सातारचा वारुगड किल्‍ला

प्रतिनिधी 21/06/2015

सातारा जिल्ह्यातील फलटण आणि माण तालुक्याच्या सीमारेषेवरून सह्याद्रीची महादेव डोंगररांग धावत गेलेली पाहण्‍यास मिळते. ती फलटण तालुक्याच्या सखल भागाच्या दक्षिण अंगाने पुढे जाते. त्या पूर्व-पश्चिम दिशेने धावणा-या डोंगररांगेत वारुगड किल्‍ला ठाण मांडून बसला आहे.

वारुगडची समुद्रसपाटीपासूनची उंची 906 मीटर आहे. किल्ला ट्रेकींगच्‍या दृष्टीने सोपा आहेे. किल्ला माणगंगा नदी जेथे उगम पावते त्या सीताबाईच्या डोंगरात डाव्या कुशीला आहे. वारुगड किल्‍ला दहिवडी गावाच्या पश्चिमेस वीस मैलांवर स्थित आहे.

वारुगड किल्ला शिवरायांनी बांधला अशी माहिती प्रचलित आहे . विजापूरहून होणाऱ्या स्वा-यांना पायबंद घालण्‍यासाठी, तसेच स्वराज्याची साता-याकडील बाजू मजबूत करावी यादृष्‍टीने शिवाजी महाराजांनी संतोषगड आणि वारुगड हे दोन किल्‍ले निर्माण केले. वारुगडचा किल्लेदार परभू जातीचा होता. त्या किल्ल्यावर दोनशे पहारेकरी व बरीच शिबंदी होती. तो किल्‍ला साताऱ्याच्या राजाच्या विठ्ठलपंत फडणवीस याने दोनशे लोक पाठवून दुसऱ्या बाजीरावापासून 1818 मध्ये घेतला.

वारुगडाचे बांधकाम भक्कम आहे. किल्‍ल्‍याचा मुख्य फलटण दरवाजा गोमुखी बांधणीचा आहे. (किल्‍ला फलटणपासून फक्‍त पंधरा किलोमीटर अंतरावर आहे.) किल्‍ल्याच्‍या कमानी ढासळलेल्या आहेत. तटबंदीतील बुरूजांनाही तडे गेलेले आढळतात. उर्वरित तटबंदी सुस्थितीत आहे. किल्ल्याची विभागणी दोन भागांत करता येते. एक गडाची माची तर दुसरा बालेकिल्ला. बालेकिल्‍ला आकर्षक आहे. तिथून खालपर्यंत बांधलेली भिंत जमिनदोस्‍त होत चालली आहे. त्‍या भिंतीवरूनच बालेकिल्‍ल्‍यावर जाण्‍याची वाट आहे.

किल्ल्याच्या माचीवर गेल्यानंतर वारुगडाचा मोठा घेर ध्यानात येतो. किल्ल्याच्या माचीचा पूर्वकडील भाग तटबंदीने वेढलेला आहे. गडावरील माची मोठ्या प्रमाणावर शाबूत आहे. पूर्वी माचीत शिरण्यासाठी पाच दरवाजे होते; मात्र सद्यस्थितीत त्यातील फक्त दोन शिल्लक आहेत. गिरवी-जाधववाडी या मार्गे माचीत प्रवेश करणारी वाट एका दरवाज्यातून तर मोंगळ-घोडेवाडी माचीत प्रवेश करणारी वाट दुसऱ्या दरवाज्यातून वर येते. माचीवर घरांचे, वाड्यांचे काही अवशेष आहेत. पाण्याचे दोन-तीन टाके व तळीसुद्धा आहेत. ते टाके नव्याने बांधले असून त्यात उतरण्यासाठी पाय-याही आहेत. गडावर एक विहिर आहे. ती पांडवकालिन असल्‍याचे स्‍थानिक मानतात. ती पृष्‍ठभागापासून खोल असल्‍याने तेथे उन्‍हाळ्यातही थंडावा लाभतो. गडाच्‍या माचीवर भैरोबाचे जीर्णोद्धारित मंदिर आहे. मंदिर प्रशस्त असल्याने तेथे राहण्याची सोय होऊ शकते. माची फिरण्यास दोन तास लागतात.

गिरवी-जाधववाडीतून माचीवर जाणारा रस्ता दरवाज्यातून पुढे गेल्यावर विभागला जातो. उजवीकडे व डावीकडे जाणारा रस्ता माचीवरील घोडेवाडी वस्‍तीकडे नेतो तर सरळ वर जाणारी वाट पंधरा मिनिटांत बालेकिल्ल्याच्या प्रवेशद्वारापाशी जाऊन थडकते. त्‍या दरवाज्याची तटबंदी शाबूत आहे. बालेकिल्ल्याच्‍या समोर सदरेची इमारत आहे. ती नव्याने बांधून काढलेली आहे. समोरच, पाण्याचे टाके व विहीर आहे. किल्‍ल्‍याच्‍या टाक्यांमधील पाण्याचा साठा वर्षभर टिकून राहतो. त्‍या पाण्‍याचा फायदा गडाखालच्‍या गावांनाही होतो. किल्ल्यावरून समोरचा परिसर पाहिला की जाणवते, की किल्ला किती मोक्याच्या ठिकाणी वसलेला आहे! समोर सीताबाईचा डोंगर, महादेव डोंगररांग असा परिसर दिसतो. संतोषगडावरून वाट सीताबाईच्या डोंगरातून वारुगडावर पोचते. वातावरण स्वच्छ असल्यास गडावरुन पुरंदर आणि वज्रगड हे दोन किल्ले दिसतात. तेथून महादेव डोंगररांगेतील शिखर शिंगणापूर हे मंदिर नजरेस पडते.

वारुगडावर जायचे असल्यास फलटण गाठावे. फलटणपासून किल्ल्यावर जाण्यास अनेक मार्ग आहेत. एक मार्ग फलटण-मोगराळे-तोंडल वारूगड असा आहे. दहिवडी-मलवडी-तोंडल-वारूगड या मार्गानेही वरुगडापर्यंत पोचता येते. फलटण - दहीवडी रस्त्यावर फलटण सोडल्यानंतर सव्वीस किलोमीटर अंतरावर बीजवाडी नावचे गाव लागते. त्‍या गावातून एक कच्चा गाडी रस्ता तोंडली मार्गे थेट माचीवरील घोडेवाडी वस्तीत जातो. फलटण - दहीवडी रस्त्यावर फलटण सोडल्यानंतर वीस किलोमीटर अंतरावर मोगराळे नावचा फाटा लागतो. या फाट्यापासून एक कच्चा गाडी रस्ता तोंडली मार्गे थेट माचीवरील घोडेवाडीत घेऊन जातो. मोगराळे ते घोडेवाडी अंतर पंधरा किलोमीटर आहे.

वारुगडाला जाण्यासाठी सोयीचा मार्ग म्हणजे फलटण-गिरवी-चव्हाणवाडी असा आहे. फलटण ते गिरवी अशी एस.टी. सेवा उपलब्ध आहे. गिरवी गावातून पाच किलोमीटर अंतरावर जाधववाड्यापर्यंत पायी चालत जाता येते. जाधववाडा हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे. तेथून वारुगड माचीवर जाण्यास दोन तास लागतात. माचीतून बालेकिल्ल्यावर जाण्यास वीस मिनिटे पुरतात.

वारुगडाच्या माचीवर असणाऱ्या भैरवगडाच्या मंदिरात शंभर लोकांची राहण्‍याची सोय होते. मंदिरामागील धर्मशाळेत पंचवीस जणांची सोय होऊ शकते. मात्र गडावर जेवणाची सोय नाही. माचीवर बारमाही पिण्याच्या पाण्याची टाकी आहे. वारुगडावर मुक्काम करायचा असल्यास अमावास्या टाळावी. दर अमावास्येला पंचक्रोशीतील लोक गडावरील भैरोबाच्या मंदिरात जमतात. तेथे भंडारा असतो व रात्रभर किर्तन चालते. त्यावेळी धर्मशाळेत राहण्यासाठी जागा नसते. वारुगडावर मुक्काम केल्यास दुस-या दिवशी त्या परिसरातील इतर वास्तू पाहता येतात. त्‍यामध्‍ये चाळीस किलोमीटर अंतरावर असलेले शिवाजी महाराजांचे कुलदैवत, शिखर शिंगणापूरचे मंदिर, त्या परिसरात शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजींनी बांधलेला तलाव आणि किल्‍ल्‍यापासून पंचवीस किलोमीटरवर असलेला महिमानगड इत्‍यादी वास्‍तूंचा समावेश होतो. वारुगडावर सर्व ऋतूंत जाता येते.

Last Updated On - 20 June 2016

लेखी अभिप्राय

उत्तम माहिती. प्रवासाला उपयुक्त आणि इतिहासाला जाणून घेण्याची संधी.

विजयराज बोधनकर24/06/2016

वारूगडगायदरा

ROMAN. GHADGE12/09/2016

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.