सोलापूरचा भुईकोट किल्ला


सोलापूर शहरातील भुईकोट किल्ल्याचा परिसर मोठा आहे. किल्ल्यात जाण्यासाठी पाच रुपयांचे तिकिट आहे. आतमध्ये बाग आहे, पण देखभाल होत नसल्याचे जाणवले. दोन पोलादी तोफा व एक माहिती देणारा दगडी फलक लावला आहे. आतमध्ये नमाजासाठी पडकी मशिद आढळली. ती अनेक खांबी आहे. पुढे छोटा हौद आहे. त्यात दगडी कलाकुसर हिंदु पद्धतीची आहे. आतमध्ये सभोवताली चिंच, बाभूळ, बदाम, कडुनिंब असे मोठमोठे वृक्ष आहेत. कारंजांच्या जागाही आहे, पण पाणी नसल्याने ते कोरडे आहेत!

सोलापूरचा किल्ला नक्की केव्हा बांधला याबद्दल मतभिन्नता आढळते. कॅम्पबेल यांच्या मते बहामनी बादशहा महंमदशहा याने तो 1358 ते 1375 या दरम्यान बांधला असावा तर डॉ. हंटर यांच्या मते, तो 1345 मध्ये बांधला असावा. तोरो यांच्या मताप्रमाणे, हसन गंगू बहामनी याने बाहेरील कोट 1313 मध्ये तर आतील कोट हिंदू राजांनी बाराव्या शतकात बांधला आहे. सोलापूरचे मल्लिकार्जुन पाटील यांनी हा किल्ला इ.स. 1456 साली बांधला असे मत नोंदवून ठेवले आहे. दुसरा महंमदशहा बहामनी (1466 ते 1482) यांचा हुशार दिवाण महमद गवान याने सोलापूर व परांडा हे दोन्ही समान बांधण असलेले किल्ले एकाचवेळी बांधले असावे, असे काहींचे मत आहे.

सोलापूरच्‍या भुईकोट किल्ल्यात हेमाडपंथी अवशेष आढळतात. त्‍या किल्ल्यात पूर्वी तीनशे घरे होती. उत्तरेच्या भिंतीत बुजलेले देऊळ आढळते. त्याचे उत्खनन 1919 साली झाले व ते चालुक्य देवालय असल्याचे कळले. तेथे हिंदू स्थापत्यकलेची ओळख सांगणारी शिल्पे कोरलेली दिसतात.

मुघल बादशहा औरंगजेब १६८५-८६ या काळात सुमारे वर्षभर या किल्ल्यावर राहिला होता. येथेच त्याच्या टांकसाळीतून चांदीची नाणी निर्माण झाल्याचे पुरावे आढळतात. ती नाणी कोलकता येथील म्युझियममध्ये आढळतात. १७९५ ते १८१८ या काळात हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात होता. दुसरा बाजीराव पेशवा यांचा निवास या किल्ल्यावर होता. इंग्रजांनी सोलापूरवर आक्रमण करून बाजीरावाचा पाडाव मे, १८१८ मध्ये केला.

लेखी अभिप्राय

Solapur kille.

Sonali Sutkar 30/11/2019

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.