माचणूरचे सिद्धेश्वर मंदिर
मंगळवेढा गावापासून जवळ ब्रम्हपुरी गावाजवळ माचणूर येथे भिमा नदीच्या काठावर सिद्धेश्वराचे प्राचीन मंदिर आहे. मंदिर दगडी असून भव्य आहे. मोठ्या शिळांचा वापर बांधकामासाठी केला आहे. दगडी पायऱ्या उतरून प्रवेशद्वाराच्या आत उभे राहिलो तर मंदिराचा परिसर व उजव्या बाजूला भीमा नदी असे सुंदर दृश्य दिसते. माचणूरचे मंदिर प्राचीन आहे. ते केव्हा बांधले गेले याचा उल्लेख नाही. पण औरंगजेबाच्या आधीच्या काळात ते नक्की अस्तित्वात होते, कारण औरंगजेबाचा मंदिराजवळच्या किल्ल्यात 1694 ते 1701 पर्यंत मुक्काम होता. त्या काळात त्याने ते मंदिर नष्ट करण्याचे प्रयत्न चालवले होते. (भीमेच्या पाण्यामध्ये हे मंदिर वाहून जाईल अशी व्यवस्था मोठा चर खोदून केली होती, पण ती यशस्वी झाली नाही.) त्याने सिद्धेश्वराला मांस अर्पण करण्याचा उद्योगही केला, पण त्या प्रदेशातील भुंगे वा मधमाशा यांनी त्याच्या सैन्याला सळो, की पळो करून हुसकून लावले. नंतर औरंगजेबाने सिध्देश्वर मंदिराला ४०० रुपये व ६ रुपये वार्षिक वतन देत त्याची भरपाई केली. आजही महाराष्ट्र सरकार कडून मंदिराला ४८० रुपये वर्षासन मिळते. त्या ऐतिहासिक घटनेबद्दलच्या प्रचलित दंतकथेत औरंगजेबाने शंकराचा उपमर्द करण्यासाठी त्याला नैवेद्य म्हणून गोमांस पाठवल्यानंतर नैवेद्याच्या ताटावरील कापड दूर सारताच गोमांसाच्या जागी पांढरी फूले दिसल्याचा उल्लेख आहे. मांसाचा नूर पालटला म्हणून ‘मासनूर’चे नंतर अपभ्रंशाने माचणूर झाले.
माचणूर गावात जाणा-या रस्त्यावर प्रथम सिध्देश्वर मंदिर लागते. रस्ता संपतो तेथे औरंगजेबाचा किल्ला आहे. सिद्धेश्वराचे मंदिर काळ्या पाषाणात बांधलेले आहे. मंदिराच्या घडणीत तुळजापूरच्या मंदिराशी साम्य जाणवते. दगडी प्रवेशद्वारातून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश करताना दोन्ही अंगांना पहारेक-यांच्या देवड्या दिसतात. डाव्या हाताला शंकराचे लहान मंदिर आहे. पाय-या उतरून पुढे गेल्यानंतर दुसरे प्रवेशद्वार लागते. त्या द्वाराच्या दोन्ही बाजूंना भिंतीत विरगळी बसवलेल्या आहेत.
सिद्धेश्वराच्या मंदिराभोवती तटबंदी उभारली आहे. मंदिरासमोर तीन फूट उंचीचा भव्य नंदी आहे. गाभाऱ्यात सिद्धेश्वराची (शंकराची) पिंडी आहे. चांदीचा भव्य मुखवटाही आहे. तेथे जाण्यासाठी दोन दरवाजे ओलांडून जावे लागते. त्यापैकी पहिला दरवाजा पाच फूट उंचीचा तर दुसरा अडीच फूट उंचीचा आहे. त्या दरवाजातून वाकून पुढे गेल्यानंतर गाभा-यात प्रवेश करता येतो. मंदिराबाहेर जुने, मोठे पिंपळाचे झाड आहे. महाशिवरात्रीला तेथे यात्रा भरते. मोठा उत्सव साजरा केला जातो. दीड-एक लाख भाविक येतात. पंढरपूरचे बडवे श्रावणात ठराविक काळासाठी माचणूरच्या मंदिरात येऊन पूजा करतात. उजव्या बाजूस, मंदिराच्या तटाला लागून पन्नास पायऱ्या खाली उतरल्यावर भीमानदीच्या किनारी बांधलेला प्रशस्त घाट नजरेत भरतो. नदी पात्रातच मध्यभागी जटाशंकराचे छोटे मंदिर आहे, तेथे बोटीने जाता येते. नदीच्या दुस-या तीराला मल्लिकार्जुन मंदिर आहे. भीमानदीला 1956 साली आलेल्या पूराने मंदिराचा कळस वाहून गेला. पूर्ण मंदिर पाण्याखाली गेले. पूर प्रचंड होता, पन्नास पायऱ्या चढून पाणी सिद्धेश्वराच्या मंदिरात सहा फूट उंचीपर्यंत आले होते. त्याची खूण गावकरी दाखवतात.
मंदिराची पूजा ब्रम्हपुरीतील गुरव आळीपाळीने करतात. ब्रम्हपुरीत त्यांच्या चाळीस-पन्नास घरांची वाडीच आहे. सर्वांचे आडनाव पुजारी आहे. सर्वजण शाकाहारी आहेत. देवस्थानाला इनाम म्हणून मिळालेली जमीन बावन्न एकर होती. उजनी धरणात त्यापैकी बावीस एकर गेली व आता ती तीस एकर जमीन आहे. माचणूर गावाच्या पूर्व दिशेस एक मैल अंतरावर भिमा नदीपलिकडे बेगमपूर गाव आहे. तेथे औरंगजेबाच्या मुलीची कबर आहे.
माचणूर हे गाव सोलापूर-पंढरपूर रस्त्यावर आहे. सोलापूरला रेल्वे किंवा बसने पोचता येते. तेथून एस.टी. ने त्रेचाळीस किलोमीटरचा प्रवास करून माचणूरला जाता येते. पंढरपूरला रेल्वेने पोचण्याची सोय आहे. तेथून एस.टी. पकडली तर एकवीस किलोमीटर अंतरावर माचणूर गाव लागते. ते गाव मंगळवेढ्यापासून बारा किलोमीटर अंतरावर आहे.
-राजा/राणी पटवर्धन, प्रमोद शेंडे
लेखी अभिप्राय
माहिती खरंच खूप चांगली आहे. पण मला एक सुचवायचे होते माचणूर ठिकाणी श्री कृष्ण मंदिरही आहे त्याचाही इतिहास आहे तो आपण देऊ शकता का मला माहित आहे. त्याबद्दल आपण मला संपर्क करु शकता. धन्यवाद.
Add new comment