धामणगावचे माणकोजी महाराज बोधले


बालेघाटाच्या पायथ्याला नागझरी नदीतीरावर वसलेले छोटेसे गाव म्हणजे धामणगाव. धर्मेश्वराच्या प्राचीन मंदिरावरून त्या गावास धार्मण्यपूर असे नाव पडले. त्याचा अपभ्रंश झाला धामणगाव. त्याच गावात श्री संत माणकोजी बोधले महाराजांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव भानजी आणि आईचे नाव पार्वतीबाई. त्यांना बंधू होते - त्यांचे नाव शिवाजी. शिवाजी हे पंढरीचे वारकरी तर माणकोजी युद्धकलेतील तरबेज धारकरी. माणकोजी यांनी काही रांगडे तरुण जमा केले. त्यांना युद्धाचे शिक्षण दिले आणि तत्कालिन मुस्लिम राजवटीच्या अन्यायाविरुद्ध लढा सुरू केला, अत्याचार करणाऱ्या यवनाला पंचक्रोशीतून हुसकावून लावले आणि पंचक्रोशीत त्यांची स्वत:ची सत्ता स्थापन केली.

एकदा माणकोजी त्यांच्या दादाबरोबर पंढरीला गेले. त्यांनी पंढरी पाहिली, विठोबाचे दर्शन घेतले. तेथील सुखसोहळा पाहिला अन् ते त्या सुखसागरात पूर्ण बुडून गेले. त्यांना जगाचा विसर पडला; ‘देहीच विदेही’ अवस्था प्राप्त झाली. ते विठुरायाच्या भेटीचा दृढ निश्चय करून, अहोरात्र विठ्ठलनामाचा जप करत मंदिराच्या ईशान्य ओवरीत ठाण मांडून बसले. माणकोजी अन्नपाण्याविना तीन दिवस निग्रहाने जप करत होते. त्यांचा जप चौदा दिवस चालला आणि शेवटी, त्यांना पांडुरंगाने साजिऱ्या गोजिऱ्या रूपात ‘दर्शन’ दिले! त्या अवस्थेत त्यांनी नमूद केले :

बोधला म्हणे देवा तू मज बोधीले
आवडीने ठेवीले नाम माझे

विठ्ठलाने बोध केला म्हणून माणकोजी महाराजांचे आडनाव बोधले असे पडले!

त्यांना असाही बोध झाला, की त्यांनी आता पंढरीला येण्याची गरज नाही. पांडुरंग धामणगावात आहे की! बोधले महाराज विठ्ठलमूर्ती घेऊन धामणगावी आले. संत वारकरी जमा झाले. त्यात संत तुकाराम महाराज, रामदास स्वामी यांचाही समावेश होता असे सांगतात. त्यांच्या हस्ते मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. बोधले महाराजांचे एकशेदहा अभंग सरकारी सकलसंत गाथेत आहेत. त्या काळापासून आषाढी-कार्तिकीस धामणगावात मोठा उत्सव साजरा होतो. देव एकादशीच्या रात्री पंढरीहून धामणगावी येतात असा भाविकांचा समज आहे.

 

 

पंढरीची वाट धामणगावा गेली
ऐसी सेवा केली बोधल्याने

विठ्ठलाचा पालखी सोहळा धामणगावनगरीत पाच दिवस उत्साहात साजरा होतो. पौर्णिमेला दहीहंडी फुटते. देव काला घेऊन पंढरीला निघून जातात. बोधले महाराजांचे चरित्र भक्ती विजय व बोध लिलावंती ग्रंथात उपलब्ध आहे.

बोधले महाराजांनी दुष्काळात स्वत:जवळची धान्याची पेवे लुटली, हुरड्यात आलेले ज्वारीचे पीक वारकऱ्यांना वाटले. बोधले महाराजांनी अनेक ‘चमत्कार करून’ सामान्य जिवाला भगवंताच्या अस्तित्वाची प्रचिती घडवली, मूढजनांना भक्तिमार्गाला लावले आणि जीवनकार्य पूर्ण करून शके 1616 ज्येष्ठ वद्य तृतीया या दिवशी संजीवन समाधी घेतली.

माणकोजी यांचे बंधू शिवाजीराव पुढे मराठवाड्यात निघून गेले. त्यांचे वंशज प्रकाश महाराज बोधले उस्मानाबाद जिल्ह्यात असतात. माणकोजींची परंपरा ‘धामणगावी’ चालू राहिली. बराच काळ त्यास संस्थानाचे स्वरूप आले, परंतु विद्यमान विवेकानंद बोधले यांनी ख्याती संपादन केली आहे.

- प्रधान कोरके

 

 

लेखी अभिप्राय

good

bhimrao bodhal…07/12/2018

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.