन आहे. ते कोकणनिर्मिती आणि त्याचा निर्माता परशुराम यांविषयी खूप काही बोलते.

‘वाडेश्वरोदय’ या संस्कृत काव्याचे एकच हस्तलिखित उपलब्ध असून ते कोलकोत्याच्या एशियाटिक सोसायटीच्या संग्रहालयात ठेवलेले आहे. त्यावरून त्या काव्याची फोटोकॉपी तयार करण्यात आली. ‘Oriental Though’ (Series No. 10) त्यामध्ये डॉ. अ.द. पुसाळकर यांनी त्या काव्याविषयी लेख छापला. तसेच, त्या काव्याचा परिचय करून देणारा लेखही श्री गुरुस्वामी केवलानंद सरस्वती यांच्या गौरवग्रंथात 1952 साली छापलेला (पृष्ठ 83 ते 102)आहे. त्या लेखात त्यांनी मूळ ग्रंथलेखकासंबंधी (विश्वनाथासंबंधी) माहिती आणि मूळ ग्रंथाचा परिचय करून दिला आहे. त्यामध्ये पुसाळकरांचा एक उद्देश होता, की वाडेश्वरभक्तांच्या वाचनात तो लेख आला तर गुहागरस्थित काही मंडळी अधिक माहिती देतील. सांस्कृतिक परंपरेत प्राक्कथा, मिथक, दंतकथा यांमधूनही काही धागेदोरे हाती येऊ शकतात.

मुळात आमच्या गुहागर गावात ज्ञानाविषयी आणि संशोधनाविषयी फारसा रस नाही. त्यामुळे पुसाळकरांचा उद्देश सफल होण्यासारखा नव्हताच आणि त्यांना काहीच माहिती न मिळाल्याने तो सफल झाला नाही.

‘वाडेश्वरोदय’ ग्रंथाचा कर्ता विश्वनाथ हा ‘गुहाग्राम’ म्हणजे हल्लीचे गुहागर (जिल्हा- रत्नागिरी) या गावचा रहिवासी. पित्रेकुलोत्पन्न महाराष्ट्रीय ब्राम्हण. विश्वनाथ पित्रे यांनी त्यांची वंशावळ ग्रंथाच्या शेवटी नोंदवली आहे. ग्रंथसमाप्तीचा काल नोंदवला आहे तो असा : ‘रन्ध्रबाणतिथिसम्मिताशब्दक शालिवाहन शके 1559.’ म्हणजे इसवी सन 1637.

मूळ ग्रंथाची नक्कलप्रत शके 1575 म्हणजेच इसवी सन 1653 ला झालेली दिसते. ती राम नावाच्या ब्राम्हणाने केली असा उल्लेख आहे. विश्वनाथ पित्रे यांनी 14 व्या सर्गामध्ये 24 आणि 25 या श्लोकांत ती वंशावळ नोंदवली आहे.


वंशे s भूत्कौशिकस्यागणितगुणगणो वेदतत्त्वावबोधी
काशीनाथाभिदान: सकलबुधवर: श्रीगुहग्रामवासी |
तत्पुत्रात्पुण्यगोत्रात्समजनि सुकृती श्रीमहादेवसंज्ञो
विद्वान् पित्राख्ययोक्तो द्विजजनपरमो s भूद्धरिर्नाम तस्मात्

कौशिक वंशात वेदशास्त्रसंपन्न काशीनाथ नावाच्या मूळ पुरुषापासून वंशावळ सुरू होते. त्याचा पुत्र महादेव. त्याच्यापासून पित्रे हे आडनावाने प्रसिद्ध असलेल्या हरीपासून महादेव अशी वंशावळ सुरू होते. वंशावळ विश्वनाथ पित्रे यांच्यापर्यंत दिलेली आहे. (14 व्या सर्गातील 24 ते 28 मूळ श्लोक पाहता येतील.) त्यांच्या घराण्यात शंकराची उपासना असल्याचा उल्लेख आलेला आहे. त्यांच्या कुळातील पूर्वजांचे वर्णन विश्वनाथाने आत्मभावाने केलेले दिसते. कुळातील व्यक्ती वेदशास्त्रसंपन्न, अगणित गुणांनी युक्त, दानशूर, आचारविचारसंपन्न, उपासक आहेत असे वर्णन वाचताना गंमत वाटते.
‘वाडेश्वरोदय’ ग्रंथाला 14 सर्ग आहेत आणि श्लोक संख्या सहाशे चौऱ्याण्णव (694)एवढी दिलेली आहे.

वाडेश्वर मुख्य कुलदैवताच्या स्थापनेचे वर्णन सविस्तरपणे पहिल्या सर्गात येते. ग्रंथाची सुरुवात गणेशवंदनेने झाली आहे. दुसरा श्लोक शारदावंदनेचा आहे. त्यामध्ये विश्वनाथने केलेली प्रार्थना लक्षणीय आहे.

‘हे वागीश्वरी, हे माते, आपले नाव सार्थ करून, अपभ्रंशात वेगाने संचार करणाऱ्या माझ्या वाणीवर योग्य नियंत्रण ठेवून तिला उत्तम शब्दांच्या दिशेने ने व वाणीवर प्रभुत्व देऊन हे सदय सर्वेश्वरी देवी, या दासाला काव्याची प्रेरणा दे’ (मूळ श्लोकाचा हा सारांश आहे)

यामधील ‘अपभ्रंशात’ वेगाने संचार करणाऱ्या वाणीवर नियंत्रण ठेव असे म्हटले आहे. कवीची वाणी भरकटते, मूळ विषयाला सोटून भटकते असा या शब्दाचा – अपभ्रंश – अर्थ केला आहे. हे काव्य वाचताना विश्वनाथाने केलेली वर्णने बहारदार आणि नेटकी आहेत हे नोंदवावेसे वाटते.

रामायण आणि महाभारत यांमध्ये परशुरामाची कथा येते. त्या कथेपेक्षा येथे परशुरामाचा वेगळा संदर्भ आलेला आहे. परशुरामाने मिळवलेली जमीन क्षत्रियहत्येने पापक्षालनार्थ कश्यपाला दिली आणि तो दक्षिणेकडे आला, त्याचा उल्लेख त्या काव्यात नाही. दान केलेल्या भूमीवर राहणे योग्य नाही म्हणून  परशुराम स्वत:च दक्षिणेकडे उतरला आणि त्याने समुद्र हटवून भूमी मिळवली. म्हणून तो ‘अपरान्ताचा स्वामी’ असा त्याचा गौरव तेथे आहे.

सर्ग एक व दोन हे दोन्ही परशुरामाची सविस्तर कथा सांगतात. त्यात परशुरामाने सोडलेल्या बाणाचे वर्णन प्रभावी आहे. उदाहरणार्थ, परशुरामाने सोडलेला बाण आपल्या ध्वनीने निनादत आकाशातून गरुडाप्रमाणे वेगाने जात असता त्या बाणाच्या पंखातून निघणाऱ्या वाऱ्याने प्रकंपित होऊन मेघांचे तुकडे तुकडे झाले. (सर्ग 2, श्लोक 37)

परशुरामाने अर्जित केलेल्या भूमीच्या क्षेत्रफळाची कल्पना देणारे दोन श्लोक तेथे येतात. तसेच भौगोलिक स्थितीचे वर्णन येते.

‘शंभर योजने विस्तीर्ण (लांब) आणि सहा योजने रुंद, सह्याद्री व समुद्र यांमध्ये वसलेले ते परशुराम क्षेत्र होय. केरळ देशाची हद्द ही दक्षिणसीमा तर उत्तरेकडे वैतरणा नदी ही उत्तरसीमा होय. (सर्ग 2, श्लोक 46, 47)

‘योजन’ हा भूमीमापनाचा मापक होता. ह्युएन् त्श्वाँग (इसवी सन 602 ते 664 ) हा चिनी प्रवासी भारतात आला. त्याने अंतर मोजण्याचा तक्ता तयार केला. त्यामध्ये त्याकाळी वापरात असलेल्या त्या मापकाबद्दल माहिती मिळते. ‘योजन’ एककाबद्दल माहिती देताना :  ‘9 योजन = 8 क्रोश (कोस)’ अशी नोंद आहे. (विश्वकोश खंड 15, पृष्ठ 351) या मापकावरून कोकणभूमी आठशे कोस लांब, साठ कोस रुंद म्हणता येते. विश्वकोशात कोकणची लांबी पाचशे ते सहाशे किलोमीटर व रुंदी पंचावन्न ते पासष्ट किलोमीटर अशी  नोंद आहे.

हे दोन सर्ग म्हणजे परशुरामाच्या पराक्रमाची गाथा आहे. रौद्र, भयानक, वीर रसांचा अपूर्व मेळ तेथे लेखकाने घडवला आहे.

चतुर्थ सर्गामध्ये ‘वाडेश्वर’ कुलदेवतेची स्थापना झालेली आहे आणि गुहाभिध नावाचे क्षेत्र म्हणजे गुहागर येथे तो वाडेश्वर विसावला आहे अशी स्पष्ट नोंद आहे.

यथा गुहायां संलीनं दुर्लभं वस्तु दुर्दशाम् |
तथात्र दुर्लभो वासस्तस्मान्नाम्ना गुहाभिधम्
अवनितलविशिष्टं हृत्सुविष्टं सुराणां
गिरिशचरणघृष्टं संनिकृष्टं पयोधे: |
भृगुपतिपदमिष्टं संप्रजुष्टं गुणौघे –
रघविघटनसृष्टं धर्मपुष्टं चकासे |

ज्याप्रमाणे गुहेत लपलेली वस्तू वाईट-दुष्ट लोकांना दुर्लभ असते त्याप्रमाणे येथे निवास करायला मिळणे दुर्लभच. सागराजवळ असलेले, भगवान परशुरामाने स्थापन केलेले, शंकराच्या चरणस्पर्शाने पुनीत झालेले हे क्षेत्र, गुहामिध (गुहागर) नावाचे क्षेत्र प्रकाशमान झालेले आहे. परशुरामाचा काळ इसवी सन पूर्व 6500 वर्षे समजला जातो. मूळ मंदिर काळाच्या ओघात राहिलेले नाही हे उघड आहे. पण पुण्यक्षेत्राचा जीर्णोद्धार परत परत होत असतो. त्या न्यायाने गुहागरचे वाडेश्वर पुरातन मंदिर आहे असा अर्थ घ्यायचा.

काव्यातील उल्लेख  नद्या आणि सरोवरे, तीर्थे हे आजही आहेत. बाणगंगा, रामतीर्थ, रामेश, वेळणेश, टाळदेव, तारकेश्वर, कनकेश्वर, विंध्यवासिनी, कोकणातील नद्या ‘सावित्री’ आणि ‘गायत्री’ हे सारे निर्देश भौगोलिकदृष्ट्या पथदर्शक आणि महत्त्वाचे आहेत. त्यामुळे स्थलविषयक सामग्रीवर प्रकाश पडतो. स्थलनिश्चितीला असे उल्लेख महत्त्वाचे ठरतात.

गुहागर गावाच्या रचनेचे वर्णन तेराव्या सर्गात सविस्तरपणे आले आहे.

अथैक: श्रीधरोनाम ब्राम्हण: सर्वशास्त्रवित् |
वशीकृतपिशाचेश: साधको योगसिद्धीमान् ||१ ||
धनी बहुजनो विद्वान् वदान्यो राजसंमत: |
वाडेश्वरमुपस्थाय सजानं समुपस्थित: ||२ ||

त्यातील पिशाच्चविद्या वश केल्याचा उल्लेख विद्वान व्यक्तीच्या संदर्भात न पटणारा असा आहे. तरीसुद्धा श्रीधर हा बुद्धिमान आणि कुशाग्र असावा. स्थापत्यशास्त्राचे त्याला चांगले ज्ञान असावे. ग्रामरचनेच्या बाबतीत त्यांनी सांगितलेला आराखडा लक्षणीय आहे. गावाची रचना झाल्यावर त्यांनी केलेल्या सूचना पथदर्शक आहेत. रस्त्याची आखणी, वस्त्या मंदिरे, सरोवरे यांची आखणी पाहता तो तंत्रज्ञ असावा याला दुजोरा मिळतो.

गाव पूर्ण वसवल्यावर काय काळजी घ्यावी, त्याचे वर्णन पाहण्यासारखे आहे.

‘गाव स्थापन झाल्यावर पंचवीस वर्षे जाईपर्यंत त्या गावातून राजाला कोणताही कर देऊ नये. नंतर गावाच्या उत्पन्नाचा दहावा अंश निव्वळ प्रजेसाठी राहवा. उरलेला सहावा अंश प्रजेचे पालन करणाऱ्या राजासाठी राहवा’ (सर्ग 13, श्लोक 6 व 7)

राजाने श्रीधरला सर्व प्रकारचे सहकार्य दिले. ‘वाडेश्वरोदय’ हे संस्कृत काव्य शिवकालीन आहे. पण त्याचे काही पडसाद त्या काव्यात दिसत नाहीत. इसवी सन 1637 म्हणजे तो बालशिवाजीचा काळ. त्या काव्यात ब्राम्हणांची भलावण आणि त्यांचे कार्यकर्तृत्व आहे. त्यामुळे त्या त्या काळातील सामाजिक संदर्भाचा अर्थ बुद्धिनिष्ठेने समजून घ्यायला हवा. तीनशे वर्षांपूर्वी लिहिल्या गेलेल्या त्या ग्रंथामध्ये भौगोलिकदृष्ट्या आणि स्थलदृष्ट्या काही  महत्त्वाचे उल्लेख आहेत. म्हणून त्याचा परिचय महत्त्वाचा!

‘वाडेश्वरोदय’ या काव्याचे मराठी भाषांतर संस्कृत पंडित मो.दि. पराडकर यांनी ‘श्री वाडेश्वर महात्म्य’ या नावाने केले. रघुनाथ हरी आपटे हे वाडेश्वराचे परमभक्त होते. त्यांनी तो ग्रंथ स्वखर्चाने छापून 1981 साली लोकांच्या हाती ठेवला.

- लीला दीक्षित
9422526041

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.