कुंडलिकचे मोहोरदार तबलाबोल!


कुंडलिक मोहोरकरचा जन्म अकलूजचा. कुटुंब पाच जणांचे. आई, वडील, कुंडलिक-त्याचे दोन भाऊ आणि बहीण. त्याचे वडील पांडुरंग ढोल, तबला बेंजो पथकात आणि लावण्यांच्या फडात वाजवायचे. आई सुमन घरकाम करायची. घरी दारिद्र्य, वडिलांना दारू पिण्याचा नाद. त्यामुळे दोन वेळचे जेवण मिळणे मुश्किल असायचे. कुंडलिकला शाळेत घातले होते, पण फी-गणवेश-पुस्तकांसाठी पैसे नसायचे.

कुंडलिकने तो सात वर्षांचा असताना बेंजो पथकात हजेरी लावली. त्यासाठी त्याला शाळा सोडावी लागली. कुंडलिक म्हणतो, “दोन पैसे घरात आले तर घर सावरले जाणार होते. शाळा सोडून बेंजो पथकात हजेरी लावण्याचा निर्णय घेतला तेव्हा आईला बरे वाटले. घरात मीच मोठा; मला ती जबाबदारी उचलणे गरजेचेच होते.”

कुंडलिकला बेंजो पथकात दिवसाचे पाच रुपये मिळायचे. तो पथकात खुळखुळा वाजवायचा. तो पथकाबरोबर इतर गावांमध्येही जायचा. तो इतर वाद्ये वाजवण्यास शिकला. कुंडलिक सांगतो, “माझ्या वडिलांनी वा मी देखील वाद्य वाजवण्याचे शिक्षण घेतले नाही. पथकात दाखल झालो नि ही कला म्हणजे त्याल्या स्वत:ला लाभलेली नैसर्गिक देणगीच असल्याची जाणीव झाली. ढोल वाजवण्याचे ज्ञान अवगत झाल्यानंतर मी जागरण-गोंधळ पार्टीत प्रवेश केला. तेथे शंभर-दोनशे रुपये मिळू लागले.”

अकलूजमध्ये सुरेखा पुणेकरांचा फड आला होता. कुंडलिकचा पाहुणा त्या फडात काम करत होता. त्याने कुंडलिकला तबला वाजवण्यास सांगितले. कुंडलिकने तेथे तबला वाजवला. सुरेखा पुणेकर यांना त्याचे तबला वादन आवडले. त्यांनी कुंडलिकची कामाप्रती असलेली तळमळ व प्रामाणिकपणा यांची साक्ष पटल्यावर त्याला कार्यक्रमात तबला वाजवण्यास सांगितले. त्या कार्यक्रमात कुंडलिकच्या तबलावादनाला प्रेक्षकांची दाद मिळाली आणि पुणेकरांच्या पार्टीत कुंडलिकची वर्णी लागली!

पुणेकरांबरोबर कुंडलिकने अनेक कार्यक्रम केले. त्यानंतर त्याने माया जाधव यांच्या पार्टीत हजेरी लावली. तेथे त्यांना हजेरीला अडीचशे रुपये मिळायचे. मायाबाईंच्या पार्टीचे कार्यक्रम मुंबई-पुण्यात व्हायचे. तेथेही त्याचे बरेच कौतुक झाले. पण अकलूजवरून पुण्याला जायचे म्हटले तर सत्तर रुपये तिकीट. कुंडलिकला तो खर्च परवडेना. त्याने पुन्हा पुणेकरांची पार्टी पकडली. सुरेखाबाईंनी त्याला मासिक पगार पाच हजार रुपये दिला. कुंडलिकने त्यांच्यासोबत जवळपास साडेतीनशे कार्यक्रम केले.

दरम्यान, त्याची ओळख संगीतकार बाळासाहेब माने यांच्याबरोबर झाली, ती योगायोगाने. कुंडलिक अकलूजमधील महाविद्यालयाच्या गॅदरिंगमध्ये तबला वाजवत होता तेव्हा.

कुंडलिक सांगतो, “मानेसर मला देवासारखे भेटले. त्यांनी मला पाच वर्षे तबलावादनाचे प्रशिक्षण दिले. त्यांच्यामुळेच माझ्या वादनाचा अडाणी बाज गेला. पूर्वी मी तबला वाजवायचो. आता मी ते वादन मनापासून अनुभवतोही. त्यांनी दिलेल्या प्रशिक्षणामुळे मला माझी नव्याने ओळख झाली.” 

कुंडलिकविषयी बाळासाहेब माने म्हणतात, “कुंडलिकला मी पहिल्यांदा तबला वाजवताना पाहिलं तेव्हा मी स्वतःला त्याच्यात पाहिले. माझी संगीतक्षेत्रातील सुरुवातीची धडपड मला आठवली.”

कुंडलिक पंधराएक वाद्ये वाजवतो. ढोलकी, हार्मोनियम, तबला, संबळ, ड्रम, ट्रिबल, दिमडी, हलगी, बासरी, पखवाज, थाप ढोल, ताशा... कुंडलिक सांगतो, “बेंजो पथकात जागरण-गोंधळ पार्टीत इतर लोकांची निरनिराळी वाद्ये यायची. ती थोडा वेळ वाजवत बसायचो. तेथे कोणी शिकवणारे नव्हते. इतर कोणी वाजवत असायचे, तेव्हा त्याची लय, ताल डोक्यात साठवून ठेवायचो. हातात वाद्य आले की माझी रिहर्सल सुरू व्हायची! असे करून करूनच एकेक वाद्य शिकत गेलो. मानेसरांच्या संपर्कात वाद्ये वाजवण्यात पारंगत झालो.”

मुंबईत ताज हॉटेलमध्ये महाराष्ट्राची लावणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कुंडलिक त्या कार्यक्रमात लता पुणेकरांच्या पार्टीच्या माध्यमातून सहभागी झाला होता. त्या कार्यक्रमास प्रसिद्ध ड्रमर आनंदन शिवमणी आले होते. त्यांनी कुंडलिकचे तबलावादन ऐकून त्याला त्यांच्या ड्रमरसोबत तबला वाजवण्यास सांगितले. त्यांनी ऱ्हिदम लावला. कुंडलिकनेही त्यांना तबल्यावर साथ देण्यास सुरुवात केली. मात्र शिवमणींच्या ड्रमर्सनी काही वेळातच कुंडलिकसमोर हार पत्करली! कुंडलिक म्हणतो, “शिवमणी यांच्याकडून झालेले कौतुक माझ्यासारख्या अडाणी माणसासाठी फार मोलाचे आहे. कलेतील दिग्गज माणसाकडून पहिल्यांदाच कौतुकाचे बोल ऐकायला मिळाले होते!” त्याचा डावा हात काही वर्षांपूर्वी स्कूटरवरून पडून फ्रॅक्चर झाला होता. डॉक्टरांनी प्लास्टर सव्वा महिना ठेवायला सांगितले होते. पण घरी कोणी न कोणी कोणत्या न कोणत्या कार्यक्रमात वाजवण्यासाठी त्याला बोलावायला यायचे. आई-वडील म्हणत, “अरे, असा घरी बसलास तर घर कसे चालायचे?” पंधरा दिवसही झाले नव्हते. कुंडलिकने हाताचे प्लास्टर काढून टाकले नि कार्यक्रमाला जाण्यास सुरूवात केली. त्यावेळी त्या दुखऱ्या हातानेही त्याला चांगली साथ दिली. त्याचा हात त्या अपघातानंतर थोडा वाकडा आहे. पण त्यामुळे त्याच्या वादनात काही फरक पडत नाही.

कुंडलिकचे दोन्ही भाऊदेखील बेंजो पार्टीत काम करतात. त्याच्या बहिणीचे लग्न व्हायचे आहे. तो सध्या ‘सागर कला केंद्रा’त वादकाचे काम करतो. त्या कामातून त्याला शेदोनशे तर कधी अधिकचे पैसे मिळतात. पण कर्जाचा फेरा चुकत नाही! “आम्ही सगळे अशिक्षित. शिक्षण असते तर चांगले पैसे कमावता आले असते. पुरेसा पैसा घरी देता येत नसल्याने घर उसनवारीवर चालत आले. एका ठिकाणी काम करायचे. तेथे उचल घ्यायची. घेतलेली उचल पूर्ण केली की दुसरीकडे काम बघायचे. पुन्हा घरच्या अडचणी. पुन्हा उचलवारी...” कुंडलिक हताश होऊन सांगतो. काही क्षण तो शांत राहतो. पुन्हा थोडा सावध होऊन म्हणतो, “उसनवारी असली तरी कलेच्या जोरावर मी घर बांधले. तीच काय ती मोठी मिळकत!”

कुंडलिकला तीन मुले - विनायक, ज्ञानेश्वर व पुरूषोत्तम. विनायक व ज्ञानेश्वर दुसरीत तर पुरूषोत्तम बालवाडीत जातो. त्याच्या मुलांनी भरपूर शिकावे. अडाणी राहू नये. चांगला नोकरीधंदा करावा एवढीच कुंडलिकची इच्छा आहे.

कुंडलिक मोहोरकर - 8600607758

- अर्चना राणे

Last Updated On - 24 th June 2016

लेखी अभिप्राय

Best of luck sir of future life

अज्ञात24/06/2016

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.