पूर्णतावादी चतुरस्र व्यासंगी द. ग. गोडसे


दत्तात्रय गणेश गोडसे किंवा द. ग. गोडसे म्हटले तरी ज्यांना त्यांची अपुरी, चुकतमाकत ओळख पटेल, त्यांना चित्रकार गोडसे म्हटले तरी पुरी, पक्की ओळख पटल्यासारखे वाटेल! त्यासाठी त्यांची चित्रे पाहिलेली असावीत असे मुळीच नाही. ती तशी दुर्लभच. गोडसे हा चित्रे प्रदर्शनात न मांडणारा चित्रकार. पुस्तकांच्या मुखपृष्ठांतून त्यांच्या चित्रकलेची चुणूक वाचकांपर्यंत पोचलेली असते. त्यांची इतर चित्रकारिता ही मानून घेण्याची गोष्ट समजत असावेत, किंवा कुण्या एका काळची!

पण गोडसे त्यांची अनेकविध व्यवधाने सांभाळून पंधरा तरी रेखाचित्रे काढल्याशिवाय दिवसाची सांगता झाली असे मानत नाहीत आणि ती चित्रे प्राय: स्वत:साठी काढलेली. नवनवीन,अकल्पित वळणांच्या ध्यासाने, व्रत घेतल्यासारखी काढलेली. त्यांनी ते कलाव्रत बालपणी अंगीकारले आणि बालपणच्या व नंतरच्या काही काळातही ते फार खडतर होते. त्यात विघ्ने होती. परीक्षा पाहणारी इसापनीतीतील प्राण्यांची चित्रे आणि कुटुंबाचे दैवत असलेल्या गणेशाची प्रचंड मूर्ती यांनी त्या मुलाला झपाटले. त्यात पुन्हा गणेशाचे हत्तीद्वारा प्राणिसृष्टीशी लागेबांधे, मुक्त वाटणारा विशाल आकार, तुंदिल तनू व बाकदार सोंड यांतून डोळ्यांत भरणारा वळणावळणांचा स्वैर विलास मुलाला फार भावला. त्यातच विरोधाने उठाव घेणारी ऋद्धी-सिद्धींची सुघड, लडिवाळ, ललित रूपे उभय बाजूंला. ते सर्व पाटीवर, हाती लागेल त्या कागदावर, भिंतीवर उठू लागले. असा त्या मुलाने स्वत:च त्याच्या चित्रकला शिक्षणाचा श्रीगणेशा घालून दिला. पुस्तकी, सांकेतिक शिक्षणाची चाल थबकली. वडिलधाऱ्यांच्या उग्र डोळ्यांवर ते येणार हे चाणाक्षपणे हेरून, त्याने त्याचा ‘स्टुडिओ’ अडगळीच्या मजल्यावर निवांत सांदीकोपऱ्यात हलवला. पण वडील मंडळींना त्या गुप्त स्थानाचा वास लागला आणि स्फोट झाला. सोज्वळ, सधन कुटुंबातील मुलाला चित्रे काढण्याची अवदसा आठवावी? गणित सोडून गणपती? येथे त्या विघ्नहर्त्यांचे छत्र अपुरे पडले. धाकधमक्या झाल्या, ‘हा कार्टा पुढे नाटकमंडळींचे पडदे रंगवण्याचा छाकटा धंदा करणार’ या सुरातील भाकिते गर्जू लागली. ते उपरोधप्रेमी नियतीने कानांत जपून ठेवले असावे. योग असा, की संगीत नाटक अकादमीने भारतातील गतवर्षीचा सर्वश्रेष्ठ नेपथ्यकार म्हणून गोडशांचा गौरव केला. त्यांनी मराठी व संस्कृत रंगभूमी यांच्या सजावटीसाठी गेल्या वीस-पंचवीस वर्षांत केलेल्या कार्याची ती पावती होती. त्यात कधी पडदे रंगवणेही आले! नेपथ्यकार हा वजनदार शब्द अलिकडचा. आताचा चित्रकार म्हणजे तेव्हाच्या सरळसोट व्यवहारात ‘पेंटर’.

पेंटरवरून आठवले. चाळीसएक वर्षांपूर्वीचा ‘अभिरुचि’ मासिकाचा पहिल्या उल्हासाचा काळ. गोडसे मासिकाच्या अगदी आतल्या गटातील. पण त्यांना मासिकासाठी काही लिहा म्हटले तर ते त्यांचे काम लेखणीशी नाही, या राजरोस सबबीवर नकार देत आणि ब्रश चालवण्याचा आविर्भाव करत. तेव्हा आम्ही काहीजण त्यांना गमतीने ‘पेंटर’ म्हणू लागलो. मिस्कील नियतीने तेही टिपले. पुढे, गोडशांनी लिहिलेली पुस्तके प्रसिद्ध झाली. त्यांना जाणकारांची मान्यता मिळाली, पुरस्कार लाभले!

गोडशांच्या जन्मकाळाची चित्तरकथा वेधक आहे. आईचे दिवस भरलेले. प्रसूतीसाठी माहेरी जायचे ते पूर्णा नदी ओलांडून. उलट्या बाजेवर तिला बसवून भोई ती ओढत नदी पार करत होते. पण भर आषाढ. एकाएकी प्रवाह फुगला. बेफाम झाला. भोयांच्या पकडीतून निसटलेली बाज धारेला लागली. आई भयभीत झाली. तिला उतरवून घ्यायला आलेल्या दुस-या तीरावरील आप्तांत हलकल्लोळ माजला. पण दैवाने खैर केली आणि बाज अडवली गेली; माहेरच्या तीराला लागली. प्रसूती सत्वर झाली. गोडसे सांगतात, की पुढे, अनेक वर्षे रौद्र प्रवाहात बाजेवरून वाहत असल्याचे दु:स्वप्न पडत असे. कोणी त्याचा संबंध - फार पुढे, पन्नाशीनंतर त्यांच्या कलाविषयक लेखनात पुन्हा पुन्हा येणारे नदीप्रवाह-त्यांची वाकवळणे, त्यांच्या- काठातळातील दगडगोटयांच्या आकृती यांच्याशी लावतील! ही कल्पनारम्य कादंबरीत शोभून दिसेल अशी ती घटना ३ जुलै १९१४ च्या उत्तररात्रीची.

गोडसे अल्पभाषी, जवळजवळ अबोल- किंबहुना माणूसघाणे आहेत असा अनेकांचा प्रामाणिक ग्रह आहे आणि तो खुद्द त्यांनीच कटाक्षाने करून दिला असावा. पण जेथे कुंडली जमते किंवा कधी तार जमते, तेथे गोडशांची वाणी अशी फुलून येते, की शहाण्या माणसाने ऐकत राहवे. कारण तो होश चढला की गोडसे उभे राहून बोलू लागतात. जेवणाची वेळ असली तर जेवण थांबते. काळच थांबतो. विषयही पुन्हा शिळोप्याचा, गमतीचा नव्हे. इतिहाससंशोधन, कलाविचार आणि त्यांना स्पर्श करणारी क्षेत्रे-असल्या वजनाचे विषय त्यासाठी हवेत. मात्र, सार्वजनिक भाषणाला त्यांचा ठाम नकार. त्यांना सभासमारंभाची रुची नाही.

गोडशांच्या बहुरंगी आयुष्यात प्राध्यापकीही आली. ते बडोदे विद्यापीठातील ‘फाइन आर्ट्स’ विभागाच्या प्रमुखपदी आठ वर्षे होते. नंतर ते चित्रकलेवर मुंबई विद्यापीठातील सौंदर्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठी व्याख्याने देत. त्यांनी त्यांच्या विद्यार्थ्यांचा मोठा आदर ‘करायचे ते जीव ओतून’ या त्यांच्या वृत्तीमुळे संपादन केला. गोडशांचे व्यावसायिक आयुष्य बहुविध होते. त्यात शिक्षकीचा काळ आला तो शेवटी. आरंभी, त्यांनी अनेक स्थळी नोक-या केल्या; त्यानंतर पूर्णवेळ स्वतंत्र व्यवसाय. मराठी मध्यमवर्गीय व्यवहारनीतीत नोकरीतील स्थैर्य हा महान सद्गुण -एकदा चिकटल्यावर शक्यतोवर तेथे चिकटून राहणे, बूड न हलवणे हा संभावित आचार. गोडशांचा आचार रामदासी-‘ब्राह्मणु हिंडता बरा!’ फकिरी, कलंदर म्हणा. शेवाळ किंवा गंज किंवा बुरशी हा अलंकार न मानणारा.

कलावंत म्हणूनही त्यांचे अनेक अवतार झाले. त्यांनी व्यंगचित्रकार म्हणून नाव मिळवले ते कॉलेजच्या दिवसांत. रेखाचित्रे शेकडय़ांनी काढली असणार. चित्रांत कलेइतकेच समकालीनता, ऐतिहासिक वास्तवाशी इमान राखलेले. पुस्तकाची सजावट म्हणजे रंगीत मुखपृष्ठावर रंगेल बाई बसवणे नव्हे. तीस-चाळीस वर्षांपूर्वी, तो बाजार अडवून बसलेला कलेचा व्यापार अलिकडे बराचसा उठलेला आहे. त्याचे मुख्य श्रेय गोडसे आणि त्यांच्यासारखे काही अस्सल कलावंत व प्रकाशक यांना द्यायला पाहिजे. वेष्टनावरील गोडशांचे चित्र पुस्तकाच्या नावाला, त्याच्या अंतरंगाला अनुरूप असतेच; पण अनेकदा, त्याचे सारसर्वस्व सुचवणारे प्रतीकधर्मी असते. गोडशांची सजावट मुखपृष्ठापाशीच थबकत नाही. ते संपूर्ण पुस्तकाची मांडणी, टाइपाची निवड, ओळींची लांबी, ओळींतले अंतर, दोन्ही बाजूंचे समास असल्या लहानसहान तपशिलांपर्यंत करतात. त्यांना पुस्तकाचे अंतरंग व बहिरंग यांचा सूर जमायला हवा असतो. त्यांना मुद्रणकलेतही बारीक नजर आहे. त्यांचे सोन्याबापू ढवळ्यांसारख्या मुद्रणाचार्याशी उत्तम जमत असे, ते त्यामुळेच. हरिभाऊ मोट्यांसारख्या चोखंदळ प्रकाशकाचे त्यांच्याविना पान हलत नसे. गोडसे पुस्तकाचा असा थाटघाट सिद्ध करण्यात मग्न असताना त्यांना न्याहळणे, त्यांचे आवेगामुळे अडखळणारे बोलणे ऐकणे हे आनंदाचे असते.

गोडसे नेपथ्ययोजनेत १९४१ पासून आहेत आणि त्यांनी ती शंभराहून अधिक नाटकांना पुरवली. त्यांचा मुंबई मराठी साहित्य संघाच्या नाटकांपासून ते अलिकडच्या ‘बॅरिस्टर’, ‘दीपस्तंभ’ इत्यादी नाटकांच्या यशातील वाटा जाणकार मानत आले आहेत. एकासारखे दुसरे नेपथ्य नाही. त्यांनी प्रत्येक नाटक हे कल्पनेला आणि कारागिरीला आव्हान मानले आणि त्यात नाटक जुन्या काळचे असले -संस्कृत नाटकापासून ते पाऊणशे वर्षांपूर्वीच्या काळातील ‘बॅरिस्टर’पर्यंत- म्हणजे गोडशांना चिथावल्यासारखे होते.

त्यांनी भरतमुनींनी आखून दिलेला रंगमंच संस्कृत नाटकांसाठी कसोशीने उभा केला. तो मधील आठ शतकांत हरवला होता. जर्मनीत ‘शाकुंतल’ व ‘मुद्राराक्षस’ यांचे प्रयोग झाले तेव्हा गोडशांच्या त्या नेपथ्याची वाहवा झाली. ते भासाच्या 'प्रतिमां'वरून गोडशांनीच अनुवादलेल्या ‘धाडिला राम तिने का वनी?’ या नाटकात आणि त्यांच्या संक्षिप्त ‘शाकुंतला’त मराठी प्रेक्षकाला पाहायला मिळाले. पण त्यांचे इतिहासाशी इमान केवळ नेपथ्यापुरते नाही. त्यांनी संस्कृत नाटकांचे स्वत्व त्यांच्या प्रयोगात मुळातून किंवा अनुवादातून राखले, प्रतिष्ठा सांभाळली. त्यांचे पोरकट, विपरीत, असंस्कृत मराठीकरण करू दिले नाही.

गोडसे बी. ए.साठी मुंबईच्या विल्सन कॉलेजात आले तेव्हा कॉलेजातच वस्ती आणि जवळच सा. ल. हळदणकरांसारख्या नामांकित कलाशिक्षकाचे घर. गोडशांच्या चित्रकलेचा अभ्यास झेपावत पुढे गेला. ‘गोडशांसारखा शिष्य मला मिळाला नाही’ असे हळदणकर मला म्हणाले. असा गुरुशिष्य योग. गोडशांनी वडिलांच्या आदेशाप्रमाणे बी. ए. पदरात पाडून घेतली आणि ते लंडन विद्यापीठाच्या स्लेड स्कूल या नामांकित कलाशिक्षण संस्थेत गेले. तेथील प्रमुख बाब, हे त्यांच्यावर त्यांच्या रेषेवरील हुकमतीमुळे प्रसन्न झाले आणि त्यांच्याकडून त्यांच्या शिष्याला खूप काही मिळाले. त्यानंतरचे गुरू म्हणजे 'टाइम्स ऑफ इंडिया'च्या कलाविभागाचे प्रमुख लँगहॅमर.

गोडशांच्या मुलुखगिरीची बखर येथेच संपत नाही. चित्रपटासारखा नवा कलाप्रकार -ज्यात अनेक कलांचा मेळ असतो- त्यातून कसा सुटेल! चाळीस वर्षांपूर्वीच्या काळात गोडसे त्या उद्योगात चार-एक वर्षे होते. कथा-पटकथा लेखक, सहाय्यक दिग्दर्शक, कलादिग्दर्शक अशा विविध भूमिकांत त्यांनी विश्राम बेडेकरांबरोबर सहा महिने ‘बाजीराव-मस्तानी’वर काम केले. त्यातून चित्रपट निष्पन्न झाला नाही, पण ते मस्तानीत अधिक गुंतले.

गोडशांनी त्यांची संगीतसाधना मात्र छुपी ठेवली. त्यांनी चित्रकलेचा रियाज निष्ठेने केला तसा मृदंगवादनाचाही केला. पण तो स्वान्त: सुखाय; इतरांसाठी नाही. त्याची खुद्दांनी सांगितलेली कथा अशी- ज्या शंकरराव अलकुटकरांचा गंडा बांधायचे त्यांच्या मनात होते, ती एक विक्षिप्त, तिरसट वल्ली होती. त्यांनी नकाराला निमित्त म्हणून या इच्छुकाला मृदंगावर थाप मारून दाखवायला सांगितले. गोडशांनी ती मारली, आणखी मारल्या आणि अलकुटकर (स्वत:चा) कान पकडून म्हणाले, ‘असा गादीदार तळवा आमच्या गुरूंचा होता.’ त्यांचे परात्पर गुरू म्हणजे नानासाहेब पानसे. झाले! अलकुटकरांनी गोडशांना गंडा बांधला, कोडकौतुकाने विद्या दिली.

गोडशांचा साहित्याशी संबंध केव्हापासूनचा? वाचक म्हणून तो लहानपणीच जडला. पण लेखक म्हणून? आरंभी, त्यांचा नियतकालिकांशी संबंध आला तो व्यंगचित्रकार म्हणून, सजावटीचे सल्लागार म्हणून. प्र. श्री. कोल्हटकर हे आप्त, म्हणून त्यांचे ‘संजीवनी’ घरचेच. वा. रा. ढवळे हे स्नेही, म्हणून त्यांची ‘ज्योत्स्ना’ इत्यादी मासिके जवळची. ‘अभिरुचि’ मासिक १९४३ मध्ये बडोद्याहून निघू लागले आणि लवकरच, गोडसे त्यात सामील झाले, ते प्रथम व्यंगचित्रकार म्हणून. त्यात त्यांची व्यंगचित्रे येऊ लागली. त्यांचे आणि माझे तेव्हा जमले आणि घट्ट झाले. त्याआधी फक्त जुजबी परिचय होता. ‘अभिरुचि’ची सजावट लवकरच त्यांच्याकडे गेली. त्यांनी सजवलेली विशेष व दिवाळी अंकाची मुखपृष्ठे आतील साहित्याइतकीच समजदार वाचकांच्या मनात भरली. ते ‘अभिरुचि’च्या कुटुंबातील एक झाले. त्यांनी मासिकासाठी अनेक खस्ता खाल्ल्या; चोरून थोडेसे लिहिलेही. ते मलासुद्धा फार उशिरा कळले! त्यानंतर त्यांनी किती नियतकालिकांसाठी काय काय केले, त्याचा हिशेब या बेहिशेबी माणसाकडे असणे अशक्य!

गोडशांचे पहिले पुस्तक ‘पोत’ १९६३ चे. म्हणजे पन्नाशीच्या उंबरठ्यावर निघालेले. त्याने कलाचिकित्सकांच्या छोट्या जगात मोठी खळबळ माजवली. गोडशांनी पुढे कलेतील सौंदर्यतत्त्वाचा शोध घेणारी अशी आणखी पाच पुस्तके प्रसिद्ध केली. शक्तिसौष्ठव (१९७२), गतिमानी (१९७६), लोकधाटी (१९७९), मातावळ (१९८१) आणि ऊर्जायन (१९८५). त्यांचा समन्दे तलाश (१९८२) हा लेखसंग्रह. त्यातील पाच लेख तर साठीनंतरचे! म्हणजे लेखनकलेतील गोडशांचा फुलोरा उशिराचा. त्यांतील प्रत्येक पुस्तकात स्वतंत्र बुद्धीचा आविष्कार आहे आणि त्याला प्रतिभेची झाक आहे. त्या व अन्य पुस्तकांतील गोडशांची सर्व मते सर्वच विद्वानांना पटतात असे नव्हे. पटती तर आश्चर्य! कोणाला त्यांत हट्टी नवेपण दिसते, कोणाला त्यांतील एकांतिकता खुपते. कोणाला त्यांतील कल्पनाशक्तीमागे फरपटत जाणारा तर्क खटकतो; कोणाला ती नुसतीच विक्षिप्त वाटतात. उद्यापरवा, ते आक्षेप कदाचित मऊ होतील; इतके आग्रही अटीतटीचे राहणार नाहीत आणि विरोधाचे असे सोहळे झाले नाहीत तर तो नवेपणा कसला!

गोडशांच्या लेखनातील या विचारधनामागे मोठे सांस्कृतिक संचित आहे. विविध कलाप्रकारांचा विलक्षण आस्वाद आणि त्यातील बुद्धिप्रधान निर्मितीचा परिपक्व अनुभव आहे. प्राचीन-अर्वाचीन साहित्याचे रसिक परिशीलन आहे. मानसशास्त्र, मानववंशशास्त्र, लोकसाहित्य, लोककला आणि त्यांच्या परिघातील विषय यांचा गाढ व्यासंग आहे. विज्ञानाच्या काही शाखांशी परिचय आहे आणि इतिहासाचा छंद तर बलिष्ठ आहे.

त्या पुस्तकांशिवाय १९७४ मध्ये ‘काळगंगेच्या काठी’ हे गोडशांचे नाटक प्रसिद्ध झाले. ते इतिहास व लोककथा यांतील संशोधनातून सिद्ध केलेल्या कथानकावर आहे. विषय : संभाजीराजे व ‘सती गोदावरी’. ‘राजयाचा पुत्र अपराधी देखा’ या त्यांच्या अप्रकाशित (पण रंगभूमीवर आलेल्या) नाटकाचा विषय तोच. गोदावरीची लोककथा गोडशांनी रायगडच्या परिसरात टिपली; तिच्यातील इतिहासाचा मागोवा घेतला. तिला असे नाट्यरूप दिले आणि तिच्यावर एक टिपण लिहिले; ते ‘ऊर्जायन’ या पुस्तकात आहे.

‘समन्दे तलाश’ (१९८१) हा गोडशांच्या काही लेखांचा संग्रह. त्यांच्याच शब्दांत- ‘समन्दे तलाश म्हणजे शोधाचा.. तर्काचा घोडा. शिवाजीमहाराजांनी औरंगजेबास पाठवलेल्या प्रसिद्ध फारसी पत्रातील तो वाक्प्रचार.’ मुख्यत: महाराष्ट्राचा इतिहास व येथील कला या जोडप्रांतात अज्ञात वा उपेक्षित सत्याचा वास काढत, लोकप्रिय -नव्हे विद्वत्प्रियही- गैरसमजुतींचा  पोकळपणा उघडा करत गोडशांची लेखणी तेथे दौड करते. दौड म्हणण्याइतक्या बेदरकार आत्मविश्वासाने पुस्तक अर्पण केलेले आहे- ‘... मस्तानीच्या पवित्र स्मृतीस.’ आणि त्यातील सर्वात मोठा लेख तिच्यावर आहे. गोडशांना गणपतीने जसे लहानपणी झपाटले तसे पुढे मस्तानीने झपाटले. पंधराव्या वर्षी हेडमास्तरांच्या खोलीतील ऐतिहासिक पुरुषांच्या चित्रांत इतरांबरोबर स्त्री, पहिल्या बाजीरावाबरोबर कोणी का नाही या कुतूहलापासून आरंभ. अच्युतराव कोल्हटकरांच्या ‘मस्तानी’ या भडक रंगातील नाटकाने ते वाढीला लागले. त्यांनी तिच्याविषयीच्या निखालस सत्याचा शोध घेण्यासाठी इतिहासाचा कानाकोपरा गेली अनेक वर्षे धुंडाळला आहे. त्या संशोधनातून तयार झालेले त्यांचे ‘मस्तानी’ हे पुस्तक. त्यातील तिच्यावरचा लेख पाहता तिचे अवास्तव गुणवर्णन करण्याऐवजी इतिहासकारांनी आणि अन्य लेखकांनी अज्ञानामुळे किंवा कोत्या पूर्वग्रहांतून तिची जी डागाळलेली विपरीत ‘प्रतिमा’ उभी केली, लोकप्रिय केली, तिचा खोटेपणा सप्रमाण सिद्ध करणे हा त्यांचा प्रधान हेतू असावा.

बुंदेलखंडाच्या राजा छत्रसालाने पहिल्या बाजीरावाला मस्तानी भेट म्हणून दिली. ती त्याने बुंदेलखंडाच्या रक्षणासाठी धाव घेतली, याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी. ती नृत्यकलापारंगत. तिची आई मुसलमान, म्हणून तीही मुसलमान आणि दर्जाने कंचनी- हा सोपा निष्कर्ष आम्ही पाठ केला. विडा खाताना पिंक तिच्या गळ्यातून उतरताना दिसे -हा तिच्या आरस्पानी लावण्याचा जणू अर्क म्हणून आंबटषोकी चविष्टपणे आम्ही एकमेकांना सांगत आलो, एवढेच. वस्तुत: मस्तानीचा सामाजिक दर्जा प्रतिष्ठेचा होता. तिच्याबरोबर मोठी वार्षिक तैनात आली. मुख्य म्हणजे ती नावापासून- ‘प्रणामी’ या निधर्मी, वर्गविहीन पंथाची होती, हे गोडसे पुराव्यानिशी सांगतात. कोत्या बुद्धीने आणि सरधोपटपणे तिला मुसलमान मानून आणि तिच्या नृत्यकौशल्याचा विपर्यास करून पेशवे कुटुंबाने आणि ब्राह्मणी पुण्याने तिचा उपमर्द केला, छळ केला. पुण्याजवळ पाबळला तिच्या गढीत-मशिदीच्या अंगणात तिची दुर्लक्षलेली, पडझड झालेली ‘समाधी’ आहे -कबर नाही. अडाणी, कावेबाज थराखाली दोन-अडीच शतके गाडल्या गेलेल्या त्या इतिहासाचे उत्खनन गोडशांनी निष्ठेने- धर्मकार्य म्हणून केले. पहिल्या बाजीरावाचे रोमँटिक आख्यान रंगवण्यासाठी आणखी एक साधन म्हणून वापरल्या गेलेल्या मस्तानीला तिचे खानदानी, सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व होते याची महाराष्ट्राला जाण करून देणे, हे ते कार्य.

गोडशांनी कवींवर व कवितांवर रसिकतेने लिहिले आहे, पण गुळगुळीतपणे नव्हे; चिकित्सक चिरफाड करून. तसेच, इतर कलावंतांवरही. जेम्स व्हिस्लर या चित्रकारावरील ‘नांगी असलेले फुलपाखरू’ हा लेख असलेला आणि तेच नाव दिलेला त्यांचा लेखसंग्रह प्रसिद्ध आहे.

गोडसे मोठे कलावंत आहेत. न मिरवणारे, म्हणून अधिकच मोठे. त्यांच्या कर्तृत्वाच्या नवनवीन अनपेक्षित बाजू हळुहळू उलगडत गेल्या. मुळात चित्रकार, त्यातून अनेक शाखा आणि धुमारे फुटले. त्यांच्या त्या मुळात त्यांनी इतर ज्या कला आत्मसात केल्या, त्यांचीही मुळे गुंतली गेली असतील का? त्यांतून एकमेकांचे सूक्ष्म पोषण झाले असेल का? गोडशांच्या कामगिरीत केवळ विविधता नाही; अनेक कलांना एकमेकांतून आलेली संपन्नताही आहे.

(लोकसत्ता, लोकरंग ४ ऑगस्ट २०१३ वरून उद्धृत)

- मंगेश विठ्ठल राजाध्ययक्ष

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.