सोलापूरच्या चार हुताम्यांपैकी एक - जगन्नाथ शिंदे

प्रतिनिधी 15/05/2015

हुतात्मा जगन्नाथ भगवान शिंदे यांचे वास्तव्य सोलापूरच्या दक्षिण कसबा परिसरातील शिंदे चौकात होते. ज्या चार हुतात्म्यांच्या बलिदानाने सोलापूर शहर स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात अजरामर झाले, त्यांपैकी शिंदे हे एक होत.

जगन्‍नाथ शिंदे रेल्वे कामगार आणि गिरणी कामगार संघटनांत कार्यरत होते. काँग्रेसप्रणीत युवक संघाचे सचिव, तालीम संघाचे सभासद होते. 'कर्मयोगी' साप्ताहिकाचे संपादक रामभाऊ राजवाडे यांचे ते खंदे समर्थक म्हणून ओळखले जायचे. ते सार्वजनिक उत्सवात सक्रिय असत. त्यांनी गरीब मराठा मुलांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळावी म्हणून परिश्रम घेतले. लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी, बार्डोली विजयदिन, १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धाचा स्मृतिदिन साजरा करण्याच्या निमित्ताने पारतंत्र्याविषयीची चीड व स्वातंत्र्याविषयी प्रेम आणि ते व्यक्त करण्यासाठी ते लोकांना आवाहन करायचे. ब्रिटिशांनी १९१० च्या प्रेस अॅक्टमध्ये जाचक कलमांचा समावेश करण्याचा घाट घातला होता. त्यानुसार २७ एप्रिल १९३० मध्ये व्हॉईसरॉय लॉर्ड आयर्विन यांनी वटहुकूम जारी केला. त्याचा निषेध करण्यासाठी ३० एप्रिल १९३० रोजी जगन्नाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. त्या सभेत शिंदे यांनी त्यांची भूमिका मुद्देसूद मांडली व त्या वटहुकमाने वृत्तपत्रांची मुस्कटदाबी कशी होणार आहे, याची माहिती त्यांनी सोप्या भाषेत नागरिकांना दिली. एवढेच नव्हे, तर  त्याविरुद्ध लढण्याचे आवाहन केले.

मिठाचा सत्याग्रह सुरु झाल्यापासून सोलापूर शहरात दररोज सभा व्हायच्या. वक्त्यांच्या भडक भाषणांमुळे लोकांच्या भावना भडकायच्या. त्यातूनच हिंसाचार झाला. त्यामुळे ते ब्रिटिश सरकारच्या रोषाला बळी पडले आणि त्यांना फासावर जावे लागले. त्या प्रखर देशाभिमानी हुतात्म्याच्या पदस्पर्शाने हा परिसर अजरामर ठरला आहे.

हुतात्मा जगन्नाथ ज्या वास्तूमध्ये राहत ती मोडकळीस आली आहे. तेथे कोणी वास्तव्याला नाही. त्यांना स्वत:ला अपत्य नव्हते. त्यांच्या भगिनी ताराबाई शिक्षिका होत्या. त्या पुण्यात आहेत. त्यांच्या पत्नी राहीबाई यांचे माहेर बार्शी तालुक्यातील शेंद्री गावी होते. शिंदे चौक परिसरात त्यांची भाऊबंदकी आहे. हुतात्मा जगन्नाथ शिंदे यांच्या कर्तृत्वामुळे शिंदे चौक असे नाव पडल्याच्या आठवणीला नव्या पिढीतील त्यांच्या भावकीतील दत्ता शिंदे उजाळा देतात.

जमनालाल बजाज आणि वीर नरीमन यांना अटक झाल्याची वार्ता सोलापुरात ८ मे १९३० साली धडकली. त्यातून हिंसाचार झाला. त्यावेळी युवक संघाने मिरवणूक काढली. त्यामध्ये जगन्नाथ शिंदे, कवी कुंजविहारी, तुळशीदास जाधव, मल्लप्पा धनशेट्टी, शेठ गुलाबचंद वगैरे सहभागी झाले होते. जमावातील काही लोक रुपाभवानी परिसरात शिंदीची झाडे तोडण्यासाठी गेले. त्यावेळी हिंसाचार, गोळीबार झाला. त्यात शिंदे यांचा सहभाग नव्हता तरी सरकारच्या रोषाला ते बळी पडले आणि त्यांना फासावर जावे लागले. केवळ देशप्रेम हाच अपराध मानून ब्रिटिशांनी त्यांना पंचविसाव्या वर्षी फासावर लटकवून दहशत बसवण्याचा प्रयत्न केला.

- विलास जळकोटकर-महेश कुलकर्णी.

जगन्नाथ शिंदे यांच्या कार्याचे सदोदित स्मरण राहवे म्हणून सतीश निकम यांच्या पुढाकारातून 'हुतात्मा तरुण मंडळा'ची स्थापना १९६५ साली करण्यात आली. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, युवकांच्या कलागुणांना उत्तेजन या हेतूने विविध उपक्रम राबवले जात. आजही ती परंपरा सुरू आहे. नव्या पिढीतील गणेश सतीश निकम, राम अनिल जाधव, रवी प्रकाश निकम यांच्या मार्गदर्शनाखाली जोमाने कार्य सुरू आहे.

(मूळ लेख दैनिक 'लोकमत') छायाचित्रे solapurdarshan.blogspot.in वरून साभार.

लेखी अभिप्राय

अतिशय उत्तम माहिती.त्यांच्या वारसांची माहिती दया.

सुनील जोशी06/03/2017

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.