पानिपतकर शिंदे यांचे वाडे


_panipatkar_shinde_yanche_wade_1_0.jpgसातारा जिल्ह्याच्या लोणंद-सातारा मार्गावर सालपेअलिकडे तांबवे या गावाच्या पुढे कोपर्डे फाटा लागतो. त्या फाट्यापासून तीन किलोमीटर अंतरावर कोपर्डे हे गाव आहे. त्या गावात प्रवेश करताना तो एका मोठ्या वेशीतून करावा लागतो. वेस भक्कम, घडीव दगडांची असून तिची उंची साडेचार ते पाच मीटर आहे व रुंदी तीन मीटर आहे. मजबूत आणि सुंदर अशा वेशीला जोडून पूर्ण गावास तटबंदी आहे. तटबंदीचे अवशेष ठिकठिकाणी दिसतात. त्या गावात शिंदे घराणे नांदत आहे. त्या घराण्यातील तीन मातब्बर पुरुषांच्या वाड्यांचे अवशेषही पाहण्यास मिळतात.

हे वाडे पानिपतच्या संग्रमानंतर ज्या शिंदे मंडळींचे वेगवेगळ्या ठिकाणी वास्तव्य झाले त्यांतील वरील तीन व्यक्ती फलटणकर नाईक निंबाळकरांच्या आश्रयाने कोपर्डे येथे स्थायिक झाल्या. जवळपासची तेरा गावे त्यांना इनाम म्हणून मिळाली. त्यांनी ते वाडे बांधून कोपर्डे या ठिकाणी त्यांचे अस्तित्व निर्माण केले. त्या शिंदे मंडळींना 'पानिपतकर शिंदे' म्हणून संबोधले जाते. ग्वाल्हेर येथे 'पानिपतकर गोट' हा त्या शिंदे मंडळींचा वस्तीचा भाग आहे. शिंद्यांचे स्वतंत्र निशाण होते. त्यावर दोन नाग व मध्ये सूर्य असे चित्र होते असे सागंतात. घराण्याचे सोयरसंबंध फलटणकर नाईकनिंबाळकर, तारळेकर राजे महाडिक, जतकर व उमराणीकर डफळे, राजे भोसले इत्यादींशी आहेत. कसब्याप्रमाणे गावात बारा बलुती सलोख्याने नांदत आहेत.

घराण्यातील भय्यासाहेब शिंदे हे सुपरिंटेण्डण्ट इंजिनीयर या पदावर होते. त्या गावचे दुसरे सुपुत्र धर्मराज शिंदे हे सातारा जिल्हा भूविकास बँकेच्या चेअरमनपदी होते. त्यांचा गावच्या अनेक विकासकामात मोलाचा वाटा आहे.

पहिला वाडा -  वेशीतून आत प्रवेश करताच डाव्या हातास वाड्याचा भव्य बुरूज आणि त्यास जोडणारी तटबंदी वाड्याचे विशाल रूप निर्देशित करते. वाड्याच्या दरवाज्यावर नगारखान्याचा किंचित अंश दिसतो. दरवाज्यातून आत गेल्यावर दोन ढेलजांची जोती दिसतात.

नगारखान्यात जाण्यासाठी घडीव दगडांचा जिना आहे. दुस-या एका जिन्याने वर गेल्यावर वाड्याचे उरलेले एकमेव दालन पाहण्यास मिळते. त्याशिवाय जुन्या वास्तू काही उरलेल्या नाहीत याची खंत मनास बोचते. वाड्याच्या लगतच घडीव दगडांची विहीर पाहून त्या वेळच्या बांधकामातील प्रामाणिकपणा लक्षात येतो.

_panipatkar_shinde_yanche_wade_2_0.jpgदुसरा वाडा - या वाड्याच्या प्रवेशद्वारास जोडलेले दोन बुरूज भक्कम स्थितीत उभे आहेत. बुरुजांचे निम्मे बांधकाम घडीव दगडांचे असून वरील निम्मे बांधकाम रेखीव अशा भाजक्या विटांचे आहे. त्यांच्या दर्ज्यामधील चुना बांधकामास घट्ट धरून ठेवलेल्या अवस्थेत पाहण्यास मिळतो. वाड्याच्या तटबंदीच्या भिंतीत नवीन दरवाजे पाडलेले असून आतील बाजूस घरे झाली आहेत. वाड्याच्या आत जुन्या बांधकामाच्या किरकोळ खुणा आढळतात. एकूण परिसर पाहिल्यावर वाड्याचे जुने वैभव मन:चक्षुंपुढे उभे राहते.

तिसरा वाडा - एकच बुरुज वाड्याच्या भव्यतेची साक्ष देतो! तिन्ही वाड्यांचे बुरुज एकाच धाटणीचे आहेत. वीटकाम व दगडकाम हे अतिशय रेखीव असून संपूर्ण बांधकाम चुन्यामध्ये केले गेले आहे. तिन्ही वाड्यांना नगारखाने असावेत. ढलजांची जोती मजबूत असून एखादी पडलेली भिंत दिसून येते. वाडे उत्तर पेशवाईतील असावेत हे त्यांच्या बांधकामांवरून लक्षात येते.

गावात सतीचे देवालय म्हणून पूर्ण दगडी वास्तू आहे. एका मातब्बर व्यक्तीची छत्रीही पर्यटकांचे लक्ष वेधून घेते. दोन्ही वास्तू सुबक बांधणीच्या आहेत. त्या तिन्ही वाड्यांत पागा होत्या. त्या पागांच्या जागी घरे झाली आहेत.

(आधार - डॉ. सदाशिव शिवदे लिखित 'ऐतिहासिक वाडे - भाग 1')

- डॉ. सदाशिव शिवदे                                                                                     
(छायाचित्र - सदाशिव शिवदे)

लेखी अभिप्राय

खूप सुंदर बर वाटल पूर्वजांची गोष्ट वाचून

सचिन मनोहरराव …07/11/2016

Nice

Amar jotiba shinde06/04/2018

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.