बेस्ट बुकसेलरचा वाडा


पुण्याच्या लक्ष्मी रोडवरील सिटी पोस्टासमोर दिमाखाने उभा असलेला तीन मजली गोडबोलेवाडा हा पुस्तकविक्रीचे मुख्य भांडार म्हणून प्रसिद्ध होता. तो वाडा म्हणजे ल.ना. गोडबोले यांनी १९११ साली विकत घेतलेली लाकडी वास्तू, अधिक त्याच घराला लागून असलेली नारळाच्या बागेची १९३० साली विकत घेतलेली दोन गुंठे जागा यांचा संगम. तो गर्डरवर उभा केला गेला आहे. रानडे इंजिनीयरनी ती भव्य इमारत उभी केली. लोखंडी गर्डर्स इमारतीत वापरण्यास पहिल्या महायुद्धानंतर सुरुवात झाली. गोडबोलेवाडा उभारताना त्याचा पाया बेसॉल्ट या दगडात बांधण्यात आला. शिसे ओतून पायाचे दगड पक्के केले गेले. गर्डर्सची फ्रेम तयार करून पायामध्ये प्लेट बसवण्यात आल्या. शिशाचा वापर मजबुतीसाठी केला गेला. गर्डर्स विलायतेतून (इंग्लंड) आयात केले गेले होते. ते घर जसेच्या तसे मजबूत आहे.

गच्ची आणि खिडक्या यांची रचना लक्षणीय आहे. गच्चीचे गज लोखंडी ओतकाम केलेल्या नक्षीचे आहेत. वाड्याच्या खिडक्या आणि चौकटी, दारे, तुळया ब्रह्मदेशाच्या सागवानी लाकडाच्या आहेत. चारही दिशांना चुनागच्ची बांधलेली दिसते. त्यावरील युरोपीयन कवड्यांचे नक्षीकाम मन वेधून घेते. तीन मजल्यांवरील स्नानगृहांची व संडासांची भांडी, टाइल्स चिनीमातीची असून त्याला साधा तडादेखील गेलेला नाही. चौथ्या मजल्यावर पाण्याच्या विशाल टाक्या बिडाच्या आहेत. वाड्यात असलेल्या चारशे वर्षांपूर्वीच्या दोन आडांचे पाणी वाड्यास पुरवले जाई. पाणी उपसण्यासाठी इंग्लिश बनावटीचा हातपंप बसवला होता. तो तसाच दिसतो.

वाड्याला वीज पुरवठा शिशाच्या वायरींमधून केला आहे. सर्व पंखे इंग्रजी बनावटीचे आहेत. जुन्या पद्धतीची उखळे तळमजल्यावर दोन व पहिल्या मजल्यावर दोन दिसतात. घराच्या बाहेरच्या (व्हरांड्यातील) फरशा लाइम स्टोनच्या आहेत, पण आतील फरशा षट्कोनी आकाराच्या असून त्या इटालियन आहेत. त्यांचा तजेलदारपणा ऐंशी वर्षानंतरही टिकून आहे. प्रत्येक मजल्यावरील प्रवेशद्वाराच्या पुढे कवड्यांची नक्षीदार कलाकृती पाहून प्रवेश करणाऱ्याच्या मनाला प्रसन्नता येते. कवड्यांचे सौंदर्य फिरोजा, जास्फर, अॅगेट यांसारख्या नैसर्गिक दगडांच्या पावडरमुळे टिकून आहे; तर फरश्यांचा तुकतुकीतपणा हा जास्फर या लालरंगी दगडांच्या झिलईमुळे टिकून आहे.

वाड्याच्या दर्शनी भागात जे सज्जे आहेत त्यावर लाकडी चौकट असून त्यावर फ्रेममध्ये बेल्जियमच्या निळ्या, हिरव्या, पिवळ्या व पांढऱ्या रंगांच्या काचा बसवल्या आहेत. प्रकाश, हवा आणि त्याचबरोबर चक्षूंना सौंदर्य टिपता यावे व आनंद मिळावा हा हेतू त्या रचनेमागे असावा. दारांना, खिडक्यांना, व्हेंटिलेटर्सना बसवलेल्या काचांची सुबकता आणि आकृतिबंध... अशी सारी सौंदर्यपूर्ण रचना पाहिल्यावर थक्क व्हायला होते. लोखंड आणि लाकूड व नाजूक काचा यांचा मनोज्ञ संगम वाड्याच्या भव्यतेत आगळ्यावेगळ्या सौंदर्याची भर घालतो. वाड्यातील दाराच्या कड्या, हँडल्सचा आवाज ऐकल्यावर मैफिलीत वाद्ये लावली जात असल्याचा भास व्हावा असा आवाज ऐकू येतो.

लोखंडी जिने चढताना त्यांचे भव्यत्व जाणवते. सर्व जिने लोखंडी फ्रेमचे बनवलेले असून चुन्यातून पायऱ्यांना आकार दिला आहे. शिसवीच्या लाकडाचा देव्हारा आणि तोही इटालियन पानाफुलांच्या सुंदर टाइल्सच्या सजावटीने असा काही देखणा दिसतो आणि त्यावर बसवलेले टाइल्सच्या पॅनेलमध्ये बसवलेले श्री गजाननाचे चित्र (रवी वर्मा यांच्या चित्रासारखे) पाहून हात सहजपणे जोडले जातात. पहिल्या महायुद्धानंतर व्हिएन्ना, ऑस्ट्रिया येथून आणलेली लोखंडी सेफ पाहून वाड्याच्या आर्थिक वैभवाची कल्पना येते. दोन जुनी घरे एकत्र जोडून तयार झालेल्या या भक्कम वाड्याचा दिवाणखाना हे वाड्याचे सांस्कृतिक वैभव होते.

आप्पाजी भास्कर गोडबोले हे हस्तलिखित पोथ्या, तक्ते, चित्रे, वेगवेगळे पट, कुंकू, जानवी, शाई, पूजेचे सामान विकण्याचे काम पुण्यात येऊन करू लागले. पेशवाई अस्तास गेली होती व इंग्रजी अंमल सुरू झाला होता. तब्बल चाळीस माणसांचे गोडबोले कुटुंब १८१० साली पुण्यात आले. शनिवारवाड्यापुढे दोन गाळे घेऊन, तंबूत राहून त्यांनी व्यवसाय सुरू केला. ब्रिटिश प्रशासन सुरू झाल्यावर शिळा प्रेस (दोलामुद्रित) निर्माण झाली. ‘बॉम्बे नेटिव्ह बुक’ ही संस्था निर्माण झाली (१९२२). विश्रामबाग पाठशाळेत पुस्तके छापण्यास १८५१ साली सुरुवात झाली. आप्पाजींचा मुलगा, नारो (नारायण) याने पुस्तके दोलामुद्रित करण्याचा विचार केला व पुढे ‘वृत्तमोद’ नावाचे वृत्तपत्र सुरू केले. त्याचे संपादक होते ‘गजानन चिंतामणी देव’! किंमत होती एक आणा व एक शिवराई. त्यातून नारो आप्पाजी यांनी लेखन केले. त्यांनी १८५७ च्या स्वातंत्र्य युद्धानंतर सदाशिव पेठेतील स्वत:च्या घरात शिळा प्रेस चालू केला व १८५८ मध्ये स्वत:चा ‘वृत्त प्रसारक’ नावाचा छापखाना चालू केला. येथून ‘वृत्तमोद’ छापले जाऊ लागले. एक पंचोपाख्यान (१८५८), चमत्कारिक गोष्टी भाग १, २ (१८६३, १८६५), भोज, कालिदास यांच्या गोष्टी भाग २, भाग ३ (१८६६), बहार दानिश फारसी गोष्टी इत्यादी (स्वभाषांतरित – फारसी – मराठी) नारायणची जावजी दादाजी नावाच्या एका व्यक्तीशी मैत्री झाली. शाई चमकदार होण्यासाठी चरबीचा वापर केला जात असे. पण ती गोष्ट समाजमान्य नव्हती. नारायणरावांनी गाईच्या तुपात शाई केली व त्यातून ‘गुरुचरित्र’ हा ग्रंथ छापला.

नारायणरावांची तिन्ही मुले - लक्ष्मण, भास्कर व विष्णू - ही त्यांच्या कामात मदत करू लागली. नारायणचे १८९० मध्ये निधन झाले व तिन्ही मुलांनी एकत्रितपणे धंदा चालू ठेवला. विष्णू नारायण यांनी स्वत:चा व्यवसाय पंढरपूरला चालू केला. लक्ष्मण व भास्कर यांनी भागिदारीत वडिलांचा धंदा १९०० ते १९१० पर्यंत चालवला. भास्कर वारल्यावर लक्ष्मण यांनी १९११ मध्ये लक्ष्मी रोडवर ल.ना. गोडबोले नावाने प्रकाशन व पुस्तकविक्री यांचा धंदा चालू केला. त्यांनीच दाते पंचांगाचे वितरण केले आणि ते नावरूपास आणले. धार्मिक पुस्तके, सांडूंची औषधे, स्लेट पाट्यांची विक्री आणि त्याचबरोबर सावकारीसुद्धा चालू केली. अनेक संस्था आणि टर्फ क्लब यांच्याशी त्यांचे संबंध प्रस्थापित झाले. त्यांनी इंग्रजी भाषेचा लघुकोश तयार केला. ते दोन हजार रुपये देऊन आचार्य अत्रे यांना जामिन राहिले होते. १९३४ साली त्रिकाल वृत्तपत्रात त्यांच्यावर ‘पुण्याचे भूषण’ या नावाने लेख प्रसिद्ध झाला. त्यातील काही मजकूर पाहा –

‘लक्ष्मीशी अहोरात्र खेळणारे व पुण्याच्या लक्ष्मी रोडवर राहणारे बुकसेलर दादा गोडबोले हे यशस्वी बुकसेलर्समध्ये पुण्यात तरी अग्रगण्य आहेत. दादांच्या हाती खेळणाऱ्या संपत्तीची अतिशयोक्तीपर वर्णने मी अनेकांच्या तोंडून ऐकलेली आहेत. ‘काळ्यारात्री दादांकडे जा व एक लाख रुपये मागा,  रुपये हवे तर रुपये, दहाच्या नोटा हव्यात तर त्या तुम्हाला हव्या त्या रीतीने ते तुमची इच्छा पुरी करतील’, असे काहीसे अभिमानाचे व काहीसे मत्सराचे उद्गार पुष्कळ लोक काढत असतात. दादांच्या जवळ असलेल्या संपत्तीविषयी अनेक कल्पना लोकांत पसरलेल्या आढळतात. त्याप्रमाणेच ती संपत्ती मिळवण्याच्या त्यांच्या मार्गाविषयीही अनेक प्रवाद पसरलेले दिसतात. या प्रवादांपैकी काहींचे स्मरण झाले, की मला भवभूतीच्या, यथा स्त्रीणं तथा वाचां साधूत्वे दुर्जनो जन: या उक्तीचे स्मरण होते. रोख व्यवहार करून दादांचा परिचय करून घ्यावा व हळुहळू त्यांच्या अंतरंगाचा ठाव काढावा म्हणजे दादांच्या त्या स्वभावाची खरी पारख करता येते, ‘उपरिसंकटंक साचे, परंतु यांचे जयांत सुरसाचे’ हे रघुनाथ पंडितांनी केलेले कोकणातील फणसाचे वर्णन दादांसारख्या प्रेमळ वृद्धांना तंतोतंत लागू पडते. सार्वजनिक संस्थांशी संबंध असल्यामुळे चित्रशाळेचे वासुकाका जोशी अगर केसरीचे बाबा विद्वांस यांच्या उद्योगप्रियतेचे लोकांकडून कौतुक व्हावे हे योग्य आहे. पण उद्योगशाली पुरुष या दृष्टीने दादांची योग्यता या उभयांपेक्षा लवमात्रही कमी नाही. साठी उलटून गेल्यानंतरही स्वत: झोळी घेऊन मंडई करणारी जी कित्येक नियमित माणसे पुण्यात आहेत, त्यात बाबा विद्वांस यांच्याबरोबर दादांचीही गणना करावी लागेल.

दादा म्हणजे केवढी द्रव्यशक्ती आहे हे पुण्यातील पुष्कळसे छापखानेवाले तुम्हाला सांगू शकतील. पुण्यातील काही छापरखानेवाल्यांची तर अशी रीतच. असे म्हणतात, की माणसांना पगार देण्याचा दिवस आला, की दादांकडून पैशाची उचल करायची व हात चालेल त्या मानाने हळुहळू त्या पैशांची परतफेड करायची. दादांची ही द्रव्यशक्ती काही जणांच्या तरी परिचयाची आहे; पण त्यांच्या उद्योगशक्तीची कल्पना फारशी कोणाला नाही. दादाच्या बाराबंदीला, गरगरीत चेहऱ्याला व बटबटीत चष्म्याला खुशाल हसावे; दादांची ओळख असणारा माझ्यासारखा माणूस असेच म्हणणार, की दादा हे त्यांच्या धंद्याचे एक भूषणच आहे’

ल.ना. गोडबोले यांना त्या वास्तूत भेटण्यास येणारी मंडळी होती – लोकमान्य टिळक, इतिहासाचार्य राजवाडे, अण्णासाहेब पटवर्धन, ज्ञानकोशकार केतकर, आचार्य अत्रे, अनेक युरोपीयन व पारशी मंडळी... ! धोंडो केशव कर्वे हे त्यांचे मित्र होते.

लक्ष्णरावांचा मुलगा सीताराम हा पहिल्या महायुद्धात तुर्कस्थान आघाडीवर होता. तो लाहोरची अदीब फाझिल ही उर्दू परीक्षा पास झाला. तो इंग्रज अधिकाऱ्यांना उर्दू शिकवत असे. वाड्याच्या दिवाणखान्याच्या खोलीत ते शिक्षणवर्ग चालत.

महाराष्ट्रातील सर्व शाळांत पुस्तके व शैक्षणिक साहित्य (कित्ते, कापडी फळे, तक्ते) पुरवण्याचे काम ‘गोडबोले बुक डेपो’ या लक्ष्मी रोडवरील दुकानाने जवळ जवळ पन्नास वर्षें केले. १९४५ साली ल.ना. वारले त्या वेळी ‘महाराष्ट्राचा बुकसेलर हरवला’ अशी प्रतिक्रिया अनेक वृत्तपत्रांनी नोंदवली.

त्यांचा पणतू संजय वाड्यात राहतो. ते इतिहास संशोधक आहेत. ते उर्दू आणि पारशी भाषांचे जाणकार तसेच, नाणेतज्ज्ञ व प्राचीन वस्तूंचे संग्राहक आहेत. त्यांनी एक हजाराहून अधिक शोधनिबंध विविध वृत्तपत्रांतून लिहिले आहेत. त्यांचे स्वत:चे ऐतिहासिक दस्त व दस्तऐवजांचे म्युझियम केल्याने त्या वाड्याचे वैभव टिकवून ठेवले आहे!

- डॉ. सदाशिव शिवदे 

लेखी अभिप्राय

Thanks for sharing

rekha joshi19/07/2015

संजय गोडबोले यांना मी पाहिले आहे. त्यांचा वाडा अप्रतिम आहे. तसेच त्यांच्या दुकानातून काही खरेदी केल्याचे देखील स्मरते. आमच्या वाड्यातील महेन्द्र संभूस यांचे कडे संजय गोडबोले यायचे.

सोमनाथ दिगंबर …21/11/2016

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.